रेख़्ता के तुम्ही उस्ताद नहीं हो

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

तसा तर प्रत्येकच कवी इतरांपेक्षा वेगळा असतो आणि तरीही प्रत्येकाच्या रचनेत काही बाह्य प्रभाव आढळून येतात. ग़ालिबच्या काव्यातलं वेगळेपण हे विशेष अनोखं होतं. त्यातली संवेदना, भाषेची वळणं, कल्पनेची भरारी, थक्क करणारी चमत्कृतिपूर्णता, दुःखाची आर्त हाक आणि निराशेची खोलवर रुजलेली जाणीव तिच्यात एक जान ओतणारी होती. समाजाच्या विविध स्तरांवरल्या लोकांना साद घालण्याची ताकद तिच्यात होती आणि म्हणूनच तिचं स्थान हे अजोड बनलं. काळाच्या भिंती भेदून ती आज एकविसाव्या शतकातही आपली प्रेरणा टिकवून आहे. उर्दू साहित्यात ग़ालिबचं स्थान खूप उच्च आहे. अगदी मोजक्याच कवींची तुलना त्याच्याशी होऊ शकते. ग़ालिब जाणून घेताना, त्याचे पूर्वसूरी आणि समकालीन शायरही ओघानेच आठवतात आणि एकूण उर्दू काव्यसृष्टीच्या संदर्भात त्यांना असं एकत्र आठवणं, हा एक सुखद अनुभव ठरतो. ग़ालिबचा आगचामागचा कालखंड हा उर्दू काव्याचा उत्तम असा कालखंड मानला जातो. विशेषतः उत्कृष्ट अशा दरबारी कवींचा कालखंड होता तो. एकप्रकारे ग़ालिब हा अखेरचा दरबारी शायर ठरतो. त्याला दरबारी शायर होण्याचा मान तसा अल्पकाळच अनुभवता आला. कारण दिल्लीचं तख़्त त्याच्या हयातीतच लयाला गेलं होतं. १८५७चा लढा अयशस्वी झाल्यानंतर, १८५८ पासून दिल्ली आणि एकूणच देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला...

ग़ालिब आणि त्याच्या आधीच्या पिढीतले प्रमुख शायर मीर तक़ी ‘मीर’ आणि मिर्ज़ा ‘सौदा’ यांची नावं त्या कालखंडातील कवींमध्ये अग्रक्रमानं घ्यावी लागतील. आणखीही अनेक शायर त्या काळात होते आणि त्यांचा लोकमानसावर एक प्रभावही होता. पण ही तीन नावं एकदम खास होती. तत्कालीन शायर आणि ग़ालिब असा विचार करताना ग़ालिबचं वेगळेपण उठून दिसतं. तसंच त्या काळातील समाज आणि साहित्य यांचं नातंही उमगायला मदत होते. या मंडळींकडे वळण्यापूर्वी अर्थातच अठराव्या शतकातील उर्दू काव्य आणि त्याचा दिल्लीशी जुळलेला संदर्भ याविषयीही जाणून घ्यायला हवं...

दिल्ली हे उर्दू साहित्याचं एक केंद्रच बनलं होतं. पण काही काळ बरेचसे कवी लखनौला गेले होते. मीरसारखा मान्यवर शायरही दिल्लीत अल्पकाळ राहून लखनौला गेला. सगळीच कविता काही दर्जेदार नव्हती. कवींना दिल्ली दरबारात मानधन, दरबारी स्थान आणि नियमित वेतन मिळत असे. इतरत्रही राजांच्या पदरी कवी चाकरी करत किंवा धनिक रसिकांच्या आश्रयावर त्यांना मानधन मिळत असे. कवींकडे बघण्याची नजरही अभिरुची असणारी असे, असं नाही. मनोरंजनाची बाजूही यात होती. यामुळं कवी मनोरंजनार्थ रचना करत, ज्यात आश्रयदात्याची खुशमस्करी, गुणगान वगैरे  असे. तसंच काहीवेळा विनोदाची झालरही या काव्याला असे. यामुळं सुमार दर्जाचा विनोदही काव्यात उतरे. कधी त्यात अश्लीलताही असे. आपल्या मालकाला खूश ठेवणं, हे उद्दिष्ट ठेवून रचना केल्या जात. नाहीतर चाकरीतून बाहेर हाकललं जाण्याची भीती होती...अशावेळी कवींची बुद्धी व कौशल्य भलत्या वाटेवरच खर्च होत असे. खरं तर अशा आश्रयाचा काव्यरचनेवर विपरीत परिणामच घडत असे. त्यापूर्वीच्या कवींना अर्थार्जनाचा असा अन्य मार्ग उपलब्ध नव्हता. शिवाय धर्माचा पगडा एकूणच समाजावर फार असल्यानं, कवींवरही तो होताच. त्यांच्या काव्यात प्रेयसी, प्रेम यांच्या रूपात ईश्वरभक्तीचाच स्पर्श होता. पण तो काळ मागं पडून, बादशाहच्या किंवा धनिक-नवाब रसिकाच्या कृपेवर कवीला उपजीविका करणं शक्य होत गेलं. त्यातच दिल्लीतील सत्ता अस्थिर बनली आणि मुग़ल दरबारात कवींना पूर्वीसारखा आश्रय मिळेनासा झाला. दिल्लीश्वरांचा खजिनाही तसा ओसरत चालला होता. मात्र दिल्ली दरबाराची शान कायम होती, त्यामुळं शायर व कलावंतांना तिथं आपण असावं, अशी आस लागून राहिलेली असे. मीर आणि सौदानंतर इन्शा, जुरअत, मुसहिफ़ी असे मान्यवर कवी होऊन गेले. अर्थात काव्यासोबतच इतरही विषयांवर ते रचना करत. बरेचसे कवी उर्दूबरोबरच फ़ारसी भाषेतही काव्यलेखन करत असत. कारण फ़ारसीचं साहित्यविश्वातलं स्थान हे त्या काळात विशेष उच्च होतं. त्याला एक जागतिक अपील होतं. फ़ारसी भाषा जगात इतर अनेक देशांमध्ये बोलली-लिहिली जात होती. इस्लामी संस्कृतीतही तिला लक्षणीय असं महत्त्व होतं. शिवाय ती दरबारी कामकाजाचीही भाषा होती. 

तर स्त्रियांची बोली भाषाही काही कवींनी काव्यरचनेत वापरायला सुरुवात केली, जी ‘रेख़्ती’ म्हणून ओळखली जात असे. तिच्यात हिंदी बोली, लोकभाषा यांची दाट छटा होती. इंशा, रंगीं या कवींची नावं या संदर्भात घेता येतील. रेख़्तीतली काव्यरचना ही थट्टाविनोद, विषयवासना, अश्लीलता अशा रंगातली होती. अभिरुचिसंपन्न समाजाला ती नापसंत होती आणि तिचं आयुष्यही स्वल्पच ठरलं. पण या तऱ्हेचं काव्य एका टप्प्यावर रचलं जात होतं आणि काही राजांच्या दरबारात ते सादर केलं जात होतं, हेही खरंच. 

मुग़ल वंशातले अखेरच्या पिढीतले राजे हे कवींचे आश्रयदाते होते आणि त्यांच्यापैकी काहीजण स्वतःही कवी होते. शाहआलम दुसरा हा बादशाह ‘आफ़ताब’ या कविनामानं शायरी करत असे. त्याच्या दरबारात सौदा, मीर, इन्शा अशा अनेक कवींना स्थान होतं. तो फ़ारसीतही रचना करत असे. त्याचा मुलगा ‘सुलेमान’ या कविनामानं लिहीत असे. शाहआलमचा एक मुलगा अकबरशाह द्वितीय १८०६ मध्ये गादीवर आला. वडिलाचं आफ़ताब (सूर्य) हे तख़ल्लुस होतं, तर यानं ‘शुआआ’ म्हणजे किरण हे नाव धारण केलं. त्याच्यानंतर १८३७ मध्ये त्याचा क्रमांक दोनचा पुत्र अबूज़फ़र सिराजुद्दीन मुहम्मद बहादूरशाह दुसरा दिल्लीच्या तख़्तावर आरूढ झाला, जो ‘ज़फ़र’ या कविनामानं प्रसिद्ध आहे. बहादूरशाह दुर्दैवानं अखेरचा दिल्लीश्वर ठरला...त्याच्या दरबारात नसीर, ज़ौक़, ग़ालिब अशांना स्थान मिळालं. कवितेच्या संदर्भात तो त्यांचा सल्लाही घेत असे. त्याच्या काव्यावर ज़ौक़ व ग़ालिब यांचा प्रभाव राहिला. ज़फ़र हा संगीताचाही दर्दी होता आणि त्यानं ठुमऱ्यांची रचनाही केली होती. सअदी (सादी) या फ़ारसीच्या नामवंत कवीच्या ‘गुलिस्तान’ या काव्यसंग्रहावर त्यानं टीकाही लिहिली होती. एकूणच ग़ालिबच्या आधीचा काळ व त्याचा समकाल विविध शायरांनी गाजवला. यात दाग़, आज़ुर्दा, मौमिन, शेफ़्ता असे बरेच कवी येतात. या काळात उर्दू शायरी जनमानसात एक स्थान मिळवून होती. एक भाषा म्हणून उर्दू स्थिर झाली होती. आसपासच्या भाषांमधून शब्द, संदर्भ, भाषिक व संस्कृतिक वारसा घेत उर्दूचा विकास झाला होता. तरीही या सर्व काळातल्या कवींमध्ये ग़ालिबचं स्थान अधिक उंचावर होतं, याच शंका नाही...अभ्यासक, विद्वान, जनसामान्य सर्वांपर्यंत गेलेला ग़ालिब हा उर्दूचा तुलसीदास किंवा सूरदासच होता, असं म्हणायला हवं...

हिंदीत सूरदास, तुलसीदास यांचं जे स्थान आहे, ते उर्दूत ग़ालिबप्रमाणे मीरचंही आहे. ग़ालिबनं मीरचा अनेकदा उल्लेख केलेला आढळतो. नंतरच्या पिढीतल्या ज़ौक़, नासिख अशा अनेक नामवंत शायरांनीही मीरची प्रशंसा केली आहे. एका शेरमध्ये ग़ालिब म्हणतो,

‘ग़ालिब’ अपना ये अक़ीदा 
है ब-क़ौल-ए-‘नासिख’
आप बे-बहरा है जो मोताक़िद-
ए-‘मीर नहीं’
शेख़ इमाम बख़्श ‘नासिख़’ 

हा ग़ालिबच्या आधीच्या पिढीतला शायर. तो मूळचा फ़ैज़ाबादचा होता, पण पुढं लखनौला गेला. तो त्याच्या भाषेच्या जाणकारीसाठी आणि आकर्षक शैलीसाठी ओळखला जातो. त्याचे बरेच शिष्य होते. पण त्याला आपल्या या लोकप्रियतेचा काहीच फायदा झाला नाही. उलट राजकारणामुळे त्रासच झाला आणि लखनौहून इलाहाबादला जावं लागलं. शब्दांचा कुशल कारागीर म्हणून नासिख़ला दिल्लीपर्यंत नाव होतं. नासिख़ हा उर्दूला धर्मापलीकडे नेणारा भाषातज्ज्ञ होता. ग़ालिब या शेरमध्ये म्हणतो. ‘नासिख़प्रमाणं माझीही धारणा आहे, की जर मीरच्या श्रेष्ठ्त्वावर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही सर्वार्थानं निर्धन-अडाणी आहात.’ 

ग़ालिबने स्वतःच्या प्रतिभेचा तोरा मिरवतानाही एका ग़ज़लच्या शेरमध्ये मीरचा उल्लेख केला आहे-

रेख़्ता के तुम्ही उस्ताद नहीं हो ‘ग़ालिब’
कहते हैं अगले ज़माने में कोई ‘मीर’ भी था

ग़ालिबची एक रचना मीरपर्यंत कुणाकडून तरी पोहोचली. त्यावर मीरने म्हटलं, ‘अगर इस लड़के को काबिल उस्ताद मिल गया, और उसने इसको सीधे रास्तेपर डाल दिया तो लाजवाब शायर बन जाएगा. वर्ना मुहम्मल बकेगा’. याचा उल्लेख यापूर्वी येऊन गेलाच आहे...ग़ालिबच्या एका रचनेवरून मीरने त्याची योग्य ती पारख केली, हे मीरचंही द्रष्टेपणच म्हणायला हवं. 

मीर आणि ग़ालिब हे उर्दूतले दोन महान कवी. त्यांच्या जवळ जाणारा दुसरा शायर नव्हता व नाही. दोघांच्या जीवनातही काही साम्य होतं आणि काही बाबतीत मानसिकतेतही. उर्दू काव्यविश्वातले हे दोन लखलखते हिरे. ग़ालिबप्रमाणं मीरही अभिमानी, स्वतःच्या शायरीविषयी सार्थ अभिमान बाळगणारा. आपलं काव्य हे काही मिटून जाणारं नाही. आपली एकही ओळ पुसून त्याजागी दुसरी लिहिता येणार नाही, असं ग़ालिब लिहून गेलाच आहे. मीरनंही स्वतःच्या कवितेबद्दल म्हटलं होतं की, ‘माझ्या काव्याचा गवगवा कधीच थांबणार नाही. कल्पान्तापर्यंत माझा दीवान टिकून राहणार आहे-

जाने का नहीं शोर सुख़न का मिरे हरगिज़
ता-हश्र जहाँ में मिरा दीवान रहेगा

ग़ालिब मीरला मानत असे आणि त्याच्या काव्यापासून त्याला प्रेरणाही मिळाली असावी, असं म्हणायला वाव आहे. अगदी गुरुशिष्य नव्हे, पण त्याच्या जवळ जाणारं असं एक नातं मीरच्या संदर्भात ग़ालिब नक्कीच मानत असावा. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली होती की नाही, हे स्पष्ट नाही, पण ती शक्यता कमी वाटते. कारण ग़ालिबचा जन्म १७९७ सालातला, तर मीरचं निधन झालं १८१० साली. त्यावेळी ग़ालिब जेमतेम बारा-तेरा वर्षांचा होता. शिवाय मीर हा या सर्व काळाच्या पूर्वीच दिल्ली सोडून लखनौला स्थायिक झाला होता. मात्र वर उल्लेख केल्यानुसार, ग़ालिबच्या एका रचनेवरून मीरने त्याची योग्य ती पारख केली होती, हे खरं आहे. हे मीरचंही द्रष्टेपणच...मीर आणि ग़ालिब यांच्यातील साम्यस्थळं शोधण्यात दुहेरी आनंद मिळतो. विशिष्ट परिस्थितीत माणूस कसा घडतो, त्याचीही झलक अनुभवता येते. ग़ालिबनं मीरविषयी आणखी एका शेरमध्ये लिहिलं आहे, ‘मीरच्या काव्याविषयी मी काय विवरण करू? त्याचा दीवान काश्मिरातील उद्यानापेक्षा जराही कमी नाही.’

मीर के शेर का अहवाल 
क्या कहूँ ‘ग़ालिब’
जिसका दीवान कम 
     अज़-गुशन-ए-कश्मीर नही      

संबंधित बातम्या