अगडबंब आकाशगंगा 

मकरंद केतकर
सोमवार, 9 मार्च 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

गाववस्तीपासून दूर कुठंतरी डोंगरातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात आकाशाकडं कॅमेरा लावून बसलेली मंडळी पाहिली की समजायचं ते ‘स्टार ट्रेल’ किंवा ‘मिल्की वे’चे फोटो काढतायत. अंधाराच्या रंगमंचावर आपलं अस्तित्व दाखवत सरकत जाणारा पांढरा पट्टा म्हणजे ‘मिल्की वे’चा अर्थात आपल्या अजस्र आकाशगंगेचा एक फारच छोटा भाग आहे. 

मागच्या काही लेखांमधून आपण ताऱ्यांच्या जन्म तसेच मृत्यूबद्दल माहिती जाणून घेतली. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसणारे जवळजवळ सगळेच तारे हे आपल्या आकाशगंगेचा भाग आहेत. ताऱ्यांचा आकार, तसंच त्यातील अंतरं पाहिली तर आपल्याला स्वतःची कीव येण्याबरोबर अचंबाही वाटू लागतो. मग हे सगळं सामावून घेणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या भव्यतेबद्दल काय बोलावं? आणि अशा अब्जावधी आकाशगंगा सामावणारं हे विश्व तर शब्दातीत! आपल्या सूर्यमालेबद्दल जाणून घेण्यापूर्वी थोडंसं आपल्या आकाशगंगेबद्दल जाणूया. 

अजस्र वायुमेघ, १०० अब्जांहून अधिक तारे आणि अब्जावधी ग्रह यांना घेऊन वर्तुळाकार फिरणारी वस्तू म्हणजे आपली आकाशगंगा. केंद्रापासून बाहेर निघालेले वक्र हात आणि त्यांच्यावर, तसंच त्यांच्यामध्ये असणारे तारे व ग्रह असं तिचं स्वरूप आहे. दिवाळीत जमिनीवर फिरणारं भुईचक्र जसं प्रकाशाच्या वक्र रेषा काढताना दिसतं तसं काहीसं. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साधारण एक लाख प्रकाश वर्ष एवढं अंतर असणाऱ्या या आकाशगंगेच्या एका हातावर आपली सूर्यमाला वसलेली आहे. ओंजळभर वाळूतला वाळूचा जणू एक कण. आकाशगंगेच्या मध्यापासून आपल्या सूर्यमालेपर्यंतचं अंतर आहे २६,००० प्रकाश वर्षं. आज पहिल्यांदाच या लेखमालेशी ओळख झालेल्यांसाठी सांगतो, प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर आहे. या वेगानं तो एका वर्षात जितकं अंतर पार करेल, ते म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 

आपली पृथ्वी जशी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते, तशीच आपली आख्खी सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरते. हा वेग आहे जवळजवळ ताशी आठ लाख किलोमीटर.. आणि या वेगानं आकाशगंगेची एक परिक्रमा पूर्ण करून त्याच जागी यायला सूर्यमालेला २५० दशलक्ष वर्षं लागतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, तर आपली पृथ्वी आज जिथं आहे त्याचजागी फिरून परत येण्याच्या कालखंडात पृथ्वीवर भूखंड तयार होत होते, एका विशिष्ट प्रकारच्या जिवांचा कालखंड संपत होता, डायनासोर्सची उत्क्रांती नुकतीच सुरू झाली होती आणि सस्तन प्राण्यांचा पत्ताही नव्हता. 

आकाशगंगेच्या मध्यभागी एक प्रचंड मोठं कृष्णविवर आहे. धूळ आणि ढगांच्या आवरणामुळं शास्त्रज्ञ अजून तरी ते थेट पाहू शकले नाहीयेत; पण त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं बाधीत होणाऱ्या काही विशिष्ट ताऱ्यांच्या मार्गक्रमणेच्या पॅटर्नवरून त्यांनी त्याच्या अस्तित्वाचा आणि स्थानाचा अंदाज लावला आहे. त्या कृष्णविवराचा आकार आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा ४ कोटी पट अधिक आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते गडप करून टाकत असतं. मागं एका लेखात आपण पाहिलं, की गुरुत्वाकर्षणाचा खेळ दाखवणारं डार्क मॅटर फार मोठ्या प्रमाणात अवकाशाला व्यापून आहे. ते आपल्या आकाशगंगेतही आहे आणि म्हणूनच अब्जावधी तारे एका लयीत आकाशगंगेच्या केंद्राभोवती वर्तुळाकृती परिक्रमा करीत असतात. दिगंतात प्रवास करताना या आकाशगंगा जशा एकमेकींना धडका देतात, तशाच त्या इतर छोट्या आकाशगंगांना फस्तही करतात. आपल्या आकाशगंगेच्याही काठावर तिनं फस्त केलेल्या इतर छोट्या आकाशगंगांमधील तारकाप्रवाहांचे अवशेष शास्त्रज्ञांना सापडले आहेत. 

अगदी अलीकडेच लागलेल्या एका शोधानुसार, आकाशगंगेच्या केंद्रामधून वायूचे ढग बाहेर पडताना आढळले आहेत. त्यांचा वेग ताशी दहा लाख किलोमीटरहून अधिक आहे. हेच आहेत ते नेब्युले किंवा वायुमेघ; ज्यांच्यामधून चमचमणारे तारे आणि त्यांच्याभोवती परिक्रमा करणारे ग्रह तयार होतात. हे केवढं फॅसिनेटींग आहे ना? अब्जावधी वर्षांपूर्वी कदाचित असाच कुठलातरी एक नेब्युला इतका ध्यानस्थ झाला, की त्याच्या साऱ्या शक्ती जागृत होऊन विश्वातला आपला पत्ता असणारी सूर्यमाला जन्माला आली. आपल्या सूर्यमालेशी अधिक ‘हाय’ ‘हॅलो’ला आपण पुढच्या लेखापासून सुरुवात करू.

संबंधित बातम्या