सूर्यमालेचा जन्म

मकरंद केतकर
सोमवार, 16 मार्च 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

आकाशगंगेच्या एका हातावर वसलेल्या आपल्या सूर्यमालेचा जन्म एका महाप्रचंड नेब्युलामधून झाला. पृथ्वी तसंच इतर ग्रहांवर असलेली मूलद्रव्यं पाहता, शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे, की बहुधा त्यावेळेस आपल्या सूर्यमालेला जन्म देणाऱ्‍या नेब्युलाला गती देण्याचं काम जवळपास झालेल्या एखाद्या सुपरनोव्हानं केलं असावं. कुठलाही तारा मरणपंथाला लागला, की त्यातील मूळच्या हायड्रोजनचं टप्प्याटप्यानं हेलियम ते लोखंड असं रूपांतर होत जातं, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. ताऱ्‍याच्या केंद्रात लोखंड निर्माण झाल्यावर त्याचं रूपांतर पुढं कशातच होऊ शकत नाही व ताऱ्‍याचं केंद्र अस्थिर होतं. अशा केंद्र अस्थिर झालेल्या ताऱ्‍याच्या मृत्यूच्यावेळी प्रचंड मोठा स्फोट होऊन केंद्रातून अनेक मूलद्रव्यं अवकाशात भिरकावली जातात. ही मूलद्रव्यं या सुपरनोव्हामधून आपल्या सूर्यमालेला जन्म देणाऱ्‍या नेब्युलामध्ये मिसळली असावीत. पुढं या स्फोटामुळं गती मिळालेल्या नेब्युलाची गोल गोल फिरणारी तबकडी तयार झाली व त्याच्या केंद्रामध्ये सूर्याचा जन्म झाला. एकीकडं सूर्याचा जन्म होत असताना त्या तबकडीमध्ये असलेली धूळ, दगड आणि इतर विविध मूलद्रव्यंही गोल फिरत होती. चक्राकार फिरताना ती एकमेकांवर आदळू लागली. हळूहळू त्यांचे मोठे तुकडे एकत्र फिरू लागले. अशा प्रकारे आसपासचे सारे तुकडे एकत्र चिकटले व स्वतःभोवती गोल फिरू लागले. हेच ते ग्रह जे आज अनेकांच्या कुंडलीत खेळ खेळत बसलेले असतात.

ग्रह तयार होताना त्यांचं तबकडीमधलं स्थान, त्यांचं स्वरूप ठरवण्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं. आपल्या सूर्यमालेत एकूण ८ मुख्य मोठे ग्रह आहेत. सूर्यापासून त्यांचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून असा आहे. यापैकी पहिले चार ग्रह हे रॉकी प्लॅनेट्स आहेत. म्हणजे त्यांच्यावर दगडमाती फार मोठ्या प्रमाणात आहे. तर उरलेले ग्रह हे गॅस प्लॅनेट्स आहेत. म्हणजे ते वायुस्वरूपात आहेत. वर म्हटल्याप्रमाणं ग्रह तयार होताना त्यांचं तबकडीमधलं स्थान, त्यांचं स्वरूप ठरवण्यात अत्यंत महत्त्वाचं ठरलं. सूर्याची निर्मिती होताना त्यातून फार मोठ्या प्रमाणात उष्णता फेकली जात होती. जे बाल्यावस्थेतील ग्रह या नवजात सूर्याच्या जवळ होते, त्यांच्यावरील बहुतांश वायू उष्णतेमुळं उत्सर्जित होऊन निघून गेले व उष्णतेला तोंड देऊ शकणारी मूलद्रव्यं धातू व दगडांच्या स्वरूपात मागं उरली. आज या ग्रहांवर लोखंड, सिलिकॉन, मॅग्नेशिअम, सल्फर, कॅल्शिअम, अ‍ॅल्युमिनिअम, निकेल असे विविध धातू आढळतात. ही मूलद्रव्ये निर्मितीच्या वेळेस ऑक्सिजनच्या संयुगांच्या स्वरूपात असावीत असा अंदाज आहे. उच्च तापमानाच्या प्रभावामुळं इतर कुठल्या स्वरूपात या ग्रहांवर इतर काही टिकणं बहुधा अशक्य असावं. नेब्युलामध्ये घन पदार्थ वायूच्या तुलनेत अगदी कमी प्रमाणात उपलब्ध होते. उष्णतेमुळं घनपदार्थच अधिक स्वरूपात एकत्र आल्यानं, मोठ्या गुरुत्वाकर्षणाच्या अभावी सूर्यापासून जवळ असलेल्या ग्रहांचा आकार फारच लहान राहिला. सूर्यापासून लांबच्या अंतरावर निर्माण झालेल्या ग्रहांपर्यंत उष्णता न पोचल्यानं मात्र तेथील वायूचं उत्सर्जन न होता अधिकाधिक प्रमाणात वायू गोळा होत त्यांचा आकार वाढत गेला. या ग्रहांवर हायड्रोजन, हेलियम, मिथेन, सल्फर अशा विविध वायूंचं मिश्रण आढळतं. या ग्रहांचं स्वरूप वायुरूपी असलं तरी त्यांच्या केंद्रस्थानी त्यांच्या जन्माच्या वेळेस एकत्र आलेले दगड असतात. तसंच वरच्या थरातील वायूच्या अतिप्रचंड दाबामुळं केंद्राच्या जवळ असलेल्या वायूचं रूपांतर घनपदार्थात होतं. जसं स्वयंपाकाचा गॅस प्रचंड प्रेशरनं सिलिंडरमध्ये भरल्यानं लिक्विड स्वरूप घेतो तसं. म्हणूनच तर त्या इंधनाचं नाव ‘लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस’ (एल.पी.जी) असं आहे.

सूर्यापासून कमीत कमी किती अंतरावर असल्यावर ग्रह वायुरूपात स्थिर कसा राहतो, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, ७८० दशलक्ष किलोमीटर्स, जे गुरू ग्रहाचं सूर्यापासून असलेलं अंतर आहे. आपल्या सूर्यमालेच्या विविध इंटरेस्टिंग फॅक्ट्स पुढच्या काही लेखांमधून जाणून घेऊ.

संबंधित बातम्या