राष्ट्रकुलातील महिला आघाडी

रोहित हरीप
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

वेध 

ऑस्ट्रेलिया देशातील ‘गोल्डकोस्ट’ मध्ये ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०१८’ नुकत्याच पार पडल्या. एके काळी इंग्लंडची वसाहत असलेले आणि नंतर स्वतंत्र झालेले देश या स्पर्धेत सहभागी होतात. अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स, जर्मनी यासारखे क्रीडा क्षेत्रातील दादा समजले जाणारे देश या स्पर्धेत सहभागी होत नसले, तरी या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंकडून ऑलिंपिक पदकासाठीच्या अपेक्षा उंचावल्या जातात. राष्ट्रकुल स्पर्धा भारतातल्या खेळाडूंसाठी ऑलिंपिक पाठोपाठची अत्यंत महत्त्वाची आणि मानाची स्पर्धा मानली जाते. येथे पदक पटकावणारे खेळाडू ऑलिंपिक पदकासाठीचे प्रबळ स्पर्धक समजले जातात, त्यामुळे सर्व देशाचे लक्ष त्यांच्याकडे आपसूक लागून राहिलेले असते.

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी समाधानकारक होती हे नक्की! या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया (१९८), इंग्लंड (१३३) यांच्यानंतर पदक तालिकेत भारत ६६ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर होता.

पहिला, दुसरा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावरचा आपला देश यांच्यातल्या पदकांच्या संख्येतील फरक पाहिला तर हे स्पष्ट होते, की आपल्यासाठी तिसरा क्रमांक जरी महत्त्वाचा असला तरी अजून बरीच मोठी मजल आपल्याला मारायची आहे. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारताने ६४ पदके मिळवली होती. यंदाच्या स्पर्धेमध्ये एक आश्‍वासक गोष्ट कुठली असेल तर या स्पर्धेतील भारतीय महिला खेळाडूंचे नेत्रदीपक यश!

आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारा आपला देश, देशाच्या पातळीवर महिलांचा आदर करण्यात आणि स्त्रियांना समाजात समान स्थान देण्यात मात्र प्रचंड उदासीन आहे. सध्या देश बलात्काराच्या अमानुष घटनांनी ढवळून निघाला आहे. कथुआ, उन्नाव आणि नुकतेच घडलेले सूरत येथील प्रकरण! यामुळे भारतातील स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहावे इतकी ही गंभीर परिस्थिती आहे. २०१२ च्या निर्भया प्रकरणानंतर देशभर महिला सुरक्षिततेबाबत मोहीम चालवली गेली, वेगवेगळे आयोग नेमले गेले, कायदे केले गेले, मोर्चे निघाले; मात्र त्यानंतरही गेल्या सहा वर्षात देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत फार काही चांगली स्थिती आहे असे नाही. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रकुल स्पर्धांमधील भारतातील महिलांचे यश नक्कीच उल्लेखनीय आहे. प्रतीकात्मक आहे. दिलासादायक आहे. 

प्रश्‍न पडू शकतो, की देशात महिलांवर होणारे अत्याचार आणि क्रीडापटूंचे यश यांचा थेट संबंध कसा? कारण एकीकडे देशातील अनेक महिलांना अत्याचारांना तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे यांपैकीच काही महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान यश संपादन करत आहेत. देशाचे नाव उंचावत आहे. वेटलिफ्टिंगच्या ६९ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवणारी पूनम सिंग, पदक जिंकून घरी आल्यानंतर तिला क्षुल्लक वादातून गावातील काही व्यक्तींकडून मारहाण झाल्याची घटना नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये घडली. मेरी कोमसारखी खेळाडू जिवंतपणी तर एक आख्यायिका बनली आहे. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ही बॉक्‍सर जगात अजिंक्‍य आहे. मात्र तिचा बॉक्‍सर बनण्याचा संघर्ष मोठा आहे. मेरी कोमने मायदेशी परतल्यानंतर देशात घडलेल्या घटनांवर भाष्य करताना, ‘मला हतबल झाल्यासारखे वाटत आहे’ अशी भावना व्यक्त केली. ही हतबलतेची भावना बरंच काही सांगून जाते.

सानिया मिर्झासारख्या खेळाडूला तिच्या कपड्यांवरून विखारी टीकेला सामोरे जावे लागते. यावरून आपल्या देशातल्या महिलांना खेळातल्या तीव्र स्पर्धेला तोंड देतानाच, बाकीच्या कुठल्या वादांना तोंड देत इथपर्यंत पोचावे लागते याची कल्पना केलेली बरी. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर एक ‘मीम’ (Meme) समाजमाध्यमांवर सगळीकडे फिरत आहे. 

‘देशातल्या मुली देशासाठी पदकं मिळवत आहेत. देशाची मान उंचावत आहेत आणि देशातील मुलं मात्र बलात्कार करण्यात आणि वेगवेगळ्या ‘बंद’ आंदोलनांच्या नावाखाली देशात तोडफोड करण्यात मग्न आहेत.’ 

बरेच काही सांगून जाणारी ही ओळ नक्कीच अंतर्मुख करायला लावणारी आहे.

इथे मुळात स्त्री-पुरुष समानता किंवा स्त्री-वाद (Feminism) यासारख्या विषयाला हात घालण्याचे प्रयोजन नाही. मात्र देशात एकीकडे मुलींवर अमानुष अत्याचार होत आहे. स्त्री भ्रूणहत्येसारखा विषय चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव केला जात असताना आपल्या देशाच्या मुलींनी मिळवलेले हे निर्भेळ यश नक्कीच उल्लेखनीय आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, साऱ्या देशाचे लक्ष सलमानला काळवीट प्रकरणात शिक्षा होणार की नाही याकडे लागले होते, तेव्हा मीराबाई चानूने स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत खाते उघडून दिले. तेव्हापासून पदक मिळवण्याचा धडाका स्पर्धा संपेपर्यंत अव्याहत सुरूच आहे. वेटलिफ्टिंगसारख्या खेळात तब्बल पाच पदके मिळवून भारतीय वेटलिफ्टर्सनी साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आता अर्थात मीराबाई चानू, संजिता चानू, पूनम यादव यांना ऑलिपिंकमधल्या पदक पटकावण्याच्या अपेक्षांचा भार उचलावा लागणार आहे.

बॅडमिंटनमध्ये तर भारत हळूहळू महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायना नेहवाल आणि सिंधू यांच्यातच सुवर्णपदकासाठी अंतिम लढत व्हावी हे भारताचे बॅडमिंटन या खेळातील वर्चस्वाचे द्योतक आहे. 

वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या मनू भाकरने नवा जागतिक विक्रम नोंदवला. तर टेबल टेनिसमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारी मनिका बात्रा ही पहिली भारतीय टेबलटेनिसपटू ठरली. मनिका बात्राने मॉडेलिंगसारखे ग्लॅमरस क्षेत्र सोडून टेबलटेनिस या खेळाची निवड करिअर म्हणून केली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती सर्वाधिक पदके जिंकणारी खेळाडू ठरली आहे. तिने एकूण मिळवलेली पदके ही इतर कित्येक देशांच्या एकत्रित पदकांपेक्षा जास्त आहेत. 

नेमबाजी या खेळामध्ये जागतिक पातळीवर भारताच्या महिला खेळाडूंनी स्वतःचे वेगळे स्थान गेल्या काही वर्षात निर्माण केले आहे. या स्पर्धेत तब्बल सात सुवर्णपदके मिळवत त्यांनी हे स्थान अधोरेखित केले आहे. भारतीय महिला खेळाडूंचे हे यश निश्‍चितच देदीप्यमान तर आहेच पण भारतासारख्या क्रीडारसिकांच्या देशात आता त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. यामुळे २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या पदकांचा आकडा वाढण्याची अपेक्षा करायला हरकत नाही.

महिलांचे योगदान पन्नास टक्के
यावर्षी भारताच्या खेळाडूंनी २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेल्या पदकांची आकडेवारी बघता असे आढळून येते, की भारताने मिळवलेल्या एकूण पदकांपैकी पन्नास टक्के पदके महिला खेळाडूंनी पटकाविलेली आहेत. यंदा भारताने एकूण २६ सुवर्ण पदके मिळवली आहेत त्यातली १२ सुवर्ण पदके महिला खेळाडूंनी व महिला संघाने पटकावली आहेत; तर रौप्य पदकांच्या बाबतीतही भारताने मिळवलेल्या २० रौप्य पदकांपैकी निम्मी पदके (११ रौप्य) महिला खेळाडूंनी पटकावली आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या इतिहासात यंदाचे वर्ष हे खऱ्या अर्थाने भारताच्या महिला खेळाडूंसाठी ‘सुवर्णवर्ष’ ठरले आहे. याआधी २०१४ च्या ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केवळ पाच महिला खेळाडूंना सुवर्णपदक मिळवता आले होते.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या