ताऱ्यांचं महत्त्व

मकरंद केतकर
सोमवार, 2 मार्च 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

मागच्या लेखात आपण हर्ट्झस्प्रंग-रसेल डायग्रामच्या तक्त्यावर ताऱ्यांचं आकारानुसार केलेलं वर्गीकरण पाहिलं. हे वर्गीकरण ‘मेन सिक्वेन्स स्टार्स’चं होतं. म्हणजे ज्यांच्या अंतरंगात हायड्रोजनच्या फ्युजनची नैसर्गिक प्रक्रिया सुरू आहे असे तारे. हे तारे O, B, A, F, G, K, M या क्रमात अरेंज केलेले आहेत. आता बघू या ताऱ्यांव्यतिरिक्त कुठले तारे आहेत. 

रेड सुपरजायंट : हे तारे बऱ्यापैकी जुने तारे असतात. यांच्या कोअरमधील हायड्रोजनचे हेलियममध्ये होणारे फ्युजन संपत आलेले असते व त्यामुळे ताऱ्याच्या गर्भातील ताकद कमी होऊन उरला सुरला हायड्रोजन ताऱ्याच्या पृष्ठभागाकडं सरकून ताऱ्याचा आकार वाढू लागतो. सहसा हा आकार मूळ आकाराच्या १०० पट अधिक असतो. पण गंमत म्हणजे, पृष्ठभागाचं तापमान अगदीच कमी असतं. जेमतेम काही हजार अंश सेल्सियस! हा तारा लाल रंगाचा दिसतो म्हणून याला ‘रेड जायंट’ म्हणतात. सोपं उदाहरण द्यायचं, तर लाकूड पेटलेलं असताना त्याची उष्णता जास्त असते. त्यातून प्रकाशही जास्त बाहेर पडतो. पण हेच जेव्हा त्याचा निखारा होतो तेव्हा प्रकाश व उष्णता दोन्ही कमी होते. या ताऱ्यांचा स्फोट होतो तेव्हा प्लॅनेटरी नेब्युला तयार होतो. 

ब्ल्यू सुपरजायंट : रेड जायंटनंतर सुरू होते ब्ल्यू सुपरजायंट फेज. रेड सुपरजायंट फेजमध्ये ताऱ्याच्या कोअरमध्ये हायड्रोजनच्या फ्युजनमधून हेलियम तयार होत जातो. सरफेसवर आलेला हायड्रोजन ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रातून बाहेर निघून जातो व हळूहळू फुगलेल्या ताऱ्याचा पृष्ठभाग आक्रसत जातो. आक्रसणाऱ्या ताऱ्याच्या पृष्ठभागामुळं कोअरमध्ये अधिक दाब निर्माण होऊन तापमान वाढू लागतं व हेलियमचं फ्युजन सुरू होतं. हेलियमचं इंधन संपत आल्यावर तारा परत फुगू लागतो आणि निळसर प्रकाश त्यातून बाहेर पडू लागतो. क्वचित त्यांचा आकार आपल्या आख्ख्या सूर्यमालेपेक्षाही मोठा असू शकतो. या ताऱ्यांचा स्फोट ‘सुपरनोव्हा’ या नावानं ओळखला जातो. 

व्हाईट ड्वार्फ : सूर्यापेक्षा लहान आकाराचा तारा, इंधन संपतं तेव्हा व्हाईट ड्वार्फमध्ये रूपांतरीत होतो. त्याच्या पृष्ठभागावरील हायड्रोजन अंतराळात निघून जातो. हेलियमचंही फ्युजन होऊन हेलियमचं रूपांतर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये होतं. परंतु, ऑक्सिजनचं रूपांतर पुढच्या मूलद्रव्यांमध्ये करण्याची शक्ती त्याच्यात नसते. त्यामुळं मागं उरतो पांढरा प्रकाश फेकणारा लहानसा तप्त गोळा. हळूहळू त्याची सर्व ऊर्जा संपून जाते व तो अंतराळातल्या काळोखाच्या पडद्यामागं लुप्त होऊन जातो. 

ताऱ्यांमध्ये असलेल्या इंधनावरून ते कुठल्या फेजमध्ये जाणार किंवा जाणार नाही हे ठरतं. वर दिलेल्या प्रकारांशिवाय ताऱ्यांचे रेड ड्वार्फ, ब्राऊन ड्वार्फ, ऑरेंज ड्वार्फ अशा अनेक प्रकारांमध्ये, त्यांच्यामधल्या फ्युजन प्रोसेस आणि मूलद्रव्यांच्या रूपांतरणावरून वर्गीकरण केलं आहे. 

महाप्रचंड तारे जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा त्यांचा महाविस्फोट होतो, ज्याला ‘सुपरनोव्हा’ असं म्हटलं जातं. यात ताऱ्यानं निर्माण केलेली मूलद्रव्यं अवकाशात भिरकावली जातात. यानंतर तारा एकतर कृष्णविवरात रूपांतरित होतो किंवा ताऱ्याचं केंद्र अमर्याद दाबामुळं त्याचे अणू अशक्य ताकदीनं एकत्र चिकटून अगदी चिमुकला न्युट्रॉन स्टार बनून शिल्लक राहतं. या दोन्हीची ग्रॅव्हिटी महाप्रचंड असते. म्हणजे आपल्या सूर्याला जर तुम्ही पुणे शहराच्या आकाराच्या खोक्यात कोंबून बसवलं, तर तो खोका जितका जड होईल तितकी प्रचंड. याच महाप्रचंड ग्रॅव्हिटीमुळं ताऱ्यामधून निघणारे रेडिएशन वक्र होते व खगोलशास्त्रज्ञांना ताऱ्याची चक्क मागची बाजूही पाहता येते. 

या सगळ्याला आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं फार फार महत्त्व आहे. कारण आपण वापरत असलेल्या अनेक गोष्टी बनवण्यासाठी लागणारं मटेरियल याच ‘सुपरनोव्हा’मधून पृथ्वीमध्ये सामावलं आहे. एवढंच काय, अगदी आपण श्वास घेत असलेला ऑक्सिजनसुद्धा! हायड्रोजन - हेलियम - कार्बन - ऑक्सिजन - 
निऑन - मॅग्नेशियम - सिलीकॉन आणि सरतेशेवटी आयर्न म्हणजे लोखंड अशी ही साखळी आहे. तेव्हा यापुढं जेव्हा जेव्हा अवकाशातले तारे पाहाल, तेव्हा त्यांना धन्यवाद म्हणायला विसरू नका.

संबंधित बातम्या