मठ नसलेला ‘आचार्य’

विनायक लिमये
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

विशेष
 

‘‘आजपर्यंत व्यासपीठाच्या त्या बाजूला मी बसत आलो आहे, क्वचितच या बाजूला मी असतो. आज या बाजूला मी आहे, पण तुमच्या पेशन्सची मला कल्पना आहे. तुम्ही आता फार काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नाही, हे मला ठाऊक आहे, पण आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं काही गोष्टी सांगणं आवश्‍यक आहे. त्यासाठी मी तुमची १०-१५ मिनिटे घेतो,’’ असं सांगत व्यासपीठावरच्या त्या व्यक्तीने ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर यांच्या एका कवितेतल्या १० ते १२ ओळी म्हटल्या. त्या इतक्‍या चपखल होत्या, की त्यांची भावना नेमकेपणाने त्या व्यक्त करणाऱ्या होत्या, त्यातून त्यांनी सगळ्यांच्या हृदयाला हात घातला आणि समोर बसलेल्या हजार - एक लोकांचा ताबा घेतला. 

समोरचे श्रोतेही वेगळेच होते. विविध क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे, चांगले वाचक, चिकित्सक आणि निरनिराळ्या क्षेत्रांतील नामवंतांचा होता. ख्यातनाम शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अभिनेते दिलीप प्रभावळकर, संगणकतज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले अशी बुलंद मंडळी आणि नवनवे लेखक, प्रकाशक राज्यभरातून तिथं जमले होते. आणि या सगळ्यांना तिथं येण्यास भाग पाडण्याचं कारण म्हणजे सगळ्यांना खेचून घेणारे चुंबकीय व्यक्तिमत्त्व अर्थात दिलीप गणेश माजगावकर. मराठीतील ख्यातनाम अशा प्रकाशन संस्था राजहंस प्रकाशन आणि या संस्थेचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर म्हणजे ‘दिगमा’. वेळ होती त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीचा क्षण आणि तोही आपल्या दिग्गज भावाच्या कार्याची स्मृती जागवत साजरा होत होता तो क्षण. ‘श्रीगमा’ यांना ध्यास होता राष्ट्रउभारणीचा आणि ग्रामविकासाचा. त्या क्षेत्रात मोलाचं काम करणाऱ्या सात संस्थांना निधी अर्पण करून भावाच्या ऋणातून थोडाफार उतराई करता येईल का, ते अजमावण्याच्या प्रयत्नापूर्वीचा क्षण. एक प्रकारे भावाला वंदन आणि आपल्या स्नेहीजनांशी सुसंवाद साधण्याचा तो अपूर्व क्षण.

‘राजहंस प्रकाशन’ या नाममुद्रेलाच मराठी साहित्य विश्वात एक आगळं-वेगळं स्थान आहे. दिलीप माजगांवकर यांनी आपल्या अथक श्रमातून या संस्थेची नाममुद्रा एका शिखरावर नेऊन ठेवलीय. अनेक लेखकांना असं वाटत असतं की, आपलं एकतरी पुस्तक या संस्थेकडून प्रकाशित व्हावं. एका मोठ्या झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही, असा आपल्याकडे एक समज. पण या संस्थेच्या बाबतीत आणि या व्यक्तीच्या बाबतीत हा समज चुकीचा ठरला. ‘श्रीगमा’ आणि ‘ माणूस’ साप्ताहिक ही जितकी मोठी नावं आणि लखलखती व प्रतिभावंतांच्या जिव्हाळ्याची होती, तितकंच स्थान ‘दिगमा’ आणि राजहंस यांना लाभलं. आधीचा वारसा सांभाळत काळाबरोबर बदलत, गुणवत्तेची भर घालत या नाममुद्रा आज मराठी साहित्य विश्वात तळपत आहेत. आपल्या सत्कार सोहळ्यात ‘हे माझं यश नाही, हे यश माझ्या टीमचं आहे. माझे सगळे सहकारी आणि राजहंस परिवाराच्या वतीने माझा हा सत्कार आहे. मी त्या टीमचा प्रतिनिधी आहे इतकंच,’ असं अत्यंत विनम्रपणे दिलीप माजगांवकरांनी स्पष्ट केलं खरं. मात्र इथं आवर्जून हे सांगायला हवं की ही टीम अर्थात ‘राजहंस’चा हा जो सगळ्या सहकाऱ्यांचा संच आहे तो या कर्णधाराच्या तालमीत तयार झालाय. 

दिलीपरावांनी आपल्या संस्थेचा कधीही ‘मठ’ होऊ दिला नाही. आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांना ‘राजहंस’च्या मुशीत घडविण्याचा त्यांचा कृतीशिल प्रयत्न नेहमीच असतो. कृतीशिल अशासाठी की कधीही ते असं करा किंवा तसं करा, असा कसलाही उपदेश करीत नाहीत. तुमच्याशी संवाद साधता साधता तुमच्यात काही चांगल्या गुणांची पेरणी ते करीत असतात. सत्काराच्या सोहळ्याला जमलेल्या हजार-एक प्रेक्षकांमधल्या अनेकांना मनात असंच वाटतं होतं की आपला आणि दिलीपरावांचा चांगलाच स्नेह आहे.  

राजहंस परिवाराशी माझा संबंध येऊन दहा वर्षे झाली. या दहा वर्षांच्या काळात मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. पहिल्या दोन-चार भेटींमध्ये एकदा मला नियोजित वेळेपेक्षा उशीर होणार होता, म्हणून मी त्यांना फोन करून उशीर होतोय, असं कळविलं होतं. पुढच्या भेटीत त्यांनी मला तुम्ही उशीर होतोय हे कळवलंत आणि नेहमी वेळ पाळता, हे चांगलं आहे. असं सांगून वेळेचं महत्त्व आणि आपल्याला उशीर होणार असेल तर वेळेआधीच कळविणं किती महत्त्वाचं आहे, हे कुठलाही उपदेश न करता मनात ठसवलं होतं. त्यांच्याबरोबर जसजसा पत्रकार म्हणून संबंध येत गेला, तसतसं त्यांचं मोठेपण प्रत्येक भेटीत जास्तीत जास्त खोलवर रुजत गेलं. अनेक वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं यांचे संपादक दिलीपरावांच्या व्यक्तिगत मैत्रीच्या वर्तुळात आहेत. पण कोणाशीही बोलताना ते  ‘‘तुमचा साहेब माझ्या ओळखीचा आहे,’’ असं जाणवू देत नाहीत. प्रत्येक माणसाचा मान ठेऊन ते बोलत असतात. सकारात्मक ऊर्जेचा ते महास्त्रोत आहेत, असं मला नेहमी वाटतं. याचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आतापर्यंत आम्ही भेटलोय, त्या त्या वेळी चर्चेच्या पहिल्या दहा मिनिटांनंतर त्यांचा प्रश्न असतो की, नवीन काय वाचलंय ? किंवा मी चित्रपट, नाटक आवर्जून बघतो हे त्यांना माहीत असल्यामुळं नवीन काय पाहिलंय ? हाही प्रश्न त्यांच्याकडून येतो. उगीच विचारायचं म्हणून हा प्रश्न ते विचारत नाहीत, आपण काय वाचलंय, काय पाहिलंय हे त्यांना सांगताना आपल्या मनावर एक छोटंसं दडपण असतं की आपण त्यांना सांगतोय काय, आपण त्यांना व्यवस्थित सांगतोय ना, कारण एखादं नवं नाटक किंवा चित्रपट आपल्याआधी त्यांनी बघितलेला असतो. नवनवीन पुस्तकं किंवा दैनिकांच्या पुरवण्यांमधील लेख वाचून त्याच्यावरची त्यांची नेमकी कॉमेंट आपल्याला वेगळी नजर देत असते. 

समोरच्या माणसाचा आदर तर ते राखतातच, पण त्यांनी सुचविलेली चांगली गोष्ट आवर्जून स्वीकारतातही. त्यांच्याशी असलेल्या स्नेहाचा गैरफायदा घेत मी मोकळेपणानं त्यांच्याशी बोलत असतो, असंचं एकदा त्यांना मी एका माणसाकडून हे छान पुस्तक लिहून घेता येईल, असं सुचविलं होतं. त्याचं झालं होतं असं की, त्यांच्याकडं एका मोठ्या व्यक्तीच्या आत्मचरित्राचं काम चाललं होतं, त्या पुस्तकाची माहिती ते मला देत होते. त्या लेखकासंबंधी माझी काही ठाम मतं होती. मी फटकळपणानं माझं मत व्यक्त करून दिलीपरावांना म्हटलं, तुमचं याआधीचं ते अमुक अमुक बेस्टसेलर चरित्र आहे, त्यापेक्षा हे पुस्तक जास्त खपेल. दहा हजार प्रतींचा टप्पा हे पुस्तक सहज गाठेल, पण खरं सांगू का, तुम्ही आता ज्या क्षेत्रातील या नामवंत माणसाचं आत्मचरित्र प्रसिद्ध करत आहात तसेच मी सांगतो या माणसाचं आत्मचरित्र प्रकाशित करा ते पुस्तक झालं तर खूप छान होईल. खूप वेगळा आणि या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर काम केलेला असा तो मोठा माणूस आहे. खरंतर हे सांगत असताना ते करीत असलेल्या पुस्तकासंबंधी मी आगाऊपणानं बोलणं काही गरजेचं नव्हतं. माझी अक्कल पाजळण्याची ती वेळही नव्हती. पण त्यांनी उदारपणे त्याकडं दुर्लक्ष करून मी ज्या माणसाचं नांव सुचविलं होतं, त्या माणसाशी संपर्क साधून त्यांना पुस्तक लिहिण्याची विनंती केली आणि आमच्या पुढच्या भेटीत तुम्ही सुचविलेल्या माणसाशी संपर्क साधून पुस्तक लिहायला सांगितलं आहे, असंही मला सांगितलं. हे सांगायचा मुद्दा इतकाच की चांगली सूचना मग ती कोणीही करो, दिलीपरावांनी ती अंमलात आणली नाही, असं होत नाही. 

असाच दुसरा एक अनुभव त्यांच्या एका महत्त्वाकांक्षी पुस्तक प्रकल्पासंबंधी. आम्ही बोलत असताना तो प्रकल्प अनुवादाचा होता, साहित्य क्षेत्रातील घडामोडी जाणून घेणं माझा आवडीचा छंद असल्यानं मी त्यांना पटकन म्हटलं, की अहो सर, तुम्ही हे जे पुस्तक अनुवाद करताय त्या संस्थेनं त्यांची सगळी पुस्तकं अमूकअमूक एका प्रकाशकाला सर्व एकगठ्ठा पद्धतीनं दिली आहेत. तुमचं पुस्तक त्यात नक्की नसेल. पण एकदा तुम्ही खात्री करून घ्या. ते बोलणं संपलं, मी तिथून निघालो, दोन दिवसांनी दिलीपरावांचा मला फोन आला, जरा येऊन भेटा म्हटले. मी तातडीने गेलो त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर मला बाकरवडीचा एक छोटा पुडा खास बक्षीस म्हणून दिला. आणि मला म्हणाले, परवा तुम्ही सांगितलं, तुम्ही गेल्यावर मी फायली बघितल्या. आमच्या पुस्तकाच्या कराराचा ड्राफ्ट बघितला आणि तो रिन्यू करावयाचा आहे, हे लक्षात आलं. तातडीने तो रिन्यूदेखील केला. तुम्ही चांगली गोष्ट लक्षात आणून दिलीत, त्यासाठी हे बक्षीस. खरंतर ही गोष्ट इतकी क्षुल्लक आणि त्यांच्या कामाच्या रुटीनचा भाग अशी होती. त्यांच्यासारख्या नामवंत संस्थेशी झालेला करार रिन्यू होणं ही फार मोठी बाब नव्हती, ते आपोआप झालं असतं, पण समोरच्या माणसाची छोटी गोष्टही लक्षात ठेऊन त्याचं कौतुक करायचं, ही खूप मोठी बाब ते सहजपणे जपतात. 

व्यावसायिक नितीमत्ता ही त्यांच्याकडून कुणीही शिकावी, इतक्‍या पराकोटीने ते पाळतात. माझ्यावर विश्वास असल्यामुळे एकदा एका लेखकाबरोबर ते बोलत असताना त्यांनी मला तिथं बसू दिलं, त्या लेखकाचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यासाठी ते लेखक त्यांचं हस्तलिखित काही दिवसांपूर्वी दिलीपरावांकडं देऊन गेले होते. माजगांवकरांनी ते हस्तलिखित परत देण्यासाठी त्यांना बोलाविलेलं होतं. ते आत्मचरित्र ‘राजहंस’नं प्रकाशित करावं अशी त्या लेखकाची इच्छा होती.  पुस्तक उत्तम होतं, लिहिणारी व्यक्तिपण मोठी होती. (पुढं ते पुस्तक दुसऱ्या संस्थेकडून प्रसिद्ध झालं, मी ते वाचलंही खरंच छान होत ते म्हणून ते पुस्तक उत्तम असं म्हणतोय, हस्तलिखित मी वाचण्याचा संबंधच नव्हता.) पण दिलीपरावांनी ते पुस्तक नाकारलं. ते लेखक परत गेले, ते गेल्यानंतर मी दिलीपरावांना विचारलं, की तुम्ही का नकार दिलात. ते उत्तरले, ‘त्या पुस्तकात ज्या व्यक्तींविषयी तक्रार आहे, ज्या व्यक्तींवर आरोप आहेत, त्या व्यक्तीसंबंधी दोन पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आहेत. हे पुस्तक त्यांच्यादृष्टीनं (त्या लेखकाच्या बाजूने) कितीही खरं असलं आणि खपणारं असलं, तरी मी प्रकाशित करणं चुकीचं आहे. माझ्या आधीच्या दोन पुस्तकांशी ते विसंगत आणि माझ्या व्यवसायाशी प्रतारणा करणारं आहे.’’ खरंतर हा संवाद माझ्यावरच्या विश्वासापोटी मी कुठं सांगणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी केला होता. हा किस्सा मी इथं सांगण्याचं कारण म्हणजे त्या पुस्तकानं त्यांना खूप पैसे नक्की मिळवून दिले असते, संस्थेचं नावही चर्चेत आलं असतं, पण पैशांपेक्षा काही तत्त्वं कठोरपणे आणि त्याचा गाजावाजा न करता कशी पाळायची असतात, हे त्यांनी मला कृतीने दाखवून दिलं होतं, म्हणून इथे आवर्जून नमूद करतोय. 

एकदा साहित्य संमेलनाहून परतल्यावर त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना असं म्हटलं की, संमेलनाचा सर्व वृत्तांत सांगणारं, त्याची नोंद करणारं, दैनिकांमध्ये येणाऱ्या बातम्यांपेक्षा जास्तीतजास्त सखोल वेध घेणारं व त्या संमेलनाचं डॉक्‍युमेंटेशन व्हावं या हेतूनं एक पुस्तक मी लिहावं असा विचार करतोय. तुमचं मत काय ? तुमचा सल्ला काय राहील? त्यांनी पटकन सांगितलं, ‘नको लिहूस, वेगळं असं काय लिहिणार आहेस, वाहिन्या व वर्तमानपत्रं यातून संमेलन इतक्‍या पद्धतीनं कव्हर झालंय, की तुला खरंच असं वाटतंय की आपण वेगळं देऊ शकू?’ असाच दुसरा प्रसंग. मी एका पुरवणीत साहित्यिकांच्या मुलाखतींचं सदर चालवित होतो. त्याबद्दलचा फिडबॅक मला चांगला मिळत होता. दिलीपरावांशी एकदा असंच चर्चा करताना मी त्यांना म्हटलं, या सदराचं पुस्तक करावं, असं काही जणांनी सुचविलं, पुन्हा एकदा त्यांनी मला सांगितलं, ‘मुळीच करू नका, तुम्ही आत्ता ज्या मुलाखती देताय त्या छोट्या आहेत, त्या नव्यानं लिहून काढून, त्यात अधिक तपशील देऊन पुस्तकाच्या गरजा लक्षात घेऊन त्या अधिक सखोल लिहून, त्याच्यावर काम करून मग त्याच्या पुस्तकाचा विचार करा. आताच्या मुलाखतीत दैनिकाची, पुरवणीची गरज भागविणारा मजकूर आहे. तो छोटा आहे. पुस्तकासाठी वेगळं आणि सविस्तर लेखन हवं. जे वाचक आज तुम्हाला कौतुकाचा फिडबॅक देत आहेत, ते तुमची मुलाखत दैनिकाच्या बरोबर मिळणाऱ्या फुकट पुरवणीतून येत आहे, म्हणून वाचत आहेत. याचा अर्थ त्याचं पुस्तक झाल्यावर ते वाचक लगेच ते पुस्तक घेतील, असा भ्रम बाळगू नका. वास्तवाची जाणीव आणि लेखकाचं भारावलेपण नेमक्‍या शब्दात ते कसं दूर करतात, हे या दोन प्रसंगांतून मला तर जाणवलंच, पण ‘राजहंस’ची पुस्तकं वेगळी का असतात आणि त्यावर लेखकांना ते मेहनत घ्यायला का सांगतात, तेही लक्षात आलं.

खरं तर ‘राजहंस प्रकाशन’ही नाममुद्रा इतक्‍या ठळकपणे मराठी वाचकांच्या हृदयात ठसण्यासाठी त्यांनी ज्या वैविध्यपूर्ण पुस्तकांचं प्रकाशन केलंय, त्यातून ते साध्य झालं. मराठी साहित्य क्षेत्रातल्या कुठल्याही नामवंत संस्थाबद्दल काही लेखकांची नेहमीची एक तक्रार असते ती म्हणजे या संस्था पुस्तक प्रकाशित करायला फार वेळ घेतात, खूप वेळा पुन्हा पुन्हा लिहायला लावतात. पुस्तक यायला फार वेळ लावतात, पण ‘राजहंस’बद्दल असं कुणाला म्हणता येणार नाही. चांगलं पुस्तक, म्हणजे लेखनामध्येच जर ते उत्तमपणे उतरलं असेल तर ते किती झटकन येऊ शकतं, याचं मला माहीत असलेलं उदाहरण म्हणजे वसुंधरा काशिकर-भागवत हिने शेतकरी नेते शरद जोशी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं देता येईल. शरद जोशींच्या निधनानंतर अल्पावधीत आलेलं हे पुस्तक. हे पुस्तक जोशी याचं चरित्र नाही किंवा त्यांचा गौरवग्रंथही नाही. वसुंधरा काशिकर-भागवत हिला शरद जोशी यांचा जो सहवास लाभला, त्या सहवासातून तिनं जोशी यांचे जे मूल्यमापन केले, तिला ते जसे दिसले, तसे तिने मांडले आहेत. हे पुस्तक रुढ चरित्रग्रंथ किंवा एखाद्या नेत्याच्या सहवासातील व्यक्तीने लिहिलेला गोडगोड प्रसंगांचा लेखाजोखा नव्हे. त्या व्यक्तीचा तटस्थपणे घेतलेला वेध आणि त्याच्या गुणावगुणांचाही ताळेबंद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. मराठीत हा प्रकार वेगळा आहे. वेगळ्या प्रकाराचे जनकत्व या पुस्तकाकडे नक्की जाईल, भविष्यात अशा पद्धतीची पुस्तके येतील, पण ज्या त्वरेने दिलीपरावांनी ते पुस्तक केले, ते कौतुकास्पद आहे. लिहिणारी व्यक्ती कोणी नामवंत नाही. तिचं ते पहिलंच पुस्तक आहे. दिलीपरावांनी फक्त बघितला, तो त्या पुस्तकातला आशय आणि त्या लेखनातली ताकद. म्हणूनच मघाशी जे म्हटलं की त्यांनी आपल्या संस्थेचा मठ होऊ दिलेला नाही. मात्र, ‘राजहंस’ची म्हणून स्वतःची एक मूस तयार केली आहे. त्या मुशीतून जे पुस्तक बाहेर पडेल, ते चांगलेच असेल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. असं करताना अनेक संस्था स्वतःचीच एक पठडी तयार करतात. त्यात एक साचलेपण तयार होते, पण ‘राजहंस’चं तसं झालेलं नाही. राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनमध्ये जशी वेगवेगळ्या पद्धतीची हजारो दर्जेदार फुले सुखेनैवपणे डौलाने नांदत असतात, तशी ‘राजहंस’ची नाममुद्रा घेऊन अनेक विषयांवर विविध पुस्तके दर महिन्याला बाजारात येत असतात. मग त्यामध्ये दिलीप प्रभावळकरांसारखा अभिनेता चक्क बालकांसाठी लेखन करतो किंवा दिलीप कुलकर्णींसारखा कट्टर पर्यावरणवादी सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात पर्यावरण कसे जपता येईल, याचं मार्गदर्शन करणारं लेखन करतो. नवोन्मेषाचा हुंकार जितक्‍या सहजतेने या संस्थेकडून येतो तेव्हढाच एखाद्या महाज्ञानी माणसाचा मार्गदर्शक ग्रंथही तितक्‍याच तोलामोलाने वाचकांसमोर येतो. ही कसरत सोपी नाही, पण ती सोपी केली आहे ती दिलीप माजगांवकर या गुणवत्तेचा पराकोटीचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तीनं. हा आग्रह आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींच्या आचरणातही कसा उतरेल, याची काळजी सहजपणे ते घेतात आणि गुणवानांची टीम उभी करतात. आपल्या सत्कारा वेळी आपला बुलंद व्यक्तिमत्त्वाचा भाऊ म्हणजे श्रीगमा यांना आपल्या वाटचालीबद्दल श्रेय देताना आपल्यावर कुणाकुणाचे संस्कार झाले, याचं इतकं चपखल शब्दांत त्यांनी वर्णन केलं की, त्यातून ऐकणाऱ्याला त्यांची जडणघडण पटकन कळावी व त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजेच ‘राजहंस’ची कामगिरी अशी बहुपेडी आणि सगळ्यांना कवेत घेणारी कशी झाली आहे, हे कळणारी होती. 

पु. ल. देशपांडेंचा विनोद समजावून सांगणार ‘अमृतसिद्धी’ हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या दिगमांनी, पुलंच्या दातृत्वाचा वसा इतक्‍या सहजपणे घेतलाय की आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांनी ज्या सहजपणे सात संस्थांना निधी अर्पण केला, ते कुणालाही आदर्श ठरावं असं काम आहे. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘मी जो निधी दिलाय तो त्या संस्थांचं उत्तुंग काम आहे, आणि ती माझी जबाबदारी आहे म्हणून मी तो अर्पण केलाय. मी निधी दिला ही गोष्ट मीही विसरतोय व लवकरात लवकर तुम्हीही विसरावी, असं माझं तुम्हाला सांगणं आहे.’’ एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये, असा दानाचा एक संस्कार असतो तोच त्यांनी जपत असल्याचं दाखवून दिलं. सात संस्थांना मिळून ४५ लाखांचा निधी एखाद्या मराठी प्रकाशकानं देणं ही छोटी गोष्ट नाही, हे मराठी वाचकांनी मुद्दाम समजून घेतलं पाहिजे. अमृतमयी अशा या आचार्यांच्या सहवासात लाभणाऱ्या स्नेहतुषारातले काही तुषार माझ्यासारख्या छोट्या माणसावर पडले आणि या तुषारांनी आयुष्यात काही चांगल्या क्षणाची पालवी फुटावी यासारखं भाग्य नाही. साहित्याकडं आणि वाचनव्यवहाराकडं एकूणच कसं पाहावं, याचं ज्ञान म्हणण्यापेक्षा थोडीफार जी नजर त्यांच्यामुळं मिळाली, ते सारं त्यांच्या शिकवणुकीतूनच. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या