न होता मैं तो क्या होता...

नंदिनी आत्मसिद्ध
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

संपूर्ण जगात आज ग़ालिबचं नाव आहे. एक महान विश्वकवी म्हणून त्याला लोक ओळखतात. विशेष म्हणजे, कवितेबरोबरच गद्य लेखनासाठीही ग़ालिब प्रसिद्ध होता. उर्दू साहित्याच्या इतिहासात त्याचं नाव लक्षणीय महत्त्व राखून येतं. फ़ारसी शायर म्हणूनही त्याचं एक स्थान आहे. या भाषांचे बारकावे तो जाणत होता आणि अभिजात भाषेप्रमाणं सर्वसामान्यांची भाषाही त्याला अवगत होती. स्वतःची क्षमता त्याला माहीत होती आणि तिला साजेसं जगणं आपल्या वाट्याला आलं नाही, याची एक खंतही त्याच्या मनात होती. फ़ारसी भाषेच्या महत्त्वाचा पगडा त्याच्या मनावर लहानपणापासून होता. त्याच्या घराण्याची ती मातृभाषाच होती. त्याच्या सुरुवातीच्या उर्दू काव्यावर फ़ारसी भाषेची छाप इतकी होती, की रचनेत चार-दोन शब्दांमध्ये फेरफार केले, तर या उर्दू रचनांचं रूपांतर सहजपणं फ़ारसीत होऊ शकलं असतं. आपण फ़ारसीचे विद्वान आहोत, याचा दिमाख त्याच्या त्या सुरुवातीच्या काव्यात स्पष्टपणं उतरत असे. पण नंतर त्याचं त्यालाच कळाल्यावर ग़ालिब फ़ारसीच्या या प्रभावातून मुक्त होत गेला. सामान्य माणसाची उर्दू त्याला येत होतीच. तिचा वापर मग तो कवितेत करू लागला. मात्र फ़ारसी भाषेची सामासिक शैली, वाक्प्रचार, शब्दयोजना आणि फ़ारसी व इराणी संस्कृती व साहित्यातील संदर्भ त्याच्या रचनांतून नेहमीच येत राहिले. पण ते खटकणारं न बनता, उलट ते त्याच्या काव्यशैलीचं वैशिष्ट्य बनून गेलं. थोडक्या आणि अर्थपूर्ण शब्दांमध्ये आपले विचार व भावना कशा प्रकारे व्यक्त करायच्या, याबाबत त्याचा हातखंडा होता. दुःखाची आर्तता, पराकोटीच्या शोकातली निराशा, तत्त्वज्ञानाची गूढता आणि खोली, आकर्षक शब्दरचना, उपरोध, विनोद असे अनेक भाव ग़ालिबच्या काव्यात आढळतात. त्याच्या गद्य रचनांमध्येही. मुळात स्वभावाने मृदू असलेल्या ग़ालिबच्या मनावर कुठल्याही गोष्टीचा चटकन आणि तीव्र परिणाम होत असे आणि त्याचं प्रतिबिंब त्याच्या कवितेतही उमटत असे. आपल्या मनातल्या विचारांना अचूक शब्दरूप देण्याची कला ग़ालिबला साध्य होती. त्यामुळं त्याच्या रचनांमधला भाव थेट हृदयाला भिडणारा असे. स्वतःचं मन आणि त्यातले विचारांचे तरंग उलगडून त्यानं काव्यात मांडले. म्हणूनच तर त्याचा प्रभाव दोन शतकांनंतरही टिकून आहे...

ग़ालिबच्या काव्यातला एकूण आशय इतका जबरदस्त आणि विचारांना चालना देणारा, की वाचणाऱ्या प्रत्येकाला ही कविता समृद्ध करून जाते. ब्रिटिश काळात ग़ालिबला अनेक गोरे चाहतेही मिळाले. त्याच्या काव्याचे ते भोक्ते बनले आणि त्याच्या शायरीची प्रशंसा करताना ते कधी थकले नाहीत. त्याच्या काळातही ग़ालिबला दिल्लीत असे बरेच चाहते  

भेटलेच; पण नंतरच्या कालखंडातही त्याच्या काव्यामुळं झपाटून जाऊन ते अधिक समजून घेण्यासाठी उर्दू शिकणारे आणि ग़ालिबच्या शायरीत बुडून गेलेले अनेकजण होते. राल्फ रसेल हा अशांपैकीच एक. तो ब्रिटिश सैनिक म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात आला आणि नंतर केंब्रिजमध्ये त्यानं पौर्वात्य अभ्यासविषयाच्या शाखेत अध्यापनही केलं. भारतातल्या वास्तव्यात  त्याला ग़ालिब माहीत झाला आणि त्याच्या काव्यामुळं प्रभावित होऊन राल्फ रसेलनं ग़ालिबची ओळख इंग्रजीतून करून देण्याची मोहीमच हाती घेतली. ग़ालिबच्या निवडक काव्याचा अनुवाद त्यानं केला आणि ग़ालिबच्या कवितेचं मूल्यमापन करणारं व त्याची जीवनकहाणी कथन करणारं पुस्तकही त्यानं लिहिलं. त्यात त्यानं म्हटलंच आहे की, ‘ग़ालिब जर इंग्रजीतून लिहिणारा कवी असता, तर तो यापूर्वीच एक थोर कवी म्हणून जगभरात प्रसिद्धी पावला असता.’ 

ग़ालिबचे अभ्यासक व चाहते जगातल्या विविध भाषांमधून आणि देशांमधून विखुरलेले आहेत. भारतात तर ग़ालिबचं नाव घराघरात गेलेलं आहे. याला कारण त्याच्या काव्याला असलेलं वैश्विक भान आणि त्यातील आशयाला असलेलं कालातीत मूल्य. 

ग़ालिबवर आजवर शेकडो पुस्तकं लिहिली गेली असतील आणि यापुढंही लिहिली जातील. उर्दू-हिंदीत त्याच्या काव्याचा परामर्श घेणारं लेखन बरंच झालं आहे. तसंच इंग्रजीतही. राल्फ रसेलप्रमाणं अनेकांनी त्याच्या काव्याचा अभ्यास केला आणि आपले त्याविषयीचे विचार टिपणारं लेखन केलं. पवन वर्मा यांनी लिहिलेलं ‘ग़ालिब : द मॅन, द टाइम्स’ हे ग़ालिबचं चरित्रही अप्रतिम आहे. ग़ालिबचा काळ, त्यावेळचा समाज व संस्कृती आणि एकूण राजकीय वातावरण यांचा वेध घेत वर्मा यांनी हे लेखन केलं आहे. गुलज़ार यांनी ग़ालिबवर लेखन केलं आहे आणि काही वर्षांपूर्वी मिर्ज़ा ग़ालिब ही दूरदर्शन मालिकाही त्यांनी बनवली होती, ज्यात, मिर्ज़ा ग़ालिबची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी मोठ्या ताकदीने साकारली होती. 

गायनाच्या माध्यमातूनही ग़ालिब वर्षानुवर्षं लोकांपर्यंत जाऊन पोहचत राहिला. थेट जीवनाला भिडणारा अनुभव आणि दुःखाचा प्रत्यय त्याच्या ग़ज़लमधून नेहमीच घेता येतो. म्हणूनच त्याच्या ग़ज़लनं शास्त्रीय संगीताच्या गायकांनाही खुणावलं आणि इतरांनाही. मुळात ग़ज़ल हा गायनाचा प्रकार म्हणून पूर्वी चिल्लर मानला जायचा. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ख़यालला अधिक महत्त्व होतं. ग़ज़ल गायन लोकप्रिय व प्रतिष्ठित बनू लागल्यावर ग़ालिबचं काव्य हळूहळू रुजू लागलं. मुळात ग़ालिब कठीण लिहिणारा म्हणून प्रसिद्ध. त्यामुळं त्याच्या ग़ज़लपासून जरा दूर राहण्याकडे गायकांचा कल. गोहरजानच्या आवाजात ग़ालिबची ‘ये न थी हमारी क़िस्मत’ ही ग़ज़ल रेकॉर्ड झाली ती अगदी सुरुवातीला. नंतर त्याच्या ग़ज़ला बेगम अख़्तर, सैगल यांनीही गायल्या. तसंच तलत मेहमूद, मलिका पुखराज, सुरैया, नूरजहाँ, मेहदी हसन, लता मंगेशकर, फ़रीदा ख़ानम, ग़ुलाम अली, महम्मद रफ़ी, आशा भोसले, जगजित सिंग, अशा अनेकांनी ग़ालिबच्या ग़ज़ला गायल्या आहेत. 

देशोदेशी ग़ालिबच्या चाहत्यांनी आपापल्या परीनं त्याचं काव्य आणि स्मृती जतन करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. पाकिस्तानातून अमेरिकेत गेलेल्या एजाज़ अहमद यांनी १८६९ साली ग़ालिबच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने ग़ालिबचं काव्य आधुनिक इंग्रजीत सादर करण्याचा उपक्रम केला होता. एजाज यांनी ग़ालिबच्या ग़ज़लांचं भाषांतर आणि त्या संदर्भातील साहित्यिक टिपणं अमेरिकेतील नामवंत अनुवादकांना आणि कवींना दिली. ग़ज़लचं वृत्त किंवा विशिष्ट प्रारूप याकडं लक्ष न देता, आपल्याला रुचेल त्या पद्धतीनं या ग़ज़लांचा अनुवाद त्यांनी नव्यानं करावा, असं एजाज़ यांनी त्या सर्वाना सुचवलं. ग़ालिबचं काव्य आणि एक कवी म्हणून असलेलं त्याचं महत्त्व या निमित्तानं पश्चिमी जगतात पुन्हा एकदा रुजावं, हा यामागचा हेतू होता. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि विसाव्या शतकात ग़ालिब नव्यानं अमेरिकी लोकांपुढं गेला. 

नतालिया प्रिगारिना या रशियन महिलेनं ग़ालिबवर रशियन भाषेत लिहिलेलं पुस्तक दोनेक दशकांपूर्वी इंग्रजीत अनुवादित झालं. नतालिया या उर्दू व फ़ारसी भाषांच्या जाणकार असून, मॉस्को इथल्या नेहरू कल्चरल सेंटरच्या संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांनी इक़बालवरही पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांचं दुसरं एक पुस्तक उर्दू व फ़ारसी काव्याची ओळख करून देणारं आहे. ग़ालिबवर उर्दू-इंग्रजीप्रमाणं इतर भारतीय भाषांमधूनही लिहिलं गेलं. हिंदी-मराठीतही अनेक पुस्तकं लिहिली गेली. सेतुमाधवराव पगडी यांनी त्याच्या काव्याचा मराठी अनुवादही केला. तर इंदुमती शेवडे यांनी ‘कथा एका शायराची’ ही ग़ालिबच्या जीवनावरील कादंबरी लिहिली. ग़ालिबवर मराठीत आणखीही बरीच पुस्तकं आहेतच... 

ग़ालिब असा वेगवेगळ्या वाटांवर अनेकांना खुणावत राहतो. त्याच्या काळातही त्याचा प्रभाव बऱ्याचजणांवर होताच. भले त्याचे टीकाकारही खूप होते, पण त्याचं महत्त्व त्यांनाही दुर्लक्षित करता आलं नाही. त्याची उपेक्षा, हेटाळणी करण्याचे प्रयत्नही झाले, पण या सगळ्या गोष्टींना भेदून ग़ालिब शिल्लक राहिलाच. तो संपला नाही. मानवी जीवनावरचं त्याच भाष्य, माणसाच्या स्वभावाचं आणि आकांक्षांचं त्यानं केलेलं निदान लक्षणीय महत्त्वाचं ठरलं. मानवी अस्तित्वाबाबत त्याने विचारलेले प्रश्न, उपस्थित केलेले मुद्दे आजही लागू पडतात.

हे अस्तित्वच अर्थहीन आहे का? माणसाची जगण्याची सतत चाललेली धडपड अर्थहीन आहे का? एकूण विश्वात मानवी अस्तित्वाचं नेमकं स्थान काय उरतं? असे अनेक सवाल ग़ालिबनं आपल्या काव्यातून सातत्यानं विचारले. अन् माणसाच्या दुःखांना मरणावाचून दुसरा सुटकेचा मार्गच नाही, हे त्याला जीवनाच्या जंजाळावर सापडलेलं उत्तर होतं. ते स्वीकारात तो जगत राहिला. आपण ते स्वीकारलं नाही, तरी त्यात काही फरक पडणार नाही, हेही तो जाणून होता. त्याच्या काव्यात हा विचार, भावनेचा हा धागा वारंवार येतो. पराकोटीची निराशा, विवंचना, जगण्याच्या समस्या, वैयक्तिक दुःखं असे अनेक अनुभव घेत जगणारा ग़ालिब कवितेतून स्वच्छपणं व्यक्त झाला. स्वतःच्या अस्तित्वाचं काय करायचं, असा प्रश्न त्याला पडला, तेव्हा तो म्हणून गेला, ‘न होता मैं तो क्या होता’...पण ग़ालिब नसता तर, ही गोष्टच आज कल्पनातीत वाटते, इतका तो आजच्या काळाशी घट्ट जुळून गेला आहे.

पूर्वसूरींच्या आणि समकालीनांच्या संदर्भात ग़ालिबचा विचार केला, तर त्याचं वेगळेपण मनावर अधिकच ठसतं. उर्दू कवितेचा विलक्षण महत्त्वाचा असा त्याचा कालखंड होता. तर दुसरीकडे देशातील राजकारण आणि समाजजीवन ढवळून निघत होतं. एका नव्या वळणावर उभं होतं. या सगळ्या परिप्रेक्ष्यात ग़ालिबचा विचार करणं आणि त्याच्या आगेमागे असलेले संदर्भ पडताळून पाहणं नक्कीच रोचक ठरेल..

संबंधित बातम्या