अवकाशाशी जवळीक 

मकरंद केतकर
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

वयाच्या पंधरा - सोळाव्या वर्षी मी पहिल्यांदा सह्याद्रीत भटकायला सुरुवात केली आणि मला दाराच्या चौकटीबाहेरचं अफाट विश्व गवसलं. सह्याद्रीच्या उंच उंच शिखरांवर वसलेल्या दुर्गांवर रात्री पाठ टेकल्यावर मला आभाळात पसरलेली अगणित ताऱ्यांची चमचमणारी रांगोळी पाहायला मिळू लागली. हे दृश्‍य मला शहरात कधीच दिसलं नव्हतं. संथपणे पश्चिमेला प्रवास करणाऱ्या या ताऱ्यांच्या काफिल्यामध्ये अचानक एखादा तारा घाईघाईत धाव घ्यायचा आणि दिसेनासा व्हायचा. कधी कधी तर असे अनेक तारे काळोखावर रेघोट्या मारून निघून जायचे. पुढं जेव्हा चांगला कॅमेरा घेऊन हिंडायला लागलो, तेव्हा मला चंद्राचं सखोल दर्शन घडलं आणि जागृत झालं कुतूहल! काय आहे हे सगळं? कुठून आलं हे सगळं आणि कुठं जाणार आहे हा पसारा? सहज म्हणून ज्ञान मिळवायला सुरुवात केली आणि सुरुवात झाली विश्वरूप दर्शनाची. 

खरंच! काय आहे अवकाश? अवकाश म्हणजे एक अथांग पोकळी, ज्यात आहेत अब्जावधी तारे, कदाचित तितकेच ग्रह आणि त्यांचे उपग्रह, जे जे पकडीत येईल ते ते गिळंकृत करणारी कृष्णविवरं, भल्यामोठ्या प्रदक्षिणा घालणारे धूमकेतू, गुरुत्वाकर्षण, ऊर्जा व उष्णता, काळोख आणि उजेड, या साऱ्यांना जन्म देणारे अजस्र वायूमेघ म्हणजेच नेब्युले आणि हे सगळं सामावून घेणाऱ्या अजस्र अजस्र अशा लक्षावधी गॅलेक्सीज. उत्पत्ती, लय आणि विलय या क्रमाची ही एक अद्‍भुत केमिस्ट्री आहे. या केमिस्ट्रीचीच करामत म्हणजे आपल्या अवाढव्य आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात असलेली आपली कणभर आकाराची सूर्यमाला, त्यातली आपली चिंटुकली पृथ्वी आणि त्यातले आपण सारे जमिनीवरचे तारे.

तर खगोलशास्त्रज्ञ त्यांच्या अभ्यासाअंती अशा निष्कर्षास आले आहेत, की या विश्वाचं वय साडेतेरा अब्ज वर्षांपेक्षा अधिक आहे. हे विश्व एका बिंदूतून स्फोट होऊन निर्माण झालं आणि प्रचंड वेगानं पसरत आहे. आपल्या आकाशगंगेपासून सर्वांत जवळ असलेली अँड्रोमिडा नावाची दुसरी एक आकाशगंगा आपल्या आकाशगंगेच्या दिशेनं प्रवास करत आहे. तिचा वेग आहे ताशी चार लाख किलोमीटर आणि या वेगानं तिला आपल्या आकाशगंगेला धडक द्यायला अजून साधारण चार अब्ज वर्षं लागतील. आता तुम्हाला अंदाज आला असेल, की या विश्वातली अंतरं, वेग आणि इतर सगळ्याच गोष्टी किती महाप्रचंड असू शकतात. इथून पुढं आपण अवकाशातील अनेक वस्तूंची ओळख करून घेणार आहोत, ज्यात आपल्या पृथ्वीचाही समावेश असेलच. पण त्याआधी आवश्यक आहे या शास्त्राची परिभाषा जाणून घेणं. यापैकी एक सर्वांत महत्त्वाची संज्ञा म्हणजे प्रकाशवर्ष. अवकाशातील अंतरं ‘लाइट इयर्स’ म्हणजेच प्रकाशवर्ष या गणितात मोजली जातात. मानवाला गवसलेली सर्वांत वेगवान गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे प्रकाश. प्रकाशाचा वेग आहे जवळजवळ तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद. या वेगानं प्रकाश एका वर्षात जितकं अंतर पार करेल, त्याला प्रकाशवर्ष म्हणतात. हे अंतर आहे पंच्याण्णव दशअब्ज किलोमीटर! पृथ्वीपासून सूर्य सोडून सर्वांत जवळ असलेला ‘प्रॉक्सिमा सेंच्युरी’ नावाचा तारा फक्त ४.२५ प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे प्रकाशाच्या वेगानं आपण जर त्याच्या दिशेनं निघालो, तर आपल्याला तिथं पोचायला सव्वाचार वर्षं लागतील. पण अजून तरी आपण या वेगापासून खूप लांब आहोत. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’नं ‘पार्कर सोलार प्रोब’ नावाचं एका कारएवढ्या आकाराचं यंत्र सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, ऑगस्ट २०१८ मध्ये त्याच्या दिशेनं सोडलं आहे. या यानाच्या माध्यमातून मानवानं साध्य केलेला सर्वांत जास्त वेग आहे साधारण ताशी साडेसहा लाख किलोमीटर. 

या आणि अशाच विविध परिभाषांबद्दल थोडं अधिक पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या