‘जंपिंग फिश’.. खरंच?

प्रतिमा दुरुगकर 
गुरुवार, 5 जुलै 2018

विशेष
 

आम्ही दक्षिणेच्या आमच्या यावेळच्या टुरमध्ये कोचीजवळील ‘चेराई बीच’वर राहण्याचे ठरविले. हा चेराई बीच व्यापीन आयलँड वर आहे. हा आयलँड २२ किमी लांब आणि फक्त अडीच किमी रुंद असे हाताच्या बोटाप्रमाणे असून त्यावर टोकाशी शांत व रमणीय चेराई बीच’ आहे. या चेराई बीचचे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रत्येक रिसॉर्टच्या पुढच्या दारात बीच आणि मागच्या दारात बॅकवॉटर आहे. आणि किनाराही कसा तर स्वच्छ आणि सोनेरी वाळूचा!

रिसॉर्टवर सेटल झाल्यावर ‘इथे जवळपास काय काय ॲक्‍टिव्हिटीज आहेत म्हणून चौकशी केली, तेव्हा समजले, की येथून एक तासाच्या अंतरावर ‘उड्या मारणारे मासे’ दाखवितात. ‘उड्या मारणारे मासे?’ आमची पहिली प्रतिक्रिया हीच होती. तेव्हा तेथे आम्हाला एक व्हिडिओ क्‍लिप दाखवण्यात आली. त्यात मनुष्यनिर्मित मोठ्या चौकोनी तळ्यात बोट फिरत होती. एक सुंदर चौकोनी, आनंदी कुटुंब त्यात बसले होते. आजूबाजूला अधून मधून मासे पाण्याबाहेर उंच उडी मारून पुन्हा पाण्यात जात होते. कधी कधी बोटीतही उड्या मारत होते. ‘अगदी असेच आम्हाला बघायला मिळेल का?’ माझा प्रश्‍न. ‘हो मॅडम अगदी असेच बघायला मिळेल याची गॅरंटी आहे आमची ! 

अर्ध्या दिवसाची टूर होती. तीन वाजता निघायचे होते. चारला तेथे पोचलो. चार ते साडे पाच बोटिंग. साडे सहा ते सातपर्यंत परत रिसॉर्टवर.’ आम्ही दुपारी जाण्याचे ठरविले.

चार वाजता आम्ही गाडीतून उतरलो. शेतांमधून चालत बरेच अंतर गेलो. हा परिसर फार रमणीय होता. पक्षीही दिसत होते. थोड्या वेळाने बॅकवॉटर दिसू लागले. होडीतून स्थानिक लोकांची ये-जा चालू होती. आमच्या ग्रुपला एका ठिकाणी २ मोटारबोटीत बसविण्यात आले. येथे आजूबाजूला आखीव रेखीव तळी दिसत होती. आमच्या बोटी एकामागून एक तळी ओलांडीत पुढे जाऊ लागल्या. बऱ्याच वेळाने एका मोठ्या चौकोनी तळ्यात आम्ही शिरलो. आता बोटमनने बोटीच्या पुढच्या बाजूला एक चक्र होते ते सुरू केले. सुदर्शन चक्रासारखे स्टीलचे ते चक्र होते. ‘हे काय आहे?’ माझा प्रश्‍न. ‘बोट वळविण्यासाठी आहे.’ आता बोट पाण्यात सारखी वळू लागली. इकडून तिकडे. तिकडून इकडे. थोड्याच वेळात बोटीच्या कडेला २-३ मासे उड्या मारताना दिसले. मासे ३-४ फूट उंच उंच उड्या मारीत होते. आणि तेही बोटीच्या आजूबाजूला. सर्वजण आनंदाने ओरडू लागले. मुले टाळ्या पिटू लागली. ते मासे खूप मोठे होते. एक ते दीड फूट लांब आणि जाड ! आता बोट तळ्याच्या वेगवेगळ्या भागात फिरू लागली. आणि एक मोठ्ठा मासा माझ्या मांडीवर येऊन पडला. मी किंचाळून उभी राहिले तर बोटमन म्हणतो कसा, ‘मॅडम, बॅलन्स जातो.. उठू नका, मासा काही करीत नाही. उचलून पाण्यात टाका.’ ‘अरे वा, म्हणे पाण्यात टाका. मी हात नाही लावू शकणार माशाला तुम्हीच उचला.’

त्यांनी तो मासा उचलला, सर्वांना दाखविला. त्याचे फोटोसेशन झाले. आणि मग तो पाण्यात गेला. पुन्हा ५ मिनिटांनी दुसरा मासा माझ्याच पावलावर पडला. एकूण तीन वेळा मासा बरोब्बर माझ्याकडे उडून पडत होता. त्यामुळे सर्वांना ‘जंपिंग फिश’ बरोबर ‘जंपिंग लेडीपण बघायला मिळाली. पण काही असो खूप मजा आली. तळ्याच्या कडेने माशांवर डोळा ठेवून अनेक पक्षी बसले होते. खूप वेळ ते उड्या मारणारे मासे बघून आम्ही मागे फिरलो. 

दुसऱ्या दिवशी खासगी हाऊसबोटने मागच्या दाराच्या बॅकवॉटरवर संध्याकाळी सैर करायचे ठरविले. या हाऊसबोटीचा चालक खूप गप्पिष्ट आणि मजेशीर होता. ‘आमचा बोटीत बसलेला एक फोटो काढा’ म्हणून कॅमेरा त्याच्या हातात दिला, तर त्याने ३०-४० फोटो काढले. आता त्याच्याकडे कॅमेरा द्यायचा नाही, हे मी व प्रदीपने न बोलता ठरविले.

हाऊसबोटीतून फिरताना दूरवरचे पक्षी, गरुड, त्यांचे घरटे व पिल्ले हे सर्व ते बरोब्बर दाखवीत होते. बोलता बोलता ‘इथे काय काय बघितले?’ असे त्याने विचारले. ‘काल उड्या मारणारे मासे बघितले’. आमच्या या उत्तरावर ते हसू लागले. ‘अहो, मॅडम, उड्या मारणारे मासे कधी असतात का? त्यांनी फसविले तुम्हाला. सर्व जणच फसतात.’ ‘अहो पण त्यांनी नावसुद्धा सांगितले माशाचे.’ ‘मग बघितले का गुगलवर?’ ‘नाही बुवा.’ आम्ही लगेच सर्च मारला. आम्हाला खरेच काही सापडले नाही. ‘पण आम्ही डोळ्याने बघितले, मासे उंच उडत होते.’ ‘त्याचे काय आहे, ते जे तळं बनविले आहेत ना, ते खूप उथळ केले आहेत व त्यात खूप मासे टाकले आहेत. बोटीला पुढे धारदार चक्र लावतात व बोट वाकडी तिकडी वेगाने फिरवतात. मासे सैरावैरा धावतात. चक्राने जखमी होतात. जिवाच्या आकांताने उड्या मारतात. बोटीत पडतात.’

कालची रमणीय संध्याकाळ आज मला भीषण वाटू लागली. आम्ही लगोलग बुकिंग ऑफिसमध्ये गेलो. सर्व सांगितले. त्यांनी हात वर केले. तेथील एकाने सांगितले, ‘मागे तुमच्यासारख्याच एक मॅडम तक्रार घेऊन आल्या होत्या. त्यांच्या बोटीत पडलेल्या माशाला जखम झाली होती व रक्त वाहत होते. म्हणत होत्या.’

‘मग तुम्ही बंद का करत नाही हे.’
‘आम्ही नोकर माणसे. आम्ही कोण ठरविणार.’ या घटनेच्या वाईट आठवणी घेऊनच आम्ही पुण्यास परतलो. 

संबंधित बातम्या