‘ग़ालिब’ हमें न छेड़...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 11 मे 2020

अन्दाज़-ए-बयाँ

ग़ालिबचं काव्य म्हणजे अक्षरशः खजिना आहे. विविध विषय, कल्पना, विचारांचं सौंदर्य आणि शब्दांच्या पलीकडं जाणारा गर्भित अर्थ व्यक्त करण्याची क्षमता  काव्यात पुरेपूर भरलेली आहे. ग़ालिबच्या रचना म्हणजे अत्यंत दिलखेचक असा कवितेचा नमुनाच आहे. ग़ज़लमध्ये तर विचारांची इतकी उंच झेप, व्यापकता आणि अर्थपूर्णतेचा आवाका त्याच्याइतका इतर कुणीच गाठला नाही. संक्षिप्त आणि अर्थगर्भ रचना हे त्याच्या शायरीचं वैशिष्ट्यच. प्रारंभी ग़ालिबच्या काव्यावर फ़ारसी शब्दकलेचा अधिक पगडा होता. त्यावेळी त्याची रचना काहीशी क्लिष्ट होती. पण लवकरच तो त्यातून बाहेर पडला. लोकांना सहज समजेल अशी, त्यांच्या नेहमीच्या वापराच्या भाषेतली कविता तो लिहू लागला. तरीही सामासिक शब्द वापरून काव्य करण्याची त्याची शैली पुढंही कायम राहिलीच. कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक अर्थपूर्णता आणण्यासाठी त्यानं रचनेचं हे वळण स्वीकारलं असावं. एकदा का या रचनेची खुबी लक्षात आली, की मग ग़ालिब समजणं सोपं होऊन जातं. त्याच्या शब्दांमधलं नादमाधुर्य, ऐट, ओघवती शैली, रचनेची सफाई, लाक्षणिक अर्थाकडं असलेला त्याचा कल यामुळं ही रचना समृद्ध झाली. तिची ख़ुमारी अजूनच वाढली. ग़ालिबची ग़ज़ल रचना तर विशेषच आहे. त्याच्या कितीतरी ग़ज़ला आजही अनेकांच्या ओठांवर असतात. अगदी क्लिष्ट म्हटल्या जाणाऱ्या ग़ज़लाही चिरंतन स्मरणात राहतात. ग़ालिबच्या ग़ज़लांनी वर्षानुवर्षं गायकांनाही खुणावलं आहे. संगीतकारांनी वेगवेगळ्या सुरावटींमध्ये या ग़ज़ला पेश केल्या आहेत. ग़ालिबला जनमानसात जपून ठेवण्यात या साऱ्यांचाही हातभार आहेच. अर्थातच मुळात या रचनांची किमयाही तितकीच जबरदस्त...

ग़ालिबची ‘मुद्दत हुई है यार को मेहमाँ किये हुए’ ही ग़ज़ल त्याच्या सर्वोत्कृष्ट ग़ज़लांपैकी मानली जाते. ही दीर्घ ग़ज़ल त्याच्या लेखणीची सारी वैशिष्ट्यं घेऊन अवतरली आहे. तिची समासयुक्त अशी रचना त्याच्या काव्याची ताकद दाखवून देणारी. ग़ज़ल हा काव्यप्रकार आपली अशी खासियत घेऊन येतो. ग़ज़लमध्ये एकच एक विषय किंवा सलग भावधारा सहसा नसते. पण सदरहू ग़ज़ल याला अपवाद आहे. एकूण १७ शेर असलेली ही ग़ज़ल एका विशिष्ट अशा भाववृत्तीत गुंफलेली आहे. एक सूत्र या रचनेत गुंफलेलं दिसतं. यातल्या शेरांची जागाही ज्या विशिष्ट क्रमानं येते, त्यालाही एक अर्थ आहे. अतिशय चित्रदर्शी, असं या रचनेचं वैशिष्ट्य सांगता येईल. एका एका शेरमधले संदर्भ आणि त्याभोवती असलेलं काळाच्या वास्तवाचं वलय हरवल्यात जमा झालेल्या वास्तवाची याद जागवतं. गतकाळाची आठवण काढत, तिला उजाळा देत, या ग़ज़लमध्ये ग़ालिबनं एक विशिष्ट सूर चढवत नेला आहे. मनात येणारी एक एक आठवण जागवत, त्यानं ही आपली कैफ़ियत मांडली आहे. हे त्याचं प्रदीर्घ असं एक स्वगतच आहे. पहिल्याच शेरपासून मनाची उदासी व्यक्त होताना दिसते आणि त्यानंतर चढत्या क्रमानं मनातले विचार आणि आठवणी जणू ओसंडून बाहेर पडतात. यात सुरुवातीलाच ग़ालिब म्हणतो, ‘बराच काळ दोस्ताला किंवा प्रेयसीला मेहमान म्हणून निमंत्रित करून, झगमगत्या मैफलीचा आनंद लुटलेला नाही.’
मुद्दत हुई है यार को मेहमाँ किये हुए
जोश-ए-क़दह से बज़्म चरागाँ किये हुए

खूप काळ जल्लोश आणि आनंद साजरा करणारी मैफल जमलेली नाही, तो आनंद आता दूर दूर निघून गेला आहे. यात प्रेयसीकडं निर्देश असला, तरी एकूणच जीवनातली मौज चाखण्याचे, तिचा उत्सव करण्याचे दिवस राहिलेले नाहीत, ही खंत आणि मित्रमंडळींची जल्लोशभरी सोबत साथीला नाही, याचं दुःख यातून व्यक्त होताना दिसतं. दोस्त भेटत नाहीत, असं ग़ालिब म्हणत नाही. तर पूर्वीसारख्या मैफली आता जमत नाहीत याची व्यथा तो व्यक्त करतो. या सगळ्या परिस्थितीला अर्थातच कारणीभूत आहे तो बदललेला काळ. विशेषतः १८५७ नंतर दिल्लीत जे परिवर्तन वेगानं आलं, त्याचा परिणाम व्यक्तिगत पातळीपर्यंत झिरपला. मुळात इंग्रजांच्या आगमनानंतर देश त्यांच्या ताब्यात गेल्यामुळं इथली राजकीय व सांस्कृतिक घडी विस्कटून गेली होती. १८५७च्या अस्वस्थ दिवसांनंतर अवतीभवतीची दुनियाच बदलली. एकूण समाजालाच निराळ्या वास्तवाला सामोरं जावं लागलं. बादशाहीच लयाला गेली, तिथं सामान्यांची काय पर्वा? जीवन बदललं आणि जुना काळ बघता बघता इतिहासजमा झाला. हे सार माहीत असूनही, त्याची झळ बसली असूनही, ग़ालिबला ते दिवस आठवतात आणि तो काळ मागे सरला, याचं दुःख आत कुठंतरी सतावत राहतं. म्हणूनच ‘तो काळ लोटला, त्या मैफली उरल्या नाहीत, ते शिष्टाचार राहिले नाहीत आणि ज्यांच्यामुळं हे आयुष्य आनंद अन् खुशी लुटत होतं, जे जीवनात रंगत आणत होते, ते दोस्तही या जगात राहिले नाहीत,’ असा एक विशिष्ट माहौल हरवल्याचा आकांत मांडणारी ही ग़ज़ल आहे. म्हणूनच विदीर्ण अशा हृदयाचे तुकडे जमा करत, सुंदर पापण्यांनी नटलेल्या मैफली आठवत, फक्त आठवणींमध्ये बुडून जात, तो काळ उगाळणं तेवढं हातातत उरलं, अशी भावना ग़ालिब बोलून दाखवतो... 
करता हूँ जमअ फिर जिगर-ए-लख्त-लख़्त को
अर्सा हुआ है दावत-ए-मिज़गाँ किये हुए

तो मागचा काळ सरला आहे आणि त्या विखुरलेल्या आठवणी समेटून घेत, त्यांच्याबद्दल ‘नॉस्टाल्जिक’ होत, स्मरणरंजनात हरवलेला शायर यात भेटतो. प्रेयसीची एक एक अदा आठवत, त्यांना आधी धूसर आणि नंतर स्वतःच्या निकट बघत, मनाशीच त्या काळाचं, त्या अद्‍भुत दिवसांचं स्मरण करतो. या स्मरणात एक दर्द आहे आणि ते दिवस पुन्हा आठवतानाचा दुखरा आनंदही... आठवण ही अनेकदा आत्मक्लेशी असते. हरवलेल्या दिवसांच्या आठवणी उगाळणं म्हणजे जखमांवर मीठ भरभरण्यासारखंच. स्मृतींचं हेच दुःखदायी रूप या ग़ज़लमध्ये ग़ालिबनं पकडलं आहे. 
फिर वज़-ए-एहतियात से रुकने लगा है दम
बरसों हुए हैं चाक गरेबाँ किये हुए

(पुन्हा एकदा त्या शिष्टाचारी संकेतांनी माझा जीव घुसमटू लागला आहे. गळ्याभोवतीचा कपडा (कॉलर) विदीर्ण केल्याला आता फार वर्षं झालीत.)

फिर गर्म-नाला-हा-ए-शरर-बार है नफ़स
मुद्दत हुई है सैर-ए-चरागाँ किये हुए

(वाटतं की आपल्या श्वासातून ठिणग्या ओकणारी वेदना ओसंडावी. खूप काळ लोटला, रोषणाईच्या रस्त्याची सैर केली त्याला.)

फिर पुरसिश-ए-ज़राहत-ए-दिल को चला है अिश्क
सामान-ए-सद-हज़ार नमक-दाँ किये हुए

(प्रेम तर निघालं आहे, जखमी हृदयाची विचारपूस करायला. हजारो नमकदानांची (मीठ ठेवण्याचं पात्र) तरतूद तर केलीच आहे.)

फिर भर रहा हूँ ख़ामा-ए-मिज़्गाँ ब-ख़ून-ए-दिल
साज़-ए-चमन तराज़ी-ए-दामाँ किये हुए

(पुन्हा एकदा मी पापण्यांची लेखणी हृदयातल्या रक्तानं भरू लागलो आहे. फुलबागेचं चित्र रंगवायचं आहे मला वस्त्रावर.)

बा हम दिगर हुए हैं दिल ओ दीदा फिर रक़ीब
नज़्ज़ारा ओ ख़याल का सामाँ किये हुए

(माझं हृदय आणि माझ्या पापण्या आता परस्परांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत. एकाला तिच्याबद्दल विचार करण्याची अन् दुसऱ्याला तिला पाहण्याची इच्छा आहे.)

दिल फिर तवाफ़-ए-कू-ए-मलामत को जाए है
पिंदार का सनम-कदा वीराँ किये हुए  
 
(माझं मन मलमपट्टीसाठी पुन्हा जातंय त्या जागी, जिथं स्वाभिमानाचं मंदिर उजाडच होणार आहे.)

फिर शौक कर रहा है ख़रीदार की तलब
अर्ज़-ए-मता-ए-अक़्ल-ओ-दिल-ओ-जाँ किये हुए

(प्रेमाला पुन्हा एखाद्या ग्राहकाची आस आहे. हृदय, जीवन आणि मनाची संपत्ती ते देऊ करत आहे.)

दौड़े है फिर हर एक गुल-ओ-लाला पर ख़याल
सद-गुलिस्ताँ निगाहल का सामाँ किये हुए 

(मन पुन्हा सौंदर्याकडे धाव घेतं, कधी गुलाब तर कधी ट्युलिपकडं. नजरेत शेकडो बागांना बघण्याची ओढ घेऊन.)

फिर चाहता हूँ नामा-ए-दिलदार खोलना
जाँ नज़्र-ए-दिल-फ़रेबी-ए-अुनवाँ किये हुए

(परत एकदा त्या दिलदाराचं पत्र उघडावं म्हणतो, ज्याचं शीर्षकच मुळी फसवं आहे.)

माँगे है फिर किसीको लब-ए-बाम पर हवस
ज़ुल्फ़-ए-सिय़ाह रुख़ पे परीशाँ किये हुए

(इच्छा होते, चेहऱ्यावर काळे कुंतल पसरवून आलेल्या कुणाला तरी छज्ज्याच्या कठड्याशी पाहण्याची.) 

चाहे है फिर किसीको मुक़ाबिल में आरज़ू
सुरमे से तेज़ दश्ना-ए-मिज़्गा किये हुए 

(मनात येतं, जिच्या खंजिरासारख्या पापण्या काजळानं टोकदार झालेल्या आहेत असं कुणीतरी आपल्यासमोर असावं.)

इक नौबहार-ए-नाज़ को ताके है फिर निगाह
चेहरा फ़रोग़-ए-मय से गुलिस्ताँ किये हुए 

(माझी नजर लागली आहे त्या सौंदर्यवतीकडे, जिचा चेहरा मद्याच्या प्रभावानं गुलाबाच्या बागेसारखा खुलला आहे.)

या साऱ्या जुन्या आठवणींचा पसारा उलगडतानाही, त्यातली वेदना अधिकच ठळक होते. कारण खरं तर मुळात या स्मृती दुखरी नस छेडणाऱ्याच आहेत. म्हणूनच तर जखमेवर छिडकण्यासाठी नमकदानाची भाषा केली आहे. पण आज जवळ उरलेलं निदान तेवढंच आहे, म्हणून तर मागचे दिवस उगाळायचे... अन् जेव्हा लक्षात येतं, की स्मृतींमध्ये हरवून जाऊन हाती काहीच लागणार नाही, तेव्हा मग मनाला खिन्नता येते. कारण त्या गेल्या गोष्टी आता परत येणार नसतात. ना प्रिया, ना दोस्त, ना त्या मैफली आणि ना ती जीव कुरतडणारी वेदना... तरीही मन मात्र अजूनही आठवणींच्या दरबारातच घोटाळत राहतं, कल्पनेच्या पातळीवर तो सारा काळ व ते वातावरण पुन्हा अनुभवू पाहतं. 
फिर जी में है कि दर पे किसी के पड़े रहें
सर ज़ेर-ए-बार-ए-मिन्नत-ए-दरेबाँ किये हुए

(कुणाच्या तरी दरवाजात, दरवानाच्या कृपेच्या ओझ्याखाली दबून उभं राहावंसं वाटतं.)

जी ढूँडता है फिर वही फ़ुरसत, कि रात दिन 
बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए

(मन पुन्हा असा अवकाश शोधतंय, की जेव्हा प्रियेच्या विचारात रात्रंदिवस बुडून जाऊन बसून राहाता येईल.)

मात्र मनातला हा आठवणींचा बहर ओसरू लागतो आणि या ओहोटीनंतर वास्तवाचं भान येतं. आठवणी नुसत्याच उगाळण्यात काही अर्थ नाही, हे पटून जातं. मागचा काळ परत यार नसल्यानं, आक्रोश करून केवळ तुफान उठवणं एवढंच आपल्या हाती उरलं आहे, हे जाणवतं. जी हवी आहे, ती फ़ुरसत काही आपल्याला मिळायची नाही. मागचा काळ आठवून रुदन करणं तेवढं आपण करू शकतो हे भान येतं आणि मग, त्या आठवणी नकोत नि नंतरचा मनाला सतावणारा आक्रोशही नको, असं वाटून, ग़ालिब मनाला बजावतो आणि ‘आठवणी काढून आणखी त्रास देऊ नकोस. आता मी तर अश्रूंच्या जोरावर वादळाची निश्चिती करून बसलो आहे,’ असं स्वतःच स्वतःला सांगतो...
‘ग़ालिब’ हमें न छेड़ कि फिर जोश-ए-अश्क से 
बैठे हैं हम तहय्या-ए-तूफाँ किये हुए

संबंधित बातम्या