गूढ आणि अनाकलनीय 

मकरंद केतकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

हो कां महातेजाचिया महार्णवीं| 
बुडोनि गेली सृष्टी आवघी। 
कीं युगांतविजूंच्या पालवीं। झांकलें गगन|| 
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा। 
तोडोनि माचू बांधला अंतराळां। 
आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां। पाहवेना|| 

गीतेच्या विश्वरूप दर्शनाच्या योगाचं निरूपण करताना माऊली म्हणतात, 

‘असे वाटते जणू काय या तुझ्या महातेजाच्या समुद्रांत सर्व सृष्टी बुडून गेली आहे किंवा कल्पांतसमयीच्या विजांच्या वस्रांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे किंवा सर्व सृष्टीचा प्रलयकारी संहार करणाऱ्या ज्वाळा तोडून जणू काय आकाशात माळाच बांधल्या; म्हणूनच आता या माझ्या दिव्यदृष्टिनेही ते तेज पाहवत नाही.’ 

नवजात विश्वात तारामंडलांची निर्मिती होऊ लागल्यावर कदाचित आकाशात असेच दृश्‍य दिसले असेल. प्रचंड ऊर्जा. प्रचंड शक्ती. प्रचंड वेग... सारंच महाप्रचंड असलेलं हे ब्रह्मांड. विश्वनिर्मितीच्या तेरा अब्ज वर्षांनंतर आपल्याला आज आकाशात अनेक दृश्‍य गोष्टी दिसतात. परंतु याच्याच जोडीनं या विराट अंधाऱ्या पोकळीत दोन अदृश्‍य गोष्टी आहेत, त्या दिसत नाहीत. परंतु त्यांचे अस्तित्व जाणवते. यालाच शास्त्रज्ञांनी ‘डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी’ अशी नावं दिली आहेत. काय आहे हे डार्क मॅटर? आधी मॅटर म्हणजे काय ते पाहू. विश्वातले अणूरेणू, तारे, आकाशगंगा तसेच पृथ्वीवरील तमाम चराचर गोष्टी या सगळ्यांची एकत्रित गणना केली की जे जमते त्याला मॅटर म्हणतात. हे सारं जेमतेम पाच टक्के भरतं. मग बाकी काय? उरलेल्या ९५ टक्क्यांमध्ये २५ टक्के डार्क मॅटर आणि बाकी आहे ती डार्क एनर्जी. हे नेमकं काय आहे याची आज जरी निश्चित कल्पना नसली, तरी एक गोष्ट नक्की समजलीय, की दृश्‍यमान गोष्टींचं गुरुत्वाकर्षण या साऱ्या आकाशगंगा, ग्रहतारे वगैरेंना एकत्र बांधून ठेवायला पुरेसं नाही. ही अदृश्‍य ऊर्जा नसती तर अंतराळात अशा विशिष्ट रचना तयार होऊ शकल्या नसत्या. म्हणजेच त्यांच्या अवतीभवती असे काहीतरी आहे जे प्रकाशनिर्मिती करत नाही. पण त्याचं अस्तित्व आहे हे नक्की कारण ते त्याला भिडणाऱ्या प्रकाशाचं वक्रीकरण करतं. या अर्थानं ते कृष्णविवरही नाही. आजवर एवढंच कळलं आहे, की ही ‘कालाजादू’ गुरूत्वाकर्षणाला प्रतिसाद देते. कदाचित असंही असेल, की त्याची रचना आपल्या आकलणापलीकडं असल्यानं ते आपल्याला अपेक्षित असलेल्या रितीनं प्रकाश आणि मॅटरशी वागत नाही. 

डार्क एनर्जी ही अशीच एक गूढ गोष्ट आहे. आपण तिला पाहू शकत नाही, मोजू शकत नाही आणि तिची परीक्षाही घेऊ शकत नाही. पण तिच्या असण्याचे संकेत मिळतात. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणं हे विश्व प्रचंड वेगानं प्रसरण पावत आहे. त्याची गतिमानता अबाधित ठेवण्याला किंबहुना वाढवण्याला ही डार्क एनर्जी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांचा असा कयास आहे, की या ऊर्जेच्या निर्मितीमागं काही अनाकलनीय आभासी कण आहेत, ज्यांच्या लय-विलयातून या ऊर्जेची निर्मिती होत आहे. ‘मोअर स्पेस = मोअर एनर्जी’ या साध्या गणितावर अंतराळात नवीन जागा आणि नवीन ऊर्जेची निर्मिती होत असते. या ऊर्जेमुळं विश्व नुसतं वेगानंच नाही, तर प्रकाशापेक्षा अधिक वेगानं विस्तारत आहे. मजा म्हणजे, या धक्क्यातून मिळालेल्या वेगामुळं भविष्यात आपली आकाशगंगा इतर आकाशगंगांपासून इतकी दूर पोचली असेल, की यदाकदाचित आपण त्यावेळी अस्तित्वात असू तर आपल्याला आज दिसणारे तारे, इतर सूर्यमाला, आकाशगंगा, आपली लाडकी नक्षत्रं... थोडक्यात, दृश्‍य ब्रह्मांड नाहीसं होऊन त्यांची जागा नव्या गोष्टींनी घेतलेली असेल. हे सगळं वाचून तुम्हाला धक्का बसेल ना? धक्का बसल्यावर आपण ‘ब्रह्मांड आठवलं’ असं म्हणतो. धक्का आणि ब्रह्मांड ... किती खरं आहे नाही?

संबंधित बातम्या