‘सर्व प्रकारचे चित्रपट करायचेत’ 

चिन्मयी खरे     
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

विशेष
‘शिकारी’ या चित्रपटानिमित्त मृण्मयी देशपांडे यांची घेतलेली मुलाखत...

‘शिकारी’ या चित्रपटाबद्दल आणि त्यातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? 
मृण्मयी देशपांडे : हा एक कॉमेडी चित्रपट आहे. मात्र त्यात एका सामाजिक विषयावरही भाष्य आहे. नवीन प्रश्‍नांना वाचा फोडणारा हा चित्रपट आहे. एक गावाकडची मुलगी मुंबईत येते तिचे या मुंबईत आल्यावर काय होते असा चित्रपटाचा विषय आहे. त्या गावाकडच्या मुलीची भूमिका मी केली आहे. फुलवा असे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ही फुलवा म्हणजे नुसता दंगा आहे. जिला मोठे होणे म्हणजे काय असते, या गोष्टीची कल्पनाच नाही. गावात लहान मुलांबरोबर बागडण्यात, गोट्या खेळण्यात तिचे आयुष्य गेले आहे. अशा या मुलीच्या व्यक्तिमत्त्वात मुंबईत येऊन काय बदल होतात, असा चित्रपटाचा विषय आहे. 

चित्रीकरणाचा अनुभव कसा होता? 
मृण्मयी देशपांडे : मला या चित्रपटाचे चित्रीकरण करताना सगळ्यात जास्त धमाल आली. कारण मला एकतर खेळायचे तरी असायचे नाहीतर खायचे तरी असायचे. कधी गोट्या, कधी लंगडी, कधी मुलांना मारायचे हे असेच करायला लागायचे मला. मी या चित्रपटात ताईगिरी आणि भाईगिरी केली आहे. 

सुव्रतबरोबर कामाचा अनुभव कसा होता? 
मृण्मयी देशपांडे : सुव्रतचा हा पहिलाच चित्रपट आहे. पण तो खूपच गोड आणि चांगला माणूस आहे. तसेच तो एक उत्तम नटही आहे. त्याच्याबरोबर काम करणे ही नेहमीच मजेशीर गोष्ट असते. त्यामुळे आम्ही खूप धमाल केली. 

‘शिकारी’ चित्रपट निवडण्याचे कारण काय? 
मृण्मयी देशपांडे : मला हा प्रश्‍न अनेक जणांनी विचारला की तू ‘नटसम्राट’, ‘कट्यार...’, ‘ध्यानीमनी’ असे चित्रपट केलेस तर मग आता ‘शिकारी’ का? तर मला असे वाटते, की प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षक वेगळा असतो आणि एक कलाकार म्हणून मला असे वाटते, की प्रत्येक प्रेक्षकाचा माझ्यावर समान हक्क आहे. या चित्रपटातून मला वेगळे काहीतरी करायला मिळेल आणि इमेज ब्रेक करण्यासाठीच मी हा चित्रपट निवडला. ज्या मृण्मयीने सोज्ज्वळ भूमिका केल्या तिला हेही जमू शकते हे मला प्रेक्षकांना दाखवून द्यायचे आहे. जेव्हा मी मागे वळून पाहीन तेव्हा मला जाणवेल की मी विविधांगी भूमिका केल्या. काहीच करायचे राहिले नाही ही भावना माझ्या मनात असेल. दुसरे कारण म्हणजे मी हा चित्रपट मांजरेकर सरांसाठी केला. कारण मी महेशसरांना नाही म्हणू शकत नाही. त्यांनी आजपर्यंत मला जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ऑफर केल्या आहेत तेवढ्या भूमिका मला आजपर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाने ऑफर केलेल्या नाहीत. मला त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच मजा आलेली आहे. म्हणून मी ‘शिकारी’ केला. 

ही भूमिका करताना काही दडपण आले होते का? 
मृण्मयी देशपांडे : अजिबातच नाही. कारण माझ्या माहेरची आणि सासरची माणसे नेहमीच माझ्या प्रत्येक भूमिकेपाठी खंबीरपणे उभी असतात. त्यामुळे मला कोणतीही भूमिका करताना दडपण येत नाही. मी जेव्हा म्हातारी झाल्यावर ‘शिकारी’ पाहीन तेव्हा त्या चित्रपटाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असेल. खरे तर मी ही सगळी कामे माझ्या म्हातारपणासाठी करतेय. जेव्हा मी माझ्या नातवंडांना खेळवत बसलेली असेन तेव्हा त्यांना दाखवता येईल की आजीने हे काम केलेले, ते काम केलेले. त्यांची पिढी फारच पुढारलेली असेल. माझ्या म्हातारपणी मला मजा यावी यासाठी हे सगळे चाललेले आहे... 

मराठीत घडणाऱ्या कास्टिंग काऊचविषयी तुला काय वाटते? 
मृण्मयी देशपांडे : मराठीत फक्त शारीरिकच नाही तर मानसिक कास्टिंग काऊचही होते. या इंडस्ट्रीत अशी काही माणसे आहेत जे अभिनेत्रींना मानसिकदृष्ट्या छळतात. म्हणजे शारीरिक कास्टिंग काऊच परवडले; पण मानसिक नको अशी म्हणायची वेळ येते इतका मानसिक छळ केला जातो. असे अनुभव मलाही आलेले आहेत. त्यामुळे मुलींनी मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याची गरज आहे असे मला वाटते. 

तुझे आगामी प्रोजेक्‍ट्‌स काय आहेत? 
मृण्मयी देशपांडे : मी ‘फर्जंद’ या चित्रपटात काम करतेय. तसेच महेश मांजरेकर दिग्दर्शित आणखी एका चित्रपटातही काम केले आहे. तो चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे. तसेच माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या चित्रपटातही मी काम करतेय. मी दिग्दर्शित केलेला ‘के सरा सरा’ हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होईल.

संबंधित बातम्या