विश्‍वरूप दर्शन 

मकरंद केतकर
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

नवीन वर्षाच्या नव्या लेखात आपणा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वर्षात आपण सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीबद्दल, तसंच तिच्या विविध रूपांबद्दल जाणून घेतलं.. या वर्षात आपण अजून भूतकाळात जाणार आहोत. 

पृथ्वीवर बहुतांश ठिकाणी सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो. आपल्या भारतभूबद्दल बोलायचं, तर वर्षातून ठराविक काळ उष्णता, थंडी तसंच काही ठिकाणी बर्फ तर बहुतांश ठिकाणी पाण्याचा वर्षाव आपण अनुभवतो. सुमारे साडेचार अब्जाहून अधिक वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा ग्रह पहिल्या क्षणापासूनच असा होता का? त्यावरील तापमान, पाणी, खंडांची स्थिती, पर्वतमालांची नक्षी आज दिसते तशीच होती का? या सगळ्यांचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असंच आहे. मग जगातील अनेक पुराणं आणि विविध धर्मग्रंथ सांगतात तसं हे सगळं देवानं निर्माण केलं का? माझं विज्ञाननिष्ठ मन सांगतं - नाही! मग या अफाट विश्वात आपल्याच ग्रहावर ही सारी ‘चंमत ग’ आढळते का? याचंही उत्तर - ‘अजून तरी माहीत नाही’ असंच आहे. मग या साऱ्या नकारार्थी उत्तरांशिवाय नेमकं पॉझिटिव्ह आहे तरी काय? तर याचं उत्तर आहे ‘आजवरच्या अफाट संशोधनातून उलगडलेलं सत्य हेच पॉझिटिव्ह आहे. हे सत्य काय आहे याचा उलगडा मी माझ्या अल्पमतीप्रमाणं पुढील लेखांमधून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उत्तर सापडत नाही म्हणून ते देवानं निर्माण केलं याच्या थोडं पलीकडं जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. 

आपण आज जे पाहतो, जे वापरतो, जे अनुभवतो त्या त्या साऱ्याचं मूळ या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात दडलेलं आहे. चुकत माकत, पडत धडपडत शास्त्रज्ञांनी चिकाटीनं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि श्रीकृष्णाच्या मुखात यशोदेला झालेल्या अफाट विश्वरूप दर्शनासारखंच अद्‍भुत दृश्‍य मानवजातीनं पाहिलं. आपल्या ग्रहाची निर्मिती जितकी इंटरेस्टिंग आहे, तितकीच इंटरेस्टिंग आहे या विश्वाची जन्मगाथा. यापुढील लेखांमधून आपण पाहणार आहोत अवकाशाची ओळख, त्याचा विस्तार, नेब्युले, त्यातून निर्माण होणारे तारे व ग्रह, अवकाशात पसरलेल्या विविध आकाशगंगा; तसंच आपली आकाशगंगा, आपल्या सूर्यमालेची निर्मिती, सूर्याची वैशिष्ट्यं, आपल्या चंद्राची निर्मिती व त्याची वैशिष्ट्यं, आपल्या ग्रहमालेतील इतर ग्रहांची वैशिष्ट्यं, पृथ्वी ग्रहाची निर्मिती, पृथ्वीनं पाहिलेल्या विविध फेजेस, खंडांची जडणघडण, विविध भूरूपांची ओळख, समुद्राची भरती ओहोटी, पृथ्वीवरच जीवसृष्टी का? आणि असेच अनेक अनवट विषय... 

‘देऊळ’ चित्रपटात एका दृश्‍यात, रात्री झालेल्या संवादात आकाशाकडे पाहात अण्णा केश्याला म्हणतात, ‘हे विश्व इतकं अफाट आहे, की तू आणि मी या विश्वाच्या पसाऱ्यात नुसता एक ठिपका आहोत. एक छोटासा ठिपका.’ 

...बरोबर आहे! आहोतच आपण ठिपका. पण मला खात्री आहे, की या लेखमालेतून मिळणाऱ्या ज्ञानाचे ठिपके जोडता जोडता तुम्हाला आपोआपच कळत जाईल, की तुम्ही आणि मी किती भाग्यवान आहोत. और ये अपुनकी गैरंटी है। तो करे शुरू? 
चला तर मग पुढच्या लेखापासून म्हणूया ‘श्री विश्वाय नम:।।’ 

संबंधित बातम्या