बुध ग्रह

मकरंद केतकर
सोमवार, 23 मार्च 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

अंतराळातल्या अतिअजस्र घडामोडींमधून आपल्या सूर्यमालेचा जन्म झाला. नेब्युलामधील बहुतांश वायू सूर्याच्या रूपात दीप्तीमान झाला व उरलेला वायू ग्रहांच्या रूपात सूर्याभोवती फिरू लागला. सूर्यापासून जवळ असलेल्या ग्रहांवरती मोठ्या प्रमाणात वायू टिकू शकला नाही, त्यामुळे त्यांचा आकार लहानच राहिला. पण दूरवर असलेल्या ग्रहांना उष्णतेचे चटके न लागल्याने ते वायुरूपात स्थिरावले. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह मुख्यतः दगडमातीचे असल्याने त्यांचा आकार लहान आहे. यांना रॉकी प्लॅनेट्स असे म्हणतात. तर गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह अतिप्रचंड आकाराचे वायुगोळे आहेत. यांना गॅस प्लॅनेट्स म्हणतात. आज आपण रॉकी प्लॅनेट्सपैकी बुध ग्रहाची माहिती घेऊ.

सूर्यापासून सरासरी फक्त ५८ लाख किलोमीटर अंतरावर असलेला बुध हा सर्वात जास्त चटके सोसणारा ग्रह आहे. पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी जे ६ ग्रह दिसू शकतात त्यापैकी बुध एक आहे. याचे इंग्लिश नाव मर्क्युरी, जे पायाला पंख असलेल्या एका ग्रीक देवतेवरून ठेवले आहे. या वेगवान ग्रीक देवतेप्रमाणेच बुध ग्रह वेगवान परिभ्रमण करतो. सूर्यापासून जवळ असल्यामुळे त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणाही ८८ दिवसांत पूर्ण होते. टेलीस्कोपमधून पाहिल्यास या ग्रहाच्याही चंद्राप्रमाणेच कला दिसतात. जेव्हा तो आपल्या आणि सूर्याच्या मधे येतो, तेव्हा त्याची गडद आकृती दिसते व जसा जसा पुढे सरकत जाईल तशी त्याची उजळलेली बाजू दिसू लागते. आकाराने अगदीच लहान असलेल्या या ग्रहाचा व्यास केवळ ४,९०० किलोमीटर आहे. पृथ्वीचा व्यास १३,००० किलोमीटर आहे. सूर्यापासून सर्वात जवळ असल्याने तो अवकाशातही चांगलाच तेजस्वी दिसतो. गंमत म्हणजे सूर्याभोवती ८८ दिवसांत चक्कर मारणारा हा ग्रह स्वतःभोवती गोल फिरायला मात्र ५८ दिवस घेतो. म्हणजे बुधावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या ५८ दिवसांचा असतो. बुधाचा परिभ्रमणाचा मार्ग अंडाकृती आहे. त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग, सूर्याभोवती फिरण्याचा वेग आणि त्याची परिभ्रमणाची कक्षा यांचा एकत्रित परिणाम बुध ग्रहावरून सूर्याकडे पाहिल्यास फारच मनोरंजक दिसतो. परिवलन आणि परिभ्रमणातील वेगाच्या तौलनिक कमतरतेमुळे बुधावर सूर्य उगवतो, पश्चिमेकडे प्रवास करू लागतो, तो मध्यावर येतो तेव्हा थांबतो, परत पूर्वेकडे जातो आणि मग पुन्हा प्रवास सुरू करून पश्चिमेकडे जातो. त्याची एक बाजू वर्षभर सूर्यासमोर राहते व दुसरी बाजू पुढच्या वर्षी सूर्यासमोर येते.                                      

बुध ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणेच शुष्क आणि विवरांनी भरलेला आहे. प्रचंड प्रमाणात उल्कापात झेलल्याच्या खुणा त्यावर स्पष्ट दिसतात. त्याच्यावरील एक विवर तर चक्क सोळाशे किलोमीटर व्यासाचे आहे. या ग्रहाची परिभ्रमणाची गती पृथ्वीपेक्षा खूपच अधिक असल्याने त्यावर उल्कापातांचे आघातही फार मोठ्या प्रमाणात झालेले दिसतात. बुधावरील विवरांना अनेक जगप्रसिद्ध कलाकारांची नावे दिलेली आहेत. बुधाचा पृष्ठभाग जसा पृथ्वीप्रमाणे दगडी आहे, तसाच त्याचा गाभाही मुख्यतः लोहापासून तयार झालेला आहे. कदाचित सूर्यावरून होणाऱ्‍या उष्णतेच्या ब्लास्टिंगमुळे त्याच्यावरील इतर मूलद्रव्ये बाष्पीभवन होऊन निघून गेली असावीत. बुधाची परिवलनाची गती अत्यंत मंद असल्याने त्याच्यावरील चुंबकीय क्षेत्रही अगदी क्षीण आहे. चुंबकीय क्षेत्र निर्माण होण्यासाठी वेगवान स्पीन आवश्यक असतो. उदा. सायकलला लावला जाणारा डायनॅमो.

क्षीण ताकदीमुळे सूर्यावरून येणाऱ्‍या सौरवाऱ्‍यांना त्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र थोपवू शकले नाही व सौरवाऱ्‍यांनी उडवून लावल्यामुळे तेथे वातावरणही टिकू शकले नाही. सौरवाऱ्‍यांनी उडवून लावलेल्या पदार्थांची शेपूट बुध ग्रहाच्या मागे लक्षावधी किलोमीटर लांबपर्यंत पसरलेली दिसते. पण सगळ्यात मोठी गंमत म्हणजे साडेचारशे अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची साक्षात भट्टी असलेल्या या ग्रहावरील विवरांमध्ये चक्क गोठलेल्या स्वरूपातील पाणी आढळते. सूर्याची उष्णता खूप खोल असलेल्या विवरांच्या आत पोचू न शकल्याने तेथील तापमान उणे १७० अंश सेल्सिअस असते. निसर्गासारखा दुसरा विक्षिप्त कलाकार नाही हेच खरे!

संबंधित बातम्या