ऋतू हिरवा 

स्मिता दोडमिसे 
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

विशेष
‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ चे सूर कानावर पडले की मग तो हिरवागार श्रावण मनात रुंजी घालायला लागतो. धसमुसळ्या आषाढ सरी गेल्या की मग असा हलक्‍या सरींचा शिडकावा करणारा श्रावण सुरू होतो. हळुवारपणे अलगद मायेने कुरवाळणाऱ्या स्पर्शासारखा...

मिलनातुर आषाढाचे भोई, त्यांची कोसळण्याची घाई 
मिलनानंतरचा श्रावण रिमझिमत, हळुवार 
उबदार मायेची झालर अलगद पांघरत जाई

अशा या श्रावणात पावसाने सगळी धरित्री न्हायलेली असते. हिरवागार शालू पांघरून ती सजलेली असते. त्या हिरव्या वस्त्रांवर नाजुकशा, लहान- मोठ्या फुलांची अन्‌ रंगाची वेलबुटी असते. काय आहे नाही श्रावण म्हटला, की रंगाची अन्‌ आनंदाची आल्हाददायक झुळूक मनावर फिरते. श्रावणात येणारे हे सारे विलोभनीय. निसर्गाची, रंगउधळण, नावीन्याचा स्पर्श घेऊन नुकतेच आकाराला आलेले जीवन यांचा तो सोहळा असतो. परिसर कसा सुस्नात झालेला दिसतो. आजूबाजूचा प्रत्येक आकार, प्रत्येक वस्तू. झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी इतकेच काय आजूबाजूचे रस्ते, जमिनी, घरेही अगदी धुतल्यासारखे दिसतात. ऊन, पावसाचा खेळ सुरू होतो, मध्येच झिरझिरीत पावसाच्या रिमझिम सरी हलकेच शिडकावा करून जातात. मग अशा या स्वच्छ आणि आरस्पानी वातावरणात रंगबेरंगी निसर्ग ही तसाच रंगात न्हायलेला दिसतो. या रंग-गंधाच्या उधळणीत निसर्ग नाहतो तसेच ही आपल्या मानवनिर्मित जगातदेखील सृजनाची चाहूल घेऊन हा श्रावण येतो. चैतन्याचा खळाळता झरा म्हणजे हा श्रावण महिना. आसेतू हिमालय भारतखडात श्रावणा हा आल्हाददायक असा नसानसात चैतन्य जागवणारा महिना. शुद्ध हवा, हिरवी गार वनराई, पावसाच्या सरी..आहाहा अगदी मनभावन असा हा श्रावण. चैतन्याचे असे मळे फुलवत श्रावण चाहूल देतो तशी निर्मितीच्या या ऋतूमध्ये कवीच्या काव्यप्रतिभेलाही नवनवीन धुमारे फुटतात. किती तरी काव्य या श्रावणाचे वर्णन करणारे आहे. बहुदा कविमनाचा निर्मितीची चेतना हा श्रावण महिना देतो. किती ते लोकप्रिय आणि अजरामर काव्य श्रावणाचे वर्णन करणारे आहे. 

बालकवी म्हणतात, 
’श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, 
क्षणात येते सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.’ तर गदिमा त्याच्या प्रासादिक, रसाळ शैलीमध्ये म्हणतात 
श्रावण आला ग. वनी श्रावण आला 
दरवळे गंध मधुर ओला. 

कुसुमाग्रजांची प्रतिभा या श्रावणाचा निराळाच हसरा खेळकर आविष्कार दाखवते, ’नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण,’ असे म्हणवून. 

निसर्गाच्या या ऋतुचक्रात, या रंगगंधाच्या सोहळ्यात जसा कवीच्या प्रतिभेला बहर येतो तसा या वातावरणात प्रेमीजनांच्या प्रेमालाही एक प्रेमाची ओढ, हुरहूर जाणवते. आपले किती तरी हिंदी, मराठी चित्रपट गीते आठवून पहा. कालिदासाला जसे मेघदूत त्याच्या प्रियेसाठी स्फुरले तसे ’तुम्हे गीतोंमे ढा लुंगा, सावन को आने दो’ असे म्हणणारा प्रेमी असेल किंवा ’सावन के झुले पडे है. तुम चले आओ’ अशी आर्त विनवणी करणारी प्रेमिका असू दे.  असा हा श्रावण सगळ्या सृष्टीच्या बहराचा, चैतन्याने रसरसलेला काळ. निसर्गाचा जसा या रंग, गंधाचा उत्सव सुरू होतो तसे आपण ही कुठे मागे असतो. निसर्गाचा उत्सव जसा सुरू होतो तसे आपल्याही सण, उत्सवांची चाहूल या श्रावणाने लागते. आपले ही सण- उत्सव या श्रावणापासूनच सुरू होतात. एकतर श्रावण सुरू झाला, की वातावरणात बदल होतो, आहारात बदल होतो. आपल्या श्रावणात फार धार्मिक महत्त्व असल्याने तो शुभ महिना मानला जातो. किती सण येतात या श्रावणात. सण, व्रत वैकल्ये, उपास, हळदीकुंकू, सत्यनारायण पूजा असा सगळाच उत्सव सुरू होतो. बालकवी तर म्हणतात, ’देवदर्शना निघती ललना वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत.’ श्रावणातल्या या व्रतवैकल्याची सुरवात होते, श्रावणी सोमवार आणि शनिवारच्या उपवासाने. लहानपणी मला आठवते आम्ही वाट पहायचो या श्रावणी सोमवारची. कारण, घरात मोठ्या माणसांना उपवास, मग त्यामुळे आमचीही चंगळ, उपवासाच्या पदार्थांची रेलचेल. या उपवासात अजून एक आम्हा मुलींचा, स्त्रियांचा अधिक आवडता भाग म्हणजे मंगळागौर. एकतर सासुरवाशिणीला मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरी येता येते. मंगळागौर जागविणे, त्याचे खेळ, त्याची सगळी गंमत म्हणजे खरेतर आमचे आनंदपर्व. पूर्वी फार लहानपणी लग्न व्हायची मग हे सण, उत्सव म्हणजे मग माहेरपणाला यायला मिळायचे कारण. त्या निमित्ताने मग सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक यांची भेट व्हायची. झिम्मा, फुगड्या, मंगळागौरीचे गाणे, खेळ म्हणजे आनंदसोहळा. आता या उपवास, व्रत वैकल्ये, मंगळागौर या बरोबर श्रावणात सण ही असतात. पोळा, दहीहंडी, गोपाळकाला, नागपंचमी, राखीपौर्णिमा असतेच ना. शेतकरी श्रावणी पोळा साजरा करतात. पिके चांगली आलेली असतात. शेतकरीराजा सुखावलेला असतो. कष्टकरी बैलांना सजवून, मिरवून, त्यांचे लाड करून तो हे ऋण व्यक्त करतो. श्रावणात असे वेगवेगळे खाण्याची, खेळाची रेलचेल असते. पूर्वी नागपंचमी म्हणजे नागपूजनाबरोबरच मुलींना, बायकांना जास्त आकर्षण पण असायचे ते झोक्‍याचे. नागपंचमी म्हटले, की अजूनही डोळ्यापुढे ते झोके फेर धरतात. चढाओढीने चढवलेले झोके, ती गाणी सगळेच विलोभनीय. 

सण श्रावणाचा आला आठवे माहेरचा झुला कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया हा नागपंचमी आणि झोपळ्याचा सोहळा संपला की मग चाहूल लागते वर्षभर बहिणींनी वाट पाहिलेल्या राखी पौर्णिमेच्या सणाची. भावाला राखी बांधताना मग कुठली राखी घ्यायची इथपासून भावाला कुठली आवडेल याचा विचार करून आणलेले आणि मगमोठ्या मायेने त्याला बांधलेली राखी. त्या नंतर त्याने घेतली भेट. ती काय असेल याची उत्सुकता अजूनही मोठे झाले तरी संपत नाही. तो एक खरं छान क्षण असतो. लग्नानंतर मग राखी पौर्णिमेची वाट पहायला लागतात स्त्रिया. 
आला श्रावण महिना, 
आली राखीची पुनीव 
येईल भाऊराया, 
त्याला माझी गं जाणीव. 
हीच हुरहुर, हीच ओढ त्या राखी पौर्णिमेची असते. हे सगळे श्रावणाचे सोहळे पाहिले की धरती जशी हिरवीगार होते, फूल नी रंगाने नटते तसेच या सणाच्या, मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया, मुली, तरुणी नटतात हे आपल्याला जाणवते. लहान छोट्याशा पऱ्या ते नवोढा तरुणी, सलज्ज नवविवाहिता ते अगदी जाणत्या काकू, आजीपासून सगळ्याच या निमित्ताने नटतात, सजतात. निरनिराळी खरेदी केली जाते. दागिने, कपडे खरेदी हे तर श्रावणात होतेच. निमित्त वेगवेगळी असली तर ही खरेदी, मग नटणे, सजणे हे आलेच ओघाने. सगळा निसर्ग, सगळी मानवजात अशी सज्ज होते श्रावणासाठी. त्या श्रावणाचा मनमुराद आनंद घेत उत्सव साजरा करते. असा हा सखा श्रावण कितीतरी आठवांचे पडदे उलगडतो. 
’कळेलच नाही कधी ठाकला, दारी साजन, दारी श्रावण ’ हे मात्र खरे

फोटो फीचर

संबंधित बातम्या