शुक्राची चांदणी

मकरंद केतकर 
सोमवार, 6 जुलै 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

लेखक, कवी आणि कलाकार मंडळींना भारून टाकणारा अवकाशीय ग्रहगोल म्हणजे शुक्रतारा. खरं तर तो तारा नाही आणि चांदणीही नाही, हे आपल्याला माहितीच आहे. ताऱ्‍यांसारखा चमकतो म्हणून या उपमा; अन्यथा तो आपल्यासारखाच परप्रकाशी ग्रह आहे. सूर्यापासून दुसऱ्‍या नंबरचा आणि पृथ्वीचा सख्खा शेजारी असलेला हा ग्रह दिसायला चमकदार आणि आकर्षक असला, तरी प्रत्यक्षात मात्र रौरव नरक आहे. 

टेलीस्कोपमधून पाहिल्यास शुक्र सपाट पांढऱ्‍या पृष्ठभागाचा ग्रह दिसतो. म्हणजे टेलीस्कोपमधून चंद्र पाहिला, तर त्यावरचे खड्डे पाहून त्यानं भूतकाळात किती जोरदार हाणामारी केली आहे हे सांगणारं चित्तथरारक दृष्य तरी दिसतं. शुक्र म्हणजे अगदीच जुन्या हिंदी पिक्चरमधल्या पांढरी साडी नेसलेल्या ‘विधवा माँ’सारखा. या पांढऱ्‍या रंगामागचं कारण आहे, त्याला लपेटून बसलेलं दाट ढगांचं आवरण. सो रोमँटिक ना? पण हे ढग पाण्याच्या वाफेचे नसून सल्फर डायऑक्साईडचे आहेत. जवळपास पृथ्वीच्याच आकाराचा, पण पृथ्वीपेक्षा सूर्यापासून जवळ असलेल्या या ग्रहाच्या पृष्ठभागाचं तापमान साडेचारशे अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. शुक्राच्या तेजस्वी चमकण्याचा आणि या प्रचंड तापमानाचा थेट संबंध आहे. शुक्राचं वातावरण कार्बन डायऑक्साईड वायूनं भरलेलं आहे. त्याच्यावरच्या वातावरणाचा दाब पृथ्वीच्या ९० पट अधिक आहे. म्हणजे समुद्रात ३,००० फूट खोल गेल्यावर वरच्या पाण्याचा जेवढा दाब तुमच्या अंगावर पडेल तितका दाब. सल्फर डायऑक्साईडच्या ढगांमधून सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा पाऊस पडतो, पण ग्रहाचं तापमान प्रचंड असल्यानं त्या थेंबांची जमिनीवर पोचण्यापूर्वीच वाफ होऊन जाते. संशोधकांचा असा कयास आहे, की सूर्यमालेच्या जन्माच्या वेळेस, सूर्य नुकताच तापायला लागलेला असताना शुक्रावर सुरुवातीला पृथ्वीसारखंच सौम्य वातावरण असावं. काळाच्या ओघात सूर्याचं तापमान वाढत गेलं. ग्रहावरच्या पाण्याची वाफ झाली व त्यात मिसळलेले सर्व घटक वायुरूपात आकाशात स्थिरावले. पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू उष्णता शोषक आहेत. त्यामुळं ग्रहाचं तापमान अधिकाधिक वाढत गेलं. शुक्राच्या जमिनीवरून तिथलं आकाश आपल्या आकाशासारखं उत्साहवर्धक निळं वगैरे न दिसता उदास तांबडं दिसतं. कायमच संधिकाल झाल्यासारखं.    

उष्णतेचा सतत व बराच काळ मारा होत असल्यानं तिथं अजून एक गंमत पाहायला मिळते. शुक्राचं निरीक्षण करणाऱ्‍या अवकाश यानांना तिथल्या पर्वतशिखरांचे माथे बर्फासारखे चमकताना आढळले. ग्रहाचं तापमान पाहता तिथं असं उघड्यावर पाणी टिकूच शकत नाही. त्यामुळं शास्त्रज्ञांचा असा कयास आहे, की तिथल्या मातीमधली काही खनिजं बाष्पीभवन होऊन वर वर जातात आणि शिखरांवरती तापमान कमी असल्यानं तिथं ती परत मूळ रूपात येतात. म्हणजे थोडक्यात धातूची बर्फवृष्टी. शुक्राचा परिवलनाचा वेग भयंकर हळू म्हणजे २४३ पृथ्वी दिवस आहे. आपले २४३ दिवस होतात, तेव्हा शुक्रावरचा एक दिवस पूर्ण होतो. विचित्र गोष्ट म्हणजे शुक्राची सूर्याभोवतीची फेरी फक्त २२५ दिवसांत पूर्ण होते. म्हणजे तिथला दिवस तिथल्या वर्षापेक्षा मोठा आहे. बापरे! म्हणजे तिथं जर कधी मानवी वस्ती झालीच, तर आपल्याला तासांवरती सण साजरे करावे लागतील. विज्ञान दिन न म्हणता विज्ञान तास म्हणावं लागेल.

बुधाप्रमाणंच शुक्राभोवतीही उपग्रह नाही. कदाचित फार पूर्वी असावेत, पण सूर्याच्या ताकदीनं त्यांना या ग्रहांच्या जोखडातून मोकळं केलं असावं.

जाता जाता अजून एक गंमत. शुक्र हा आपल्या सूर्यमालेतील सर्वांत वर्तुळाकार ग्रह आहे. परिवलनाचा वेग जास्त असला, की फिरणाऱ्‍या वस्तूमधलं वस्तुमान बाहेरच्या दिशेला पसरू लागतं. फुगडी घालताना जसं आपोआप बाहेरच्या बाजूला आपण फेकलं जाऊ लागतो तसं. शुक्राचा गिरकी घेण्याचा वेग अत्यंत संथ असल्यानं त्याचा पृष्ठभाग बाहेरच्या बाजूला पसरत नाही व तो ‘परफेक्टली स्फेरिकल’ दिसतो.

आता एक माफक अपेक्षा. कोणी कवी किंवा लेखक हा लेख वाचत असतील, तर शुक्राच्या ‘काय भुललासी वरलिया रंगा’ अशा अर्थाच्या कविता व उपमा इथून पुढं निर्माण करतील का? होऊ दे खर्च!

संबंधित बातम्या