चिराग़-ए-दैर

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

खूप आशा आणि अपेक्षा घेऊन ग़ालिब कलकत्त्याला गेला होता. जणू एखाद्या सैनिकाप्रमाणं या शहरावर स्वारी करून आपला विजय त्याला खेचून आणायचा होता. पूर्वजांप्रमाणं प्रत्यक्ष लढून नव्हे, पण निदान न्यायाच्या लढाईत तरी आपल्याला जीत हासिल होईल, अशी त्याला खात्री होती. पण तसं काहीच घडलं नाही. कारण पुढं १८३१ मध्ये या अर्जाचा निकाल लागून, त्याचा पेन्शनवरला हक्क रद्द करण्यात आला. दिल्लीला परतताना अनिश्चित परिस्थितीतच ग़ालिब कलकत्त्यातून निघाला. पुढच्या जीवनाच्या काळजीचं ओझं आणि झालेल्या कर्जाचा बोजा पुन्हा शिरावर घेऊन त्याला दिल्लीत राहायचं होतं. निराशा आणि अपेक्षाभंग काय असतो ते त्यानं अनुभवलं. त्याचा अगदी अपमान नव्हे, पण खूप मोठा मनोभंग झाला होता. मनात खूप इरादे घेऊन तो गेला होता, पण मनासारखं झालंच नाही. एक प्रकारे हात हलवत परत यावं लागलं. कलकत्त्याची आठवण झाल्यावर त्याच्या मनात स्वतःच्याच या ओळी येत असतील - 
निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन
बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले 

कलकत्त्याहून परतताना निकाल अद्याप लागायचा असल्यामुळं, ग़ालिब तसा रिकाम्या हातानं परतला असला, तरी त्याच्या अनुभवांची ओंजळ पुरेपूर भरली होती. बरे-वाईट प्रसंग, चाहत्यांचं प्रेम आणि टीकाकारांनी केलेली टीका हे त्यानं अनुभवलंच; पण याबरोबरच वेगवेगळी माणसं त्याला भेटली. काहींशी दोस्ती झाली. पहिल्यांदाच त्यानं इथं समुद्राचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. त्याच्या शायरीत त्याच्या कळतनकळत सागराच्या लाटांचा आवाज नोंदला गेला. कवीला अशा अनुभवांचं खूप अप्रूप असतं. तोवर ग़ालिब आग्रा आणि मग दिल्ली या शहरांच्या बाहेर बहुधा गेला नसावा. एकदम त्यानं बराच काळ घराबाहेरच्या जगात काढला. वाटेत तो बनारसला तीन-चार महिने थांबल्याचा उल्लेख केलाच आहे. बनारस म्हणजे हिंदूंचं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र. काशीयात्रेचं पुण्य जोडण्याचं भाग्य फार थोड्यांना मिळत असे. काशी म्हणजे विद्वत्तेचीही नगरी. पंडित, धर्मवेत्ते यांचा राबता असलेलं शहर. या बनारसमध्ये ग़ालिब खूप रमला. तिथल्या घाटावर जाऊन नदीचा प्रवाह आणि बदलते रंग न्याहाळत बसणं त्याला फार आवडत असे. त्याच्या मनातही विविध भावतरंग उमटत होते. त्याच्या इथंही बऱ्याच लोकांशी गाठीभेटी झाल्या असणार. चाहते आणि वेगवेगळे कवी त्याला भेटले असणार... 

बनारस हा त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा अध्याय ठरला. इथलं वास्तव्य त्याच्या मनावर खोलवर परिणाम घडवणारं ठरलं. त्याला हे शहर खूप वेधक वाटलं. बौद्धिक, मानसिक आणि तिथलं वास्तव जीवन सारंच त्याला आवडून गेलं. दिल्ली सोडून आपण बनारसलाच स्थायिक व्हावं, असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. याला पुरावा आहे तो ग़ालिबची एक फ़ारसी भाषेतली मसनवी. ‘चिराग़-ए-दैर’. म्हणजे मंदिरातला दिवा. बनारस शहरावर एखाद्या परदेशी भाषेत लिहिली गेलेली ही पहिलीच कविता असावी. भारताच्या संमिश्र आणि बहुरंगी संस्कृतीचा उद्‍गार तिच्यात सामावलेला आहे... 

‘मसनवी’ हा फ़ारसी भाषेतला एक काव्यप्रकार. उर्दूतही तो पुढं रुजला. मसनवी म्हणजे अशी कविता, ज्यात एखादा प्रसंग किंवा कथा पद्यात कथन केलेली असते. साधारणतः मसनवी दीर्घकविता असते. मलिक मोहम्मद जायसीची ‘पद्मावत’ ही मसनवी प्रसिद्धच आहे. ग़ालिबनं फ़ारसीत गज़ल, नज़्म आणि मसनवीही लिहिल्या. सुरुवातीला तो फ़ारसीतच रचना करे. नंतरही काही काळ इंग्रजांवर छाप पाडण्यासाठी त्यानं पुन्हा फ़ारसी रचनांमध्ये मन घातलं होतं. ग़ालिबनं फ़ारसीतून एकूण ११ मसनवी लिहिल्या. त्यांपैकी ही तिसरी मसनवी आहे. 

‘चिराग़-ए-दैर’ आता इंग्रजी, ऊर्दू व हिंदीतही अनुवादित झाली आहे. ग़ालिब बनारसच्या प्रेमातच पडला होता, असं दिसतं. तसं त्याचं इथलं वास्तव्य अल्पकाळच झालं. पण त्याला हे शहर प्रभावित करून गेलं. १८२८ मध्ये तो इथं होता. त्याचं वय तेव्हा तीस-एकतीस होतं. लखनौला काही महिने घालवून मग तो बांदा व इलाहाबाद करत, बनारसला नावेनं आला होता. त्याची तब्येतही तेव्हा जरा ढासळली होती. त्यामुळंही त्याला इथं थांबणं भागच होतं. बनारसनं त्याच्यावर जादू केली आणि तो बरा झाला. त्याचं मनही उत्फुल्ल झालं. बनारसला तो सुरुवातीला थोडे दिवस नवरंगाबाद इथल्या एका धर्मशाळेत राहिला होता. मग त्यानं एक घर भाड्यानं घेतलं. शहरात तो फिरत असे. गंगेच्या घाटावरही जात असे. बनारसचा बाजार, बागा, देवळं हे सारं त्यानं कुतूहलानं आणि आस्थेनं पाहिलं. आपल्या मित्रांना तो नेहमीच पत्रं लिहीत असे. सुरुवातीच्या या काळात तो पत्रं फ़ारसीतूनच लिही. बांदा इथला मित्र मौलवी मोहम्मद अली ख़ानला त्यानं बनारसबद्दल दिल खोलून पत्रातून लिहिलं. बनारसची प्रशंसा त्यानं यात केली. तिथलं सुंदर हवामान, समृद्ध अशी संस्कृती आणि प्रेमळ माणसं कशी आहेत, ते त्यानं लिहिलं आणि या शहरावर लिहिलेले बारा शेरही त्यानं पत्रात दिले. काही दिवसांनी मग या शहराचं वर्णन करणारी मसनवी लिहायला सुरुवात केली. या मसनवीत १०८ शेर आहेत. (१०८ या संख्येला हिंदू धर्मातही महत्त्व आहे.) बनारसचं नैसर्गिक सौंदर्य, शरीराला प्रसन्न करणारी नदीवरून येणारी वाऱ्याची झुळूक, तिथल्या हवेची शुद्धता वगैरे तर त्यानं लिहिलंच. पण ग़ालिब लिहिताना मध्येच तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतही शिरलेला दिसतो. दिल्ली शहराला बनारसचा हेवा वाटणार नाही, तर बनारस दिल्लीला आवडून जाईल, असंही तो म्हणतो. बनारसवर भाळलेला ग़ालिब स्वतःला बजावतही राहतो, की तुला इथंच राहायचं नाही. तुला आपलं काम करायला पुढं जायचं आहे. इथंच राहिलास तर कसं होणार... 

बनारसला ग़ालिब तीन-चार महिने तरी राहिला असावा, असं त्यानं जे काव्यात व पत्रांमधून लिहिलं आहे, त्यावरून वाटतं. या शहराविषयी त्याच्या मनात आकर्षणाची आणि आपुलकीची भावना निर्माण झाली होती. इतकी, की मोहम्मद अली ख़ान या दोस्ताला लिहिलेल्या पत्रात तिथल्या हिंदू सणांचं, उत्सवांचं आणि शंखनादानं आणि घंटांच्या आवाजानं रंग भरणाऱ्या आणि फुलं तसंच अबीर-गुलालाच्या सुगंध-रंगांनी सजलेल्या गंगेच्या घाटावरील एकूण वातावरणाचं वर्णन केलं आहेच. पण त्यात तो असंही लिहितो, ‘ही नगरी इतकी सुंदर आणि छान आहे, की एखाद्या परक्या माणसालाही आपली दुःखं विसरायला लावते. मला जर धार्मिक तिरस्कार आणि शत्रूंच्या टीकेची भीती नसती, तर मी स्वतःचा धर्म सोडला असता आणि हातात जपमाळ घेतली असती, जानवं घातलं असतं, कपाळावर टिळा लावला असता आणि अशाच प्रकारे माझं सारं आयुष्य या गंगेच्या तीरावर घालवलं असतं.’ ग़ालिबच्या मनातली ही निर्मळ भावना बघितल्यावर तो मनानं एका वेगळ्याच उंचीवर पोचला होता, हे लक्षात येतं. ‘चिराग़-ए-दैर’ या मसनवीत ग़ालिबनं बनारसला ‘हिंदुस्तानचा काबा’ असंही म्हटलं आहे - 
इबादतख़ाना-ए-नक़ूसियान अस्त 
हमा ना काबा-ए-हिंदुस्तान अस्त 

(ही जागा (बनारस) शंखनाद करणाऱ्यांचं (हिंदूंचं) पूजास्थळ आहे. हा तर हिंदुस्तानचा काबा आहे.) 

बनारसची आठवण त्याच्या मनातून कधीच गेली नाही. १८६० नंतरच्या काळातही त्यानं लिहिलेल्या पत्रांमधून या शहराचे उल्लेख सापडतात. आपला मित्र सैयाहला १८६० मध्ये लिहिलेल्या पत्रात तो मित्रानं लिहिलेल्या लखनौ ते बनारस या प्रवासाबद्दल कळवतो आणि लिहितो, ‘बनारसबद्दल तू लिही, बनारसवरची माझी कविता वाच असंही लिहितो. मला प्रवास करता येत नाही, पण तू कळवलंस तर त्यात मी आनंद मानेन.’ ‘मी आज तरुण असतो, तर दिल्ली सोडून बनारसला स्थायिक झालो असतो,’ असंही ग़ालिब एका शिष्याला लिहिताना दिसतो. एकूणच बनारसला तो स्थायिक होऊ शकला नसला, तरी या शहरानं त्याच्या मनात घर केलं होतं. 

कलकत्त्याहून १८२९ च्या ऑगस्ट महिन्यात निघालेला ग़ालिब परतताना पुन्हा बांद्याला काही दिवस राहिला आणि २९ नोव्हेंबरला १८२९ रोजी दिल्लीला पोचला. त्यानंतरचे त्याचे बहुतेक दिवस अडचणीत गेले. आपला प्रभाव इंग्रजांवर पडावा म्हणून तो फ़ारसी काव्यलेखन जास्त करू लागला. पण यामुळं त्याचे दिवस पालटणार नव्हते. १८४७ पर्यंत ग़ालिबनं फ़ारसीवर लक्ष केंद्रित केलं. मध्यंतरीच्या काळात, १८३७ मध्ये बहादूरशहा गादीवर आला. तो काव्याचा जाणकार होता आणि स्वतःही शायर होता. ‘ज़फ़र’ हे त्याचं तख़ल्लुस. त्याच काळातला ‘ज़ौक़’ हा शायर ज़फ़रचा उस्ताद होता. बहादूरशहामुळं ज़ौक़ला दरबारीत राजकवी म्हणून सन्मान मिळाला. ग़ालिबला हे पद हवं होतं, पण ते त्याला मिळू शकलं नाही. मात्र ग़ालिबचं नाव लोकांमध्ये होतं आणि साहित्यप्रेमी इंग्रज अधिकारीही त्याला मानत. ग़ालिबला त्याच्या प्रतिष्ठेचं काही काम मिळणं आवश्यक होतं. १८४० मध्ये एक संधी चालून आली. दिल्लीच्या कॉलेजात फ़ारसीचा तज्ज्ञ नेमण्याची गरज होती. त्यावेळच्या भारतातील कंपनी सरकारचा सचिव जेम्स टॉमसन या कॉलेजात निरीक्षक म्हणून आला होता. या पदासाठी  तेव्हा प्रसिद्ध कवी मोमिन, आणि फ़ारसी पंडित इमाम बख़्श ‘सहबाई’ व ग़ालिब या 
तीनच व्यक्ती योग्य आहेत, असं त्याला सांगण्यात आलं. ग़ालिबशी टॉमसनचा परिचय होता. त्याच्याकडं ग़ालिबचं नित्याचं जाणं-येणंही होतं. टॉमसननं या कामासाठी भेटायला येण्याची विनंती केल्यावर ग़ालिब त्याला भेटायला पालखीतून ठरल्या वेळी गेला. त्याच्या घराच्या दाराशी जाऊन थांबला. नेहमीप्रमाणं टॉमसन आपलं स्वागत करायला कोणालातरी पाठवेल या अपेक्षेनं तो बाहेरच प्रतीक्षा करत राहिला. बराच वेळ गेला, तरी कोणी आलं नाही. दुसरीकडं, ग़ालिब अजून कसा आला नाही, म्हणून वाट पाहून टॉमसन स्वतः बघायला बाहेर आला. तर ग़ालिब तिथं थांबलेला दिसला. कारण कळल्यावर टॉमसननं ग़ालिबला सांगून टाकलं, की ही नेहमीसारखी भेट नव्हती. तर त्याच्याकडं ग़ालिब नोकरीच्या मुलाखतीसाठी आला होता. मग नेहमीच्या पद्धतीनुसार त्याला सन्मानपूर्वक आत घेऊन जायला कसं कोणाला पाठवणार? ग़ालिबला हे फार लागलं. त्याचा आत्मसन्मान दुखावला. त्यानं टॉमसनला ताडकन सुनावलं, ‘कॉलेजचं हे पद स्वीकारल्यावर माझ्या सन्मानात भर पडेल असं वाटलं म्हणून मी आलो होतो. अशा नोकरीमुळं जर माझी प्रतिष्ठा कमी होणार असेल, तर हे पद स्वीकारायची माझी इच्छा नाही...’ अन् आल्या पावली ग़ालिब पालखीत बसून परत गेला. त्याच्या स्वाभिमानाचा हा आणखी एक किस्सा. 

स्वतःच्या परिस्थितीमुळं माणूस असहाय बनतो, तसंच ग़ालिबच झालं होतं. पण तो जगाची ही रीत जाणून होता आणि तटस्थ नजरेनं साऱ्या गोष्टींकडं पाहत होता. त्याचाच एक शेर आहे, की फकिराचा वेश धारण करून कृपावंतांचा खेळ मी बघत असतो.. 
बनाकर फ़कीरों का हम भेस ‘ग़ालिब’ 
तमाशा-ए-अहल-ए-करम देखते हैं

 

संबंधित बातम्या