बन्दगी में मिरा भला न हुआ

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 23 मार्च 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

गूढ तत्त्वज्ञानाची ग़ालिबच्या कवितेतली जाणीव खूप ठळक आहे. दृग्गोचर जगाचं अस्तित्व आणि त्याचा आविष्कार हा अखेरीस एक भ्रम आहे, हे तो वेगवेगळ्या प्रकारे सतत सांगताना दिसतो. त्याचं हे चिंतनशील रूपही खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य प्रत्यक्षात जगतो आणि आपल्या मनोविश्वात जे जगतो, त्यात एक नातं असतं आणि तरीही या दोन गोष्टींमध्ये तफावतही असू शकते. ग़ालिब भले त्याच्या दोषांसाठी आणि आढ्यतेसाठी प्रसिद्ध असेल. पण त्याच्या विचारांचा आवाका आणि उत्कट भावनांची या विचारांना मिळालेली जोड ही खरोखर अपूर्व अशी होती. जगाबद्दल, स्वतःला जाणवणाऱ्या विश्वाबाबतच्या गोष्टींविषयी तो कवितेतून लिहीत राहिला. या रचनांमधून पसरलेलं तत्त्वचिंतन वेधक आहे. त्याचा जितका आस्वाद घ्यावा, तितकी बौद्धिक मेजवानी मिळते. एका महान कवीच्या मस्तिष्कात चाललेल्या विचारचक्राचा प्रत्यय घेता येतो. एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘ज्याला आपण प्रकट समजतो, ते तर गूढातलं गूढ आहे. स्वप्नातून जागे झालेले आपण अद्याप स्वप्नातच आहोत.’ 
है ग़ैब-ए-ग़ैब, जिसको समझते हैं हम शुहूद
हैं ख़्वाब में हनूज़, जो जागे हैं ख़्वाब से

ग़ालिबचा अभिप्राय आहे, की या जगात आपण ज्याला प्रकट समजतो, उघड समजतो, ते सारं रहस्यपूर्ण आहे, गूढ आहे. ते तर झाकलेलंच आहे. झोपेतून जाग आली, तरी या जगात राहताना आपण एका स्वप्नातच तर असतो. कारण हे सारं जग मुळात प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीच... अशा प्रकारे ग़ालिब या संसाराला कधी भ्रम, कधी गुप्त रहस्य संबोधतो. यातूनच स्वाभाविकरीत्या मग सुख व दुःख यांचं वरखाली होत राहणं, त्याकडे तटस्थपणे बघणं त्याच्या काव्यात उतरताना दिसतं... एका शेरमध्ये ग़ालिब लिहून जातो, ‘या जगातला आनंदोपभोग म्हणजे दुःखांची शाश्वतता, निश्चितताच तर आहे.’
हिना-ए-पा-ए-ख़िज़ाँ है बहार अगर है यही
दवाम-ए-कुल्फ़त-ए-ख़ातिर है ऐश दुनिया का

एकूणच, या जगाला वसंत ऋतूप्रमाणं आनंद आणि सुखानं परिपूर्ण समजत असलात, तर लक्षात घ्या, की या वसंत ऋतूच्या पावलांवर पानगळीच्या ऋतूची मेंदी सजलेली आहे. वसंताचं रूपांतर केव्हाही पानगळीत होऊ शकतं. जगातली सुखं ही शेवटी पीडाच देतात असं तो इथं सुचवतो. 

माणसाचं अस्तित्व हेच मुळी त्याच्या विनाशाचं, मरणाचं कारण आहे, हा विचारही तो एके ठिकाणी व्यक्त करतो. जीवन आणि मरण यांचं अटळ नातं, मृत्यूची अपरिहार्यता यांची चर्चा हिंदू तत्त्वज्ञानात नेहमी होत आली आहे. ‘मरणं प्रकृतिः शरीरिणाम्, विकृतिर्जीवितम् उच्यते बुधैः’ ही कालिदासाच्या ‘रघुवंशा’तील प्रसिद्ध उक्ती इथल्या जीवनविषयक दृष्टीत मिसळून गेलेली. तिचाच प्रत्यय ग़ालिबच्या काव्यात वारंवार येत राहतो. ‘आपलं अस्तित्व हे आपल्या मरणाचं कारण आहे. स्वतःच स्वतःची शपथ असल्याप्रमाणं मिटून तर जायचंच आहे...’
हस्ती हमारी अपनी फ़ना पर दलील है
याँ तक मिटे कि आप हम अपनी क़सम हुए

दैनंदिन जगण्याच्या धडपडीतच आपली ताकद खर्ची पडते, याचीही ग़ालिबला खंत होती. इथल्या अडचणींमुळं बाकी काही करायला सवडच मिळत नाही, मला उगाचच या गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागतं, असा सूरही त्याच्या लिखाणात उमटतो. आपली स्थिती आणि वाट्याला येणाऱ्या अडचणी; यात मी दुबळा पडतो, असं तो म्हणतो. ‘मी या भौतिक विचारांमध्येच गढून गेलेला असतो. मी कुठं आणि या अटळ चिंता, ही दुःखं कुठं?’ आपल्याला या चिंतांनी जखडून ठेवलंय, नाहीतर आपण काही वेगळं झालो असतो, असंही त्याला सुचवायचं आहे. 
फ़िक्र-ए-दुनिया में सर खपाता हूँ
मैं कहाँ और ये वबाल कहाँ

जगानं परकेपणा दाखवला म्हणून तू हताश होऊ नकोस. तुझं कोणी नसलं ‘ग़ालिब’, तरी ईश्वर तुझा आहे. 
बेगानगी-ए-ख़ल्क़ से बेदिल न हो ‘ग़ालिब’
कोई नहीं तेरा तो मेरी जान, ख़ुदा है

धर्मा-धर्मातला भेद न मानणारा गालिब अनेकदा आपल्या काव्यातून हा विचार मांडताना दिसतो. सच्ची निष्ठा, भावना हीच तेवढी महत्त्वाची आहे, हे आघ्रहानं सांगतो -
वफ़ादारी ब-शर्त-ए-उस्तुवारी अस्ल ईमाँ है
मरे बुतख़ाने में तो क़ाबे में गाड़ो बिरहमन को

‘दृढ निश्चय आणि संकल्प ठेवून केलेली ईश्वरनिष्ठा म्हणजे खरं धर्मपालन. ब्राह्मण जर मंदिरात मरण पावला, तर त्याला मक्केला नेऊन काब्यात पुरायला हरकत नाही,’ असं तो म्हणतो. धर्म कोणताही असला, तरी तुमच्या सच्च्या भावनेला किंमत आहे. असा एक उदात्त विचार ग़ालिब यात मांडतो. बंदिस्त धर्माचरणाच्या पलीकडं तो होताच, पण इथं तर तो सगळ्या चौकटी तोडणारा धर्माचा उच्चार करताना दिसतो. इथं कबीराची आठवण होते. तोही म्हणून गेला, की ईश्वराचं प्रेम असेल, तर क़ाबा काशी वाटू लागतो, राम हा रहीम वाटतो. ईश्वराच्या भक्तीमुळं जाड कणकेप्रमाणं असणारं आपलं स्थूल शरीर हे मैद्याप्रमाणं सूक्ष्म होतं –
काबा फिर कासी भया, राम भया रहीम
मोट चून मैदा भया, बैठि ‘कबीरा’ जीम

माणसाची धर्मनिष्ठा बाह्य गोष्टींवर जोखू नका, हे सांगताना ग़ालिब म्हणतो, ‘जपमाळ आणि जानवं यांच्यातील गाठींवर काही अवलंबून नाही. निष्ठेवरूनच शेख आणि ब्राह्मण या दोघांचीही पारख केली जाते,’  
नहीं कुछ सुब्हा-ओ-ज़ुन्नार के फंदे में गीराई
वफ़ादारी में शैख़ ओ बरहमन की आज़माइश है

या शेरमध्ये धर्मविषयक निष्ठेचा संदेश थेटच आहे. पण याला १८५७ नंतरच्या काळाचा संदर्भही लागू पडतो, असं वाटतं. इंग्रजांशी निष्ठा असेल, तर ते तुमच्या धर्मावरील श्रद्धेपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरवणारा असा तो काळ होता. या ग़ज़लचा जो मतला, म्हणजे प्रारंभिक शेर आहे, त्यातही या अर्थाकडं झुकणारे संदर्भ सापडतात- 
क़द ओ गेसू में क़ैस ओ कोहकन की आज़माइश हो
जहाँ हम हैं वहाँ दार-ओ-रसन की आज़माइश है

ईश्वराची उपासना केली, तरी मला काहीच लाभ झाला नाही. मग ईश्वराची सत्ता ही त्या नमरूद बादशाहप्रमाणं खोटी आहे काय? असा प्रश्न एका शेरमध्ये ग़ालिब उपस्थित करतो. नमरूद हा अत्याचारी बादशाह स्वयंघोषित ईश्वर होता. अशा ख़ुदाची बंदगी करणं म्हणजे खोटी आराधनाच. पण आपण तसं न करताही आपली उपासना मात्र फळाला आली नाही. याचा अर्थ ईश्वरी सत्ता ही त्या नमरूदच्या जुलमी राजवटीप्रमाणंच म्हणायला हवी, असा त्याचा अभिप्राय आहे...
क्या वो नमरूद की ख़ुदाई थी
बन्दगी में मिरा भला न हुआ

शायरीतून धर्म आणि अध्यात्मविषयक मतं प्रकट करताना ग़ालिब इतर धर्मांतील संदर्भही सहजपणे वापरत असे. जगाच्या अस्तित्वावरही भाष्य करत असे. मानवी जीवनावरचं एक उत्तम भाष्य असलेली त्याची ग़ज़ल ‘बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे’मधून त्यानं असे उल्लेख केले आहेत. ही संपूर्ण ग़ज़लच त्याच्या काव्यशक्तीचा प्रत्यय देणारी आहे. हे जग म्हणजे मुलांच्या खेळाचं मैदान आहे आणि रोजच्या रोज इथं होणारा खेळ मी पाहत असतो, असं तो यात म्हणतो. एका शेरमध्ये तो लिहितो, ‘माझ्यासमोर सुलैमानी साम्राज्याचा भ्रामक खेळ घडतो आणि येशूचा चमत्कारसुद्धा एखाद्या सामान्य घटनेप्रमाणं वाटतो’... मानवी जीवनातल्या व इतिहासातल्या गोष्टी चुटकीसरशी घडतात आणि बघता बघता काळाच्या उदरात गडपही होतात, याचा मी साक्षीदार आहे, असं ग़ालिब लिहितो, तेव्हा माणसाच्या आयुष्याचं क्षणभंगुरत्वच तो वेगळ्या शब्दांत मांडत असतो...
बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे
होता है शब-ओ-रोज़ तमाशा मेरे आगे
इक खेल है औरंग-ए-सुलैमान मेरे नज़दीक
इक बात है एजाज़-ए-मसीहा मेरे आगे

धर्माच्या आणि आध्यात्मिकतेच्या संदर्भात ग़ालिबकडं एक बंडखोर म्हणूनही पाहता येईल. शिवाय तो स्वतः अतिशय बुद्धिमान होता आणि बुद्धिवादीही. धर्माविषयीचा त्याचा विचार हा सूफ़ी तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारा होता. मंदिरातल्या मूर्तीत किंवा मशिदीत न मावणारा ईश्वर त्याला मान्य होता आणि कर्मकांडं साफ नामंजूर होती. कधी त्यानं एकेश्वरवाद मांडला, तर कधी चिद्विलासवाद अन् ईश्वर त्याला नेहमीच गूढ वाटत आला. कडवे मुस्लिम, हिंदू धर्मातील प्रतिमापूजनाला चुकीचं मानत व आजही मानतात. ग़ालिब मात्र त्याकडं प्रतीक म्हणून पाहू शकत होता. मूर्तीच्या पूजेच्या माध्यमातून मनातला भक्तिभाव, आदरच तर शेवटी व्यक्त होत असतो आणि शेवटी तोच महत्त्वाचा असतो, असं त्याचं मत होतं. 

ग़ालिबनं वरील ग़ज़लच्या एका शेरमध्ये म्हटलं आहे, की मला एकीकडं माझा धर्म विचलित होण्यापासून रोखत आहे, तर त्याचवेळी नास्तिकता मला आपल्याकडं खेचून घेत आहे. माझ्या पाठीमागं क़ाबा आहे आणि पुढं कलीसा, म्हणजे चर्च आहे...
ईमाँ मुझे रोके है और खींचे है मुझे कुफ्र 
क़ाबा मिरे पीछे है कलीसा मिरे आगे

मनाची कशमकश, द्विधा स्थिती व्यक्त करणारा हा शेर आहे. ज्या गोष्टी इस्लामनं निषिद्ध ठरवल्या, त्यांच्याकडं खेचलं जाणं ग़ालिबला अपेक्षित आहे, की स्वतःचं चंचलपण, ते नेमकं स्पष्ट होत नाही. एक माणूस म्हणून आपल्या मनाची होत असलेली कोंडी, तात्त्विक त्यामुळं आध्यात्मिक गोष्टींबाबत तर्कवितर्क करण्याची वृत्ती अंगी भिनलेला शंकेखोर स्वभावाचा, मूर्तिभंजक वाटावा असा स्वतः ग़ालिबही यात अभिप्रेत असू शकतो. तसा तर कोणताही धर्म हा परिपूर्ण नसतो. ग़ालिबही म्हणूनच मग विविध धर्मांबद्दल, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या स्वरूपाबद्दल विचार करत राहतो. एकीकडं आध्यात्मिक गोष्टीमधलं स्वारस्य आणि दुसरीकडं भौतिक गोष्टींबद्दलचं आकर्षण यांच्या कात्रीत सापडलेला शायर यातून भेटतो. तसंच आपल्याला लाभलेला इस्लामी संस्कृतीचा वारसा आणि इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वामुळं समोर दिसत असलेलं बदलतं वास्तव यांचाही संदर्भ यात अपेक्षित आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य संस्कृतींमधला बदल आणि संघर्ष ग़ालिबच्या नजरेनं टिपला होता, हे या ओळींमधून दिसतं. नवीन बदलांचं स्वागत करणारा ग़ालिब गृहीत धरला, तर या शेरचा आणखी वेगळाच अर्थ होतो. ‘धर्म माझी वाट रोखून धरत आहे आणि नास्तिकता मला पुढं ओढत आहे. काबा माझ्या पाठीमागं आणि चर्च माझ्या पुढं आहे,’ असाही याचा अर्थ लावता येऊ शकतो. म्हणजे, जग आता आधुनिक वळण घेत आहे, पण धर्म आधुनिकतेकडं जाण्यास रोखत आहे, असंही त्याला सुचवायचं असावं. बदलत्या काळाची चाहूल लागलेला एक द्रष्टा कवी यातून समोर येतो...  

ग़ालिब एकाच वेळी काफ़िर, म्हणजे धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि त्याचवेळी मुसलमानही होता. त्याची आध्यात्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक धारणाच तशी होती. त्याचा शंकेखोरपणा, प्रस्थापित समजुतींना प्रश्न विचारण्याची वृत्ती त्याला वेगळं ठरवते. भारताच्या आंतरिक बहुसांस्कृतिक गाभ्याशी तो खऱ्या अर्थानं जोडलेला होता... 

संबंधित बातम्या