मनाचा गुंता 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 18 मे 2018

विशेष
 

  • दोन बातम्या.. 
  • एका १०४ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक डेव्हिड गुडॉल यांनी जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे वैद्यकीय मदतीने आपले जीवन संपविले. 
  • सुपरकॉप हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. 

     स्वेच्छेने मरण स्वीकारणे या पलीकडे या दोन्ही बातम्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. 
मात्र, असे काही झाले की लगेच स्वाभाविक चर्चा सुरू होतात. कोणी म्हणते, आत्महत्या करणे भ्याडपणाचे लक्षण आहे.. कोणी म्हणते, आत्महत्या करायला मोठे धाडस लागते.. वगैरे वगैरे... 
पण आज यावर मला चर्चाच करायची नाही. कारण कोणत्याही बाजूने चर्चा करायला मी कोणी ‘अधिकार व्यक्ती’ नव्हे. आत्महत्या करणारा बरोबर होता, की चुकीचा हे आपण आपल्या जागेवर बसून कसे ठरवणार? एकदा मिळणारे जीवन असे संपवू नये, असे आपण म्हणू शकतो. ओळखीच्या व्यक्ती तसे करत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करू शकतो - नव्हे तसे करावे, याबद्दल शंकाच नाही. पण संबंधित व्यक्तीची आपल्याला कोणतीही माहिती नसताना तो/ती भ्याड किंवा धाडसी असे शिक्के त्यांच्यावर मारू नयेत. 

आत्महत्या करणे या गोष्टीला इतर अनेकांसह वैयक्तिक माझा प्रचंड विरोध आहे. मला वाटते, आयुष्य म्हणजे संघर्ष आला.. सगळ्यांनाच तो अटळ असतो. सगळेच दिवस सारखे नसतात.. सुखानंतर दुःख येते... हे चक्र अखंड सुरू असते. चांगल्या गोष्टींचा आनंद घेतला तर वाईट गोष्टींचाही सामना करायला हवा - करता यायला हवा. अशा प्रसंगात कमजोर पडून कसे चालेल? पण ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ या न्यायाने प्रत्येकाची ‘सोसण्या’ची ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे स्वतःची मोजपट्टी दुसऱ्या व्यक्तीला लावू नये. तशी ती लावली तर गोंधळ होतो. 

या दोन घटना मला एरवीच्या प्रकरणांपेक्षा वेगळ्या वाटतात. पहिल्या घटनेतील वैज्ञानिकाने इच्छामरण स्वीकारले. त्यांचे वय १०४ होते. वयाप्रमाणे गात्रे मंदावत गेली. परावलंबित्व आले. ती परिस्थिती सहन न होऊन त्यांनी जिनिव्हा गाठले कारण ऑस्ट्रेलियात इच्छामरणाला मान्यता नाही. दुसऱ्या घटनेतील हिमांशू रॉय हे आपल्याला कर्तबगार, धडाडीचा पोलिस अधिकारी म्हणून परिचित होते. अचानक त्यांच्या आत्महत्येची बातमी आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. कर्करोग, त्यावरचे उपचार याला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती. दोन्ही घटनांमध्ये दिली गेलेली कारणे पटणारी आहेत. यापैकी पहिल्या घटनेवर आपल्याकडे फारशी चर्चा झाली नाही. अनेकांना तर ती माहितीही नाही. पण हिमांशू रॉय यांच्याबद्दल मात्र खूप जणांनी मते व्यक्त केली. त्यातले एक मत साधारण सारखेच होते.. रॉय हे फिटनेससाठी प्रसिद्ध होते. व्यायामाने त्यांनी शरीरयष्टी कमावली होती. असा ‘आडदांड’ माणूस आत्महत्या का आणि कसा करू शकेल? बहुतेकांच्या मनात हाच प्रश्‍न आला. 

अनेक प्रश्‍न असे असतात, ज्यांची समाधानकारक उत्तरे मिळतातच असे नाही. अशावेळी तर्क लढविले जातात. त्याला हरकत नसते. पण तेच बरोबर असे ठासून म्हणणे चुकीचे; संबंधितांवर अन्याय करणारे ठरते. त्यामुळे ‘असा माणूस आत्महत्या कसा करू शकतो किंवा असे कसा वागू शकतो?’ या प्रश्‍नाला तसा काही अर्थ नसतो. याबाबतीत आपण वरवर दिसणाऱ्या गोष्टी बघत असतो. शरीर आणि मनाचा संबंध लावत असतो. शरीर धिप्पाड असेल म्हणून मनही तेवढेच खंबीर असेल असे आपण गृहीत धरत असतो. चूक नेमकी तिथेच होते. यातूनच काही चुकीची गृहीतके आपल्या समाजात निर्माण झाली आहेत. ‘पुरुष कसा रडू शकतो?’ हे त्यापैकी एक! का नाही रडू शकत? तो माणूस नाही? त्याला भावना नाहीत? त्याने त्या व्यक्त करायच्या नाहीत? सतत घुसमट सहन करायची? थोडे विषयांतर झाले, पण असे वरवर बघून निष्कर्ष काढणे आता खरे तर बंदच व्हायला हवे.  

आतापर्यंत अनेक आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या - ऐकल्या; पण या बातम्यांनी भयंकर अस्वस्थ व्हायला झाले. १०४ वर्षांचे आयुष्य जगलेला माणूस सलाईनची नळी काढून डॉक्‍टरांच्या मदतीने विषारी द्रव्याची नळी सुरू करतो.. संपूर्ण आयुष्य पोलिस दलात गेलेले. खून, मारामाऱ्या जवळून बघितलेल्या - असा माणूस खासगी परवाना असलेली बंदूक तोंडात घालून ती उडवतो... आपला शेवट त्यांनी ठरवला होता. एका क्षणानंतर आपण हे जग परत बघू शकणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव असणार. तरीही त्या निर्णायक क्षणी ते माघार न घेता अज्ञाताच्या वाटेला लागले.. काय असेल त्यावेळची त्यांची मनःस्थिती? ते काय विचार करत असतील? तो क्षण तर आहेच, पण त्या क्षणापर्यंत येण्यासाठी त्यांनी मनाची तयारी कशी केली असेल? कोणाशी बोलावे - मन मोकळे करावे, असे त्यांना वाटले नसेल? 

वेदनांना माणूस कंटाळतो; पण म्हणून हा मार्ग बरोबर आहे का? शरीर कमवायला तुम्ही व्यायाम करता; तसा मनाचाही व्यायाम असेलच की! आपण मनाला इतके दुय्यम स्थान का देतो? त्याचा अजिबातच विचार का करत नाही? वास्तविक मनावरील उपचारांची आज कधी नव्हे इतकी आवश्‍यकता निर्माण झाली आहे. हे उपचार घेताना लाजण्यासारखे काहीच नाही. कारण ‘मनाचा आजार’ म्हणजे माणूस वेडाच असायला हवा असे नाही. त्याचप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करायलाही शिकायला हवे. कारण त्या आतल्या आत दाबून त्यांचा निचरा होत नाही, तर त्याचा शरीरावरच परिणाम होत असतो. 

शरीराचा फिटनेस तर राखायलाच हवा. पण त्या शरीरातच आपल्यालाही न दिसणारे एक मन असते; त्याचीही काळजी घ्यायला हवी. त्यालाही अधून मधून गोंजारायला हवे. मनात येणाऱ्या गोष्टींवर इतरांशीही चर्चा करायला हवी.. यामुळे अशा घटना कमी होऊ शकतील... कदाचित!

संबंधित बातम्या