घन घन माला अंतराळी दाटल्या 

मकरंद केतकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

परवाचीच गोष्ट आहे. माझ्या अत्यंत लाडक्या असलेल्या दांडेलीच्या जंगलात रात्री हिंडत होतो. हिंडता हिंडता एका मोकळ्या जागेत आलो आणि आकाशात पसरलेली चांदण्यांची चित्रकला आपलं विराट रूप दाखवू लागली. मृग नक्षत्र अगदी स्वच्छ दिसत होतं. व्याधानं त्या हरणाच्या पोटात मारलेला बाण (ओरायन बेल्ट), मी दुर्बिणीनं पाहात होतो. त्या बाणाच्या मधल्या ताऱ्याच्या थोडं खाली पाहिलं आणि दिसला ओरायन नेब्युला. अवकाशातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक. आपल्यापासून साधारण १५०० प्रकाशवर्षं (लाइट इयर्स) दूर असलेला अंतराळातला हा एक प्रचंड वायुमेघ आहे. नेब्युला म्हणजे काय ते जरा आधी पाहू. 

नेब्युला हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ ढग असा आहे. हायड्रोजन, हेलियम, धूळ आणि इतर विविध रासायनिक घटकांनी (केमिकल एलिमेंट्स) बनलेला हा एक प्रचंड मोठा घनाकार असतो. ढग म्हटला, की तो सूर्यालाही झाकू शकतो हे आपण पाहतो. मग शेकडो हजारो प्रकाशवर्षं दूर असूनही नेब्युला इतका मोठा दिसतो म्हणजे त्याचं घनत्व फार जास्त असेल असा समज होऊ शकतो. पण खरं तर तसं नाही. आपल्या पृथ्वीवरील वायुच्या घनतेशी जर त्याची तुलना केली, तर त्याचं गणित असं येतं - एक क्युबिक सेंटीमीटर या आकारात जर पृथ्वीवरील हवेचे ३०,०००,०००,०००,०००,०००,००० इतके कण मावत असतील; तर तेवढ्याच जागेत नेब्युलामधील वायुंचे फक्त ३०० कण बसतात, इतका तो विरळ असतो. अजून एक उदाहरण द्यायचं, तर समजा या महाप्रचंड नेब्युलामधून आपण फक्त पृथ्वीच्या आकाराचा भाग बाजूला काढून त्यातील वस्तुमानाचं वजन केलं तर ते जेमतेम काही किलोग्रॅम भरेल. पण इतकी विरलता असूनही याच नेब्युलामधून ताऱ्यांचा आणि ग्रहांचा जन्म होतो. 

नेब्युला चार प्रकारचे असतात. प्लॅनेटरी नेब्युला, एमिशन नेब्युला, रिफ्लेक्शन नेब्युला आणि डार्क नेब्युला. 

अ) प्लॅनेटरी नेब्युला : एखाद्या ताऱ्याच्या अंतानंतर जेव्हा महास्फोट होतो, तेव्हा त्याच्या धक्क्याच्या लहरींमुळं त्या ताऱ्याच्या बाह्य आवरणामधील वायू आणि धूळ अवकाशात फेकली जाऊन गोलाकार कडं बनतं. ते ग्रहासारखं गोल दिसतं म्हणून त्याला प्लॅनेटरी नेब्युला म्हणतात. 

ब) एमिशन नेब्युला : आकाशातील तप्त ताऱ्याजवळ वायुमेघ असेल तर त्यातील हायड्रोजनचे अणू त्या ताऱ्याच्या ऊर्जेनं भारीत होऊन प्रकाश फेकतात व तो मेघ चमकू लागतो. हे मेघ जास्त करून लाल रंगाचे दिसतात. 

क) रिफ्लेक्शन नेब्युला : जवळपासच्या तारा किंवा ताऱ्यांचा प्रकाश या वायुमेघातील धुळीवरून परावर्तित होतो व तो मेघ प्रकाशमान होतो. या परावर्तनाच्या गुणधर्मावरून याला रिफ्लेक्शन नेब्युला असं म्हटलं जातं. 

ड) डार्क नेब्युला : जेव्हा एखाद्या मेघामध्ये धुळीचं प्रमाण तुलनेनं खूपच जास्त असतं, तेव्हा तो मेघ त्याच्यामागून येणारा दृश्‍य प्रकाश शोषून घेतो. त्यामुळं टेलिस्कोपमधून पाहिल्यावर लक्षावधी ताऱ्यांमध्ये एक काळी पोकळी दिसते. 

याशिवाय अजून एक सुपरनोव्हा रेमनंट प्रकारचा नेब्युला असतो. सुपरनोव्हा म्हणजे जेव्हा अतिप्रचंड ताऱ्याचा स्फोट होतो, तेव्हा त्यातील धूळ आणि वायुचा साठा अवकाशात फेकला जातो. तशी ही प्रक्रिया प्लॅनेटरी नेब्युलासारखीच असली, तरी याचा आकार तुलनेनं महाप्रचंड असतो. तसंच या दोघांच्या रेडिओ रेडिएशनमध्येही फरक असतो. 

वर म्हटल्याप्रमाणं नेब्युला म्हणजे ताऱ्यांच्या जन्माचं गर्भगृह असतं. त्यातील वायुकणांचं गुरूत्वबल एकमेकांवर प्रभाव टाकत असतं. या एकमेकांबद्दलच्या ओढीतूनच पुढं तारे आणि ग्रह निर्माण होत जातात. कसे ते आपण पुढच्या लेखात बघूच. पण आपल्याला सहज दिसू शकणारा ओरायन नेब्युला कधी पाहाल, तर तुम्ही ताऱ्यांचं मॅटर्निटी होम पाहात आहात, हे नक्की ध्यानात असूद्या.

संबंधित बातम्या