शून्यातून विश्‍व 

मकरंद केतकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

मागच्या लेखात आपण पाहिलं, की हे विश्व अजस्र आहे. त्यात अणूपासून आकाशगंगांपर्यंत विविध आकाराच्या, वस्तुमानाच्या गोष्टी आहेत. त्यात असंही म्हटलं होतं, की हे विश्व एका बिंदूतून जन्माला आलं. या संकल्पनेला ‘बिग बँग’ म्हणजे ‘महास्फोट’ असं म्हणतात. ही संज्ञा जरी १९४९ मध्ये प्रसिद्ध झाली असली, तरी त्याची सुरुवात एडविन हबल या अमेरिकन शास्त्रज्ञाच्या निरीक्षणातून झाली. आपल्याला विश्वरूप दर्शन घडवणाऱ्या हबल दुर्बिणीला ज्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ नाव दिलं आहे, तेच हे गुरुदेव! 

आपल्या टेलिस्कोपमधून अवकाशाचं निरीक्षण करत असताना त्यांच्या लक्षात आलं, की अंतराळातल्या आकाशगंगा एकमेकींपासून दूर जात आहेत. म्हणजेच विश्व प्रसरण पावत आहे. प्रसरण पावत आहे, याचा अर्थ हे सारं प्रकरण कुठूनतरी प्रचंड वेगानं आणि ताकदीनं फेकलं गेलं असणार. या संशोधनाचा मुख्य आधार होता प्रकाशलहरींमधला रंगबदल. याला रेडशिफ्ट स्पेक्ट्रम असं म्हणतात. म्हणजे, प्रकाश जितका दूर प्रवास करेल तेवढी त्याची तरंगलांबी बदलत जाते आणि तो रंगपिसाऱ्यातील शेवटच्या रंगात म्हणजे लाल रंगात परिवर्तित होतो. या रेडशिफ्ट स्पेक्ट्रमचा अभ्यास करून खगोलीय वस्तूंमधली अंतरं मोजली जातात. अशाप्रकारे एकूण ४६ आकाशगंगांचा अभ्यास करून १९२९ ला त्यांनी अवकाशाच्या विस्तारण्यावर संशोधन प्रबंध प्रसिद्ध केला. त्यांच्या प्रबंधाचं  सार होतं, ‘जेवढी एखादी आकाशगंगा आपल्यापासून दूर, तेवढा तिचा लांब जाण्याचा वेग जास्त.’  

‘शून्यातून विश्व उभं करणं’ अशी मराठीत म्हण आहे. या म्हणीला शब्दशः खरं ठरवणारी ही ‘बिग बँग थिअरी’ खूपच इंटरेस्टिंग आहे. अर्थात यामागं कुठल्याही कविकल्पना नाहीत तर रेडिओ लहरी, रेडशिफ्ट स्पेक्ट्रम आणि अशाच विविध शास्त्रशुद्ध अभ्यासपद्धतींचा हा निष्कर्ष आहे. आज आपण जे पाणी पितो, जी गाडी चालवतो, ज्या घरात राहतो आणि ज्या कागदावर छापलेला सकाळ साप्ताहिक तुम्ही वाचताय, या साऱ्या साऱ्या, तुमच्या माझ्यासकट प्रत्येक गोष्टींचं मूळ या ‘बिग बँग’मध्ये आहे. म्हणून आपण थोडक्यात विश्वाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ. 

शास्त्रज्ञांच्या अदमासानुसार साधारण १३.८ अब्ज वर्षांपूर्वी जेमतेम एखाद्या गोटीएवढ्या आकाराच्या बिंदूतून एक महाप्रचंड स्फोट होऊन या विश्वाची निर्मिती झाली. त्यापूर्वी काय होतं याचा शोध अजूनही सुरू आहे. हा स्फोट घडला सेकंदाच्या अब्ज अब्ज अब्जांशाव्या भागात. यावेळी तिथलं तापमान होतं साडेपाच कोटी अब्ज सेल्सिअस इतकं महाप्रचंड! प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स अशा मुक्त स्वरूपातील अणूरेणूंची मांदियाळी तिथं होती. या महास्फोटामुळं तिथं असलेल्या धुरळ्यातून प्रकाशकिरणंही बाहेर पडू शकली नव्हती. हळूहळू काही लाख वर्षांनंतर आज आपल्याला परिचित असलेली अणूकेंद्र आणि त्याभोवती फिरणारे अणूरेणू अशी रचना तयार झाली. मुक्त स्वरूपात फिरणारे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स एकत्र आले. ब्रह्मांडात पसरलेलं दाट धुकं विरू लागलं आणि प्रकाशाचा प्रवास सुरू झाला. हळूहळू हायड्रोजन आणि त्यातून हेलियम या वायूंची निर्मिती सुरू झाली. महास्फोटानंतर अंदाजे पन्नास कोटी वर्षांनंतर हे वायूमेघ एकमेकांकडं आकर्षित होऊन आदळू लागले. त्यांच्यातील अणूरेणूंच्या गुरुत्वाकर्षणामुळं ताऱ्यांची निर्मिती होऊ लागली. याबद्दल अधिक तपशीलवार मी पुढं सांगेनच. 

शास्त्रज्ञ असं सांगतात, की आपण जर त्यावेळी पृथ्वीवरून अवकाशाकडं पाहिलं असतं, तर आपल्याला आकाशात लक्षावधी फटाके फुटल्याप्रमाणं दृश्‍य दिसलं असतं. या ताऱ्यांच्याच गुरुत्वाकर्षणामधून पुढं आकाशगंगा तयार होऊ लागल्या. आपल्या सूर्यमालेचा जन्म या महास्फोटानंतर साधारण ९ अब्ज वर्षांनंतर झाला. आज तिचं वय, साधारण ४.८ अब्ज वर्षं आहे. ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू होताना त्यातून अनेक मूलभूत द्रव्यांची निर्मिती होते, जी वर म्हटल्याप्रमाणं, तुम्ही वाचत असलेल्या कागदामध्येही आहेत. त्याविषयीसुद्धा पुढं सांगेनच. 

पण जाता जाता एक गंमत सांगतो. तुम्ही रेडिओ चॅनेल बदलताना जी खरखर येते किंवा केबल कनेक्शन गेल्यावर टीव्हीवर ज्या मुंग्या दिसतात, त्यात विश्वाच्या निर्मितीच्या वेळी उत्पन्न झालेल्या रेडिओ लहरींचाही छोटासा हिस्सा असतो. भागके कहां जाओगे बचुआ!

संबंधित बातम्या