बनती नहीं है बादा ओ साग़र कहे बगैर

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 20 एप्रिल 2020

अन्दाज़-ए-बयाँ

उर्दू-फ़ारसी काव्यात मद्य, मद्यपान आणि नशा यांना एक विशिष्ट स्थान आहे. दारू हा विषय समाजात तसा हलक्या आवाजात बोलण्याचा. इस्लामी धर्मात तर मद्यपान पूर्णतः वर्ज्य ठरवलं आहे. तरीदेखील मद्याचा उल्लेख, अपूर्व आनंदाशी जोडलेला मद्यपानाचा संकेत हे या काव्यात आपसूकच येतं. उर्दूत ग़ालिबप्रमाणं इक़बाल आणि अहमद फ़राज़ यांच्या काव्यात शराबचे उल्लेख विपुल आढळतात. तर फ़ारसी काव्यसृष्टीतला अुमर ख़य्यामही मद्याचं गुणगान करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. एकूणच उर्दू-फ़ारसी शायरीत अपेय मानल्या गेलेल्या पेयाचं स्थान अपरिहार्यपणे येतंच. अर्थातच मद्य हे एक फक्त नशीलं पेय म्हणूनच दरवेळी येत नाही. जीवनातल्या आनंदाशी त्याचा धागा जोडलेला आहे, प्रेमातल्या धुंदीशी त्याची नशा नातं सांगते आणि माणसाला ईश्वराप्रत नेणाऱ्या आध्यात्मिक अवस्थेशीही मद्यपानाचा संबंध जोडून शायर एक वेगळी अनुभूती अभिव्यक्त करताना दिसतात. सूफ़ी तत्त्वज्ञानातही आध्यात्मिक उन्मनावस्था आणि मद्याचा संबंध दिसून येतो. शराब, शायरी आणि सूफ़ी विचार असा एक धागाच गुंफलेला आढळतो. उर्दू शायरीत शराब आणि शबाब यांचं वर्णन वारंवार आढळत असल्यामुळं ही कविता म्हणजे याच गोष्टींपुरती आहे, असाही अनेकांचा समज असतो. काही वेळा अशी वरवरची आणि सवंग कविता लिहिलीही जाते, नाही असं नाही. पण शराबचा धागा उदात्त अशा आध्यात्मिक, तात्त्विक विचाराशीही जवळीक राखून येतो. या शायरीच्या परंपरेत मद्याचा गवगवा फार आहे, हेही खरंच. मात्र त्याभोवतीचे संदर्भ आणि दाखलेही महत्त्वाचे असतात. काव्यातली शराब ही बरेचदा रूपकात्मक असते. लाक्षणिक असते. ख़ुदाच्या संदर्भात शराबचा उल्लेख येतो. कधी तर मशीद आणि ख़ुदा यांच्यासह शराबचाही उल्लेख असतो. ग़ालिबनं एका शेरमध्ये म्हटलं आहे, ‘मला मशिदीत शराब पिऊ द्या. नाहीतर जगात अशी एखादी जागा दाखवा, जिथं ख़ुदा नाही...’
ज़ाहिद शराब पीने दे मसजिद में बैठकर
या वो जगह बता, जहाँ ख़ुदा नहीं

ग़ालिब तर स्वतः मद्यपानासाठी बदनामच होता. मद्याची त्याला आसक्ती होती आणि ती त्यानं कधी लपवली नाही. मद्याबाबतच्या रूढ समजुतींना त्यानं कधीच मानलं नाही. पण काव्यात शराबचा उल्लेख करण्याची परंपरा मात्र त्याला मान्य होती. म्हणूनच कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे तो शराबचा उल्लेख करून आपला आध्यात्मिक विचार, तात्त्विक मतं मांडत असे. ‘अंतिम सत्याविषयीची चर्चा करायची झाली, तर शराब आणि प्याला यांच्याविना ती करता येत नाही,’ अशा अभिप्रायाचा त्याचा हा शेर प्रसिद्धच आहे-
हर चन्द हो मुशाहिदा-ए-हक़ की गुफ़्तगू
बनती नहीं है बादा-ओ-साग़र कहे बग़ैर

आपल्या काव्यातल्या शराब, प्याला, सुरई यांच्या उल्लेखांकडं तात्त्विक आणि आध्यात्मिक नजरेनंच पाहा, असंच जणू ग़ालिब इथं सुचवतो. या शब्दांच्या उल्लेखांविना ही चर्चा पूर्ण होऊच शकत नाही. कारण शराब हे एक माध्यम आहे. ग़ालिबचे अनेक शेर या दृष्टीनं वाचले, तर त्यातला अंतःस्थ भाव कळून येतो. ‘मधुशालेतून मी तहानलेलाच कसा काय परतेन? समजा तसा मी विन्मुख निघालो, तर मग साक़ीनं, म्हणजे मद्य वाटप करणाऱ्या मधुबालेनं मला थांबवलं का म्हणून नाही?’ असा त्याचा शेर आहे. यातही ग़ालिब ‘मय’, ‘बज़्म-ए-मय’, हे शब्द प्रतीकात्मक रूपानंच वापरतो. ईश्वराची अवकृपा झाल्यानंच आपण या मधुपानापासून वंचित राहिलो, असा त्याचा अभिप्राय आहे. 
मैं और बज़्म-ए-मय से यूँ तिश्ना-काम आऊँ
गर की थी मैंने तौबा साक़ी को क्या हुआ था

मद्यपानासारख्या आपल्या दोषांची जाणीव असल्यानं, आपल्याला आध्यात्मिक उंची गाठता येत नाही, असंही कुठं तरी त्याला वाटत असावं. स्वतःच्या त्रुटींबद्दल त्यानं काव्यात अनेकदा बोट ठेवलं आहे. पवित्र समजल्या जाणाऱ्या मक्केच्या काबादर्शनाचा आपल्याला अधिकार नाही, असं मनोगत व्यक्त करणारा त्याचा हा शेर या भावनेचंच द्योतक आहे-
क़ाबा किस मुँह जाओगे ‘ग़ालिब’
शर्म तुमको मगर नहीं आती 

खरं तर ग़ालिबच्या काळात मद्याचा नाद इतर अनेक शायरांनाही होता. श्रीमंती व प्रतिष्ठित वर्तुळातही मद्याचा आनंद लुटण्याची प्रवृत्ती होती. पण ग़ालिबचं नाव अधिक बदनाम झालं, यामागं त्यानं याबाबतीत दाखवलेली खुली मनोवृत्ती हेही कारण आहेच. तसंच त्याच्या स्पर्धकांनी वैयक्तिक कारणांमुळंही त्याची ही बाजू लोकांसमोर सतत आणली असावी. मात्र त्याला आपलं हे व्यसन कधीच सोडता आलं नाही. वयोपरत्वे प्रमाण कमी होत गेलं इतकंच. एका पत्रात त्यानं याबद्दल लिहिलं आहे व आपल्या ग़ज़लचा एक शेरही दिला आहे, ज्यात म्हणतो, की आता शराब सुटली, पण तरीही कधी कधी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री किंवा ढगाळ वातावरण असताना दिवसा मी मद्यपान करतो... 
‘ग़ालिब’ छुटी शराब पर अब भी कभी कभी
पीता हूँ रोज़े अब्र ओ शबे माहताब में

ग़ालिबच्या जीवनातले असे काही प्रसंग आहेत, जे त्याच्या तीव्र मद्यासक्तीचं स्वरूप स्पष्ट करतात. आपल्या मित्रांना लिहलेल्या पत्रांमधून त्यानं स्वतःच्या दारूच्या व्यसनाबद्दल लिहिलं आहे. त्याच्यासाठी नोकर गुलाबपाण्यात मद्य मिसळून प्याला तयार करायचा आणि मग थोडा वेळ तो पाण्यात थंड करायला ठेवायचा. जरा थंड झाल्यावर ग़ालिब त्याचा आस्वाद घ्यायचा. आस्वादही तो उंची मद्याचाच घेत असे. मित्राला आपल्या पत्रातून त्यानं ‘लिक्यूर’बद्दल कळवलेलंही वाचायला मिळतं. जीवनातल्या उत्तमोत्तम आणि दर्जेदार गोष्टींबद्दल त्याला आकर्षण होतं. पण पैशांची चणचण आणि उंची राहणी, उंची मद्याचं सेवन यांचा मेळ बसणं शक्य नसल्यामुळं तो सतत कर्जात असायचा. एका विदेशी मद्यविक्रेत्याची बरीच उधारी त्यानं थकवली होती. त्याला तुरुंगवास झाला, त्यावेळी उधारी थकवल्याचा मुद्दाही निघाला होता. 

ग़ालिबबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, त्यात त्याच्या मद्यासक्तीचाही समावेश होतो. एकदा संध्याकाळी त्याला शराब हवी होती, पण पैस नव्हते आणि बायकोनंही पैसे नाहीत म्हणून सांगितलं. मशिदीत जा आणि दुआ मागा, म्हणजे मिळतील पैसे, असंही ऐकवलं. ग़ालिब मग मशिदीत नमाज़ पढायला निघाला. ग़ालिब मशिदीकडं जातोय, हे दृश्यच लोकांना गमतीचं वाटत होतं. त्याच्या एका शिष्याला समजलं की त्याला शराब मिळाली नाही, म्हणून तो एक बाटली घेऊन मशिदीकडं आला. नमाज़ची वेळ होत आली होती. मौलवी येतच होते, तितक्यात गालिबचं शिष्याकडं लक्ष गेलं. त्यानं खूण करून ग़ालिबला सांगितलं की चला आणि हातातली बाटली दाखवली. झालं, ग़ालिब मशिदीतून बाहेर पडला. कोणीतरी त्याला विचारलंही, ‘नमाज़ न पढताच निघताय?’ त्यावर ग़ालिबनं उत्तर दिलं, ‘जिस चीज़ के लिए दुआ माँगनी थी, वो तो यूँही मिल गई।’ 

ग़ालिबनं १८५७ च्या धामधुमीनंतर ‘मी आधा मुसलमान आहे,’ असं सांगून स्वतःची देशद्रोहाच्या आरोपातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलाच होता. त्याला त्या काळात आपल्या पेन्शनबद्दल चिंता होती आणि या संदर्भात तो अधिकाऱ्यांना सांगून आपले प्रयत्न करत होता. त्याच्या घरी एकदा मोती लाल नावाचे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर आले होते. बोलताना त्यानं पेन्शनचा विषय काढला आणि त्यांना काही करण्यास सांगितलं. त्यावेळी आपल्याला सरकारनं उगाचच ‘बाग़ी मुसलमान’ म्हटलं आहे, असं सांगून ग़ालिब त्यांना म्हणाला, ‘तमाम अुम्र अगर एक दिन शराब न पी हो तो काफ़िर और अगर एक दफ़ा नमाज़ न पढ़ी हो तो गुनहगार, फिर मैं नहीं जानता कि सरकार ने किस तरह मुझे बाग़ी मुसलमानों में शुमार किया।’ 

इस्लाममधील धर्मविषयक समजुतींचा वापरही तो आपल्या रचनांमध्ये मुबलक करत असे. याचंच हे एक उदाहरण- ‘उद्यासाठी म्हणून तू आज शराब देताना मनाचा क्षुद्रपणा दाखवू नकोस. कौसरच्या साक़ीविषयीचं हे तुझं मत म्हणजे या साक़ीबाबत शंका, पूर्वग्रह उपस्थित करणारं आहे. थोडक्यात, तिचा अपमान करणारं आहे.’ कौसर हे स्वर्गातील विशिष्ट नदी वा कारंज्याचं नाव आहे. या नदीतच इतर साऱ्या नद्यांचा उगम आहे, अशी श्रद्धा वा कल्पना इस्लाममध्ये आहे. तिचा संदर्भ घेऊन ग़ालिब म्हणतो, की उद्यालाही शराब पुरावी, म्हणून आज कद्रूपणा दाखवू नकोस. कौसरची साक़ी कुठं अशाप्रकारे विचार करून शराब वाटप करते? 
कल के लिए न कर आज ख़िस्सत शराब में
ये सू-ए-ज़न है साक़ी-ए-कौसर के बाब में

यातलाच हा पुढचा शेर वर अगदी साधा, सरळ दिसतो, पण त्यात वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत. पण असा क्षुद्रभाव दाखवणाऱ्यांकडून जेव्हा कधी शराबचा प्याला पुढं केला जातो, तेव्हा यात काही मिसळलेलं तर नाही ना, अशी शंका यायला आपल्या वाट्याला भरला पेला कधी येतच नाही, यावर विश्वास असलेला ग़ालिब बोलून दाखवतो...
मुझ तक कब उनकी बज़्म में आता था दौर-ए-जाम    
साक़ीने कुछ मिला न दिया हो शराब में

यातली ‘उनकी बज़्म’ म्हणजे नेमकी कोणाची मैफल असावी? ती प्रतिस्पर्ध्याची असू शकते, हा अर्थ सरळ आहे. पण तशीच प्रिय व्यक्तीचीही असू शकते. एरवी कितीदाही गेलं, तरी तिथं सन्मान होत नाही, हेटाळणी होते. मात्र त्याच जागी अचानक समोर भरलेला पेला आला, म्हणजे मनासारखं स्वागत झालं, तर मग नक्कीच त्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय मनात येतो. पहिली ओळ वाचल्यावर वाटतं आता पुढं शायर काय सांगणार असेल? तर आपल्या मनातील शंका तो समोर मांडतो... काव्यातून आस्वादकाला असे धक्के देण्याचं काम ग़ालिबनं वारंवार केलं. 

अशीच आणखी एक ग़ज़ल आहे, मधुशाला आणि मसजिद यांना जोडणारी, ज्यात ग़ालिब म्हणतो, ‘मशिदीच्या सावलीतच एखादी मधुशाला असावी.’ (काही अभ्यासकांच्या मते मात्र ही ग़ज़ल ग़ालिबची नाही. काही प्रसिद्ध शेर अथवा ग़ज़लरचना अशा आहेत, ज्यांच्याबाबत मतभेद आहेत. मात्र या रचना ग़ालिबकृत म्हणूनही ओळखल्या जातात. एरवीही ग़ालिबच्या नावावर काहीही सुमार खपवलं जातं, ते वेगळंच.) मद्यातून इथं आनंद कुणाला हवा आहे? मला रात्रंदिवस सतत एक धुंदी, विस्मृती हवी आहे... 
मस्जिद के ज़ेर-ए-साया ख़राबात चाहिए
भौं पास आँख क़िबला-ए-हाजात चाहिए
मय से गरज़ निशात है किस रू-सिहाय को
इक-गूना बेख़ुदी मुझे दिन रात चाहिए

ग़ालिब असा काव्यात आपल्या विचारांमध्ये गढून गेलेला, शंकांमध्ये हरवून गेलेला सापडतो. डोक्यात सतत काहीतरी विचारचक्र सुरू आहे आणि दैनंदिन जीवनातल्या त्रुटी व अडचणी सारखा अडथळा आणताहेत, असं त्याचं म्हणणं असतं. शराबची नशा त्याला या गोंधळापासून दूर नेते, आपलं दुःख, क्षुद्र आयुष्य विसरायला लावते. तरीही मनात येतंच, या समस्यांनी भरलेल्या जटिल जगात आपण कधीपासून आहोत, कोण जाणे... त्यातही वियोगाच्या रात्रींचा हिशेब केला तर हा काळ आणखीच प्रदीर्घ ठरेल. 
कब से हूँ क्या बताऊँ जहान-ए-ख़राब में
शबहा-ए-हिज्र को भी रखूँ गर हिसाब में

इतक्या सगळ्या कुंठित, त्रस्त करणाऱ्या वातावरणात आपण काव्य लिहितो, ते सारं आपल्याला सुचतं तरी कसं, असा प्रश्न त्यालाही पडतो. तो दुसऱ्या कुणी विचारायच्या आतच ग़ालिब उत्तरही देऊन टाकतो, की हे सगळे विचार माझ्या मनात येतात ते बाहेरून, अज्ञात, गूढ अशा ठिकाणाहून. माझ्या लेखणीचा कुरकुर आवाज हा तर देवदूतांचा स्वर आहे... स्वतःला श्रेय न घेता, तो ते स्वर्गीय शक्तीच्या पारड्यात टाकतो खरा. पण यातही स्वतःच्या रचनांच्या गुणवत्तेविषयीचा अभिमान आणि आत्मविश्वास आहेच.. 
आते हैं ग़ैब से ये मज़ामीं ख़याल में
‘ग़ालिब’ सरीर-ए-ख़ामा नवा-ए-सरोश है

संबंधित बातम्या