एका अरण्याची गोष्ट

अनुज सुरेश खरे 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

विशेष
नष्ट होत चाललेल्या एका समृद्ध जंगलाच्या पुनरुज्जीवनाची यशोगाथा...

अखेर तो काळा दिवस उजाडला. एका अरण्याच्या भूतलावरचा अखेरचा नर वाघ गायब झाल्याची बातमी आली. हिऱ्यांच्या खाणी असलेल्या त्या जंगलातील खरा हिरा नाहीसा झाला याचं दुःख खरं होतं. भारतीय संस्कृतीत पूर्वीच्या प्रत्येक पिढीने जतन केलेल्या या अरण्याच्या ऱ्हासाची सुरवात झाली, की काय अशी भीती वाटायला लागली. नाहीतरी पुराणात सांगितले आहेच, 
‘निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्रयते वनम। 
 तस्माद्‌व्याघ्रो वनं रक्षेत व्याघ्रं च पालयेत।।’ 

अर्थात, जर वाघ नष्ट झाला तर जंगलही नाहीसे होईल आणि जर जंगल नाहीसे झाले तर वाघही नाश पावतील. म्हणजेच जंगल वाघांचे आणि पर्यायाने वाघ जंगलाचे रक्षण करतो. अशा या परिस्थितीत या अरण्याचा विनाश दिसायला लागला होता. पण.. यात ठामपणे उभा राहिला एक अत्यंत चांगला, कर्तव्यदक्ष मनुष्य... त्याने या जंगलाचं पानिपत होऊ दिलं नाही. या आमूलाग्र बदलाची कहाणी म्हणजे या अरण्याच्या म्हणजेच पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची यशोगाथा आहे. 

ही कहाणी ऐकायला थोडंसं इतिहासात डोकवावं लागेल. बुंदेलखंडात असलेल्या या भूमीवर पूर्वी खूप घनदाट अरण्य होतं. ही म्हणजे पार बुंदेला राजांच्या वेळची गोष्ट. पाठोपाठ इंग्रज आले आणि या ना त्या कारणाने समृद्ध खजिन्याची, तरुलतांची तोड सुरू झाली. झाडांबरोबरच हळूहळू इथले वाघही राजे, महाराजे, इंग्रज यांच्या शौकाची शिकार बनू लागले. पुढे भारत स्वतंत्र झाला. पण हे चित्र फार सुखकर झालं नाही. अखेर या जंगलाच्या संवर्धनासाठी वर्ष १९८१ मध्ये पन्ना राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. पुढे १९९४ मध्ये या जंगलाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. ही थोडी आशादायक गोष्ट होती. कारण व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जामुळे वाघांना आणि पर्यायाने इतर झाडं, पशू-पक्षी यांनाही आपोआप संरक्षण मिळतं. व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जामुळे माणसाच्या वावरावर बंधन येतात. कायदेकानून कडक लागू होतात आणि मानवी हस्तक्षेप कमी झाला, की आपोआपच जंगलाचं संवर्धन होतं. पण २००९ वर्ष उजाडेपर्यंत इथल्या वास्तव्याला असलेल्या सर्व वाघांचा निःपात झाला. आणि व्याघ्र प्रकल्प असूनही जंगलात एकही वाघ शिल्लक नाही अशी विदारक स्थिती निर्माण झाली. 

काही विवेकी, विचारी, अभ्यासक लोकांनी आपलं मत मांडलं, की जंगल वाचवायचं असेल तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे. आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम बनवण्यात आला. २००९ मध्ये बांधवगड आणि कान्हा या दोन व्याघ्र प्रकल्पातून २ वाघिणी पन्ना प्रकल्पात आणण्यात आल्या. बांधवगडमधून आणलेल्या वाघिणीला नाव देण्यात आलं T-1 आणि कान्हातून आणलेल्या वाघिणीला T-2. पण याच दरम्यान इथल्या धरेवर वावरणारा शेवटचा नर वाघही नाहीसा झाल्याने या वाघिणी साथीदाराशिवाय येथे टिकतील का? अशी शंका अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आली. आणि मग २००९ मध्ये ‘पेंच’ व्याघ्र प्रकल्पातून T-3 नावाचा नर वाघ इथे आणण्यात आला. पन्नाचं गतवैभव पुन्हा उभं करण्याच्या या कामी एका अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. आर. कृष्णमूर्ती.

या जंगलाच्या आणि विनाशाच्यामध्ये उभा राहिलेला हाच तो अधिकारी! या नवीन तीन व्याघ्ररत्नावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर नावाचे उपकरण बांधण्यात आले. यातून निघणारे सिग्नल्स एका अँटिनाद्वारे मिळवले जातात. यावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आर. श्रीनिवासन मूर्तींनी काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. आणि अखेर एक खडतर तपश्‍चर्या सुरू झाली. 

T-1 आणि T-2 यांनी पन्नाच्या भूमीचा त्यामानाने लवकर स्वीकार केला. इथे त्या मुक्तपणे वावरू लागल्या. प्रत्येक वाघाची स्वतःची हद्द ठरलेली असते. T-1 आणि T-2 यांनीही आपापल्या हद्दी निश्‍चित केल्या. पण T-3 च्या बाबतीत तसं झालं नाही. पन्ना व्याघ्र प्रकल्प ही त्याची जन्मभूमी नव्हती. कर्मभूमी तर त्याहून नव्हती. त्याचा जन्म पेंच व्याघ्र प्रकल्पातला. ऐन उमेदीच्या वयात पेंचमध्ये स्वतःचा दरारा निर्माण करण्यास सुरुवात केलेली असतानाच त्याला पन्नात आणण्यात आलं होतं. ‘जननी जन्मभूमीश्‍च स्वर्गादपी गरियसी।’ असं म्हणतात. त्यामुळे त्याला साहजिकच त्याच्या घराची ओढ होती. याच ओढीने त्याने एक दिवस पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा प्रदेश सोडला. आणि मग सर्वांचाच सुरू झाला एक मॅरेथॉन प्रवास. त्याच्यामागोमाग त्याच्यावर लक्ष ठेवायला नेमलेली टीम त्याचा मागोवा घेत निघाली. या त्याच्या घराच्या ओढीने त्याने पेंचच्या दिशेने थोडाथोडका नाही तर तब्बल ४४२ किलोमीटरचा प्रवास केला. पन्नापासून त्याचं अंतर जसं वाढत गेलं तसं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्याला शेवटी जेव्हा पुन्हा बेशुद्ध करून पन्ना व्याघ्र प्रकल्पात आणण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्याच्या तैनातीला तब्बल ७० कर्मचारी, ४ हत्ती आणि मूर्ती स्वतः असा फौजफाटा होता. आता मात्र पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा तो पन्नाचं जंगल सोडून जाऊ नये म्हणून T-3 ला या दोन्ही वाघीणीकडे आकृष्ट करण्यासाठी मूर्ती यांनी नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी T-3 ला सोडायच्या वेळी वाघिणीचे मूत्र आणि पाणी यांचा मिश्रणाचा ठिकठिकाणी शिडकावा केला. हा बाण बरोबर बसला. T-3 दोन्ही वाघीणींच्या शोधार्थ निघाला. अखेर दोन्ही वाघिणींनी त्याला जोडीदार म्हणून स्वीकारले. आणि सरतेशेवटी मूर्ती आणि त्यांच्या टीमच्या भगीरथ प्रयत्नांना यश आले.
सोळा एप्रिल २०१० हा तो दिवस. या दिवशी T-1 या वाघिणीने चार इवल्या पिल्लांना जन्म दिला. अशा प्रकारच्या वाघांच्या या पुन्हा परिचयाच्या यशस्वतीचेच पन्ना जगाच्या इतिहासात पहिलं उदाहरण आहे. यापाठोपाठ T-2 ने ऑक्‍टोबर २०१० मध्ये ४ पिलांना जन्म दिला. जंगलाच्या नियोजनाचे काम बघणारे सर्व कर्मचारी आणि मूर्ती या भगीरथांच्या वारसदारांनी या जंगलाच्या पुनर्जन्माचा नवा अध्यायच जणू लिहिला होता. तेव्हापासून १६ एप्रिल हा दिवस पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. २०११ हे वर्ष निसर्ग संवर्धनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे वर्ष आहे. या वर्षी T-4 या वाघिणीला कान्हामधून पन्ना व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. या पाच वर्षांच्या वाघीणीची आई तिच्या जन्मानंतर थोड्याच काळात मरण पावली. त्यामुळे T-4 आणि तिची अजून दोन भावंडं अनाथ झाली. कान्हा प्रशासनाने चार वर्षे एका मोठ्या बंदिस्त परिसरात ठेवून त्यांचं पालनपोषण केलं होतं. पन्नामध्ये आणल्यावर अर्थातच रेडिओ कॉलर लावून T-4 वर लक्ष ठेवणं सुरू झालं. या वाघिणीने या जंगलातील एका भागात स्वतःची हद्द स्थापन केली. आईने न शिकवता शिकार करायला स्वतःहून शिकणारी जगातील पहिली वाघीण असा गौरव तिने प्राप्त केला. तिच्या पावलावर पाऊल ठेवून T-5 या तिच्या बहिणीला पन्नात आणण्यात आले. तिनेही थोड्याच कालावधीत बहिणीचा कित्ता गिरवला. वर्ष २०१४ मध्ये T-6 या वाघीणीला पन्नामध्ये आणण्यात आले.

इथल्या अवनीतली वाढणाऱ्या या वाघांच्या बच्च्यांची नावे ठेवण्याची पद्धत मोठी अनोखी आहे. उदाहरण म्हणून आपण T-1 या वाघिणीला झालेल्या बछड्यांची नावं पाहू. या चार पिल्लांना नाव दिली होती p111, p112, p113 आणि p114 यातील p म्हणजे पन्ना. 111 मधील पहिला 1 म्हणजे आईचे T1 हे नाव दर्शवितो. दुसरा 1 म्हणजे पहिल्या वेळेचा बछडा हे दर्शवितो. आणि तिसरा 1 म्हणजे हा चार मधील बछड्याचे नाव दर्शवितो. आता T-1 ने पाचव्यांदा बच्चांना जन्म दिला आहे. त्यामुळे त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत p151 आणि p152. तसेच जन्मलेल्या वाघांना पुढे जाऊन बच्चे झाले तर त्यांना काय नावं दिली असतील? समजा p111 ला दोन बच्चे झाले असतील तर त्यांना नावं देण्यात आली p(111)11 आणि p(111)12. इतर व्याघ्र प्रकल्पापेक्षा अगदी निराळी अशी ही पद्धत आहे. अशा रीतीने इथल्या भूभागावर पुन्हा नंदनवन फुलायला लागलं. साहजिकच जंगल वाढविण्यात आणि त्यातील समतोल राखून ठेवण्यात मदत झाली. 
माझ्या मते वाघांना सोनम, माया, गब्बर, जय अशी नावं देणं हे त्या वाघाभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण करतं. हे असं करणं एकूणच वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून तारकही आहे आणि तितकंच मारकही आहे. जंगलातल्या प्रत्येक वाघाला सारखंच पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वेगळ्या नावांनी हे वाघ प्रसिद्ध झाले, की त्या भागातलं पर्यटन त्या वाघाभोवती केंद्रित होतं. आणि मग काही अतिउत्साही पर्यटकांमुळे या सर्वांचे दुष्पपरिणाम दिसायला लागतात. मला वाटतं पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने ही आगळीवेगळी पद्धत रूढ केली आणि इथे गाईड म्हणून काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक वाघाची ओळख याच नावाने लोकांना करून दिली. प्रशासन आणि गाईड या दोघांनीही हा एक आदर्शच बाकी व्याघ्र प्रकल्पासमोर ठेवला आहे. 

या जंगलांच्या संवर्धनाची यशस्वी रामकथा तुम्हाला सांगितली. आता पन्नाच्या भूभागांची आणि एकूणच वैशिष्ट्यांची माहिती तुम्हाला सांगावीच लागेल. पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा प्रदेश तीन टापूमध्ये विभागला आहे. हे तीन टापू उंचीनुसार कमी ते अधिक असे आहेत. सर्वांत खालचा म्हणजेच कमी उंचीचा टापू आहे ‘मडला’. त्यापेक्षा उंच टापू म्हणजे ‘हिनौता.’ आणि सर्वाधिक उंचीवरचा टापू आहे ‘पन्ना.’ या सर्व भागांवर तुम्हाला मोठी मैदानं, मोठ्या झाडांचा काही प्रदेश असे वैविध्यपूर्ण भाग दिसतील. या झाडांमध्ये सागाच्या झाडांची संख्या अधिक. पन्नाच्या भूभागातून कमनीय वळण घेत वाहणारी कर्णावती नदी ही म्हणजे इथे वास्तव्याला असणाऱ्या अनेक जिवांची जीवनवाहिनी. अत्यंत शुद्ध असणारा तिचा प्रवाह पन्नाच्या सौंदर्यात अधिकच भर पाडतो. पन्ना राष्ट्रीय उद्यान, गंगाऊ अभयारण्य आणि रणेह फॉल अभयारण्य यांच्या एकत्रीकरणातून पन्ना व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या सर्वांचा मिळून १५९७ चौ. कि.मी. आवाका. यातल्या ५७६ चौ.कि.मी. भाग कोअर आणि १०२१ चौ. कि.मी. भाग बफरमध्ये मोडतो. एकंदरच पन्नाचा भूभाग अनेक छोट्या मोठ्या नद्या, असंख्य छोटे जलप्रवाह, गवताळ भाग, डोंगररांगा आणि नैसर्गिकरीत्या बनलेल्या अजस्र घळी यांनी बनलेला आहे. इथल्या जैवविविधतेत भर टाकणाऱ्या ७ प्रकारच्या गिधाडांच्या वास्तव्याची ठिकाण असलेली ‘धुंधवा सेहा’ ही घळ म्हणजे इथल्या जंगलाच्या उत्पत्तीच्या वेळेस झालेल्या हालचालींचा उत्कृष्ट नमुना आहे. जंगलाच्या आश्रयाला असणारे विविध प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी तुम्हाला इथे सापडतील. अनेक प्रकारचे पाणपक्षी, माळरानावरचे पक्षी, शिकारी पक्षी, गिधाडासारखे जंगलाचे सफाई कामगार असणारे तरस ; तसेच बिबट्या, कोल्हा, खोकड, अस्वल, कुरंग वर्गातील प्राणी म्हणजेच चिंकारा, चौशिंगा, नीलगाय आणि सारंग वर्गातील प्राणी म्हणजेच चितळ, सांबर, भेकर हे म्हणजे या जंगलाच्या शिरपेचात खोवलेल्या माळेतील मोतीच जणू.

आज या लेखाच्या निमित्ताने मी मागच्या काही काळाचे सिंहावलोकन केले. आज सुमारे ३५ वाघ वास्तव्याला असणाऱ्या या जंगलाच्या संवर्धनाची यशस्वी कहाणी विस्ताराने सांगणे गरजेचे होते. ० ते ३५ हे अंतर गाठणार हा प्रवास अनेक लोकांच्या प्रयत्नांची परिसीमा गाठणारा होता. हा प्रवास उलगडताना मला शब्दांचे भान राहिलं असतं तरच नवल. या व्याघ्र प्रकल्पाच्या या टिकवल्या गेलेल्या वैभवावर आणखी एक धोका काळ बनून उभा आहे तो म्हणजे केन-बेतवा नदीजोड प्रकल्प. केन म्हणजे कर्णावती आणि बेतवा या दोन नद्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे संपूर्ण मडला गाव आणि जंगलाचा भूभाग पाण्याखाली जाणार आहे. मला खात्री आहे या धोक्‍याला परतावून लावण्याकरिता पुन्हा एखादा भगीरथ उभा राहील. आणि जंगलाच्या या सौंदर्याला अबाधित ठेवण्याचे किंबहुना ते वाढवण्याचे शिवधनुष्य तो लीलया पेलेल. 

आपल्याला लाभलेल्या समृद्ध निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी आपली आहे. माणूस हा भूतलावरचा सर्वांत हुशार प्राणी. आपली ही हुशारी आपण निसर्गाचं रक्षण करण्यासाठी वापरली तरच आपल्या पुढील पिढीचं अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा विनाश अटळ आहे. 
(शब्दांकन : ओंकार बापट)

फोटो फीचर

संबंधित बातम्या