वली पोशीदा और काफ़िर खुला...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 9 मार्च 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

उत्तुंग प्रतिभा लाभलेला ग़ालिब जीवनाकडं कुतूहलानं, आसक्तीनं पाहणारा होता. हे जगणं जगताना त्याला मनस्ताप झाला, अडचणी आल्या आणि शिष्टसंमत नसलेल्या गोष्टी केल्यामुळं बदनामीचा धनी व्हावं लागलं. सर्वसाधारण धर्मभीरू, सामाजिक संकेतांना मानणाऱ्या लोकांपेक्षा त्याचं वागणं वेगळं होतं. हटकून होतं. धर्मातल्या कर्मकांडांना आणि अवडंबरांना तो यत्किंचितही महत्त्व देत नसे. धर्मसंस्थेचे जणू मक्तेदार झालेल्यांना तर या गोष्टीचा फारच राग होता. तशात ग़ालिब मद्यपान करणारा. यामुळंही त्याची बदनामी होतच होती. तो धर्मविरोधी आहे, त्याला सद्‍गुणांची चाडच नाही याप्रकारे त्याच्यावर टीका होत असे. पण असं असलं, तरी ग़ालिब हा काही कुणी एखादा नुसताच पियक्कड आणि मनमानी करणारा मनुष्य नव्हता. त्याला तत्त्वज्ञानाची जाण होती. धर्मतत्त्वंही तो जाणत होता आणि वेगवेगळ्या धर्मांची वैशिष्ट्यं त्याला माहीत होती. त्याच्या काव्यातही त्याच्या या चिंतनशीलतेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. ईश्वर, त्याची रूपं व आविष्कार, मानवी जीवनातलं अध्यात्माचं स्थान याबद्दल त्याची काही विशिष्ट मतं होती. धर्मातल्या रूढ गोष्टी तो मानत नसला, तरी ईश्वराचं अस्तित्वच आपल्याला मान्य नाही, असं त्यानं कुठं स्पष्टपणे म्हटलेलं दिसत नाही. तो पूर्ण नास्तिक नव्हता. उलट, आपण काफ़िर नाही, असंच त्यानं एका शेरमध्ये म्हटलं आहे. ‘शिक्षेतल्या यातनेसही काही मर्यादा असली पाहिजे. मी पापी आहे, पण मी काही काफ़िर नाही,’ असं तो सांगतो –
हद चाहिये सज़ा में अुक़ूबत के वास्ते
आख़िर गुनाहगार हूँ काफ़िर नहीं हूँ मैं

मात्र धर्माच्या नावाखाली जे काही समाजात चालतं, जी बंधनं किंवा संकेत रूढ असतात त्यांना तो अजिबात किंमत देत नसे. त्याच्या काव्यातूनही या गोष्टींची खिल्ली उडवलेली आढळते. त्याच्या विरोधकांनी याचाच फायदा घेऊन, त्याला धर्मविरोधी ठरवून समाजात बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्याचे पडसाद अगदी आजही जाणवतात. पण ग़ालिबची कविता ही या साऱ्या गोष्टींपेक्षा उंचीवरची आहे, हे सत्यच आहे... 
आपल्या टीकाकारांना या संदर्भात तो बजावून सांगतो, ग़ालिबच्या वाटेला कुणी आलं तर पाहा. वरून तो जरी नास्तिक दिसला, तरी वस्तुतः तो छुपा साधुपुरुषच आहे-
‘देखियो ग़ालिब’ से गर उलझा कोई
है वली पोशीदा और काफ़िर खुला

स्वतःच्या कवित्वाचा आणि निश्चित अशा तात्त्विक भूमिकेचा अभिमान बाळगणारा ग़ालिब स्वतःचं वैगुण्य किंवा न्यूनही ओळखून होता. आपण करत असलेल्या मद्यपानाबाबत त्यानं कधी लपवाछपवी केली नाही. पण ही काही मोठी चांगली गोष्ट नव्हे, असंही त्यानं मानलं नाही. पण आपल्या गुणांचं, कर्तृत्वाचं श्रेय आपल्याला मिळायला हवं. मद्यपानाचा या गोष्टीशी संबंध जोडला जाऊ नये, असं त्याचं सांगणं होतं. तत्त्वज्ञानाची, अध्यात्माची गुढं आणि तू करत असलेलं त्यांचं वर्णन. ग़ालिब, अरे तू जर मद्यपी नसतास, तर तुला आम्ही साधुपुरुषच समजलो असतो...
ये मसाईल-ए-तसव्वुफ़ ये तिरा बयान ‘ग़ालिब’
तुझे हम वली समझते जो न बादाख़्वार होता

लौकिक अर्थानं पाहिलं, तर धार्मिक रीतिरिवाज वगैरे त्यानं कधी पाळले नाहीत. जन्मानं मुसलमान असला, तरी धर्माच्या नियमानुसार तो नियमित नमाज़ पढला नाही की रमज़ान महिन्यात त्यानं रोज़े (उपवास) केले नाहीत. धर्माला निषिद्ध मद्य हे तर त्याला अतिशय प्रिय होतं. वरवर बघितलं तर असा मनुष्य स्वतःला साधुपुरुष म्हणवतो, हे विचित्रच वाटेल. पण ते तसं नव्हतं. कारण उपवास करणं, नमाज़ पढणं यावरून माणसाची ईश्वरावरील श्रद्धा जोखता येत नाही. ग़ालिबला माणसातलं माणूसपण अधिक महत्त्वाचं वाटत होतं. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, असं आपण आज म्हणतो. दोनशे वर्षांपूर्वी ग़ालिबची अशीच काहीशी धारणा होती. त्याच्या भूमिका स्वतःशी स्पष्ट होत्या. तो ईश्वर आणि रूढ धर्म यात फरक करत होता. पण म्हणूनच तो इतरांना धर्मभ्रष्ट वाटत होता. 

सूफ़ी तत्त्वज्ञानाचा मोठाच प्रभाव ग़ालिबवर होता. पण निवृत्तीची वृत्ती त्याच्या ठायी अजिबात नव्हती. आयुष्याच्या वाटेवरल्या हरएक लहानमोठ्या ऐहिक सुखांमध्ये त्याला रस होता. या गोष्टी त्याला प्राप्त झाल्या असं नाही. किंबहुना त्यांचा अभावच त्यानं बहुतांश वेळा अनुभवला. वाट्याला आलेली दुःखं स्वीकारण्याचा तटस्थपणाही त्याच्यात आला होता, हे तर त्याच्या काव्यावरूनही दिसून येतं. मुळात त्याचा ईश्वराच्या सर्वव्यापकतेवर आणि  
मानवाच्या वैश्विकतेवर विश्वास होता. भोवती दिसणारं चराचर जग आहे, त्यात ‘त्या’चा अंश असला पाहिजे, ही भावना तो अनेकदा प्रकट करताना दिसतो. तरीही या साऱ्या दृश्य पसाऱ्याचा नेमका अर्थ काय, हा प्रश्नही त्याला पडत राहतो...
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है
सब्ज़ा-ओ-गुल कहाँ से आये हैं 
अब्र क्या चीज़ है, हवा क्या है

मनातली श्रद्धा त्याच्या काव्यातून अशी व्यक्त होते-
जान तुम पर निसार करता हूँ
मैं नहीं जानता दुआ क्या है

ईश्वराची प्रार्थना करावी, धर्माच्या संकेतांनुसार शिष्टसंमत वर्तन ठेवावं असं ग़ालिबला कधीच मनापासून वाटलं नाही. त्याची गरज नाही, असं त्याचं मत होतं. विशिष्ट धर्माच्या शिकवणीच्या अनुसार वागलं, तरी जगात धर्म कितीतरी आहेत. प्रत्येकाची कर्मकांडं निरनिराळी, खुणा वेगवेगळ्या. असलाच ईश्वर तर तो एकच आहे. त्याच्यावरची श्रद्धा व्यक्त करण्याचा खरा मार्ग म्हणजे, धर्मांची, संप्रदायांची बंधनं झुगारून देणं. ही बंधनं, कर्मकांडांचे अडसर आणि अवडंबर सोडून दिले, की मग खऱ्या श्रद्धेची सुरुवात होते, असा त्याचा अभिप्राय होता. पण हे सामान्यतः कोण पटवून घेणार होतं? एक शेर आहे, ज्यात तो म्हणतो, ‘आम्ही एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे आहोत. परंपरांचा त्याग करणं हाच आमचा धर्म. विभिन्न श्रद्धा व धर्म जेव्हा पुसले जातात, तेव्हा ते अधिक व्यापक श्रद्धेचा हिस्सा बनतात...’
हम मुवह्हिद हैं हमारा केश है तर्क-ए-रुसूम
मिल्लतें जब मिट गईं अजज़ा-ए-ईमाँ हो गईं

धार्मिक रीतिरिवाजांचं पालन न करण्यावरून ग़ालिबवर टीका होत असे. पण त्याचा गमतीदार स्वभाव, संभाषणचातुर्य यामुळं तो खुबीनं आपली बाजू स्पष्ट करून स्वतःची सुटका करून घेई. बहादूरशहाच्या दरबारातही तो मोकळेपणानं बोलत असे. त्याचा धार्मिक दृष्टिकोन स्पष्ट करणारी परखड मतं सर्वांना पटत असत असं नाही. पण त्याचा अपमान न करता त्याचं ऐकून घेतलं जाई आणि प्रसंगी त्याच्या विनोदबुद्धीला आणि उपहासाला दादही देण्याची बादशहाची व इतर अनेकांची वृत्ती होती. असे अनेक किस्से, घटना आहेत, ज्यातून ग़ालिबच्या धर्मविषयक धारणांची आणि मतांची कल्पना येते. प्रचलित धर्मरूढींची तो यथेच्छ टिंगल करत असे. तीही उघडपणे. मद्यपानाबाबतही तो थट्टेच्या सुरात बोलत असे. एकदा त्याच्याशी बोलताना कोणीतरी म्हणालं की मद्यपान वाईट आहे, निषिद्ध आहे आणि मद्यपान करणाऱ्याच्या प्रार्थना फळाला येत नाहीत. त्यावर ग़ालिबनं शेरा मारला, की ‘एखाद्यापाशी जर मद्य असेल, तर मग अन्य कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थना करण्याची गरज तरी उरेल का?’ 

रमज़ानच्या महिन्यात तो रोज़े पाळत नसे. एकदा एक सुन्नी पंथीय मौलवी या काळात त्याच्या घरी आला होता. दुपारची वेळ होती, बोलताना ग़ालिबनं नोकराला हाक मारली आणि पाणी आणायला सांगितलं. तेव्हा त्या मौलवीला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, ‘हे काय? तुम्ही उपवास करत नाही का?’ त्यावर ग़ालिब गमतीनं त्याला म्हणाला, ‘मी सुन्नी आहे ना, त्यामुळं सूर्यास्ताच्या दोन तास आधीच रोज़ा सोडतो.’ खरं तर शिया व सुन्नी दोन्ही पंथीय दिवसभर रमज़ानचा उपवास करतात. पण काटेकोरपणे धार्मिक नियम पाळण्याकडं शियांचा कल अधिक असतो, असं साधारणपणे मानलं जातं. या गोष्टीचा आधार घेऊन ग़ालिबनं हे उत्तर दिलं होतं...

ग़ालिबची ही अशी मतं इतरांना फारशी न पटणारी होती. पण तो उघडपणे ती बोलून दाखवत असल्यानं, बऱ्याचजणांना त्याच्याबद्दल कौतुक वाटायचं. शिवाय त्याच्या खोचक आणि नर्म विनोदाचा आस्वाद अशा शेरेबाजीतून घेण्याचा आनंद मिळत असे. रमज़ानच्या महिन्यात प्रत्यक्ष बादशहा बहादूरशहा ज़फ़रला ग़ालिबनं एकदा असंच गमतीशीर उत्तर दिलं होतं. बहादूरशहानं ग़ालिबला विचारलं, ‘मिर्ज़ा, तुम्ही किती दिवस उपवास पाळलात?’ त्यावर ग़ालिबनं खुबीनं उत्तर दिलं, ‘जहाँपनाह, मला एक दिवस उपवास पाळता आला नाही.’ याप्रकारे बोलून, केवळ एक दिवस पाळता आला नाही की एकही दिवस पाळला नाही यातला कोणताही अर्थ घ्यायचा, हे बादशहावरच सोपवून तो मोकळा झाला. 

ग़ालिब मानवतावादी होता, सहृदय होता. त्याच्या मित्रमंडळींमध्ये आणि शिष्यपरिवारातही हिंदू, ख्रिस्ती व अन्यधर्मीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. आपल्या एका पत्रात त्यानं मानवजातीला समान पातळीवर मानण्याच्या आपल्या वृत्तीचा उल्लेख केला आहे. तो लिहितो, ‘मैं बनी आदम को – मुसलमान हो, या हिंदु या नसरानी, अज़ीज़ मानता हूँ और अपना भाई गिनता हूँ। दूसरा माने या न माने।’

आध्यात्मिक गूढ, एकेश्वरवाद, अद्वैतवाद आणि हिंदू धर्मातील ‘ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या’ तत्त्वाचा पगडाही ग़ालिबच्या विचारांवर दिसून येतो. ईश्वर तर एकच आहे. द्वैतभाव ईश्वराबाबत संभवत नाही, हा त्याचा विश्वास अनेकदा काव्यातून प्रकटताना दिसतो. एके ठिकाणी तो म्हणतो की, त्याला कोण पाहू शकेल, कारण तो अनुपम आणि अद्वितीय आहे. द्वैताची शक्यता असतीच, तर कुठं ना कुठं समोर आलाच असता. 
उसे कौन देख सकता कि यगाना है वो यकता
जो दुई की बू भी होती तो कहीँ दुचार होता

तर, दृश्यमान जगाच्या अस्तित्वाला फसवं म्हणणारा गालिब शंकराचार्यांच्या मायावादाची आठवण करून देतो. 
हस्ती के मत फ़रेब में आ जायो ‘असद’
आलम तमाम हल्क़ा-ए-दाम-ए ख़याल है

त्याचा आणखी एक शेर आहे, ज्यात तो विश्वाला नाममात्र म्हणतो. इथल्या प्रत्येक गोष्टीला वहम म्हणजे कल्पना किंवा भ्रम म्हणतो-
जुज़ नाम नहीं सूरत-ए-आलम मुझे मंज़ूर
जुज़ वहम नहीं हस्ती-ए-अशिया मेरे आगे

स्वर्ग, नरक वगैरे कल्पनांवर तर ग़ालिब अजिबात विश्वास ठेवत नसे. या सगळ्या तर माणसानं स्वतःच्या समाधानासाठी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, असं मत तो बाळगत असे...
हमको मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ूश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है

ग़ालिबच्या काव्यात पेरलेले अध्यात्माचे असे अनेक धागे आहेत. धर्मभ्रष्ट समजल्या गेलेल्या एका उदारमनस्क कवीची आध्यात्मिक वाटचाल आणि त्याच्या काव्यातली चिंतनाची डूब आपल्यालाही अंतर्मुख करून जाते. 

संबंधित बातम्या