पैमाँ से हम गुज़र गए, पैमाना चाहिए

नंदिनी आत्मसिद्ध
बुधवार, 6 मे 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

शराब आणि ग़ालिब यांची सांगड घालून अनेक वदंता तयार झाल्या. ग़ालिब शराबकडं कोणत्या दृष्टीनं पाहत होता, त्याबद्दल खरं म्हणजे, त्याच्या काव्यातच बरंच काही सापडतं. जितकं उर्दू काव्यात आहे, तसंच ते त्याच्या फ़ारसी रचनांमध्येही असणार. अर्थातच आहे. पण आपण उर्दू शायरीचाच विचार करतोय. मद्यपानामुळं मिळणारा आनंद आणि नशा यांच्या प्रभावाचं गुणवर्णन ग़ालिबनं केलं. तसंच शराब पिण्यातून आपल्याला खुशीपेक्षा नशेची, आत्मविस्मृतीची अपेक्षा आहे, असंही म्हटलं. पण शराब मनाला प्रफुल्लित करते, असं सांगतानाच शराब पिण्यातून ऐश, समाधान मिळेल आणि शरीरालाही अपूर्व असा आनंद मिळत राहील असं मानू नका, हेही ग़ालिबनं बजावून सांगितलं. शराब ही आनंदाची वाट असू शकत नाही. म्हणूनच तिच्यापासून दूर रहा, असा उपदेशही त्यानं केला. आपल्या शायरीतून शराबचे संदर्भ वारंवार ग़ालिब देत असे. त्यात वेगवेगळे अर्थ असत. पण यामुळं त्याच्या शराबप्रेमाचा गवगवाच जास्त झाला. पण शराब ही गोष्ट आनंद देत नाही, हे वारंवार त्यानं म्हटलं आहे. ‘शराबच्या मैफलीच्या जाळ्यातून भोगविलास, ऐश या गोष्टी केव्हाच निसटून दूर पळून गेल्या आहेत,’ असं सांगणारा हा शेर बघा-
बज़्म-ए-क़दह से ऐसे तमन्ना न रख, कि रंग
सैद-ए-ज़िदाम जस्ता है, इस दामगाह का

तर एका शेरमध्ये तरुण पिढीला उद्देशून ग़ालिब म्हणतो, ‘हृदयाच्या आकांक्षांच्या बैठकीवरील नव्या शौकीनहो, तुम्हाला जर मद्याची आसक्ती आणि ओढ असेल, तर सावधान. तुमची नजर जर काही शिकायला तयार असेल, तर माझ्याकडं पाहा. तुमचे कान जर उपदेश ऐकणार असतील तर माझं जरा ऐका.’
ऐ ताज़ा वारदान-ए-बिसात-ए-हवा-ए-दिल
ज़िन्हार, अगर तुम्हें हवस-ए-नाए-ओ-नोश है
देखो मुझे जो दीद-ए-इबरत-निगाह हो
मेरी सुनो जो गोश-ए-नसीहत-निओश है

ही संपूर्ण ग़ज़लच त्यानं शराब, मयख़ाना आणि तिथल्या वातावरणाबद्दल लिहिली आहे. रात्रीचं तिथलं उत्फुल्ल वातावरण आणि पहाटे तिथं दिसणारा विस्कटलेपणा याबाबत तो म्हणतो, ‘रात्री इथला प्रत्येक कोपरा हा माळ्याच्या आणि फूल विक्रेत्याच्या अस्तित्वानं भारलेला असतो. पण सकाळी मात्र या मैफलीत येऊन पाहिलं, तर ना ती नशा दिसते ना तो उत्साह...’
या शब को देखते थे कि हर गोशा-ए-बिसात
दामान-ए-बाग़बान ओ कफ़-ए-गुलफ़रोश है
या सुब-ह-दम जो देखिए आ कर तो बज़्म में
ने वो सुरूर ओ सोज़ न जोश-ओ-ख़रोश है

स्वानुभवातून आलेलं शहाणपण यात प्रतिबिंबित झालं आहे. आपल्या शायरीचा चुकीचा अर्थ लागून लोकांनी मद्यपानाकडं वळावं, हे ग़ालिबला अर्थातच अपेक्षित नव्हतं. शराबमधून आनंद मिळत नाही, शराबख़ाना म्हणजे भिंती नि दरवाजे याशिवाय विशेष काही नाही, मद्यपी मनुष्यापासून इतरांनी दूर राहिलं पाहिजे, माणसानं स्वतःवर नियंत्रण मिळवलं पाहिजे अशा तऱ्हेच्या ओळी ग़ालिबच्या शायरीत विखुरलेल्या आहेत...शराबच्या संदर्भात ग़ालिबचा हा आणखी एक दृष्टिकोन, जो बराचसा दुर्लक्षित राहिला आहे. केवळ ग़ालिबच्या विरोधकांनीच नव्हे, तर त्याच्या प्रशंसकांनीही शराब आणि ग़ालिबचं समीकरण उचलून धरत, त्याच्यावर तसा अन्यायच केला. 

कधी शराबच्या माध्यमातून ग़ालिब सामाजिक वर्तनावरही टिप्पणी करताना दिसतो. एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘ईद नसली, तरी इतर दिवशीही गरिबाला शराबख़ान्यात भीक मिळू शकते.’ त्याला म्हणायचं आहे, की ईद वगैरे सणांना श्रीमंत लोक गरिबांना दानधर्म करत असतात, तो त्यांनी एरवीही करायला हरकत नाही. धर्मनिष्ठांची फिरकी घेत, टिंगल करत ग़ालिब नेहमीच खुमासदार असं काही लिहीत असे. 
अलावा अीद के मिलती है और दिन भी शराब
गदा-ए-कचा-ए-मयख़ाना नामुराद नहीं

मद्यपान करू नका, असं सांगणारा धर्मोपदेशक स्वर्गात गेल्यावर मिळणाऱ्या तहूर या शराबचा हवाला लोकांना देत राहतो, याचा उल्लेख करून एके ठिकाणी ग़ालिब म्हणतो, की तिथं ती खरोखरच मिळणार आहे की नाही, कोण जाणे. पण ‘स्वर्गात मिळणाऱ्या तहूर या शराबबाबत उपदोशका, तू सांगत असतोस आणि तिच्या कल्पनेपायी इथं तू शराब पीत नाहीस वा दुसऱ्या कुणाला पिऊही देत नाहीस.’ स्वर्गातल्या मद्याची प्रशंसा आणि इथल्या मद्याची मात्र निंदा, हे योग्य नाही, असंही इथं ग़ालिबला सुचवायचं आहे...
वाइज़ न तुम पियो, न किसी को पिला सको
क्या बात है, तुम्हारी शराब-ए-तहूर की

‘उपासना वा पूजा करताना मद्य आणि मध यांच्यातलं द्वंद्वच राहू नये, म्हणून या स्वर्गाला उचलून एकदा नरकातच फेकून द्या,’ असं एका शेरमध्ये लिहून ग़ालिबनं एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. स्वर्गात मद्यही आहे आणि मधही आहे. तिथं ते चालतं. पण या भूतलावर मात्र या दोन गोष्टींमध्ये झगडा होताना दिसतो. खरं तर या न्यायानं हा झगडा तिथंही व्हायला हवा. ग़ालिब सांगतो की एकदा का स्वर्गाची कल्पनाच लयाला गेली, की मग मद्य आणि मध अशा मुद्द्यांवरून ईश्वरोपासनेच्या संदर्भात भांडण व भेदभाव उरणार नाही. सगळे एकाच पातळीवर येतील. धार्मिक गोष्टींबाबत संकुचितता ठेवून वागणाऱ्यांना, पावित्र्याची चौकटबद्ध व्याख्या करणाऱ्यांना हा टोमणा आहे. 
ताअत में ता रहे न मय-ओ-अँगबीं की लाग
दोज़ख़ में डाल दो कोई ले कर बहिश्त को

स्वर्ग ही एक कल्पना आहे आणि त्यावर आपला विश्वास मात्र नाही, हे तर त्यानं म्हटलंच होतं. पण तरीही कल्पना म्हणून स्वर्ग आपल्याला प्रिय आहे, असं म्हणून एका शेरमध्ये ग़ालिब लिहितो, ‘स्वर्गाची कल्पना मला फार आवडते. कारण तिथं कस्तुरीचा गंध आणि फुलांचे रंग असलेली मनासारखी शराब पिता येणार आहे...’
वो चीज़ जिसके लिए हमको हो बहिश्त अज़ीज़
सिवाय बादा-ए-गुलफ़ाम-ए-मुश्कबू क्या है

याप्रकारे तो सहज सुचवून जातो, की स्वर्गात, दिव्य अशी शराब एवढी एक गोष्ट सोडली, तर बाकी सगळं, जे इथं मिळतं, तेच तर मिळणार आहे...खरं म्हणजे, स्वर्गाच्या कल्पनेचा उपहासच तो यात करतो. ढोंगी आणि पाखंडी धर्मवाद्यांची खिल्ली उडवून त्यांचे बुरखे फाडणारा ग़ालिब तर त्याच्या शायरीत नेहमीच भेटतो. रात्रीच्या अंधारात ही मंडळी पापं करतात आणि दिवसाच्या उजेडात आपल्या वस्त्रांवरले डाग धुऊन काढतात, असा उल्लेख त्याच्या एका शेरमध्ये येतो. पवित्र स्थळीही ही मंडळी पापं करायला मागंपुढं पाहत नाहीत, असंही तो म्हणतो. रात्रीला गुप्त आणि दिवसाला प्रकट किंवा उघड म्हणून, ग़ालिब सांगतो की पाखंडी लोक हे पवित्र स्थानीही पाप करू धजावतात, त्यांना काहीच फरक पडत नाही. या शेरमध्ये तो मक्केतल्या ज़मज़म विहिरीच्या पवित्र जलाचा संदर्भ देऊन म्हणतो, ‘रात्री पवित्र अशा ज़मज़मच्या विहिरीपाशी बसून शराब प्यायली आणि भल्या सकाळी हजच्या आपल्या वस्त्रांवर पडलेले डाग धुतले.’ (‘अहराम’ म्हणजे हज यात्रेदरम्यान घालण्याचं टाका घालून न शिवलेलं वस्त्र)
रात पी ज़मज़म पै मय और सुबहदम
धोये धब्बे जामा-ए-अहराम के

तर स्वतःच्या मद्यपानाबाबत अन्य एका शेरमध्ये तो म्हणतो, की मला माझ्या कपड्यावर शराबचे डाग पडलेलं चालतं. मला पवित्र काब्याची प्रदक्षिणा करण्यात रस नाही. थोडक्यात, तो सुचवू बघतो की ढोंगी लोकांसारखं माझं नाही. मी उघडपणे मद्यपान करतो. ते लपवण्याची गरज मला वाटत नाही. मी पापी असल्यामुळं पवित्र यात्रा करायची आणि स्वतःचे दोष लपवून ठेवायचे, हे मला पसंत नाही. इथं तो शराबच्या बाटलीलाच आपली ज़मज़म विहीर म्हणतो...
ज़मज़म ही पै छोड़ो, मुझे क्या तौफ़-ए-हरम
आलूदा-ब-मय जामा-ए-अहराम बहुत है

‘मेल्यावरही आपल्या तोंडाला आदल्या रात्रीच्या मद्याचा वास येईल, पण म्हणून काही पापपुण्याचा आढावा घेणारी देवदूतांची जोडी (मुन्कर व नकीर म्हणजेच नकीरैन) पळून जाणार नाही. तेव्हा येऊदे तो वास. त्यानं काय बिघडणार आहे, आपली कृत्यं नाहीतरी त्यांच्यापासून लपून राहणार नाहीतच...’ असाही ग़ालिबचा एक शेर आहे. एकूणच त्याचा अभिप्राय असा, की आपण जे आहोत ते आहोत. त्यात लपवाछपवी कशाला करायची. माणसानं ढोंग करून वागू नये. आसपासची माणसं त्याला फसतीलही कदाचित, पण देवदूत काही फसणार नाहीत, त्यांना खरं ते माहीत असतं...
ज़ाहिर है कि घबरा के न भागेंगे नकीरैन
हाँ मुँह से मगर बादा-ए-दोशीना की बू आए

प्रत्यक्षात आपण स्वतःच्या विवंचना विसरण्यासाठी शराब पितो, हेही त्यानं अनेकदा म्हटलं आहेच. स्वतःचं मद्यपान त्यानं कधी नाकारलं नसलं, तरी एकांतात त्याचा आस्वाद घेण्याची त्याची पद्धत होती. उघडपणे शराबचा आनंद लुटण्याचा प्रकार त्याला पसंत नसे. आपल्या मद्यपानाची कबुली तो देत असला, तरी त्याला स्वतःच्या या व्यसनाबद्दल शरमच वाटत असे. त्याचं मद्यपान तसंही सीमितच होतं. त्याच्या कल्लू दरोगा या नोकराकडं त्याच्या मद्याची बाटली असलेल्या कपाटाची किल्ली असे. या नोकराला ग़ालिबचीच सक्त ताकीद असे, की विशिष्ट प्रमाणात मद्य घेतल्यावर, मागितलं तरी आपल्याला आणखी मद्य द्यायचं नाही. एकटं असताना किंवा आपल्या खास मित्रांच्या सहवासातच तो मद्यपान करत असे. म्हणूनच ग़ालिबची कायम ज्याप्रकारे पियक्कड म्हणून संभावना केली गेली, ती त्याच्यावर अन्याय करणारी आहे. त्याच्या शायरीतले शराबचे उल्लेख बघून, हा शिक्का अधिकच ठळकपणे मारला जातो. पण शराबच्या प्रतीकातून आणि उदाहरणातून त्यानं जे सांगितलं आहे, त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं...तत्त्वज्ञान, अध्यात्म, धर्मविषयक तथ्यं अशा अनेक गोष्टींची चर्चा ग़ालिबनं केली, ती महत्त्वाची आहे.

अनेकदा, त्याच्या शायरीत असेही शराबचे उल्लेख येतात, की ज्यात मद्यपानापेक्षा इतर गोष्टींचा निर्देश असतो. उपमा किंवा कल्पना शराबची, पण या शायरीतून येणारा चर्चेचा विषय काही दुसराच असतो. तर कधी चिंतनात्मक अशा पातळीवर जाऊन काही मांडणी असते. मद्य, मधुबाला, चषक वगैरे उल्लेख असलेली ही शायरी प्रत्यक्षात शराबविषयी बोलणारी नाही. उलटा प्याला वाटावा, तसं दिसणाऱ्या आकाशाचं वर्णन करणारा हा शेरच बघा. या शेरमध्ये ग़ालिब म्हणतो, ‘आकाशरूपी मधुबाला किंवा साक़ीकडून आनंददायक अशा मद्याची अपेक्षा कशी करू शकतो? कारण आकाशरूपी मधुबाला स्वतःच तर दोन-चार उलटे अन् रिकामे प्याले घेऊन बसली आहे.’ आकाश हे उर्दू-फ़ारसी काव्यात भाग्याचं प्रतीक समजलं जातं. अभिप्राय असा, की आपलं भाग्य स्वतःच जर रिकामं आहे, तर त्याकडून अपेक्षा ती काय करायची? 
मय-ए-इशरत की ख़्वाहिश साक़ी-ए-गर्दूँ से क्या कीजे
लिए बैठा है इक दो चार जाम-ए-वाज़-गूँ वो भी

मद्याशी अनेक गोष्टींना जोडून आपल्या शायरीची रंगत वाढवणारा ग़ालिब पदोपदी भेटतो. कधी वसंत ऋतूच्या विभ्रमांमध्ये त्याला फुलांची रंच्छछटा असलेलं मद्य आठवतं. आपण मद्यपान न करण्याचं वचन दिलं होतं, त्याचा विसर पडतो आणि पुन्हा एकदा तो लोभस मद्याच्या चषकाची मागणी करताना म्हणतो-
साक़ी, बहार-ए-मौसम-ए-गुल है, सरूर बख़्श
पैमाँ से हम गुज़र गए, पैमाना चाहिए 

संबंधित बातम्या