अधिकस्य अधिकं फलम्‌

श्रीकांत नवरे
गुरुवार, 10 मे 2018

विशेष
 

‘अधिकस्य अधिकं फलम्‌’ या वाक्‍याचा अर्थ अधिक मासाचे अधिक फल असा नाही. याचे कारण अधिक मास हा ज्या कर्मांमध्ये कामना किंवा फलाकांक्षा आहे, अशा सर्व कर्मांना वर्ज्य म्हणून सांगितलेला आहे; पण माणसाला निरपेक्ष किंवा निष्काम कर्म करण्याची सवय लागावी किंवा त्या अवस्थेची अनुभूती घेता यावी, या हेतूने अधिकमासाची योजना केली असावी, असे वाटते. अधिकमासाला धर्मशास्त्रात ‘मल मास’ पुराणात ‘पुरुषोत्तम मास’ आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनात ‘धोंडामास’ असे संबोधिले आहे.

सूर्य व चंद्र ही कालमापन करण्याची नैसर्गिक साधने आहेत. केवळ सूर्यावरून जी कालगणना करतात, तिला सौरमान म्हणतात. व केवळ चंद्रावरून जी कालगणना करतात तिला चांद्रमान म्हणतात. अधिक मास धरण्याचे कारण असे आहे, की सामान्यतः चांद्र वर्षाचे दिवस ३५४ व सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात; म्हणजेच चांद्रमानाचे वर्ष व सौरमानाचे वर्ष या दोन्हींत अकरा दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे व चांद्र वर्षाचा आणि सौर वर्षाचा मेळ असावा, या हेतूने भारतीय ज्योतिर्विदांनी हा उपाय शोधून काढला. स्थूलमानाने बत्तीस महिने सोळा दिवस इतका काळ गेल्यानंतर (स्पष्टमानाने २७ ते ३५ महिन्यांनी) म्हणजे दर तिसऱ्या वर्षी अधिक मासाचा संभव होतो. अर्थात हे विधान संभवार्थ आहे,नियमार्थ नाही.

चैत्रापासून आश्‍विनापर्यंत जे सात महिने, त्यांपैकीच बहुतकरून एखादा अधिक मास येतो. क्वचित फाल्गुनदेखील येतो. पौष आणि माघ हे मात्र कधीच अधिक मास नसतात.

एकदा आलेला अधिक मास पुन्हा किती वर्षांनी येतो, याचीही मोजदाद प्राचीन ज्योतिर्विदांनी करून ठेवलेली आहे. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, आश्‍विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक मास होतो.

ज्या वर्षी क्षय मास ज्या चांद्रमासात सूर्याची दोन संक्रमणे होतात त्याला क्षय मास म्हणतात. (सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रांती किंवा संक्रमण म्हणतात.) होतो. त्यावर्षी क्षय मासाच्या पूर्वी एक व क्षय मासाच्या नंतर एक, असे दोन अधिक मास येतात. त्यांपैकी क्षय मासापूर्वी येणारा जो अधिक मास त्याला ‘संसर्प’ म्हणतात व मागाहून येणाऱ्या अधिक मासास ‘मलिम्लुच’ म्हणतात. क्षय मास एकदा येऊन गेला म्हणजे बहुतकरून १४१ वर्षांनी किंवा १९ वर्षांनी पुन्हा येतो. कार्तिक, मार्गशीर्ष व पौष या तीन महिन्यांपैकी एखादा क्षय मास असतो. दुसरा कोणताही महिना होत नाही.

हिंदू धर्मशास्त्राने चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंतच्या नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्मांचे विवेचन केले आहे; पण या बारा महिन्यांमध्ये जर अधिक मास आला, तर या महिन्यातील त्रिविध कर्मांची काय व्यवस्था लावायची, यासंबंधीही काही चर्चात्मक निष्कर्ष काढले गेलेले आहेत.

अधिक मासाला जे ‘मल मास’ नाव आहे, त्यावरून हा मास सर्व शुभ कार्यांना वर्ज्य आहे, हे स्पष्ट होते. ‘अनन्यगतिक’ म्हणजे जे केल्यावाचून गत्यंतर नाही. अशी नित्य, नैमित्तिक व काम्य कर्मे अधिक मासामध्ये करावीत. अग्नी नष्ट झाला असता अग्न्याधान, अनेक दिवस पूजेचा लोप झाल्याकारणाने करावी लागणारी पुनर्मूतिप्रतिष्ठा, अनन्यगतिक व ज्यांचा काल प्राप्त झाला आहे, असे गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंतचे संस्कार हे मल मासात देखील करावेत.

सगतिक म्हणजे जी कर्मे पुढे करता येतील किंवा अन्य वेळी करणे शक्‍य असेल, अशी नित्य, नैमित्तिक व काम्य कर्मे अधिक मासात करू नयेत. चौल, उपनयन (मुंज), विवाह, संन्यास, राज्याभिषेक, काम्यवृषोत्सर्ग, वास्तुकर्म ही सर्व कार्ये मल मासात वर्ज्य करावीत. पूर्वी न केलेल्या काम्य कर्मांचा आरंभ किंवा समाप्ती मल मासात करू नये.

नामकरण संस्कारामध्ये बालकाला जी चार नावे ठेवली जातात, त्यांमध्ये ‘मासनाम’ म्हणून एक नाव आहे. त्यात बारा महिन्यांची निरनिराळी बारा नावे आहेत. ज्या महिन्यात बालकाचा जन्म झाला असेल, त्या महिन्यातील नाव बालकाचे ठेवतात. अधिक महिन्यात जर बालकाचा जन्म झाला तर त्या बालकाचा जन्म मास त्या नावाचा शुद्ध मास असेल तोच धरतात. आणि त्या महिन्याचे मास नाम त्या बालकाचे ठरते. अधिक मासासाठी स्वतंत्र मास नाम नाही.

अधिक हा मल मास असला, तरी अधिक मासात जन्म येणे, हे अशुभ मानलेले नाही. कारण अधिक मासात जन्म झाला म्हणून कोणत्याही ग्रंथकाराने जननशांतीचे विधान सांगितलेले  दिसत नाही. अर्थात अधिक मासाची देवता विष्णू आहे आणि गर्भाधान, पुंसवन, विष्णुबली गोप्रसवशांती, प्रपौत्रमुखदर्शन यांसारखे अपत्य किंवा गर्भसंस्कार आहेत, त्यांचीही देवता विष्णूच आहे. 

अलीकडच्या काळात ‘कालसर्पशांती’ नावाची शांती विशेष प्रचारात आली आहे. अर्थात पूर्वी ती अस्तित्वात नव्हती अशातला भाग नाही; पण अनेक कारणांमुळे ती समाजापुढे येऊ न शकल्याने सामाजिक ओळखीपासून ती थोडी दूरच राहिली. या शांतीमध्ये बारा महिन्यांच्या बारा नागांचे पूजन व त्यांना उद्देशून हवन सांगितलेले आहे. यामध्ये जर अधिक मास आला असेल, तर ‘महानाग’ ही एक अधिक ‘नागदेवता’ घ्यावी असे सांगितलेले आहे.

मृत पितरांना उद्देशून पहिल्या वर्षी वर्षाची जी पंधरा मासिक श्राद्धे सांगितलेली आहेत, त्यामध्ये जर अधिक मास आला, तर त्यावेळी जे श्राद्ध येईल, त्याची द्विरावृत्ती करावी, म्हणजेच ते श्राद्ध दोनदा करावे.

चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांत किंवा अधिक मासात एखादी व्यक्ती मरण पावली, तर तिचे पहिले वर्षश्राद्ध आणि दर वर्षी होणारे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे केव्हा करावे यासंबंधी  ऊहापोह धर्मशास्त्रावरील ग्रंथात आढळतो. यातील प्रमाणभूत अशा ग्रंथांचा अभ्यास संशोधन, चिंतन करून इसवी सन १७९०-९१ मध्ये लिहिलेल्या आणि जनमानसात आकर्षण विषय ठरलेल्या ‘धर्मसिंधू’ या ग्रंथाचे रचनाकार बाबा पाध्ये यांनी या संबंधीचा काढलेला निष्कर्ष असा - चैत्रादिकांपैकी एखाद्या मल मासात मृत झालेल्याचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध केव्हा, जर तोच चैत्रादिकांपैकी मल मास आला असता मल मासातच करावे. त्याचप्रमाणे शुद्ध मासात मृत झालेल्यांचे सांवत्सरिक श्राद्ध शुद्ध मासातच करावे. मल मासात करू नये; परंतु, शुद्ध मासात मृत झालेल्यांचे प्रथम सांवत्सरिक श्राद्ध (प्रथम वर्ष मल मासात पुरे होत असेल तर) मल मासीच करावे. शुद्ध मासात करू नये. द्वितीय अगर पुढील सांवत्सरिक श्राद्धे मात्र शुद्ध मासात करावी.

अधिकमासास व्यक्तीच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात एक वेगळेच स्थान आहे. बृहन्नारदीय हे वैष्णवांचे उपपुराण असल्याने त्या पुराणात तसेच पद्मपुराणात पुरुषोत्तम माहात्म्य व मलमास माहात्म्य या प्रकरणात अधिक मासाचे महत्त्व वर्णिलेले आहे. या मासाची देवता ‘पुरुषोत्तम’ म्हणजे ‘विष्णू’ मानली असून, त्याच्या कृपेसाठी अधिक मासात करावयाची व्रते, उद्यापने, फलश्रुती या पुराणांमधून विस्ताराने सांगितलेली आहे.

अधिक मासात काही वैष्णवांकडे तीसही दिवस भागवताचे वाचन करण्याची पद्धत रूढ आहे. अर्थात हे वाचन स्वतःच्या पारमार्थिक उन्नतीसाठी किंवा आत्मिक विकासासाठी आहे. भागवतावर प्रवचन करून पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवणे हा हेतू त्यामध्ये नाही.

महाराष्ट्रात अधिक मासातले अनारशाचे वाण जावयाला देण्याची पद्धत आहे. कन्या व जामात यांना लक्ष्मीनारायण (विष्णू) स्वरूप मानलेले आहे. त्यातूनच ही पद्धत आली असावी. उपनयन (मुंज) आणि विवाह संस्कारात विवाहाच्या अगोदर जे देवदेवक ठेवतात, त्या देवदेवकाला अनारशांचा नैवेद्य दाखविण्याची कोकणात परंपरा आहे. या अनारशाला संस्कृतात ‘अपूप’ असे म्हणतात. त्याची व्युत्पत्ती म्हणजे ‘न पूयते, विशीर्यति’ जो शिळा होत नाही किंवा कुजत नाही. संसाराला देखील शिळेपण किंवा मालिन्य येऊ नये म्हणून दर तीन वर्षांनी केलेली ही नूतनीकरणाची सोय असावी. वैष्णव धर्माच्या काळात ‘अपूप’ हा वैष्णवांचा नैवेद्य ठरला. ‘अपूप’ हा वाटोळा असतो, म्हणून ते सूर्यप्रतीक ठरले आहे. सूर्य आणि विष्णू यांचा अभेद असल्याने वैष्णवांच्या पूजेत अपूपाला मान्यता मिळाली.

ज्योतिषशास्त्र आणि वेद या दोहोंच्या अभ्यासावर ज्यांचे सारखे प्रभुत्व आहे, अशा ज्योतिर्विद वेदाभ्यासकांनी निरनिराळ्या वेदांच्या संहिता आणि ब्राह्मणग्रंथ यांच्या आधारे अधिक मासासंबंधी काही ठाम निष्कर्ष मिळतात का, यासंबंधी विचार केलेला आहे.  सध्याच्या आधुनिक प्रगत विज्ञानाशी या विचारांचा समन्वय, सांगड, ताळमेळ घालता येईल का, हे पाहिले पाहिजे.

शब्दाचे भाषाशास्त्रज्ञ निरुक्तकार यास्काने ‘विष्णू’ हा शब्द ‘विष्‌’ सतत क्रियाशील असणे, अशा अर्थाने निर्मिती केली आहे (१२.१९). ज्या क्षेत्रात, व्यवसायात आपण कार्य करीत आहोत, त्यामध्ये दर्जा आणि गुणवत्ता याकडे लक्ष देऊन अधिकाधिक रचनात्मक आणि विधायक कार्य करीत सतत क्रियाशील रहाणे, हाच या अधिक मासाचा संदेश आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण विश्‍वाचे व्यवस्थापन ज्याच्याकडे आहे,अशा या पुरुषोत्तम विष्णूचा याच्यापेक्षा अधिक चांगला दुसरा संदेश तरी काय असणार?

संबंधित बातम्या