नसलेल्या फुलाची गोष्ट

मकरंद केतकर
बुधवार, 24 जून 2020

मैत्री भोवतालाशी

ही  आहे उंबराच्या नसलेल्या फुलाची गोष्ट. लॉकडाउनमध्ये रिकामटेकड्या लोकांनी खोदून खोदून जुन्या अफवा नव्यानं पसरवायला सुरुवात केली. कुठल्यातरी देवळातल्या उंबराला अचानक फुल आलं आणि हा दैवीयोग समजून त्याचं दर्शन घ्यायला गर्दी व्हायला लागली वगैरे मजकूर असलेली ही पोस्ट होती. मग कदाचित तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, की खरंच उंबराला असं दुर्मीळ फुल येतं का? तुम्ही त्याचं दर्शन घेतलं तर पवित्र होता का? अशा काही प्रश्नांची ही उत्तरं.  

‘तुम्ही म्हणजे हल्ली उंबराचं फुल झालायत..’ अगदी सहज वापरला जाणारा हा वाक्प्रचार, फारच क्वचित दिसणाऱ्‍या माणसांसाठी वापरला जातो. खरं तर हा वाक्प्रचार, चोवीस तास डोळ्यांसमोर असणाऱ्‍या माणसासाठी वापरला जायला हवा. कारण या वाक्प्रचारात वापरलेलं उदाहरण हे फळ नसून फुलच आहे हे बऱ्‍याच जणांना माहीत नसतं.

वड, पिंपळ, उंबर वगैरे फायकस कुळातील झाडांना लगडणारी फळं, खरं तर फळं नसून फळासारखी एका पातळ आवरणात गुंडाळलेली शेकडो सूक्ष्म फुलं असतात. त्यांचं बाह्य रूप जरी फळासारखं दिसत असलं, तरी त्या आवरणाच्या आतमध्ये नर आणि मादी फुलांचे गुच्छ असतात. तूर्तास सोयीसाठी आपण याला फळच म्हणू. या कुळातील झाडं पशुपक्ष्यांना मुबलक अन्न पुरवतात, म्हणून वैज्ञानिक भाषेत ती ‘की स्टोन स्पिशीज’ म्हणजे जंगलाचे मुख्य आधारस्तंभ म्हणून ओळखली जातात. मराठीतला ‘आधारवड’ हा शब्द यातूनच आला असावा.

तर, फुल म्हटलं म्हणजे परागीभवन आलंच. म्हणजेच त्यासाठी मधमाश्या, फुलपाखरं आणि इतर कीटक हवेत. पण मग अशा बंदिस्त फुलांचं परागीभवन हे कीटक कसं करणार? त्यासाठी निसर्गानं एका विशिष्ट माशीला ही जबाबदारी सोपवलेली आहे. तिला ‘फिग वास्प’ असं म्हणतात. उंबर फोडल्यावर आतमधून जे सूक्ष्म किडे उडतात, त्याच या फिग वास्प. प्रत्येक फिगच्या झाडाची स्वतःची अशी वेगळी फिग वास्प असते, जी त्या जातीच्या झाडांना आपलं सासर-माहेर मानते.

आता या वास्प परागीभवन कसं करतात पाहू. आपल्याला कल्पना यावी म्हणून एक सर्वसाधारण उदाहरण देत आहे. जातीप्रजातीनुसार या प्रक्रियेत वैविध्य असू शकतं. प्रत्येक फळात (फुलांच्या गुच्छात) फळाच्या डोक्यापाशी नर म्हणजे ‘राजा’ फुलं असतात आणि फुलाच्या तळाशी ‘मादी’ म्हणजे राणी फुलं असतात. याशिवाय काहीकाही जातीत या दोघांच्या जोडीला ‘गुलाम’ फुलंसुद्धा असतात. फिग वास्पची मादी तिच्या शारीरिक रचनेप्रमाणं राणी किंवा गुलाम फुलात अंडी घालते. अंडी घातल्यावर ती मरून जाते. अंडी फलित झाल्यावर त्यातून नर आणि मादी वास्प बाहेर पडतात. यापैकी नर हा नेहमीच आंधळा आणि बिनपंखांचा असतो. तो त्याच फळातल्या मादीशी मीलन करतो. मीलन झाल्यावर नर मरून जातो. गर्भवती झालेली मादी वास्प त्या गुच्छातून बाहेर पडते. बाहेर पडताना डोक्याशी असलेल्या नर फुलांशी तिचं घर्षण होऊन त्यातले परागकण तिच्या अंगाला चिकटतात. फळातून बाहेर पडल्यावर ती त्याच जातीचं झाड शोधून त्यातल्या एका फळात शिरते. मात्र आत शिरताना तिचे पंख, पाय इत्यादी अवयव तुटून जातात. फळात शिरल्यावर ती तिच्या शारीरिक रचनेनुसार व फुलांच्या प्रकारानुसार राणी किंवा गुलाम फुलात अंडी घालते आणि मरून जाते. मात्र या झटापटीत तिच्या अंगाला लागलेले नर परागकण हे आजूबाजूच्या मादी फुलांवर पडतात आणि फुलांची परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होते. पुढं या फळांना पक्षी, प्राणी खातात व त्यांच्या पचनसंस्थेतील पाचकरसांच्या प्रभावामुळं त्यातील बिया रुजण्यायोग्य होतात आणि नवीन झाड जन्माला येतं.

सदर फोटोतील फुलसदृश आकार एका बुरशीचा आहे. बुरशी निसर्गातील स्वच्छता कर्मचारी असून मृत घटकांचं रीसायकलिंग करायचं महत्त्वाचं कार्य ती पार पाडते. आता या बुरशीच्या दर्शनानं आपण पवित्र होऊ का? हा विचार आपल्यावर सोडतो. मला खात्री आहे, की या लेखानंतर पुन्हा जर उंबराच्या फुलाची पोस्ट आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर आली, तर आपल्याकडं उत्तर तयार असेल.  

संबंधित बातम्या