न होता मैं तो क्या होता...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 16 मार्च 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

ग़ालिबच्या काव्याकडं आणि आयुष्याकडं पाहिलं, की त्याच्या विचारांची झेप जाणवते. त्याचं द्रष्टेपण लक्षात येतं. एका अस्तंगत होत चाललेल्या तुर्की परंपरेचा अभिमानी असलेला ग़ालिब एकीकडं आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचा वारसा दिमाखात मिरवताना दिसतो. तर, दुसरीकडं रूढ धार्मिक आणि सामाजिक सभ्यतेचे संकेत धुडकावून लावताना आढळतो. जनमानसात धर्मद्रोही म्हणून बदनाम झालेल्या ग़ालिबच्या आध्यात्मिक विचारांचं प्रतिबिंब त्याच्या कवितेत पडलेलं दिसतं. चिरंतन तत्त्वाबाबत, सर्वव्यापी सर्वस्थायी ईश्वराबाबत तो म्हणतो, की सर्व गोष्टींमध्ये ईश्वर आहे, पण ईश्वरासारखी कोणतीच वस्तू नाही... अतिशय निराळ्या आणि नव्या पद्धतीनं तो हे सांगतो. 
हर चन्द, हर एक शै में तू है
पर तुझ सी कोई शै नहीं है

ग़ालिबला अध्यात्माच्या वेगवेगळ्या तत्त्वांची ओळख होती. निरनिराळ्या धर्मांचे, पंथांचे लोक मांडत असलेलं तत्त्वज्ञान त्यानं अभ्यासलं होतं. म्हणूनच चिरंतन तत्त्वाबाबतची चर्चा त्याच्या शायरीत येत राहिली. सर्वकाही जर ईश्वर असेल, तर मग दृष्टीला दिसणारं हे सारं आहे तरी काय, हा प्रश्न तो अचंबित होऊन वेगवेगळ्या पद्धतीनं उपस्थित करताना दिसतो... एका शेरमध्ये तो म्हणतो, की दृश्य, बघणारा आणि दृष्टी हे जर एकच मानायचं झालं, तर मग जे दृष्टीस पडतं त्याची गणना कशात करायची? 
अस्ल-ए-शुहूद-ओ-शाहिद-ओ-मशहूद एक है
हैराँ हूँ फिर मुशाहिदा है किस हिसाब में

चिंतनाच्या गूढ गोष्टी आणि मानवाच्या आणि एकूणच दृश्यमान जगाच्या अस्तित्वाबाबत मनाला पडणारे प्रश्न शायरीतून व्यक्त करताना ग़ालिब खूप अंतर्मुख होऊन जातो. तो ज्या वातावरणात राहत होता, बौद्धिक व आत्मिक पातळीवर त्याची वैचारिक देवघेव इतरांशी होत होती, ते वातावरण व त्याचा इतरांशी व स्वतःशी होणारा संवाद या त्याच्या या चिंतनात्मक वृत्तीमागचं कारण होतं. त्यात दिल्ली शहराचाही वाटा होता. आपल्या हयातीत तो जास्त करून दिल्लीत राहिला. या शहराची नस न नस त्याला माहीत होती. दिल्लीचा प्रभाव त्याच्यावर कळत नकळत पडला असला पाहिजे. ग़ालिबनं दिल्ली अनुभवली, ती जरा उतरती कळा लागलेल्या काळातली. पण तरीही त्या शहराचा आत्मा अगदीच हरवलेला नव्हता. दिल्ली हे पूर्वीपासून संमिश्र वस्तीचं, विविध प्रवाहांचं शहर होतं. देशातलं ते एक महत्त्वाचं शहर होतंच. त्या शहराची संस्कृतीही बहुरंगी होती. वेगवेगळे धर्म तिथं सुखानं नांदत होते. निरनिराळ्या भाषा बोलल्या जात होत्या. विशेषतः अकबराच्या काळापासून दिल्ली शहरावर संमिश्र संस्कृतीचा प्रभाव पडत गेला. ग़ालिबच्या काळाआधी मुग़ल साम्राज्याची चांगली पकड बसली होती. अकबरानं आणलेली प्रशासनाची सुविहित घडी दिल्लीला एक नवा चेहरा प्रदान करणारी ठरली होती. सर्व धर्मांच्या विद्वानांना आणि कलावंतांना दरबारी प्रोत्साहन आणि अर्थसाह्य मिळत होतं. मशिदींबरोबरच मंदिरांनाही सरकारी मदत मिळत असे. अकबरानंतर दोनतीन पिढ्या वातावरण चांगलं राहिलं. पण औरंगज़ेबाच्या काळात त्यानं या साम्राज्याचं रूपांतर कडव्या इस्लामी राज्यात करण्याचा जणू निश्चयच केला होता. मुग़ल राजवटीला त्यानंतर उतरती कळाच लागली. अकबरशहा (दुसरा) याच्या वडिलांच्या काळात दिल्लीचा सम्राट इंग्रजांचा पेन्शनर झाला. या घडामोडींमुळं बरीच राजकीय उलथापालथ झाली. मात्र दोन शतकांच्या सांस्कृतिक प्रभावाला यामुळं मोठा धक्का पोचू शकला नाही. 

अशा बहुरंगी वातावरणाचे संस्कार आणि अनुभव ग़ालिबला लाभले. त्याच्यासारख्या समंजस आणि विशाल दृष्टिकोन बाळगणाऱ्या विद्वानाला दिल्ली शहर आवडलं व मानवलं यात नवल नाही. राजकीयदृष्ट्या पीछेहाट असली, तरी दिल्लीची संस्कृती त्याच्या काळात एका टप्प्यावर येऊन स्थिरावली होती. तिथल्या लोकांची जीवनशैली काळाच्या ओघात घडत गेली होती. मुसलमानांमधील सुफ़ी संप्रदाय आणि हिंदूंमधील भक्तिसंप्रदायानं निर्माण केलेलं सौहार्दाचं वातावरण टिकून होतं. काही अप्रिय घटना तेव्हाही घडत, पण लोकांमध्ये परस्परांविषयी अविश्वास आणि तिरस्कार निर्माण होण्याचे प्रकार फारसे घडत नसत. 

पूर्वीच्या काळातच मुग़लांनी फ़ारसी भाषेला दरबारी स्थान दिलं होतं. ते सर्वमान्य होतं आणि अनेक हिंदू फ़ारसी पंडितही राजदरबारी मान प्राप्त करून होते. पुढच्या काळात निर्माण झालेली उर्दू भाषा जनसामान्यांमध्ये आणि कवींमध्येही रुजली आणि त्या भाषेत काव्यरचना होऊ लागल्या. फ़ारसी भाषेतून अनेकानेक संस्कृत ग्रंथांचं भाषांतर अकबराच्या काळात सुरू झालं आणि नंतरही ही परंपरा बरीच वर्षं टिकून होती. अथर्ववेद, रामायण यांचे अनुवाद मुल्ला अब्दुल कादिर बदायूनीनं केले होते. रामायणाचे तर फ़ारसीत गद्य-पद्य दोन्ही प्रकारांमध्ये बरेच अनुवाद झाले. भास्कराचार्यांच्या लीलावती या ग्रंथाचा फ़ारसी अनुवाद फ़ैज़ी या कवीनं केला होता. शाहजहानचा पुत्र व औरंगज़ेबाचा भाऊ दारा शिकोह हा विद्वान होता आणि त्यानं भगवद्‍गीता, योगवासिष्ठ यांचा अनुवाद फ़ारसीत केला होता. हिंदू व मुस्लिम गूढवादी तत्त्वज्ञानाचा परामर्श घेणारा ग्रंथही त्यानं लिहिला होता. 

अशा संमिश्र वातावरणाचा वारसा घेऊन आलेल्या दिल्ली शहरात धार्मिक सण उत्साहात साजरे होत. बादशहा मुस्लिम असला तरी हिंदूंचे सणही दरबारातर्फे जोशात साजरे होत. रक्षाबंधन, दसरा, होळी, दिवाळी, शिवरात्र, वसंतपंचमी हे सण व उत्सव राजदरबारातही थाटात पार पडत. रक्षाबंधनासंदर्भात पूर्वी एक घटना घडली होती. अकबरशहा (दुसरा) याचे आजोबा सम्राट आलमगीर (दुसरे) यांची हत्या झाली आणि त्यांचं शव राजमणी गौड या ब्राह्मण स्त्रीच्या नजरेला पडलं, राजाचे सैनिक येईपर्यंत तिनं त्यावर पहारा दिला. या बादशहाच्या मुलानं म्हणजे शहा आलमनं त्यानंतर या स्त्रीच्या हातून दरवर्षी राखी बांधून घेण्याचा पायंडा पाडला. ती दरवर्षी येऊन त्याला राखी बांधत असे आणि भेटवस्तू देऊन बादशहा तिचा सन्मान करत असे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांमध्येही कायम राहिली आणि राजमणीच्या कुटुंबातल्या स्त्रिया प्रतिवर्षी बादशहाला राखी बांधू लागल्या. 

ग़ालिबच्या काळात यामुळंच दिल्लीत धार्मिक दंगे होत नसत. त्याच्या हयातीत एक प्रसंग घडला, जेव्हा शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. ही गोष्ट १८५४ मधली. त्या वर्षी बकरी-ईदच्या कुर्बानीसाठी गोहत्या करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचं दिल्लीचा तत्कालीन इंग्रज अधिकारी थॉमस मेटकाफ यानं घोषित केलं. वास्तविक हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या काळी मुग़ल राजे ईदच्या काळात उंटाचा बळी देत असत. तशी परंपराच प्रचलित होती. पण ब्रिटिशांनी गोहत्येवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. मग दिल्ली शहरातलं वातावरण तंग झालं. पण तरीही दंगे वगैरे घडले नाहीत. त्यावेळी ग़ालिबनं आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात या घटनेचं वर्णन केलं आहे –

‘इथे ईदच्या दिवशी काय झालं ते मी तुला सांगतोच. पण त्या आधी, तिकडे अलिगडमध्ये काय झालं असेल, याबद्दल इथे चर्चा चालली होती त्याविषयी लिहितो. ईश्वर आपलं रक्षण करो! अलीगडमध्ये जणू युद्धच झालं आहे असं लोक भेटेल त्याला सांगत होते. हिंदू व मुस्लिम दोघांनी तलवारी उपसून एकमेकांवर हल्ले केले आणि त्यांत दोन्हीकडची दहा-वीस माणसं तरी ठार झाली, असं बोललं जात होतं. तुला पत्र लिहून याबद्दल विचारावं असं माझ्या मनात होतंच, तेवढ्यात तुझं पत्र आलं आणि खरी परिस्थिती मला समजली. मला वाटतं तिकडंही दिल्लीबद्दल अशाच बातम्या पसरल्या असतील – तलवारी उगारल्या गेल्या वगैरे, वगैरे. तर, सभ्य गृहस्था, तलवारी वगैरे अजिबात उपसल्या गेल्या नाहीत आणि काही तंटाही झाला नाही. दोन दिवस हिंदू दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवली, त्यानंतर ब्रिटिश न्यायाधीश आणि शहरातील पोलिस प्रमुखांनी शहरभर दौरा केला. समजावणी करत, मनधरणी करत, आग्रह करत आणि दरडावणी करत त्यांनी दुकानं उघडायला लावली आणि अखेरीस बकरे व गाई दोघांचीही कुर्बानी देण्यात आली.’

ग़ालिबच्या या पत्रावरून हिंदू-मुसलमान लोकांमध्ये जातीय हिंसाचार होऊ शकतो, ही कल्पनाच त्याला अतिशयोक्त वाटत असल्याचं दिसून येतं. अलिगडमधल्या खऱ्या परिस्थितीचं ज्ञान झाल्यावर त्याला वाटलेला दिलासाही पत्रातून स्पष्ट होतो. दिल्लीबद्दलही अशाच अफवा उठल्या असणार, या अंदाजानं तो तिथल्या वास्तव परिस्थितीविषयी आपल्या मित्राला कळवतो. अर्थात तणावाचे प्रसंग तेव्हाही घडत असत. ते होत नव्हतं असं नाही. एकदा जैन आणि हिंदू धर्मीयांमध्येही रथयात्रेवरून काहीतरी कुरापत निघाली होती. शिवाय शिया व सुन्नी पंथांच्या मुसलमानांमध्येही अधूनमधून वादाचे प्रसंग उद्‍भवत असत. ईद आणि रामलीलेच्या मिरवणुकांच्यावेळी काही गडबड होऊ नये, यासाठी ब्रिटिश फौजा सज्ज असत. पण काही कारवाई होण्याची वेळ आल्याचं दिसत नाही. उलट रामलीलेची मिरवणूक आपल्याला महालातून पाहता यावी याकरिता तिचा पूर्वीचा मार्ग बहादूरशहा ज़फ़रनं बदलल्याचे संदर्भ वाचायला मिळतात. अरबी भाषेतली बायबलची प्रत कुणी भेट दिल्यावर त्या बादशहाला आनंदच वाटतो...

धार्मिक समजुतींबाबत टिंगल करण्याबाबतचा ग़ालिबचा एक किस्सा आहे. दिवसभर ज्या खोलीत तो वावरत असे, तिच्या लगतच दुसरी एक छोटी खोली होती. ती काहीशी अंधारी होती. आत शिरताना वाकूनच जावं लागे, इतकं तिचं दार बुटकं होतं. या खोलीत जमिनीवर गालिचा अंथरलेला असे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग़ालिब सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत या छोट्या खोलीतच थांबून राही. त्या जागेला थंडावा होता. एकदा उन्हाळ्याच्या काळात रमज़ान महिना आला असताना, ग़ालिबचे एक स्नेही मौलाना त्याच्याकडं आले. तेव्हा ग़ालिब या खोलीत बसून फाशाचा खेळ खेळत होता. हा प्रकार बघून ते म्हणाले, ‘मी धर्मग्रंथांमध्ये असं वाचलंय, की रमज़ानच्या काळात सैतान कैदेत असतो म्हणून. पण आता तुझ्याकडं बघून मला या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शंका वाटू लागली आहे...’ त्यावर ग़ालिबनं आपल्या खास शैलीत उत्तर दिलं, ‘महाशय, आपण ऐकलंत ते अगदी खरं आहे. मात्र मला जरा स्पष्ट करून एवढंच सांगायचं आहे, की सैतानाला जिथं ठेवलं ती तुरुंगाची जागा म्हणजे हीच खोली आहे...’

अशी धर्माची आणि धार्मिक संदर्भांची पदोपदी खिल्ली उडवणारा ग़ालिब सर्वव्यापी ईश्वराच्या संकल्पनेला मानणारा होता. चिरंतन तत्त्वावर त्याची श्रद्धा होती. ‘तत्त्वमसि’ किंवा ‘अहं ब्रह्मास्मि’ यासारख्या उक्तींची आठवण करून देणारे शेर त्यानं लिहिले आहेत. 
न था कुछ तो ख़ुदा था
कुछ न हता तो ख़ुदा होता
डुबोया मुझको होने ने
न होता मैं तो क्या होता

मायावादाची छटाही त्याच्या काव्यात आढळते. जे दिसतं आहे, ते मुळात ‘नाही’, तो तर भ्रम आहे, असंही तो एके ठिकाणी म्हणतो –
हाँ खाइयो मत फ़रेब-ए-हस्ती
हर चन्द कहे कि कै, नहीं है

संबंधित बातम्या