दिल्लीची दारुण दुर्दशा 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

दिल्लीत बंडखोर शिपायांचा प्रवेश झाल्यापासूनच्या परिस्थितीचा अहवाल ग़ालिबनं आपल्या ‘दस्तंबू’ या रचनेत नोंदवला आहे. त्याच्या आसपास घडणाऱ्या घडामोडी, व्यक्तिगत अनुभव, दिल्लीकरांपुढले प्रश्न व अडचणी असा अनेक गोष्टींचा वेध ग़ालिबनं यात घेतला आहे. ११ मे १८५७ ते ऑगस्ट १८५८ असा कालखंड दिल्लीसाठी कसा होता, याचं वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं. एखाद्या सामान्य वाचकाला ही दैनंदिनी किंवा रोजनिशी वाटेल. पण त्यात दिल्लीत घडलेल्या घटनांबद्दल क्रमवार पद्धतीनं वाचायला मिळतं. इतिहासाचा एक भाग म्हणूनही याकडं पाहता येईल. ग़ालिबचा जो पेन्शनचा प्रश्न होता, त्याच्याशीही या लिखाणाचा संबंध कसा पोचतो, हेही लक्षात घ्यायला हवं. १८२८ पासून ग़ालिब आपल्या समस्येची तड लावण्याच्या मागं होता आणि १८५७ च्या जानेवारी महिन्यात त्याला जे उत्तर मिळालं होतं, त्यातून त्याची आशा पल्लवित झाली होती. पण लवकरच मे महिन्यात गोऱ्यांविरुद्धचा शिपायांचा संघर्ष सुरू झाला आणि सगळी स्थितीच बदलून गेली. आपला या साऱ्या उठावाशी संबंध नव्हता, हेही ग़ालिबला दाखवून द्यायचं होतं. असं केल्यानं आपल्यावर सरकारविरोधी अशा शिक्का बसणार नाही आणि आपला पेन्शनचा प्रश्न मिटेल, असं त्याला वाटत होतं. कारण त्या काळात दिल्लीतील रहिवाशांवर, त्यातही मुसलमानांवर गोऱ्यांनी दात ठेवला होता आणि बंडखोरांना कुणी मदत करत आहे अशा संशय आला, की त्याला चौकशीसाठी बोलावून कित्येकदा तुरुंगात टाकलं जाई. कित्येकांना फासावरही लटकावण्यात आलं होतं. ग़ालिबला स्वतःला या बंडखोरांबद्दल मनातून सहानुभूती होती. त्याच्या पत्रांमधून याचं प्रतिबिंब उमटत असे. पण त्यानं त्यांना मदत अशी केली नव्हती आणि त्याची स्थितीही अशी नव्हती, की तो त्यांना साह्य करू शकेल. उलट त्यालाच जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं... 

एका बाजूनं ग़ालिबनं ‘दस्तंबू’ लिहिला, तो टिकून राहण्यासाठी. पण त्यानं यात नोंदवलेल्या घटना या खऱ्याच होत्या. हिंसाचार त्यानं डोळ्यांनी पाहिला होता. त्याचा स्वतःचा भाऊ याच काळात आपल्या घरात मरण पावला, तेव्हा बातमी मिळताच, ग़ालिबनं तिथं जाऊन आणि स्वतः कबर खोदून त्याचे अंत्यसंस्कार केले होते. याबाबत असंही म्हटलं जातं, की ग़ालिबच्या या भावाला इंग्रजांनी गोळी घालून मारलं होतं. शहरात गोळीबार सुरू झाल्यावर ग़ालिबचा हा स्किझोफ्रेनिक बाऊ बिथरला आणि बाहेर काय चाललंय ते बघायला घराबाहेर पडला आणि त्याला गोळीनं टिपलं. पण ग़ालिबनं याचा थेट उल्लेख कधी केला नाही. ना ‘दस्तंबू’त ना एखाद्या पत्रात. उलट आजारी होऊन हा भाऊ गेल्याचं सांगायला त्याचा नोकर कसा आला व आपण तिकडं कसे गेलो अशा पद्धतीनं या घटनेचा त्यानं उल्लेख केला. या संदर्भात ग़ालिबला काहीजण दोषही देतात. पण त्याची मजबूरीही यात दिसते. गडबडीच्या काळात घराबाहेर न पडलेला ग़ालिब भावाला पुरण्यासाठीच पहिल्यांदा बाहेर पडला असावा. एक दुर्दैवी अनुभव... 

ग़ालिबची उर्दू कविताही या काळात गहाळ झाली होती. याला कारण, त्याची शायरी उतरवून घेणारे व तिच्या नकला बनवणारे नवाब ज़ियाउद्दीन ख़ान आणि नवाब हुसैन मिर्ज़ा यांची घरं लुटली गेली आणि त्यात ग़ालिबच्या साऱ्या कविता हरवल्या. या दोघांचा मोठा ग्रंथसंग्रहही नष्ट झाला. ‘मी माझ्या कवितांसाठी तरसतो आहे,’ असं ग़ालिबनं आपला मित्र मिर्ज़ा हातिम अली मेहर याला एका पत्रात लिहिलं होतं. या काळात ग़ालिबला एकदा पोलिसांनी चौकशीसाठी पकडूनही नेलं होतं आणि त्यावेळी त्यानं चतुराईच्या बोलण्यातून आपली सुटकाही करून घेतली होती. ‘तुम मुसलमान हो?’ या प्रश्नाला ‘आधा मुसलमान’, असं उत्तर त्यानं दिलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण देताना, ‘शराब पीता हूँ, सुअर नहीं खाता’, असं सांगून अधिकाऱ्याचं मनोरंजन केलं होतं.. 

ज़फ़र हा तेव्हा खरं तर जुन्या दिल्लीपुरता बादशाह होता. नावाचाच हिंदुस्तानचा बादशाह. पण बंडानंतर त्याचं महत्त्व वाढलं. बादशाहच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काढलेल्या शिक्क्यावर (सिक्का) कोरण्यासाठी बहादूरशाह ज़फ़र याची स्तुती करणारा मजकूर ग़ालिबनं लिहिला होता. त्यावर फ़ारसी भाषेत लिहिलेला मजकूर असा होता,
बर ज़री आफ़ताब ओ नुक़्रा-ए-माह
सिक्का ज़द दर जहान बहादूर शाह
याचा अर्थ, ‘सूर्याकडील सुवर्ण आणि चंद्राकडील चांदीवर बहादूरशाहने हा सिक्का कोरला आहे.’ इतकंच नव्हे, तर १८५७ च्या जुलै महिन्यात ग़ालिबनं दरबारात हजेरी लावून, आग्रा शहर भारतीयांच्या ताब्यात आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ एक क़सीदा, म्हणजे प्रशंसागीत लिहिलं होतं. तसंच पुन्हा पुढच्याच महिन्यात, म्हणजे ऑगस्टमध्येही एक स्तुतिगीत बादशाहला पेश केलं होतं. त्याबद्दल ग़ालिबला मानाची वस्त्रंही मिळाली होती. पण हे सगळं तात्पुरतं ठरण्याची वेळ आली. कारण २० सप्टेंबर १८५७ रोजी बहादूर शाहला इंग्रजांनी अटक केली आणि नंतर त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. (हे सिक्का प्रकरण ग़ालिबला भोवलं. कारण काही काळ त्याचं पेन्शन बंद करण्यात आलं होतं.) मधल्या काळात काही दिवस बादशाह हुमायूनच्या कबरीच्या जागी लपला होता. पण त्याचा शोध घेण्यात आला. त्याच्यावरचा खटला ४१ दिवस चालला. आधी तो कलकत्त्यात होणार होता, पण तो पार पडला दिल्लीच्याच लाल किल्ल्यात. बंडखोरांना जाऊन मिळाल्याचा आणि मदत केल्याचा आरोप बादशाहवर ठेवला गेला. त्यानं स्वतःला भारताचा सम्राट घोषित केल्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला. अखेरीस बादशाहला दिल्लीपासून दूर, देशाच्या बाहेर असलेल्या रंगूनला पाठवण्यात आलं. इथं बादशाहच्या समर्थनार्थ आणखी उद्रेक होऊ नये, याची काळजी इंग्रजांनी घेतली होती... वास्तविक १८५७ चं बंड हा काही एखाद्या निमित्तानं घडलेला उठाव नव्हताच. इंग्रजांमुळं गांजलेल्या जनतेच्या मनात एक असंतोष आधीपासूनच होता. बरीच वर्षं तो खदखदतच  होता. गोऱ्यांच्या राजवटीत भारतीय संस्कृती, भाषा यांना असलेलं महत्त्व कमी होत चाललं होतं आणि परंपरांना अर्थ उरला नव्हता. विद्वान म्हणून ओळखले जाणारे या राजवटीत जणू निरक्षर ठरत होते. अनेक राज्यं इंग्रजांच्या घशात चालली होती. पारंपरिक कला, कारागिरी यांनाही वाईट दिवस आले होते. म्हणूनच मुख्यतः उत्तर आणि मध्य भारतातील वेगवेगळ्या स्तरांमधले लोक या बंडात सामील झाले होते. किंबहुना काही ठिकाणी तर हे सैनिकी बंड होण्याआधीच लोकांनी उठाव करायला सुरुवात केली होती... 

या काळात जे पाहिलं, त्यामुळं ग़ालिब विषण्ण नक्कीच झाला होता. आपला मित्र मीर मेहदी हुसैन मजरूह याला ऑक्टोबर १८५८ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ग़ालिबनं लिहिलं आहे, ‘मियाँ क्या बातें करते हो? मैं किताबें कहाँ से छपवाता! रोटी खाने को नहीं, शराब पीने को नहीं, जडे आते हैं, लिहाफ़-तोशक की फ़िक्र है; किताबें क्या छपवाऊँगा?’ सारं आयुष्यच विस्कटल्यामुळं झालेली ही दुर्दशा संपूर्ण दिल्लीलाच लागू होत होती. तिचंच चित्र ‘दस्तंबू’मध्ये वाचायला मिळतं. इंग्रजांची दहशत, निरपराधांची झालेली कत्तल अशा अनेक गोष्टी वाचताना मनाला वेदना होतात... 

या सगळ्या पार्श्वभूमीवरचा ग़ालिबनं दिल्लीत घेतलेला प्रत्यक्ष अनुभव दाहक होता. या उद्रेकाची आणि त्यानंतरच्या अल्पकालीन नियोजित विरोधांची कहाणी या ‘दस्तंबू’मध्ये येते. दिल्लीचा एक रहिवासी म्हणून त्यानं जे पाहिलं ते त्यानं लिहिलं आहे. हे करताना, त्याला कसरत करावी लागली. जरी तो इतिहासाला टिपण्याचं काम करत होता, तरी त्या काळात याप्रकारचं लिखाण करण्यात धोका होताच. कारण इंग्रजांना जरा जरी संशय आला असता, तरी त्याला कदाचित जीवही गमवावा लागला असता. एकाच बाजूनं ग़ालिबनं लिहिलं आहे आणि त्याला ठोस पुरावा नाही, किंबहुना कागदपत्रांचा पुरावा नाही, अशा प्रकारची टीका नंतर त्याच्यावर काही इंग्रज अधिकाऱ्यांनी केलीही. म्हणूनच ग़ालिबनं बरेच टिकाणी सूचक स्वरूपात लिहिलं आहे. अस्सल फ़ारसी भाषेत व विशिष्ट औपचारिक शैलीत त्यानं हे लिखाण केलं. या लेखनात संवेदनशीलता आहे आणि मानवी चेहऱ्याचा स्पर्शही. ज्यांना खूप सोसावं लागलं, बरचसं गमवावं लागलं, त्यांच्याबद्दलची सहानुभूती, सहवेदना यात दिसून येते. आपला हेतू साध्य करण्यासाठी तो हे लिहीत होताच, पण या लिखाणात त्याचं अंतरंग उलगडून समोर येतं. त्यात सच्चेपणाही आहे. आत्मा गमावून केलेलं हे लिखाण नाही. परिस्थितीच अभूतपूर्व अशी होती. दिल्लीचा पाडाव झाला होता. इंग्रजांचं वर्चस्व सिद्ध झालं होतं. अफवाही बऱ्याच होत्या आणि साऱ्या जरी खऱ्या ठरल्या नसल्या, तरी त्यांची सत्यता पटावी, असंच वातावरण होतं. तसंच काही प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहेत, असं पसरलं होतं. त्यात जामा मशीद पाडणार, फ़तेपूर मशिदीच्या जागी लष्करी तळ येणार, आणखी कुठे तरी बेकरी होणार वगैरे वार्ता कर्णोपकर्णी जात होत्या. शाही महालही इंग्रजी अधिकाऱ्यांसाठी वापरला जाणार आणि एक हॉस्पितळही तिथं उभं राहणार असं ही बोललं जात होतं... ग़ालिब लिहितो, ‘पाच तऱ्हेच्या फौजा, एका पाठोपाठ एक करत, शहरावर चाल करून आल्या होत्या. पहिली होती बंडखोरांची, जिनं तिनं नागरिकांना लुटलं; दुसरी खाकी फौज (इंग्रजी) जिनं माणसांचे जीव, मालमत्ता, सन्मान, घरं सगळंच लुटलं; तिसरी म्हणजे दुष्काळ. त्यानं हजारोंना नष्ट केलं; ज्यांना खायला मिळालं, त्यांना चौथ्या फौजेनं, कॉलरानं मारलं; तर पाचवी फौज होती साथीच्या तापाची, जिनं लोकांची सहनशक्ती आणि ताकद संपवलीच.’ 

............................ 

‘दस्तंबू’ या शब्दाचा अर्थ आहे पुष्पगुच्छ. ग़ालिबच्या या पुष्पगुच्छात मात्र काट्यांचा स्पर्श अधिक आहे. मनाला स्पर्श करणारं हे लेखन एक अनोखा लेखनप्रकार बनून समोर येतं. पुस्तक जरी गद्यात असलं, तरी यात ग़ालिबनं कविताही दिल्या आहेत. फ़ारसी भाषेचा एक वेगळाच नूर या लेखनात अवतरतो. १८५७ च्या घडामोडींबरोबरच यात ग़ालिबच्या आयुष्यातली वेदनाही दडलेली आहे. दिल्लीसारख्या एका मोठ्या आणि प्रसिद्ध शहराची दुर्दशा कशी झाली, याचा आँखों देखा हाल यात वाचायला मिळतो. या पुस्तकाच्या संदर्भात ग़ालिबनं आपला लाडका शिष्य मुन्शी हरगोपाल ‘तफ़्ता’ याला पत्रातून लिहीत असे. मुळात हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मनात येणं हेच अद्‍भुत आहे. एका महत्त्वपूर्ण दस्तावेजच यामुळं उपलब्ध झाला. नाहीतर आपल्याकडं या तऱ्हेचं लिखाण फारसं होत नाही. इतिहासाचे दरवाजे जरा किलकिले करून त्या काळाकडं बघण्याची एक वाट हे पुस्तक खुलं करून देतं. आपण या बंडात भाग घेतला नाही, हे शाबीत करण्यासाठी जरी ग़ालिबनं ‘दस्तंबू’ लिहिलं. कारण मी निर्दोष आहे, माझं पेन्शन बंद करू नका, हे सांगण्याचा हा एक मार्गच आपल्यापुढं खुला आहे, असं त्याला वाटत होतं... नंतर ग़ालिबनं इंग्लंडच्या राणीची स्तुती करणारं काव्यही लिहिलं आणि आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. ग़ालिबची ही लाचारी, मजबुरी काहीही म्हणा, पण एका कवीच्या-लेखकाच्या दुर्दशेची जाणीव करून देणारी आहे. कवी आणि कलाकारांचा राजाश्रय कमकुवत होऊन हरपत चालल्याचा तो काळ होता. लेखकाची ही असहायता आजही संपलेली नाही, हेही दारुण सत्यच...

संबंधित बातम्या