अमेरिकेतील फायर चळवळ

वैभव पुराणिक
शनिवार, 8 डिसेंबर 2018

वेध
अमेरिकेत नोकरी सोडून लवकर रिटायर होण्याचा ट्रेंड येथील मध्यमवर्गात रुजत आहे. अमेरिकन मध्यमवर्गीयांमध्ये एक नवीन चळवळ सुरू झाली आहे. याविषयी...

आपल्यापैकी बहुतेक सर्वच आपल्या नेहमीच्या रहाटगाडग्यात अडकलेले असतो. दररोज सकाळी उठा, घरची कामे करा, मुलांना शाळेत सोडा, कामावर जा, कामावरून ठरल्या वेळेवर परत या, स्वयंपाक करा, जेवण करून, टीव्ही बघून झोपा. शनिवार-रविवार सोडला, तर हे असे चक्र नियमित चालू असते. त्यातील अनेकांना आपापल्या कामात रसही नसतो. अनेक वेळा कामावरील परिस्थिती अनुकूल नसते. कामाचा ताण अधिक असतो.  केवळ चांगले पैसे मिळतात म्हणून न आवडणारी नोकरी यातील बरेच लोक करत असतात. आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य असंच निघून जातं आणि आपल्याला पत्ताही लागत नाही. 

अमेरिकेतील काही मंडळींना या आयुष्यचा उबग आला. भारत असो वा अमेरिका, मध्यमवर्गाची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच असते. इंग्रजीत या गाड्याला फार छान नाव आहे - ‘रॅट रेस’. अमेरिकेतील या तरुण मंडळींनी ठरवलं, कि यातून बाहेर पडायचं. चक्क रिटायर व्हायच. पण रिटायर झालं, तर खाणार काय? यातील बहुतेकांचा चरितार्थ हा नोकरीवरच चालत होता. चरितार्थाचे साधन म्हणून ते काय? मग त्यावरही लोकांनी उपाय शोधून काढला. शक्‍य असतील तिथे पैसे वाचवून या लोकांनी आपला खर्चच कमी केला. एकूण उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के रक्कम त्यांनी साठवायला सुरुवात केली. ही रक्कम त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवली. मग पुरेसे पैसे साठले, की नोकरी सोडायची! आणि हे पुरेसे पैसे साठवण्यासाठी ५० पर्यंतही काम करायची गरज नाही. अनेक लोकांनी वयाच्या तिशीतच नोकरी सोडली आहे ! नोकरी सोडून जे आवडेल ते करायचे. मग त्यातून पैसे मिळाले नाहीत, तरी हरकत नाही. पैसे मिळाले तर छानच, पण पैशासाठी म्हणून पुन्हा काम करायला लागू नये अशी परिस्थिती निर्माण करायची. रिटायर होणे म्हणजे काहीच काम करणे असे नाही. रिटायर होणे म्हणजे दुसऱ्याची चाकरी करणे सोडणे. या चळवळीला आता अमेरिकेत नावंही मिळाले आहेत. ‘फायर’ - FIRE (फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली) असे या चळवळीचे नाव असून, काही लोक त्याला नुसतेच फाय (FI - फायनान्शियल इंडिपेंडन्स) असेही म्हणतात. जे लोक त्याला नुसते ‘फाय’ म्हणतात त्यांना रिटायर अर्ली या भागावर भर द्यायचा नसतो, त्यांच्या मते ‘फायनान्शियल इंडिपेंडन्स - आर्थिक स्वातंत्र’ हेच या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

फायर मूव्हमेंट समजून घेण्याआधी अमेरिकेतील मध्यमवर्गाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. बहुतांशी अमेरिकन मध्यमवर्ग ‘पेचेक टू पेचेक’ जगतो. म्हणजेच त्यांची बचत काहीच होत नाही. अशा लोकांची नोकरी गेली अथवा काही समस्या आली तर हे लोक रस्त्यावर येतात. आपला पगार ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ही मंडळी खर्च करीत नाहीत, आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च करतात. अमेरिकेत मध्यमवर्गाकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या विम्याच्या पॉलिसी असतात. घराला काही झाले, तर होम इन्शुरन्स त्याची भरपाई करून देतो. एखादे आजारपण आले, की त्यासाठी मेडिकल इन्शुरन्स असतो. त्यामुळे ही मंडळी बचतीच्या भानगडीत न पडता जेवढा पगार हातात मिळतो तो बहुतेक सगळा खर्च करतात. महागड्या गाड्या व महागडी घरे कर्जावर घेतात. क्रेडिट कार्डाचा सर्रास वापर केला जातो. क्रेडिट कार्डाचे बिल दर महिन्याला न भरता, फक्त कमीत कमी पैसे भरून ही मंडळी वर्षानुवर्षे जगत राहतात. अमेरिकेत सर्वसाधारण क्रेडिट कार्डावरील थकबाकीवर बॅंका १८ ते २० टक्के व्याजदर आकारतात. पूर्ण बिल भरले नाही, तर उरलेल्या रकमेवर व्याजदर लागू होतो व या मंडळींच्या नकळत त्यांचे कर्ज वाढत राहते. यातील अनेक लोकांना याचे गणितच कळत नाही. त्यामुळे ही मंडळी कर्जाच्या बोज्याखाली झुकलेली असतात. फायर चळवळीचा एक मुख्य भाग म्हणजे स्वतःला कर्जाच्या बोजातून मुक्त करणे.

फायर चळवळीची काही प्रमुख अंगे आहेत. ही चळवळी नक्की काय आहे ते समजून घेण्यासाठी ही अंगे प्रथम समजावून घ्यावी लागतील. यातील सर्वांत महत्त्वाचे अंग म्हणजे ४ टक्‍क्‍यांचा नियम. याला इंग्रजीत  ‘4 पर्सेंट रुल’ असे म्हटले जाते.  १९९४ मध्ये अमेरिकेतील एक संशोधक विल्यम बेंगन यांनी रिटायरमेंट घेण्यासाठी किती पैसे जमवणे आवश्‍यक आहे याचा अभ्यास केला व त्यावर एक लेख लिहिला. त्यांना ‘सेफमॅक्‍स’ शोधायचे होते. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील, तर हे पैसे तुम्हाला किती वर्षे पुरतील हे त्यांना शोधायचे होते. किंबहुना त्यापेक्षाही हे पैसे किती पैसे दरवर्षी काढून घेतले तर संपणार नाहीत हे त्यांना पहायचे होते. सेफमॅक्‍स म्हणजे साठवलेल्या रकमेच्या किती टक्के रक्कम तुम्ही दरवर्षी काढली तर पैसे ३० वर्षात संपणार नाहीत? त्यानंतर टेक्‍सासमधील ट्रिनिटी विद्यापीठातील प्राध्यापकांनी अशाच प्रकारचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष १९९८ च्या फेब्रुवारी महिन्यात ‘जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशन ऑफ इंडिविज्युएल इन्वेस्टर्स’ या शोधमासिकात प्रसिद्ध केले. या निष्कर्षानुसार ४ टक्के रक्कम तुम्ही दर वर्षी काढत राहिलात, तर तुमची मूळ रक्कम ३० वर्षांनी सुरक्षित राहण्याची शक्‍यता तब्बल ९५ टक्के एवढी आहे. म्हणजेच तुमचे पैसे ३० वर्षात संपणार नाहीत. तसेच या अभ्यासामध्ये संशोधकांनी महागाईचा दरही लक्षात घेतला होता. अमेरिकेत सर्वसाधारणतः महागाई दरवर्षी ३ टक्‍क्‍याने वाढते. म्हणजे तुम्ही महागाई झाल्यामुळे प्रत्येक वर्षी ३ टक्के जास्त रक्कम काढली तरीही तुमचे पैसे संपणार नाहीत असे संशोधकांनी म्हटले. त्यासाठी संशोधकांनी अमेरिकन शेअर बाजाराच्या मागील ३० वर्षाच्या माहितीचा अभ्यास केला. फायर चळवळीतील अनेकांनी या संशोधनाचा आधार देऊन दरवर्षी ४ टक्के रक्कमच काढावी लागेल अशा पद्धतीने पैसे साठवायला सुरुवात केली. म्हणजेच तुमचा वार्षिक खर्च १ लाख डॉलर्स एवढा असेल, तर तुम्हाला २५ लाख डॉलर्स एवढी रक्कम स्टॉक व बाँडमध्ये गुंतवावी लागेल. परंतु तसे करण्याआधी सर्वप्रथम या लोकांना आपला वार्षिक खर्च काय आहे हे पाहणे सुरू केले. आजकाल अमेरिकेत अनेक कंपन्या आपला महिन्याचा खर्च नक्की कुठल्या गोष्टीवर होत आहे हे सांगणारी साधने विनाशुल्क उपलब्ध करून देतात. अमेरिकेतील बहुतेक लोक क्रेडिट कार्ड अथवा बॅंकांनी पैसे देत असल्याने या कंपन्यांना त्यातील माहितीवरून खर्चाचे वर्गीकरण करणे सोपे जाते. या वर्गीकरणात मग किराणा मालावर किती खर्च झाला, पेट्रोलवर किती खर्च झाला, बाहेर जाऊन खाण्यावर किती खर्च झाला अशा गोष्टी तुम्हाला वेबसाइटवर छान चार्ट स्वरूपात दिसतात. त्याचा अजून एक परिणाम म्हणजे या लोकांना आपला खर्च अनावश्‍यक ठिकाणी होत आहे असेही समजायला लागले. मग तो खर्च कसा टाळता येईल याचा विचार ही मंडळी करू लागली. अभिनव पद्धती वापरून त्यांनी खर्चाचा आकडा कमी करण्यात यश मिळवले. खर्च कमी झाला, तर साठवायला लागणारी रक्कमही कमी होईल व बचत वाढेल असेही या मंडळीच्या लक्षात यायला लागले. तसेच आकडेमोडीवरून या मंडळींना आयुष्यातील लवकर केलेल्या बचतीचे महत्त्व उमगले. समजा तुम्हाला लवकर म्हणजे ५० वर्षाचे असतानाच रिटायर व्हायचे आहे. दरवर्षी तुम्ही १००० डॉलर्सची बचत करत आहात. आणि ही बचत तुम्ही वयाच्या २१ व्या वर्षापासून करत आहात. जर दरवर्षी तुमची रक्कम १० टक्‍क्‍याने वाढत असेल, तर ३० वर्षांनी - म्हणजे तुम्ही रिटायर व्हाल, तेव्हा या रकमेचे तब्बल १ लाख ८० हजार डॉलर्स झालेले असतील! परंतु वयाच्या विशीमध्ये तुम्ही पैसे बाहेर खाण्यात आणि मजा करण्यात उडवलेत आणि त्याऐवजी तुम्ही वयाच्या ३१ व्या वर्षापासून दरवर्षी १००० डॉलर्सची बचत करायला सुरुवात केलीत, तर तुम्ही ५० वर्षाचे होताल तेव्हा फक्त ६३ हजार डॉलर्सच जमा झालेले असतील! याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट अथवा चक्रवाढ व्याज! जे लोक विशीपासून बचत सुरू करतात, ते प्रत्यक्षात फक्त १० हजार डॉलर्सच जास्त टाकतात, पण त्यांची रक्कम मात्र तिप्पट जमा होते. याचे मुख्य कारण म्हणजे या रकमेला ३० वर्षे चक्रवाढ व्याजाने वाढायला मिळतात. जे लोक तिशीपासून सुरुवात करतात त्यांना फक्त वीसच वर्षे मिळतात. त्यामुळे आयुष्याच्या सुरुवातीला अधिक बचत करणे जास्त महत्त्वाचे आहे हे ही या मंडळींना उमगू लागले. अमेरिकेत बहुतेक लोक वयाची विशी गाठायच्या आधीच आपल्या पालकांचे घर सोडतात. अनेक लोक कॉलेजचे शिक्षण घेत असतानाही अर्धवेळ नोकरी करून स्वतः:च्या खर्चापुरते पैसे कमावतात. अशा वेळी पैसे कमी मिळत असले, तरीही जबाबदाऱ्या नसल्याने खर्चही कमी असतो. त्यामुळे एकूण उत्पन्नाच्या अधिक टक्के बचत करणे शक्‍य होते. 

ही मंडळी नक्की कुठे पैसे वाचवतात हे पाहणे आवश्‍यक आहे. अमेरिकेतील सर्वसामान्यांचा एक मोठा खर्च म्हणजे गाड्या. अमेरिकेतील न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिस्कोसारखी काही मोठी शहरे सोडली, तर बहुतेक सर्व ठिकाणी तुम्हाला गाडी घ्यावीच लागते. गाडीशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे फारच कठीण असते. त्यामुळे गाडी हा प्रत्येक अमेरिकन मध्यमवर्गीयांचा एक मोठा खर्च असतो. कार कंपन्या आपल्या गाड्यांचे अभिनव पद्धतीने मार्केटिंग करतात व गाडी हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे एक्‍सप्रेशन (प्रकटीकरण) आहे असे भासवतात. तसेच या गाड्या घेणे सर्वसामान्यांना सोपे व्हावे म्हणून कमी दराची कर्जेही उपलब्ध करून देतात. फायर चळवळीतील मंडळी गाड्यांवरील खर्च कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. नवीन गाडीऐवजी जुनी गाडी विकत घेणे हे या चळवळीतील लोकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेत कारफॅक्‍स या प्रसिद्ध वेबसाइटनुसार नवीन गाडीची किंमत पहिल्या महिन्यातच १० टक्‍क्‍यांनी कमी होते व वर्षाअखेरीस ती तब्बल २० टक्‍क्‍यांनी कमी होते. म्हणजेच एखादी गाडी नवीन घेण्यापेक्षा एक वर्ष जुनी घेतली, तर जवळजवळ नवीन कार तुम्हाला तब्बल २० टक्के स्वस्त मिळू शकते! तसेच ही मंडळी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज अथवा ऑडी न घेता टोयोटा आणि होंडा गाड्यांवर भर देतात. या गाड्या दीर्घकाळ टिकतात व त्यांच्यावर खर्चही कमी होते. अजून एक पैसे वाचविण्याची संधी म्हणजे बाहेर खाणे. अमेरिकेतील मध्यमवर्ग - विशेषतः मोठ्या शहरात डबे वगैरे घेऊन जाण्याची संस्कृती नाही. त्याऐवजी लोक बाहेरच खातात. फायर चळवळीतील लोक मात्र पैसे वाचवण्यासाठी घरी स्वयंपाक करायला शिकतात व शक्‍य असेल तेव्हा घरचेच खातात. घरे घेतानाही ही मंडळी मोठी घरे न घेता आपल्याला ज्याचा हप्ता भरणे सहज शक्‍य होईल असेच घर घेऊन पैसे वाचवतात. या चळवळीमध्ये कर्ज लवकर फेडून टाकण्याचाही एक प्रवाह आहे. या प्रवाहानुसार घराचे कर्ज बाकी न ठेवता जेवढ्या लवकर शक्‍य होईल तेवढ्या लवकर ते फेडायचा प्रयत्न करतात. 

फाय अथवा फायर चळवळीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘इंडेक्‍स फंड इन्वेस्टींग’ म्हणजेच पैसे विशिष्ट कंपन्यांच्या शेअरमध्ये न गुंतवता ते इंडेक्‍स फंडात गुंतवणे. म्युच्युअल फंड ही संकल्पना आता भारतात सर्वांना माहीत असतेच. अनेक कंपन्यांच्या शेअरना एकत्र करून म्युच्युअल फंड तयार केला जातो. मग लोकांनी पैसे कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवण्याऐवजी अशा फंडाच्या शेअरमध्ये गुंतवल्याने तुमची गुंतवणूक एका कंपनीच्या परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. फंडातील एखाद्या कंपनीचे शेअर खाली गेले, तरी दुसऱ्या कंपनीचे शेअर वर गेल्याने एकूण फंडाचा शेअर वर जाऊ शकतो. म्युच्युअल फंडामुळे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतील धोका तुम्हाला एकप्रकारे कमी जास्त करता येतो. अनेक स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडेक्‍स असतात. या इंडेक्‍स एकंदरीत स्टॉक मार्केट अथवा त्याचा काही भाग वर गेला आहे, की कमी झाला आहे हे तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ मुंबईच्या स्टॉक मार्केटच्या मुख्य इंडेक्‍सला सेन्सेक्‍स असे म्हणतात. या सेन्सेक्‍समध्ये ज्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन सर्वांत जास्त आहे अशा तीस कंपन्यांचे शेअर एकत्र करून त्यांच्या एकत्रित किंमतीवरून एक अंक मिळतो. हा अंक जास्त असेल, तर स्टॉक मार्केट वर गेले असे म्हणतात आणि अंक कमी झाला तर स्टॉक मार्केट पडले असे म्हणतात. इंडेक्‍स फंडात सेंन्सेक्‍ससारख्या इंडेक्‍समधील शेअर हे त्या कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या प्रमाणात एकत्र केलेले असतात. म्हणजेच ज्याचे मार्केट कॅपिटलायझेशन जास्त त्यांचे जास्त शेअर या फंडात असतात. अमेरिकन स्टॉक मार्केटचा अभ्यास करून असे सिद्ध झाले आहे, की तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे शेअर निवडलेत, तरी वर्षामागून वर्षे तुम्हाला इंडेक्‍सपेक्षा जास्त फायदा होणे फारच कठीण असते. म्हणजे तुम्ही निवडलेल्या दहा शेअरची एकत्रित किंमत सलग तीन वर्षे १२ टक्‍क्‍यांनी वाढली, तरी ती १० वर्षे सलग सेंन्सेक्‍समधील स्टॉकच्या एकत्रित किंमतीपेक्षा जास्त वाढू शकत नाही. म्हणजेच कुठलाही म्युच्युअल फंड हा एखाद्या इंडेक्‍समधील शेअरना एकत्रित केल्यास त्यांच्यापेक्षा चांगला रिटर्न तुम्हाला देऊ शकत नाही.आणि म्हणूनच वेगवेगळ्या शेअरमध्ये अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा फायर चळवळीतील मंडळी इंडेक्‍स फंडात गुंतवणूक करणे पसंत करतात. अर्थात ही संकल्पना भारतीय स्टॉक मार्केटला लागू होते की नाही याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. 

फायर चळवळीत अनेक नवीन सेलिब्रिटी आहेत. जे एल कॉलिन्स, मॅड फायटीस्ट, पॉला पंत (ही वंशाने नेपाळी आहे व तिचे खरे नाव प्रज्ञा पंत असे आहे) ही नावे प्रसिद्ध असली तरीही या चळवळीतील सर्वांत अग्रेसर नाव म्हणजे मिस्टर मनी मुस्टॅश. या व्यक्तीचे खरे नाव पिटर ॲडनी असे असले तरी त्याच्या https://www.mrmoneymustache.com/  या वेबसाइटमुळे तो मनी मुस्टॅश नावानेच अमेरिकेत प्रसिद्ध आहे. हा व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता होता. तो आपल्या तिशीतच निवृत्त झाला व निवृत्त झाल्यानंतर त्याने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. हा ब्लॉग या चळवळीतील सर्वांत लोकप्रिय ब्लॉग आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या ब्लॉगवरून मनी मुस्टॅश आपल्या अनुयायांना पैसे कसे वाचवायचे याच्या टिप्स तर देतोच, पण चळवळीशी निगडित अनेक गोष्टींवर चर्चाही करतो. निवृत्त झाल्यावर त्याने आपले पैसे रिअल इस्टेटमध्येही गुंतवले आहेत. अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील डेनवर जवळील लाँगमाँट या एका छोट्या शहरात तो राहतो. याच्या काही मुलाखती युट्यूबवरही उपलब्ध आहेत. तसेच फायर चळवळीतील लोकांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटता यावे म्हणून तो कॅम्प फाय नावाची एक छोटीशी परिषदही भरवतो. 

भारतीयांना या चळवळीतील बऱ्याच गोष्टी नवीन नाहीत. आपल्याकडील अनेक लोक वरील संकल्पानांचे पालन करीतच लहानाचे मोठी होतात. आमच्या मागच्या पिढीने तर कधी कर्जच काढली नाहीत. त्यांना कर्जे मिळतच नसत! माझ्या वडिलांनी मुंबईतील स्वतः:च्या मालकीची पहिली खोली १९९८ मध्ये - म्हणजे त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतर घेतली. त्यांनी या फ्लॅटसाठी लागणारी पूर्ण रक्कम साठवली आणि मगच तो फ्लॅट घेतला. परंतु आता हळूहळू भारताची संस्कृती बदलायला लागली असून किंमती प्रचंड वाढल्याने कर्जाशिवाय मोठ्या शहरात फ्लॅट घेणे जवळजवळ अशक्‍य झाले आहे. नवीन पिढी क्रेडिट कार्डाचाही सढळ हाताने वापर करताना आढळते. मेडिकल विम्याचे प्रमाणही वाढले आहे आणि मध्यमवर्गाकडे आता मोठमोठ्या गाड्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे लोकांची बचतही कमी झाली आहे. त्यामुळे भारतातील मध्यमवर्गाची अमेरिकन मध्यमवर्गाकडे वाटचाल सुरू आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या