लाल मातीतला ‘मल्ल’

संपत मोरे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

विशेष
यंदाची महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत अभिजित कटके विरुद्ध बाला शेख अशी सुरू होती. मॅटवर होणारी ही लढत माती गटातल्या बाला शेखला जड जाईल असा जाणकारांचा होरा होता, पण सर्वांना चकित करत बाला शेखने अभिजितचा पराभव करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकवला. बाला शेखच्या यशस्वी वाटचालीविषयी...

‘बालाने ज्या दिवशी मला चितपट केले त्याच दिवशी मी त्याला म्हणालो ‘तुला आता कोणीही हरवू शकत नाही’ बालाचा बाप जरी मी असलो, तरी त्याला घडवले ते गणपतराव आंधळकर यांनी. बालाचा आजचा विजय बघायला ‘आबा’ हवे होते. त्यांच्यामुळेच माझा पोरगा महाराष्ट्र केसरी बनला’, बालाचे वडील आझम शेख सांगत होते. आझम शेख हे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वतः पोराशी लढत देत होते, त्याचा सराव घेत होते. बाप-लेकाच्या लढतीत ज्या दिवशी बाला पहिल्यांदा जिंकला त्या दिवसापासून त्यांनी लढत बंद केली, आणि त्याच दिवशी त्यांच्या मनात बालाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील खडकी गाव. या गावात शेख घराण्यातील चौथी पिढी बालाच्या माध्यमातून लाल मातीशी आजही इमान राखून आहे. पणजोबांपासून शेख घराण्यात कुस्तीची आवड आहे. ‘पदासाठी नाही तर नादासाठी कुस्ती खेळायची’ हा या घराण्याचा दंडक, म्हणूनच शेख घराण्याची ‘पैलवानाच घर’ म्हणून गावात ओळख आहे. बालाचे वडील आझम शेख चांगले पैलवान म्हणून प्रसिद्ध होते. ‘गरिबी कुस्तीच्या आड येत नाही’ हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. ‘कुस्तीसाठी जिद्द हवी, जिद्द गरिबीवर मात करते’ ही थिअरी त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध केली आहे. उमेदीच्या काळात त्यांच्या महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, रावसाहेब मगर(छोटे) या पैलवानासोबत लढती झाल्या होत्या. त्यांनी हाच कुस्तीचा वारसा स्वतःच्या पोराकडे दिला. त्यांनी बाला लहान असतानाच त्याला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचे मित्र श्रीराम पाटील, आमदार नारायण पाटील यांची मदत झाली. हे दोन बंधू कुस्तीप्रेमी म्हणून परिचित आहेत. श्रीराम पाटील हे आमदार नारायण पाटील यांचे थोरले बंधू. कुस्ती आणि लाल माती हा पाटील आणि शेख या दोन घराचा स्नेह जोडणारा दुवा. आझम शेख यांच्याबद्दल बोलताना आमदार पाटील म्हणतात, ‘मी त्याच्यासाठी जे केले ते काही उपकार नव्हे, आझम शेख यांनी कुस्तीसाठी जे परिश्रम घेतले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी त्यांना केवळ मदत केली. मला पैलवान म्हणून घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मी त्यांना माझ्या मोठ्या भावाच्या जागी मानतो. कुस्तीवर एवढे प्रेम करणारा माणूस माझ्या बघण्यात नाही. बालाने जे यश मिळवले आहे ही त्याच्या वडिलांच्या कष्टाच कमाई आहे. आणि बाला महाराष्ट्र केसरीवर थांबणार नाही, तर तो हिंदकेसरीसुद्धा होईल अशी त्याच्याकडून अपेक्षा आहे’

जालना येथे झालेल्या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून बाला लढला. तो कोल्हापूरला मोतीबाग तालमीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करीत होता. त्या काळात हिंदकेसरी आंदळकर बाळाच्या वडिलांना म्हणाले होते, ‘हा मी घडविलेला शेवटचा पैलवान आहे.’ त्याच्या कुस्तीचा त्यांना खूप अभिमान वाटायचा. आंदळकर यांचे निधन झाल्यावर बाला पुण्याला गेला. तिथे हनुमान तालमीत वस्ताद गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केसरीची कसून तयारी केली. बाला गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र केसरी किताबासाठी तयारी करतो आहे. नागपूरला तो माती गटात अंतिम  फेरीत पोचला होता. मात्र विजय चौधरीकडून त्याला हार पत्करावी लागली. महाराष्ट्राच्या मैदानी कुस्तीत जय पराजयाची कसलीच भीती मनात न ठेवता लढणाऱ्या बाला रफिकने अनेक नामवंत मल्लांना पराभवाचे पाणी पाजले आहे. मैदानी लढतीत बाला नेहमीच लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. प्रत्येकाला त्याची लढत पाहायला आवडते. राज्यभरात अनेक मोठ्या मैदानावर त्याच्या कुस्त्या झाल्या. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील लढतीत त्याने संतोष दोरवडला चितपट करत मोठी लढत जिंकली होती.

महाराष्ट्र केसरी किताबाची लढत गादीवरची असते. त्याचा प्रतिस्पर्धी असलेला आणि गतवर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी अभिजित कटके गादी गटातून आला होता. तर बालाने माती गटातून बाजी मारली होती. अंतिम लढतीत अभिजितचे पारडे जड मानले जात होते. त्यात माती गटातून लढलेल्या मल्लाला गादीवर लढताना मोठ्या ताकदीने टिकून राहावे लागते. पण अंतिम लढतीत आपल्या ताकदीच्या बळावर बालाने गादीवर भक्कमपणे उभे राहून अभिजितला वरचढ होऊ दिले नाही. अभिजितने सुरुवात आक्रमक केली होती, मात्र बालाचे गुण रोखण्यासाठी त्याला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. या प्रेक्षणीय लढतीत बालाने अकरा विरुद्ध तीन गुणांनी दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपले नाव कोरले.  या विजयानंतर बाला म्हणाला, ‘माझा विजय मी हिंदकेसरी गणपतराव आंधळकर यांना अर्पण करतो. हा प्रवास त्यांच्यामुळेच शक्‍य झाला. ते नसते तर मी इथवर पोचू शकलो नसतो.’ बाला शेख यांच्याबद्दल कुंडल येथील कुस्तीप्रेमी प्रीतम लाड म्हणाले, ‘हा पैलवान मोठ्या ताकदीचा आहे. त्यांचे भविष्य हे नक्कीच उज्वल असणार आहे. या खेळातील ही ताकद त्याने कमावली असल्याने तो यश मिळवू शकला. दुसरी गोष्ट म्हणजे बालाकडे असणारा संयम ! त्याच्या आजवरच्या कुस्तीत तो अनेकदा पराभूत झाला आहे, पण ते पराभव त्याने पचवला. पराभव पचवून त्यामधून नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पराभवाने तो दुःखी झाला नाही पण प्रेरणा घेतली. बालाला बघायचे ते मैदानात. मी त्याच्या कुस्तीचा चाहता आहे. त्याच्या कुस्तीची शैली मला आवडते. तसा बाला हा उपेक्षित पैलवान होता, त्याचे फारसे गोडकौतुक झाले नाही, पण त्याने स्वतःच्या हिमतीवर यश मिळवून कुस्ती क्षेत्राला त्याची ताकद दाखवून दिली. एका पैलवानाच्या पोटी जन्मलेला हा पोरगा भविष्यात खूप मोठा होईल.’  अभिजित कटके आणि बाला रफीक शेख या दोघांचे वडील चांगले मित्र आहेत. कुस्ती हा या दोघांच्या मैत्रीचा समान धागा. या दोन मित्रांच्या मुलांची लढत बघण्यास सर्वच कुस्तीप्रेमी उत्सुक होते. बाला आपल्या बेधडक कुस्ती लढण्याच्या पद्धतीमुळे महाराष्ट्रभर ओळखला जाणारा पैलवान आहे. मैदानात लढायला लागला, की हारजीतची फिकीर न करता तो प्रतिस्पर्धी मल्लावर चालून जात आपल्या बलदंड कवेत घेऊन त्या मल्लाला अस्मान दाखवण्यात त्याचा हातखंडा आहे. सव्वाशे किलोचा, जवळपास सहा- सव्वा सहा फुटाचा हा धिप्पाड बाला पैलवान मैदानात येऊन उभा राहिला, की समोरच्या प्रतिस्पर्धी मल्लाला धडकी धडकी भरते.

बाला रफीक हा मातीच्या आखाड्यातल्या पारंगत असलेला पैलवान ! ‘हाप्ती’ या त्याचा हुकमी डाव आहे. हाप्ती डाव म्हणजे प्रतिस्पर्धाच्या काखेत दोन्ही हात घालून त्याच्या छातीवर हनुवटी ठेवून, प्रतिस्पर्धाल्या कमरेत वाकवून चितपट करणे. त्यांच्या या आवडत्या डावावर त्याने अनेक मल्लांना मैदानात धूळ चारली. मॅटवर लढण्याचे तंत्र त्याला तितके अवगत नव्हते. पण यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने अंतिम लढत मोठ्या हुशारीने, हिमतीने व ताकदीने लढत संधीच सोनं करत महाराष्ट्र केसरी बनला.

रामापूर या गावचे शिवाजी शिंदे यांचा मुलगा विजय हा गेल्या वर्षी अपघातात मरण पावला. विजय हा बालाचा अत्यंत जवळचा मित्र होता. सांगली जिल्हातील देवराष्ट्रच्या कुस्ती मैदानाला बाला आला होता. त्यावेळी शिवाजी शिंदे यांची आणि बालाची ओळख झालेली. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाल्यावर शिंदे यांनी अभिनंदन करायला बालाला फोन केला, त्यावेळी बाला म्हणाला, ‘मामा आज विजय हवा होता. माझ्या यशाचे जे काही वाटेकरी आहेत त्यात विजूचाही वाटा आहे.’ 

‘मला तुम्ही विजूच्याच ठिकाणी हायसा.’ विजूचे वडील बालाला म्हणाले.

हा पैलवान जितका शक्तिमान आहे तितका विनम्र आणि संवेदनशीलदेखील आहे. बळ आणि नम्रता एकत्र क्वचित आढळते. बळाचा वापर कुस्तीसाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी हा शेख घराण्याचा वारसा त्याच्या निमित्ताने सिद्ध झाला आहे. त्याने मिळवलेल यश हे सामान्य पैलवानांना प्रेरणा देणारे आहे.

‘पैलवान घडवणाऱ्या वस्तदाचा हा मुलगा आहे, ज्याने आयुष्यभर फक्त कुस्तीशिवाय काहीही केले नाही. स्वतःच्या संसारापेक्षा त्यांनी कुस्तीचाच संसार केला. गरिबी पाहिली, अनुभवली. पण गरिबीचा पराभव करत बाला घौडदौड करत राहिला. गरिबी आड आली नाही. गरिबीचे वास्तव स्वीकारून तो कुस्ती करत राहिला. गरिबी प्रगतीच्या आड येत नाही,’ हे त्यांनी सिद्ध केल्याचे पैलवान मतीन शेख म्हणाले.
छोट्याशा गावातून अगदी कोवळ्या वयातच कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीत बालाने पाय ठेवले. वस्ताद गणपतराव आंदळकरांच्या संस्कारात तो वाढत गेला. आणि महाराष्ट्रातला क्रमांक एकचा मल्ल बनला. आता महाराष्ट्र केसरी बनून आपल्या वाड वडिलांचा वारसा त्याने पुढे चालवला आहे. 

संबंधित बातम्या