कुछ दर्द मेरे दिल में सिवा होता है 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा असलेलं १८५७ चं बंड (या स्वातंत्र्यसमराला तो ‘बंड’ असंच म्हणतो) संपूर्णपणे नव्हे, परंतु काही अंशांनी ग़ालिबच्या ‘दस्तंबू’मध्ये टिपलं गेलं आहे. त्याचं स्वरूप मर्यादित असलं, तरी यामुळं त्याचं महत्त्व कमी होत नाही. समकालीन लेखकानं शब्दबद्ध केलेला या काळातील संघर्षाचा व त्याच्या परिणामांचा हा एक दस्तावेजच आहे. दिल्लीतल्या छापखान्यात फ़ारसीचा सुलेखनकार नसल्याकारणानं ‘दस्तंबू’ आग्रा इथं छापण्यात आलं. त्याची पाचशे प्रतींची पहिली आवृत्ती आग्रा इथल्या एका प्रकाशन संस्थेनं नोव्हेंबर १८५८ मध्ये प्रसिद्ध केली आणि पाच महिन्यांत ती संपलीही. मग १८६५ मध्ये तिची दुसरी आवृत्ती रोहिलखंडच्या लिटररी सोसायटीनं काढली आणि तिसरी ग़ालिबच्या मृत्यूनंतर, १८७१ मध्ये त्याच संस्थेनं पुन्हा प्रसिद्ध केली. नंतरच्या काळात या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही झाला. 

या काळात आपला लाडका शिष्य हरगोपाल तफ़्ता याला लिहिलेल्या पत्रात ग़ालिबनं दिल्ली शहराची हकिकत लिहिली आहे आणि स्वतःच्या निराश मनःस्थितीविषयीही लिहिलं आहे. एके ठिकाणी आपला एक शेर ग़ालिब देतो, ज्यात त्याच्या मनोवस्थेचं दर्शन घडतं. मनात दुःख असल्यानं, मला माझ्या कटुवचनांसाठी माफ करा असं म्हणून, आपल्या अभिव्यक्तीत आलेला विषाद, कटुता याबद्दल सांगताना तो लिहितो, 
रखियो ‘ग़ालिब’ मुझे इस तल्ख़-नवाई में मुआफ़ 
आज कुछ दर्द मेरे दिल में सिवा होता है 
‘दस्तंबू’चा पहिला उल्लेख ग़ालिब तफ़्ताला लिहिलेल्या एका पत्रातच करताना दिसतो. १७ ऑगस्ट १८५८ या तारखेचं हे पत्र आहे. त्यात तो या लिखाणाबद्दल कळवताना लिहितो, ‘अब एक अम्र सुनो - मैंने आग़ाज़े (आरंभ) याज़दहुम (अकरावी तारीख) मई सन १८५७ ई. (ईसवी) से सी यकुम (एकतीस) जुलाई १८५८ ई. तक रूदादे शहर (शहराचं वर्णन) और अपनी सरगुज़िश्त (जीवनचरित्र) यानी पन्द्रह महीने का हाल नस्र (गद्य) में लिखा है और इल्तेज़ाम ऐसा किया है कि इबारत यानी फ़ारसी क़दीम (जुनी फ़ारसी) लिखी जाए और कोई लफ़्ज़ अरबी न आये... हाँ अशख़ास के नाम (लोकांची नावं) नहीं बदले जाते। वो अरबी, अंग्रेज़ी, हिंदी जो हैं लिख दिए हैं।’ 

दिल्ली शहरात गडबड सुरू झाल्यावर आपण दरवाजा बंद करून घरातच बसलो आणि बाहेर जाणंही बंद करून टाकलं, असं सांगून अन्य एका शिष्याला ग़ालिब लिहितो, ‘बिनकामाचं बसणं काही मला शक्य नाही. मग मी स्वतःच्या आठवणी लिहायला सुरुवात केली. काही ऐकलेल्या गोष्टीही त्यातच जोडल्या.’ स्वतःकडले उंची कपडे विकूनही या काळात त्याला गुजराण करावी लागली होती. म्हणूनच आपण पुस्तक लिहिलं तरी छापायला पैसे नव्हते, असं ग़ालिब मीर मेहदी हुसैन मजरूहला एका पत्रात लिहितो आणि म्हणतो, ‘मियाँ क्या बातें करते हो? मैं किताबें कहाँ से छपवाता? रोटी खाने को नहीं, शराब पीने को नहीं, जाड़े आते हैं, लिहाफ़-तोशक की फ़िक्र है; किताबें क्या छपवाऊँगा?’ ‘दस्तंबू’च्या प्रकाशनासाठी इंदूरहून एका मित्राच्या ओळखीतून भेटायला आलेल्या मुंशी उम्मीद सिंह यांनी ‘दस्तंबू’ची पानं चाळल्यावर हे लिखाण प्रसिद्ध कराच, असा आग्रह धरला आणि पुस्तकाच्या ५० प्रती विकत घेण्याची तयारी दाखवली. त्यांनी लगेच पैसेही देऊ केले. मग आग्रा इथं असलेल्या तफ्तानं बाकी व्यवस्था करण्याची जबाबदारी उचलली आणि अशा रीतीनं पुस्तक तयार होऊ शकलं. ग़ालिबचं हे लिखाण छापून उजेडात आलं... उम्मीद सिंहनं दिलेल्या पैशामुळंच हे घडू शकलं. पुस्तकाची नियोजित किंमत पाच रुपये होती आणि पन्नास प्रतींचे पंचवीस रुपये सिंह यांनी लगोलग आगाऊ देऊन टाकले होते... वगैरे माहिती ग़ालिबच्या पत्रांमधून समजते. छापण्याची प्रक्रिया पुरी झाल्यावर तफ़्ताला पुन्हा ग़ालिब पत्र लिहून या गोष्टीची आठवण करून देतो आणि उम्मीद सिंहला प्रती पाठवण्यास सांगतो. या पुस्तकात ३१ जुलै १८५७ पर्यंतचीच कहाणी आहे. बहादूरशाहला अटक झाली ती सप्टेंबरात. हा उल्लेख यात अर्थातच नाही. याविषयी ग़ालिबनं एका पत्रातच लिहिलं आहे, की उम्मीद सिंह इंदूरला जायच्या गडबडीत होते आणि त्यांना छापण्य़ापूर्वी या पुस्तकाचा आराखडा दाखवायचा होता. त्यामुळं तोवर जितकं लिहिलं होतं, तेवढंच पुस्तकात गेलं. नाहीतर कुणी पैसे दिले असते, असा प्रश्नही ग़ालिब विचारतो. त्या काळातील पुस्तक प्रकाशनातल्या अडचणी आणि त्यासाठी  
लागणारा पैसा व एकूण व्यवहार याबद्दलही यानिमित्तानं माहिती मिळते... 
......................... 
रिवाजानुसार, परमेश्वराच्या स्मरणानं ‘दस्तंबू’ची सुरुवात ग़ालिबनं केली आहे. पण त्यापूर्वीही एक बोलकी ओळ आहे, ‘मी पापणीवरला एक थरथरता अश्रुबिंदू आहे.’ 
ग़ालिबचं हे लिखाण त्याच्या मनातली खळबळ दाखवून देतं. सभोवतीचा हिंसाचार आणि त्याचे परिणाम चित्रित करतं. तसंच राजेशाहीचा अस्त आणि वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याची स्थापना यांच्या कात्रीत सापडलेला ग़ालिबसारखा बुद्धिजीवी कवीच्या मानसिक आंदोलनांचीही कल्पना ‘दस्तंबू’तून येते. ब्रिटिशांवर पत्रांमधून टीका करणारा ग़ालिब ‘दस्तंबू’ मध्ये त्यांच्या कारभाराची स्तुती करताना दिसतो. ‘मी यांचं मीठ खाल्लं आहे आणि माझ्या बालपणापासून या विश्वविजेत्यांनी मला आपल्या पंगतीत खिलवलं आहे,’ अशा तऱ्हेनं तो आपल्या लिखाणामागची भूमिकाही स्पष्ट करून सांगतो. यातच सर्व काही आलं... इंग्रजांना न्यायप्रिय, आपला जुना सहकारी असं संबोधून झाल्यानंतर ग़ालिब मुग़ल शासकांशी असलेल्या आपल्या संबंधांचाही उल्लेख करतो. बादशाहनं दिलेल्या कामांची आणि सन्मानांची चर्चा करतो. 

‘दस्तंबू’मधील नेमक्या विषयाला हात घालताना, मेरठहून आलेल्या शिपायांचा नारा आणि दिल्ली शहरात झालेलं त्यांचं आगमन याबद्दल तो लिहितो. शहराचे रक्षणकर्ते पहारेकरी या सैनिकांना मिळालेले होते. काही इंग्रजांशी एकनिष्ठही होते. पण ते सारे विखुरलेले आणि लढायला असमर्थ होते, असं लिहून, आपणही स्वतःही अशांमध्ये होतो. आपल्या घरात बंदिस्त राहून बाहेरचे हल्ल्याचे आवाज आपण ऐकत होतो, असं तो म्हणतो. सैनिकांचे आणि घोडदौडीचे आवाज ऐकू येत. बाहेर डोकावलं, तर रक्तानं माखलेली जमीन दृष्टीस पडे... असं वर्णन ग़ालिब करतो. विद्वान व मूर्तिमंत न्याय असलेले इंग्रज आणि त्यांच्या सुंदर स्त्रिया, त्यांची गुलाबाच्या फुलासारखी निर्दोष मुलं-बरेचजण मरणाच्या भोवऱ्यात सापडले, रक्ताच्या समुद्रात बुडाले, असं एकूण परिस्थितीचं चित्र तो उभं करतो. हिंदुस्तानच्या या दुर्दशेबाबत पाषाणाचं बनलेलं हृदय सोडता कुणीही द्रवेल, निर्जीव नसलेले डोळे पाझरतील, असं तो म्हणतो... एकूण हे सारं लेखन याच पद्धतीनं केलेलं आहे. 
अर्थात ग़ालिबनं, तो घराबाहेर पडतच नव्हता, असं लिहिलं असलं, तरी ते पूर्ण सत्य नव्हतं. कारण जोवर मुग़ल पराभूत झालेले नव्हते, त्या काळात ग़ालिब कधीमधी दरबारातही जात होता. सुरुवातीच्या दिवसांनंतर ग़ालिब नक्कीच बाहेर पडू लागला होता, बादशाहची स्तुती करणाऱ्या रचना त्यानं केल्या होत्या वगैरे... पण आपला या बंडाला पाठिंबा नव्हता, हे त्याला शाबित करायचं असल्यानं, बहुधा त्यानं आपण घरातच डांबलो गेलो होतो, असं लिहिलं असावं. 

‘दस्तंबू’मध्ये लांबवरच्या शहरांबद्दलही ग़ालिबनं लिहिलं आहे. बरेलीच्या सरदारानं बादशाहला सोन्याच्या किती मोहरा पाठवल्या, रामपूरच्या नवाबानं काय केलं, लखनौला काय घडलं वगैरे गोष्टी तो लिहितो. घरात बंदिस्त असताना ग़ालिबला ही सारी माहिती मिळत होती, हे अर्थातच संभाव्य नाही, अशी टीकाही यावर काहींनी केली आहे. पण याप्रकारे हे लेखन बाद ठरवण्यापूर्वी आणि ग़ालिबनं जणू खोटेपणा केला असं म्हणण्यापूर्वी, हेही लक्षात घ्यायला हवं, की हे पुस्तक काही १८५७ चं नाही. ते १८५८ मध्ये प्रकाशित झालं. नंतरच्या काळात मिळालेली माहिती ग़ालिबनं यात समाविष्ट केली असावी. अर्थात ही ‘डायरी’ आहे, असा दावा मात्र मग तसाच्या तसा ग्राह्य समजता येत नाही... ‘दस्तंबू’चं लेखनही रूढ अर्थानं ‘डायरी’ म्हणता येईल, असं नाही. 

दिल्लीतला हिंसाचार व कत्तल याविषयी लिहिण्याबरोबरच, शहरातून लोक बाहेर पळून जात होते त्याचीही माहिती देतो. पण आपण काही बाहेर गेलो नाही, कारण दिल्ली शहर काही माझ्याकरिता तसं वाईट नव्हतंच. मी अपराधी नसल्यानं, मला सजा मिळणार नाही. मग मी इथून पळून कशाला जाऊ, असा विचार बोलून दाखवतो. घरात एकटं बसलो असताना, माझी लेखणी तेवढी माझ्या सोबतीला आहे. माझ्या डोळ्यांतून आसू वाहत आहेत आणि माझ्या लेखणीतून दुःखभरे शब्द बाहेर पडतात... अशा तऱ्हेचं मनोगत ग़ालिब नोंदवतो. 

दिल्लीतलं वातावरण कसं भयावह बनलं होतं, त्याचं वर्णन ग़ालिब करतो. त्यानुसार, इंग्रजांचे सैनिक घरात घुसून, छतावर चढून लोकांना मारलं होतं. माणसं रस्त्यावर दिसली, तर त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते. ते लूटमारही करत होते. बरेच मुसलमान शहराबाहेर पळाले होते, कारण दिल्ली व आसपासच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी संघर्षात उडी घेतल्यानं, इंग्रजांनी एकूणच मुस्लिमांना लक्ष्य बनवलं होतं. तर इंग्रजांना पाठिंबा असलेले अनेक मुस्लिमही होते, जे मेरठहून आलेल्या सैनिकांच्या पाडावाची आणि इंग्रजांच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते, जेणे करून शहरात पुन्हा शांतता स्थापित व्हावी. या संघर्षाबाबत अनेकजण संभ्रमितही होते. बहादूरशाह हिंदुस्तानचा बादशाह बनल्याचा आनंदही त्यांना होता. काहींनी बंडखोरांना आर्थिक साह्यही पुरवलं होतं. पण गोऱ्यांची मुलं आणि स्त्रियांची कत्तल करण्यात त्यांचा सहभाग नव्हता. ज्यांना ज्यांना शक्य झालं, त्यांनी गोऱ्यांच्या महिला व मुलांना आपल्या घरांमधून आश्रयही दिला होता. त्यांना मारण्यात विद्रोही सैनिकांप्रमाणंच समाजाच्या निम्नवर्गातील लोकांचा जास्त सहभाग होता. दिल्लीवर इंग्रजांचा पूर्ण कब्जा झाल्यावर, शहरात मुसलमानांना राहण्यास मनाईच करण्यात आली होती. त्यांची संपत्तीही जप्त झाली होती. घराबाहेर पडायचं झाल्यास, त्यांना एक ‘टिकट’ (पास) घ्यावं लागत असे, असं ग़ालिब लिहितो. एका पत्रातही ग़ालिबनं लिहिलं आहे, की आपल्या नोकराला तो पोस्टात पत्र घेऊन पाठवू शकत नाही, कारण मुसलमान नोकरांना रस्त्यावर येणं शक्य नव्हतं... काही रस्ते व गल्ल्या दगड-विटा टाकून बंद केले गेले होते. तर ग़ालिब राहत असलेल्या बल्लिमारांच्या गल्लीतली दुकानं पाडून रस्ते रुंद करण्याचं कामही सुरू झालं होतं. एकूणच, दिल्ली शहरातलं वातावरण आणि त्यातली भयावहता ग़ालिबनं यात टिपली आहे...

संबंधित बातम्या