घर हे बंदीशाला...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

दिल्लीत सामान्य माणसाची जी परवड झाली, तिचे अनेक दाखले ग़ालिब ‘दस्तंबू’ लिहिताना देतो. हिंसाचाराबरोबरच लुटालूटही शहरात खूप झाली. लोकांचे दागिने, पैसाअडका, उंची चीजवस्तू लुटल्या गेल्या. पुस्तकं, शोभेच्या अनेक वस्तू या धामधुमीत नष्ट झाल्या. ‘काळंकुट्ट अंतरंग असलेल्या खुन्यांनी शहरभर छावण्या उभारल्या होत्या आणि लाल किल्ल्यात त्यांनी आपल्या घोड्यांचे तबेले केले होते. शाही कक्षांचा वापर ते झोपण्यासाठी करत होते,’ असं वर्णन ग़ालिब करतो. हा प्रकार साऱ्या देशातच चालू झाला होता आणि देशभरातले सैनिक आणि जमीनदार या लोकांना जाऊन मिळाले होते. रक्ताची निर्लज्ज अशी हाव त्या साऱ्यांना होती, अशीही टिप्पणी तो करतो. एकूणच ब्रिटिशांच्या विरोधातला हा संघर्ष मूठभर लोभी आणि आपमतलबी लोकांचा होता, असा त्याचा अभिप्राय यात दिसतो. जे काही घडत होतं, त्याचं वर्णन करून, अलंकारिक भाषेत त्या संदर्भातली टिप्पणीही ग़ालिब करतो. ‘माझं हृदय काही दगडाचं किंवा पोलादाचं बनलेलं नाही, की ते हलून जाऊ नये. डोळे काही भिंतीतल्या निर्जीव भेगांप्रमाणे नाहीत की, मृत्यूचं तांडव अन् उजाड हिंदुस्तानावर त्यातून अश्रू येऊ नयेत,’ अशा प्रकारचं मनोगत तो यात सातत्यानं लिहीत जातो...

मे महिन्यात सुरू झालेला गदारोळ जसजसा काळाबरोबर चालूच राहिला, तसतशी जनतेची तगमग वाढत कशी गेली, लोकांना पिण्याचं पाणीही कसं मिळेनासं झालं वगैरे अडचणींची माहिती यातून मिळतेच. पोस्ट खात्याची सेवा विस्कळित झाल्यामुळं किंबहुना जवळपास बंदच पडल्याकारणानं बाहेरची खबर अजिबातच कळत नाही. पोस्टमनला शहरात फिरणं मुश्कीलच बनतं. पण टेलिग्राफ सुविधेमुळं आपले संदेश बाहेर पाठवता येतात, एवढाच काय तो दिलासा ग़ालिबला वाटतो. पत्रव्यवहार बंद असल्यानं, ग़ालिबच्या मनाची होणारी तगमग जाणवते. शिवाय सैनिकी खाक्याच्या अत्याचाराचे नमुनेही अनुभवावे लागतात. स्वतःच्याच सावलीची भीती वाटावी, अशी ही परिस्थिती असल्याचंही ग़ालिबनं लिहिलं आहे. तो स्वतःच्या मनोवस्थेबद्दल लिहितो, ‘अशा वातावरणात मला कवितेतून काय दिलासा मिळणार? माझं हृदय जणू बंदच पडलं आहे, सारी गात्रं दुबळी बनली आहेत आणि मला आता कोणत्याही शिक्षेची भीती नाही की बक्षिसाची आस नाही.’ आपण एकाकीपणाचे कैदी बनलो आहोत, असंही तो म्हणतो...

‘दिल्लीच्या आत आणि बाहेर मिळून ५० हजारांची फौज आहे. शहराच्या चहूबाजूला तोफा आणि बंदोबस्ताची व्यवस्था करून या शहराचं रूपांतर किल्ल्यात केलं गेलं आहे. दिवसभर तोफांचे आवाज ऐकू येत राहतात. वाटतं जणू आकाशातून दगडांचा वर्षाव होतो आहे.’ अशा तऱ्हेच्या वातावरणात निसर्गानंही त्रास द्यायला सुरुवात केली होती. मे आणि जून महिन्यातली काहिली लोकांना भाजून काढत होती आणि घराबाहेर पडण्याची चोरी होती. 

बंडखोरांना देशभरातून प्रतिसाद मिळत होता आणि दिल्लीश्वराचं नाव यात जोडलेलं असल्यानं, मोठ्या प्रमाणावर लोक यात सहभागी होत होते, असंही ग़ालिब लिहितो. 

यात सामील झालेल्यांची माहिती मिळते, तसंच ब्रिटिशांना पाठिंबा देणाऱ्यांबद्दलही  वाचायला मिळतं. अवधचा नवाब वाजिद अली शाह याच्या दहा वर्षाच्या मुलाला बंडखोरांकडून हिंदुस्तानच्या बादशाहचा वज़ीर म्हणून घोषित करण्यात आल्याचा उल्लेखही यात आहे. 

शहरात सर्वत्र चिडीचुप शांतता आणि लोकांना बाहेर फिरण्यास मज्जाव असल्यामुळं अडचणीत भर पडते. दिल्लीच्या काश्मिरी गेट ते चाँदनी चौक दरम्यानचा परिसर जणू युद्धभूमीच बनून जातो. ग़ालिबनं लिहिल्याप्रमाणं, तो राहत असलेला परिसर काश्मिरी गेट आणि दिल्ली गेट यांच्या मध्यभागी होता. या गल्लीचं प्रवेशद्वार तिथल्या रहिवाशांनी बंद करून ठेवलं होतं. मात्र अधून मधून ते उघडलं जाई आणि लोकांना बाहेर जाऊन अन्नधान्य आणता येणं शक्य होई, बंडखोर सैनिकांनी आत घुसल्यावर खूप लूट केली आणि लोकांना त्रास दिला. त्यांची घरं जाळली. ‘अशा तऱ्हेचे प्रकार विजयानंतर नेहमीच होत असावेत’, अशी एक टिप्पणीही ग़ालिब  करतो...शहरातले हे प्रकार पाहून बरेचजण शहराच्या तीन मुख्य प्रवेशद्वारामधून दिल्ली बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि शहराबाहेरच्या लहान वस्त्यांमध्ये आणि मकबऱ्यांमध्ये आश्रय घेऊन राहू लागले. शहरातला दंगा थांबला की आपल्याला परतता येईल, अशी आशा घेऊन ते तिथे राहत आहेत, असं ग़ालिबनं लिहिलं आहे...

अशा परिस्थितीत १८ सप्टेंबर (१८५७) रोजी झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी शहर अंधारून गेलं आणि लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. ग़ालिब राहत असलेल्या गल्लीपर्यंत हा धुमाकूळ येऊन पोहोचला. या घटनेविषयी ग़ालिब लिहितो, ‘या गल्लीत दहा ते बारा घरं आहेत आणि एकाच ठिकाणी प्रवेशाचं दार आहे. बहुतेक लोक सोडून गेले आहेत- आपल्या बाळांना उराशी कवटाळलेल्या स्त्रिया आणि खांद्यावर सारं सामान घेतलेले पुरुष-आणि आमच्यासारखे फक्त थोडेच जण आता इथं उरले आहेत. आम्ही या गल्लीचं दार आतून बंद करतो आणि प्रवेशाच्या तोंडाशी दगडांच्या राशीही रचून ठेवतो. सगळं पक्कं बंद करण्यासाठी.’

अशा तऱ्हेच्या वातावरणात पतियाळाचे महाराज नरेंद्र सिंह यांच्याकडून मदत मिळाली. त्यांचा ब्रिटिशांना पाठिंबा होता. त्यांचे काही अधिकारी ग़ालिबच्याच गल्लीत राहत होते आणि त्यांच्यामुळं तिथल्या रहिवाशांना थोडा दिलासा मिळत होता. ब्रिटिशांनी शहरावर ताबा मिळवल्यावर या राजानं पतियाळाचे रखवालदार या गल्लीपाशी नेमले आणि त्यामुळं गोऱ्या सैनिकांना गल्लीत नासधूस करणं, रहिवाशांना त्रास देणं यापासून रोखलं गेलं. अर्थात हा त्रास नसला, तरी जगणं कठीण होत चाललं होतं. कारण चौदा सप्टेंबरपासून शहरातले सारे दरवाजे बंद झाले होते. ग़ालिब त्या दिवसांबद्दल लिहितो, ‘विक्रेते आणि खरेदीदार दोन्हीही नव्हते. कोणीही गहू विकणारा नव्हता आणि यामुळं आम्हाला पीठ मिळू शकत नव्हतं, धोबी नव्हता की ज्याच्याकडे आमचे मळलेले कपडे देता येतील, आमचे केस कापायला न्हावी नव्हता किंवा साफसफाई करायला झाडू कामगार नव्हता. मात्र, या दिवसांत आम्ही गल्ली सोडून बाहेरून पाणी आणू शकत होतो किंवा कधीतरी पीठ आणणं शक्य होत होतं. पण नंतर हेही अशक्य बनत गेलं. गल्लीच्या प्रवेशावर दगड बसवले गेले आणि आमच्या हृदयावर दुःखाचं सावट पसरलं.’ 

पण मग घरात होतं नव्हतं ते सगळं खाऊन संपलं. घरात पाणी जपून वापरलं जात होतं, पण तरीही एखाद्या पेल्यात किंवा घड्यात पाण्याचा थेंबही नाही, अशी स्थितीही आली. याचं वर्णन असं येतं, ‘लोकांची सहनशक्ती पूर्णपणे संपली आहे आणि आपण जर धैर्यानं दिवस घालवले, तर आपली भूक संपेल हा भ्रमही आता पूर्णपणे दूर झाला. आणि आम्ही संपूर्ण दिवस अन् रात्र भुकेले व तहानेले बनलो.’ 

पतियाळाच्या महाराजांचे सैनिक पहाऱ्यावर आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. कारण हा पहारा मैत्रीच्या भावनेतून केला जात होता, यामुळं आपल्या गल्लीतल्या लोकांना चौकातल्या (चाँदनी चौक) बाजारापर्यंत जाण्याची मुभा मिळत होती. त्यापलीकडच्या भागात मात्र हिंसाचार चालूच होता, असं ग़ालिब लिहितो... मात्र रस्ता खुला झाला, तरी पाणी वाहणारे कामाला मिळत नव्हते. मग प्रत्येक घरातला एकजण दोन नोकरांना बरोबर घेऊन जाई आणि थोडं पाणी मिळवण्याचा प्रयत्न करे. पण हे खारं पाणी असे आणि गोडं पाणी फारच लांबवर जाऊन आणावं लागत असल्यामुळं या पाण्यावर वेळ निभावून न्यावी लागे. पाणी आणणारे लोक बाहेरची हालहवाल सांगत त्यावरून समजे, ‘गल्लीपासून लांब जाता येत नसे आणि त्यापलीकडे अनेक घरं सैनिकांनी पाडली होती. ती घरं आता नुसती ओसाड होती,’ या सगळ्या काळातल्या जीवनाविषयी आणि कोंडमाऱ्याविषयी ग़ालिबनं लिहिलं आहे, ‘आम्ही सध्याच्या दिवसांत कैद्याप्रमाणं जगत आहोत, खरोखरच कैद्यासारखंच जगत आहोत. कुणीही आम्हाला भेटायला येत नाही. आम्हीही बाहेर काय चाललंय ते स्वतःच्या डोळ्यांनी बघायला बाहेर पडू शकत नाही. या त्रासात भरीस भर म्हणून आमच्याकडे खायला रोटी नाही की प्यायला पाणी नाही.’ अशा अवस्थेत जगत असताना एक दिवस निसर्गाची कृपा झाली आणि अचानक पाऊस पडला. तेव्हा मग अंगणात चादर पसरून वर बांधली आणि त्याखाली भांडी, मडकी ठेवून पाणी गोळा केलं, अशीही एक आठवण यात आहे. समजशक्तीच्या बाहेर असलेल्या परिस्थितीत ही स्वर्गातून आम्हाला मिळालेली मदतच होती, असंही ग़ालिब म्हणतो. 

दिल्लीबद्दल आणि त्या बंदिस्त दिवसांबद्दल लिहिताना मग ग़ालिब अचानक वळतो, तो स्वतःच्या कहाणीकडे. ‘आता माझ्याबद्दल थोडं सांगीन म्हणतो,’ असं म्हणून ग़ालिब लिहीतो, आपण आता वयाच्या बासष्टाव्या वर्षात असून, अनेक वर्षं मी या जगातली धूळ चाळणीने चाळून घेतली आहे. गेली ५० वर्षं मी माझं मन कवितेच्या माध्यमातून खुलं करत आलो आहे. असं सांगत, आपले आजोबा, वडील, काका यांच्याविषयी तो लिहितो आणि मग पेन्शनचा उल्लेख करून, त्या संदर्भातला सगळा इतिहास थोडक्यात समोर ठेवतो...ज्यासाठी ‘दस्तंबू’च्या लेखनाचा घाट घातला, त्या मुद्द्याला तो थेट हात घालतो...

हे सर्व लिहितानाच, स्वतःबद्दलचे व्यक्तिगत तपशील ग़ालिबनं दिले आहेत आणि म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. एरवी, या महान कवीची अशी वैयक्तिक माहिती सहजासहजी उपलब्ध न होती...मूलबाळ न वाचल्यामुळं पत्नीच्या माहेरील कुटुंबातील दोन मुलांना ग़ालिबनं दत्तक घेतलं होतं आणि स्वतःच्या मुलांप्रमाणं त्यांना वाढवलं होतं. त्याच्या कटकटीच्या जगण्यातली ती हिरवळच होती. या गोड मुलांना फळं, दूध, मिठाई हवी असते, पण आपण त्यांना यातलं काही देऊ शकत नाही, याचं त्याला वाईट वाटतं. आपला वेडसर भाऊ कसा जगतो, तो जिवंत आहे की नाही, याची माहिती आपल्याला मिळत नाही, असं असहायपणं तो लिहितो. नंतर त्यानं भावाच्या मरणाची हकीकत (पण नेमकं सत्य न सांगता) दिली आहेच. आपण हे जे काही प्रसंग वर्णन केले, ते दुःखदायक आहेतच. पण न सांगितलेले प्रसंग तर हृदयद्रावक आहेत, असंही त्यानं म्हटल आहे. आपल्या पेन्शन प्रकरणाची दाद लागावी आणि ती आपल्याला अनुकूल लागावी, अशी ग़ालिबची अपेक्षा होती. म्हणून व्हिक्टोरिया राणीला उद्देशून आपण पूर्वी कसा पत्रव्यवहार केला होता आणि त्याला लॉर्ड एडिन्बर्ग याच्याकडून कसं उत्तर आलं होतं की माझं निवेदन राणीसमोर गेलं आहे...वगैरे उल्लेखही त्यानं यात केले आहेत. पेन्शन प्रकरणाचा सारा इतिहासच यात तपशिलात येतो. आपल्याला न्याय मिळावा आणि आपल्या जगण्याचा, उपजीविकेचा प्रश्न सुटावा यासाठीची ग़ालिबची धडपड या सगळ्या लिखाणातून अशी वारंवार पुढं येत राहते...   

संबंधित बातम्या