ग़ालिबची फ़ारसीतली मुशाफिरी 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

ग़ालिब जितका उर्दूचा शायर होता तितकाच फ़ारसी भाषेचाही! त्याच्या उर्दू काव्यावर, शब्दकळेवर फ़ारसीची छाया होती. या भाषेचा प्रवेश ग़ालिबच्या जन्मापासूनच त्याच्या जीवनात झाला. कारण त्याच्या वाडवडिलांची भाषाच मुळी फ़ारसी होती. ग़ालिबचे पणजोबा तरसुम ख़ान हे समरकंदमध्ये सैनिकी पेशात होते. तर त्याचे आजोबा क़ौक़ान बेग ख़ान हे १७५० च्या सुमाराला समरकंदहून भारतात आले होते. सैनिकी पेशात नशीब अजमावण्यासाठी म्हणून त्याकाळी लोक आपली भूमी सोडून इतरत्र जात असत. घरातच फ़ारसी भाषा असल्यानं तिची जवळीक ग़ालिबला बालपणापासूनचीच! मुख्य गोष्ट म्हणजे, भारतात त्याकाळी इस्लामी राजवटींमुळं फ़ारसी भाषेला खूपच महत्त्व होतं. इथली दरबारी कारभाराची, कामकाजाची भाषाच मुळी फ़ारसी होती. इतकंच नव्हे, तर ही भाषा स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनातही बेमालूमपणं मिसळून गेली होती आणि तिचे अनेक शब्द इथल्या प्रादेशिक भाषांमधून रूढ झाले होते. दरबारी वातावरणातून ती जनमानसात मिसळून गेली होती आणि दिवाणखान्यापासून माजघर-स्वयंपाकघरापर्यंत फ़ारसी भाषेतले शब्द रुळले होते आणि आज तर ते त्या त्या भाषांमधले शब्द होऊन गेले आहेत... 

फ़ारसीचं मूळ हे इराणमधलं. पण ती केवळ त्या देशापुरती मर्यादित कधीच नव्हती. प्राचीन काळात तर तत्कालीन भारताच्या पूर्वेकडील सीमांपासून, उत्तरेकडं रशियापर्यंत आणि इराणच्या खाडी किनाऱ्यापासून ते इजिप्त व भूमध्यसागराच्या प्रदेशापर्यंतच्या भागांमध्ये फ़ारसी बोलली जात होती. आज फ़ारसी भाषेचा विचार भारताच्या संदर्भात करणं, तिला भारताची भाषा म्हणणं हे विचित्र वाटेल. पण एकेकाळी काही शतकं फ़ारसी भाषेचा प्रभाव आपल्या देशावर आहे, ही वस्तुस्थिती आहे. शिवाजी महाराजांनाही कारभारात फ़ारसी भाषेचा वापर करावा लागला होता. कारण माध्यम म्हणून ती रूढ झाली होती. इथल्या राज्यकारभारात फ़ारसी भाषा स्थिरावली असल्यानं, ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांनाही याच भाषेचा वापर कारभारात अनेक वर्षं करावा लागला. अनेक गोरे अधिकारी फ़ारसी शिकून घेत आणि या भाषेला उत्तेजन देण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्नही केले. मात्र पुढं १८३५ नंतर त्यांनी फ़ारसीचा कारभारातील वापर बंद केला. त्यानंतर तिची पीछेहाट सुरू झाली आणि आता इंग्रजीच्या वापरामुळं जी वेळ इतर भारतीय भाषांवर आली आहे, ती अवस्था तेव्हा फ़ारसीची झाली. फ़ारसी, अरबी आणि खड़ी बोली यांच्या मिश्रणातून भारतात उर्दू भाषेचा जन्म झाला. यामुळंच फ़ारसी भाषेच्या ज्ञानाशिवाय उर्दूचं आकलन नीटपणं होऊ शकत नाही. तसंच इस्लामी संस्कृतीत धार्मिक ग्रंथांमुळं जरी अरबी भाषेला महत्त्व असलं, तरी फ़ारसी हीसुद्धा या संदर्भात एक महत्त्वाची भाषा आहे. मुळात अरब आक्रमणानंतर, इराण व इतर ठिकाणच्या फ़ारसी भाषेत अरबी शब्द मिसळू व स्थिरावू लागले असले आणि तिची लिपीही बदलली असली, तरी इराणच्या लोकांनी फ़ारसी भाषेऐवजी अरबी भाषेचा स्वीकार करणं पूर्णतः नाकारलं. त्यामुळं ही भाषा टिकून राहिली आणि विस्तारलीही. या टप्प्यानंतर फ़ारसी भाषेत फार मोठे बदल झाले नाहीत. त्यामुळंच फ़ारसी भाषेतील जुन्या, म्हणजे ११ व्या शतकातील काव्यरचनाही आज नव्यानं ही भाषा शिकणाऱ्यालासुद्धा बऱ्यापैकी समजू शकतात. उदाहरणार्थ उमर ख़य्याम (१०४८-११३३), हाफ़िज़ (१३१५-१३९०) किंवा सअदी (१२१०-१२९२) या फ़ारसीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींची रचना आज तितकीशी जुनी वाटत नाही. कारण फ़ारसी भाषेत काळाच्या ओघात काही बदल झाले असले, तरी तिचं स्वरूप फार बदललेलं नाही. याउलट भारतीय भाषांमध्ये जे बदल इस्लामी आक्रमणानंतर झाले, त्यामुळं इथल्या भाषांची शब्दकळा खूपच बदलली. आजच्या सामान्य मराठी माणसालाही जाणकाराच्या मार्गदर्शनाविना ‘ज्ञानेश्वरी’ सहजपणं समजू शकत नाही. इंग्रजीचं महत्त्व वाढल्यानंतर तर भारतीय भाषांमध्ये आणखीच बदल झाले आहेत. अर्थातच आजच्या फ़ारसीतही नवे शब्द आले आहेत. पण खरोखरच तिच्यात लक्षणीय बदल झालेले नाहीत. 

फ़ारसी भाषा ही ख्रिस्तपूर्व काळापासून म्हणून स्थिरावली होती आणि पहेलवी जुनी फ़ारसी अशा वळणांनी आधुनिक भाषेपर्यंतचा तिचा प्रवास झालेला दिसून येतो. इंडो-इराणी गटातली ही भाषा विशाल अशा पर्शियन साम्राज्याबाहेरही गेली आणि स्वीकारली गेली, वापरली गेली. पार्स लोकांच्या ख्रिस्तपूर्व ५५०-३३० शतकादरम्यानच्या इराणमधील राजवटीत तिचा विशेष विकास झाला, म्हणून तिला पारसी किंवा फ़ारसी असं नाव मिळालं. आजही फ़ारसी भाषा इराणप्रमाणंच अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा काही भाग इथंही बोलली जाते. उझबेकिस्तानमधील समरकंद हे तर फ़ारसी भाषेचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून जुन्या काळापासून ओळखलं जातं. भारतात ही भाषा आणली, ती मुग़ल राजवटीच्या सम्राटांनी. समरकंदवर मुग़लांचं वर्चस्व स्थापन झाल्यानंतर या फ़ारसीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि फ़ारसी भाषा त्यांनी आत्मसात करून, तिला त्यांनी कारभाराची भाषा केली. याच समरकंदमधून ग़ालिबचे आजोबा क़ौक़ानबेग ख़ान आपलं नशीब अजमावण्यासाठी म्हणून भारतात आले होते. 

००० 

ग़ालिबचा जन्म आग्रा इथला. घरात फ़ारसी भाषा असल्यानं त्याला ती मातृभाषेप्रमाणंच होती. त्यातही फ़ारसी ही त्याकाळी कारभाराची भाषा होती, तशीच ती ज्ञानभाषा, अभिजात साहित्य असलेली एक महत्त्वाची भाषा म्हणून ओळखली जात होती. उर्दू भाषेला असलेली साहित्यिक, भाषिक आणि सांस्कृतिक परंपरा ही फ़ारसी भाषेशी जवळचं नातं सांगणारी. फ़ारसी ज्याला उत्तम अवगत आहे, तो खरा विद्वान, असं समीकरणच तेव्हा रूढ होतं. त्यातही ग़ालिबचे मूळ तुर्कवंशीय पूर्वज इराण, समरकंद  अशा वाटचालीनंतर भारतात आलेले. त्यामुळं त्याला आपल्या या वारशाचा स्वाभाविक अभिमानही होता. आपल्याला ज्ञात असलेली फ़ारसी भाषा ही अस्सल आहे, इथले फ़ारसीचे जाणकार जाणतात त्या फ़ारसीत स्थानिक उर्दूची झलक उतरते, असं त्याचं मत होतं. मात्र त्याची अस्सल फ़ारसी इथल्या फ़ारसी जाणणाऱ्यांना काहीशी खटकतच होती. यामुळंच कलकत्त्याला गेला असता, ग़ालिबच्या फ़ारसीतील काव्यवाचनाच्या कार्यक्रमांमध्ये त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. ग़ालिबचं फ़ारसी काव्य हे काहींना इराणमधील शायरांच्या तोडीचं वाटत नसे. पण तरीही जागतिक फ़ारसी साहित्यात ग़ालिब हे नाव नेहमीच मोठं आणि महत्त्वाचं समजलं गेलं. त्यानं फ़ारसीत मसनवी आणि ग़ज़ल हे प्रकार खास करून हाताळले. त्याचा फ़ारसी दीवानही प्रकाशित झाला होता. ग़ालिबनं लिहिलेल्या समग्र फ़ारसी काव्याचं आकारमान हे त्याच्या उर्दूतील शायरीपेक्षा विशाल आहे, हा मुद्दाही महत्त्वाचाच. अगदी २०१० मध्येही तेहरानमध्ये इराणच्या कला व संस्कृती मंत्रालयातर्फे ग़ालिबच्या फ़ारसी काव्याचा ग्रंथ (कुल्लियात-ए-ग़ालिब) प्रकाशित करण्यात आला होता. ग़ालिब हा जागतिक फ़ारसी साहित्यजगतात ‘ग़ालिब-ए-देहलवी’ म्हणून ओळखला जातो. तर उर्दूचा महान शायर इक़बाल फ़ारसी विश्वात ‘इक़बाल-ए-लाहौरी’ या नावानं प्रसिद्ध आहे. 

ग़ालिबच्या फ़ारसीतील लिखाणाचा धावता परिचय करून घेण्याआधी, त्याला असलेलं फ़ारसीचं ज्ञान आणि बालपणापासून त्याला असलेला या भाषेचा सहवासही लक्षात घ्यायला हवा. बालपणी त्यानं आग्रा इथं तिथला प्रसिद्ध शायर नज़ीर अकबराबादी याच्याकडं फ़ारसीचे प्राथमिक धडे गिरवले होते आणि फ़ारसीच्या जाणकारीत आणि व्यासंगांत शिष्य गुरूला मागं टाकून पुढं निघून गेला... ग़ालिबनं मुल्ला अब्दुल समद या फ़ारसी भाषेच्या एका पंडिताकडूनही या भाषेचं शिक्षण घेतलं होतं. हा मूळचा इराणचा रहिवासी होता. तो मूळचा यहुदी होता आणि त्यानं मुस्लीम धर्म स्वीकारला होता, असं म्हणतात. लहान वयातच तो फ़ारसीत काव्यरचना करत असे आणि त्याचा त्यातील हातखंडा वाखाणण्याजोगा होता. तो सात-आठ वर्षांचा असतानाचा एक किस्सा सांगितला जातो... आग्र्याच्या एका गल्लीत मित्रांबरोबर ग़ालिब खेळत होता. तिथून एक वयस्क माणूस चालला होता आणि त्यांच्या खेळात व्यत्यय येत होता. तेव्हा ग़ालिब वैतागून एकदम त्याच्यावर खेकसला आणि म्हणाला, ‘ए म्हाताऱ्या, जरा तिकडून जा.’ त्या माणसाला अर्थातच राग आला. पण आपल्याला ‘म्हातारा’ म्हटलं, म्हणून त्याला जास्त राग आला होता. तो ग़ालिबच्या काकांकडं तक्रार घेऊन गेला. काकांनी ऐकून घेतलं आणि ग़ालिबला समजावलं, की असं मोठ्या माणसाला बोलू नये. म्हातारा म्हणणं चुकीचं आहे. ते ज्येष्ठ आहेत, बुज़ुर्ग आहेत. त्यावर ग़ालिब पटकन उत्तरला, मी म्हटलं तेच बरोबर आहे. ते तर नुसते म्हातारेच आहेत. मोठा माणूस नाहीत. आपल्या बोलण्याच्या पुष्टीसाठी त्यानं काकांना एक फ़ारसी शेरही ऐकवला - 
बुज़ुर्गी बा अक़्ल अस्त न बा साल 
तवानगिरी बा दिल अस्त न बा माल 

याचा अर्थ असा, ‘श्रेष्ठता किंवा मोठेपण हे ज्ञानामुळं ओळखलं जातं, वयामुळं नव्हे. श्रीमंती ही मनाच्या विशालतेवरून ठरते, धनामुळं नव्हे.’ ऐकून काका हसले आणि त्यांनी त्या माणसाला काहीतरी सांगून शांत केलं. ग़ालिबनं केलेला युक्तिवाद बिनतोड होता... आग्रा इथं असतानाच ग़ालिबनं केलेल्या फ़ारसी काव्यरचनेतील एका शब्दाच्या अर्थाबाबत त्याचे शिक्षक मौलवी मुअज़म यांनी आक्षेप घेतला, तेव्हाही ग़ालिबनं फ़ारसीचा प्रख्यात शायर ज़हुरी यानं हा शब्द त्याच अर्थानं कसा वापरला होता, त्याचं उदाहरण देऊन आपला व्यासंग दाखवून दिला होता. लग्नानंतर वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी ग़ालिब दिल्लीला आला होता हे बघता, त्यानं फ़ारसी भाषेवर किती लहान वयात प्रभुत्व मिळवलं होतं, हे लक्षात येतं. असं असलं, तरी ग़ालिब उर्दू काव्यरचनेमुळं अधिकाधिक लोकांपर्यंत पोचला आणि आजही तो वाचला जातो. 

ग़ालिबच्या उर्दू रचनांवर फ़ारसी भाषेचा प्रभाव दिसून येतो. त्याच्या सुरुवातीच्या रचना अधिक फ़ारसीप्रचुर होत्या. नंतर त्यानं सामान्य लोकांच्या उर्दूत लिहायला सुरुवात केली. त्याची शब्दकळा फ़ारसी संस्कार असलेली असल्यानं त्याच्या वापरात फ़ारसीतले सामासिक शब्द येतात, त्याचप्रमाणं फ़ारसीतली ‘ता’ (म्हणून) सारखी काही अव्ययं, शबहा, बारहा अशी फ़ारसी पद्धतीनं केलेली बहुवचनं वारंवार आढळतात. काही फ़ारसी शब्दांचा उर्दूतला उच्चार व अर्थ वेगळा आहे. याबाबतीत मात्र ग़ालिब उर्दूतल्या रूढ गोष्टी अनुसरताना दिसतो. उदाहरणार्थ, ‘क़ज़ा’ हा शब्द फ़ारसीत दुर्घटना तर उर्दूत मृत्यू या अर्थानं वापरला जातो. तर ग़ालिब मृत्यू हा अर्थ वापरतो. तेच ‘बाज़ीचा’ शब्दाबाबत. फ़ारसीत त्याचा अर्थ आहे, खेळ किंवा लहान खेळ. तर उर्दूतला अर्थ आहे, खेळाचं मैदान. अशी बरीच उदाहरणं सांगता येतील... 

ग़ालिबची बनारसवरील मसनवी ‘चिराग़-ए-दैर’ (वर्णनपर दीर्घकाव्य) हा त्याच्या लेखनशैलीप्रमाणंच उदार धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनाचाही पुरावा आहे. मलिक मोहम्मद जायसीच्या ‘पद्मावत’प्रमाणं ग़ालिबचं हे काव्य खूप लोकप्रिय झालं. ग़ालिबनं लिहिलेल्या एकूण मसनवींची संख्या अकरा भरते. ‘चिराग़-ए-दैर’ ही त्यानं लिहिलेली तिसरी मसनवी आहे. या मसनवीत ग़ालिबला वाटत असलेलं बनारस शहराबद्दलचं प्रेम ठायी ठायी दिसून येतं. त्याच्या अकरापैकी या चार मसनवी विशेष प्रसिद्ध आहेत - चिराग़-ए-दैर, अब्र-ए-गुहर, तक़रिज़-ए-आईन-ए-अकबरी आणि आस्तीनामा. काहींचं उर्दू भाषांतरही झालं होतं. 

ग़ालिबला स्वतःला आपण लिहिलेलं फ़ारसी काव्य हे उर्दू रचनांपेक्षा उजवं वाटत असे आणि तो ते तसं उघडपणं बोलूनही दाखवत असे. ‘उर्फ़ी हा (शायर) शिराज़चा होता, म्हणून तुम्ही दबून जाऊ नका. ज़ुलाली हा ख़्वानसारचा होता, म्हणून त्याच्या आहारी जाऊ नका. माझ्या कल्पनांच्या सोमनाथला भेट द्या. म्हणजे तुम्हाला दिसतील, माझ्या आत्मप्रकाशानं उजळून निघालेल्या भुवया, पवित्र धाग्यानं वेढलेले माझे खांदे’ असं ग़ालिब एका फ़ारसी शेरमध्ये स्वतःच्या फ़ारसी काव्याबद्दल म्हणतो. 

ग़ालिबची फ़ारसी भाषेतली पत्रंही लक्षणीय आहेत आणि त्यातून असलेली साहित्यविषयक, धर्मविषयक चर्चा त्याच्या एकूण धारणांची कल्पना देते. पण १८५७ मधील सैनिकी उठावानंतर झालेल्या दिल्लीतील वाताहतीच्या वातावरणाचा लेखाजोखा मांडणारं त्याचं ‘दस्तंबू’ हे फ़ारसीतील पुस्तक विशेष उल्लेखनीय आहे. ते दैनंदिनीसारखं आहे आणि गद्यात लिहिलेलं आहे. १० मे १८५७ रोजी मेरठला शिपायांनी बंड केलं आणि तिथून ते दिल्लीला आले. ११ मे १८५७ या दिवशी दिल्लीचे दरवाजे त्यानी उघडायला लावले. त्यानंतर दिल्लीत जे झालं, जो हिंसाचार, तोडफोड आणि गोंधळ झाला त्याचं वर्णन तर ग़ालिब यात करतोच, पण विस्कळीत झालेलं जनजीवन, इंग्रजांकडून मुसलमानांची झालेली कत्तल आणि गोऱ्यांनाही सोसावे लागलेले त्रास वगैरे गोष्टींविषयीही ग़ालिबनं यात लिहिलं आहे. त्या दिवसांचा एक आलेखच ‘दस्तंबू’मध्ये त्यानं मांडला आहे. ‘दस्तंबू’विना ग़ालिबची ओळख तशी अपुरीच...

संबंधित बातम्या