श्रीदेवी गेली? 

ऋता बावडेकर
मंगळवार, 20 मार्च 2018

विशेष
 

‘ती बातमी कोणी पहाटे बघितली, तर कोणी सकाळी.. पण परिणाम एकच... सुन्नपणा! श्रीदेवी गेली? कसं शक्‍य आहे? पण ते खरं होतं.. कार्डिॲक ॲरेस्टनं या अभिनेत्रीचं निधन झालं होतं. ही बातमी खोटी असावी किंवा अफवा असावी, असं प्रत्येकाला वाटत होतं; पण... 
ती अवघी चोपन्न वर्षांची होती. पण हळहळ वाटण्याचं हे एकमेव कारण नाही. श्रीदेवी आणि तिनं साकार केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या किती जवळच्या होत्या, याची जाणीव त्या क्षणी तिच्या चाहत्यांना झाली. 

तसं बघितलं तर ‘इंग्लिश विंग्लिश’ वगळता तुमच्या-आमच्या जवळच्या म्हणाव्यात अशा भूमिका तिनं फारशा केल्या नाहीत. ती कायमच ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिका करत राहिली. तिच्याकडं नेहमीच ‘स्टाइल आयकॉन’ म्हणून बघितलं गेलं. आपल्याला जे अप्राप्य ते ती रुपेरी पडद्यावर करत होती. तिचे चाहते ते अनिमिष नेत्रांनी बघत होते. त्यामुळं अंतर कायमच राहिलं.  भूमिका कोणतीही असो ती त्यात सामावून जायची, पण तरी आपल्या आसपासची कधीच वाटायची नाही. आपल्याला जे करणं शक्‍य नाही, ते ती पडद्यावर करायची. त्यामुळं अनेकांना ती खूप जवळची वाटायची. विचित्र आहे, पण आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये लहानपणापासून लैंगिक अत्याचार झालेला एक तरुण आला होता. त्याच्या या असह्य करणाऱ्या काळात श्रीदेवीचे ‘चालबाज’, ‘नगीना’ वगैरे चित्रपट तो आवडीनं बघायचा. कारण त्यात ती दुष्टांचं निर्दालन करते. त्यांना कठोर शिक्षा करते. कॅथार्सिसचं हे टोकाचं उदाहरण म्हणायला हवं. पण एरवीही ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘मि. इंडिया’ वगैरे चित्रपटांतही तिच्यात व आपल्यात अंतर जाणवत असलं, तरी तिच्यासारखं व्हावं अशी प्रेरणा तिनं नक्कीच अनेकींना दिली. तिच्या आसपासही आपण नाही, हे कळत असूनही तिच्याबद्दल आपलेपणा वाटणं हा तिच्या अभिनयाचा आणि पडद्यावर दिसणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्त्वाचाच परिणाम म्हणायला हवा. 

श्रीदेवीनं आपलं व्यावसायिक आणि खासगी आयुष्य कायमच वेगळं ठेवलं. काम करतानाही तिनं आपली मर्यादा ओलांडली नाही आणि कोणाला ती ओलांडूही दिली नाही. तिचीही एक-दोन प्रकरणं झाली, पण त्याबद्दल फार बभ्रा झाला नाही, तिनं तो होऊ दिला नाही. आपलं खासगीपण तिनं कायमच जपलं. त्यामुळं खासगी आयुष्यात जसं तिच्या खांद्यावर कोणी हात ठेवू धजलं नाही, तसं तिच्या काही भूमिका नेहमीच्याच असल्या तरी तिला कोणी कॉपी करू शकलं नाही. एरवी एखाद्या अभिनेत्रीच्या कपडे, हेअरस्टाइलची कॉपी होऊन सगळीकडं तेच तेच दिसू लागतं. पण श्रीदेवीनं आपली स्टाइल नेहमीच वेगळी ठेवली - तसा प्रयत्न केला.  श्रीदेवीबद्दलची ही आपुलकी, ती गेल्यानंतरची हळहळ या सगळ्यांतून आली.. 

सध्या सोशल मीडियाचे पेव फुटलं आहे. त्यामुळं प्रत्येकजण आपल्या भावना तिथं व्यक्त करू शकतो. पण ते करताना काही भानही पाळायला हवं. फेसबुकची वॉल आपली आहे, ट्‌विटरचं अकाउंट आपलं आहे, म्हणून माहिती नसताना काहीही लिहिण्याचा आपल्याला कोणीही अधिकार दिलेला नसतो, हे लक्षात घ्यायला हवं. 

कारण हळूहळू ‘कायम तरुण राहण्यासाठी ती काही औषधं घेत होती’, ‘प्लॅस्टिक सर्जरी चुकल्यामुळं तिचा मृत्यू झाला’ (कोणकोणत्या डॉक्‍टरांचे दाखलेही त्यासाठी देण्यात आले), ‘तिच्या आयुष्यात ती खूप तणावाखाली होती’, ‘तिच्या कुटुंबीयांनी तिला सामावून घेतलं नव्हतं’, ‘तिचा मृत्यू नेमका कसा झाला’... एक ना दोन! अशा पोस्ट्‌स येऊ लागल्या. अशी चर्चा करणारे कितीजण या किंवा तिच्यासारख्या कलावंतांना प्रत्यक्ष ओळखतात? जुजबी तरी ओळख आहे का? मग अशी मूर्ख चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आपल्या आयुष्यात काय घडतं आहे, याचा जिथं आपल्या स्वतःला पत्ता नसतो, तिथं या कलावंतांच्या बाबतीत आपण बेधडक काहीही कसं बोलू शकतो? वॉल दिलीय, अकाउंट आहे, बातमीखाली प्रतिक्रियांसाठी जागा आहे म्हणून काहीही व्यक्त व्हायचं? आपली जबाबदारी आपल्याला कधी कळणार? की अशीच मूर्खासारखी चर्चा आपण करत राहणार आणि त्यातच धन्यता मानणार?.. 

अर्थात या कलाकारांच्या आयुष्याचा हा भाग असतो. बरेच जण त्याला तितकीच किंमत देतात. श्रीदेवी तर आता त्यापलीकडं गेली आहे. तिचा ‘डाय हार्ड फॅन’ म्हणायला हवा अशा निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं तिच्याबद्दल फार छान लिहिलं आहे... 

तो म्हणतो, ‘मी वाईट स्वप्न पाहतो आहे असं मला अजूनही वाटतं आहे. पण ते खरं नाही.. आय हेट श्रीदेवी.. तीही आपल्यासारखीच माणूस होती याची जाणीव करून दिल्याबद्दल मला तिचा राग येतो. जगण्यासाठी हृदय धडकणं तिच्यासाठीही आवश्‍यक होतं?.. कधीही थांबू शकेल असं तिचंही हृदय होतं?.. खरं तर ती इथली नव्हतीच.. ती एंजल होती; तरीही?... तिला मारलं म्हणून मला देवाचा राग येतो; आणि श्रीदेवी गेली म्हणून तिचा..!’ 

काही अपवाद वगळता, तिच्या चाहत्यांची हीच अवस्था असेल...

संबंधित बातम्या