मंगळ

मकरंद केतकर
सोमवार, 13 जुलै 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

अनेक लग्नाळलेल्या मंडळींच्या पत्रिकेत टांग अडवून बसलेला ग्रह म्हणजे मंगळ. लाल रंगाचा आणि तापट स्वभावाचा हा ग्रह पत्रिकेत जरी गोंधळ करत असला, तरी मानवजातीसाठी अवकाशातील दुसरं घर होऊ शकतो का, याची चाचपणी विज्ञानविश्‍वात सुरू आहे. अमेरिका, रशिया तसंच भारतानं आजवर या ग्रहावर अभ्यासासाठी आपापली यानं उतरवली आहेत. आकारानं पृथ्वीपेक्षा लहान पण फार पूर्वी कधीतरी कदाचित पृथ्वीसारखाच असू शकणारा हा ग्रह शास्त्रज्ञांना का खुणावतो आहे ते आपण पाहू. 

सूर्यापासून चौथा आणि पृथ्वीच्या नंतर असलेला हा शेवटचा रॉकी प्लॅनेट आहे. पृथ्वीच्या जास्तीत जास्त सहा कोटी किलोमीटर इतक्या जवळ येणारा मंगळ सूर्यापासून तब्बल दोनशे दशलक्ष किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालतो. सूर्यापासून इतक्या लांब असल्यानं त्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान उणे ६० अंशांपर्यंत असतं. या ग्रहाचं क्षेत्रफळ पृथ्वीच्या निम्मं आहे. रात्री लालसर रंगात चमकणाऱ्‍या मंगळाला हा लाल रंग त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या लाल मातीमुळं लाभला आहे. तिथल्या मातीत लोहाचं प्रमाण खूप जास्त असल्यानं त्याचं आयर्न ऑक्साइडमध्ये रूपांतर झालं आहे. मंगळाचा दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धाच्या तुलनेत खूपच खडबडीत आणि फुगवटे असलेला आहे. याउलट उत्तर गोलार्ध खचलेल्या स्वरूपात आढळतो. कदाचित फार पूर्वी कधीतरी एखादा लघुग्रह त्याच्यावर येऊन आदळला असावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रात मंगळावर थारसिस नावाचं भलंमोठं पठार आणि चार ज्वालामुखीची विवरं दिसतात. मंगळावर सध्या तरी सक्रिय ज्वालामुखी नाही पण फार पूर्वी, आज पृथ्वीवर जसे भूखंड हालचाल करत असतात, तसे करत असावेत त्यातूनच या ज्वालामुखींची निर्मिती झाली असावी.

मंगळाची सगळ्यात अद्‍भुत गोष्ट म्हणजे ‘व्हॅलीस मेरीनरीस’ नावाची महाप्रचंड दरी. १९७० च्या आसपास नासाच्या मेरिनर ०९ नावाच्या एका छोट्या यानानं मंगळाला प्रदक्षिणा घालताना तिचा शोध लावला. संपूर्ण उत्तर अमेरिका खंडाच्या लांबीएवढी मोठी ही दरी खरोखरच एक अद्‍भुत आश्‍चर्य आहे. हीची लांबी आहे ४,००० किलोमीटर, रुंदी २०० किलोमीटर आणि खोली तब्बल ७ किलोमीटर. अमेरिकेतील प्रसिद्ध ग्रँड कॅनियन या दरीपेक्षा दहापट लांब रुंद. पण ग्रँड कॅनियन ही नदीनं डोंगर कोरल्यामुळं तयार झालेली दरी आहे. व्हॅलीस मेरीनरीस, अंतर्गत उष्णतेमुळं थारसिस पठाराचा फुगवटा तयार होताना निर्माण झालेली भेग आहे. मंगळावरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा किंचित मोठा आहे, पण तेथील वर्ष मात्र पृथ्वीच्या जवळ जवळ दुप्पट म्हणजे ६८७ दिवसांचे आहे. मंगळाला डायमोस आणि फोबोस नावाचे जेमतेम काही किलोमीटर लांबीचे दोन उपग्रहही आहेत, पण त्यांचं स्वरूप पाहता ते धूमकेतूच जास्त वाटतात. ‘मंगळाला दुसरं घर करता येईल का?’ याचा शोध घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या दोन्ही ध्रुवांवर गोठलेल्या स्वरूपात पाणी आहे. या पाण्यावर ऋतुमानानुसार थंडीत कार्बन डायऑक्साइडचा थर जमा होतो व उन्हाळ्यात तो परत वाफ होऊन निघून जातो. मंगळावर फार पूर्वी नद्या व समुद्र होते याच्या स्पष्ट खुणा आढळतात. पण काही अज्ञात कारणामुळं त्याच्या आतील चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारी यंत्रणा बंद पडली व त्यामुळं प्रलयकारी सौर वाऱ्‍यांनी त्याच्या वातावरणाचं सुरक्षा कवच नष्ट केलं आणि तेथील बरेचसे वायू व पाणी अंतराळात निघून गेले. पण मंगळावर अजूनही गोठलेल्या स्वरूपात भूमीगत पाणी आहे. भूस्खलन झालं किंवा एखादी उल्का आदळली की ते दिसू लागतं. मंगळावर जर वातावरण आणि पाणी होतं, तर तिथं जीवसृष्टी होती का हा कुतूहलाचा विषय आहे. तसे पुसटसे संकेतही मिळत आहेत आणि म्हणूनच त्यादृष्टीनं संशोधनही सुरू आहे.

आपले हे उद्‍ध्वस्त स्वरूपातील सख्खे शेजारी पाहिले, की खरोखर आपल्या ग्रहाबद्दलची आपुलकी आपोआप वाढते आणि एकच प्रश्‍न अधोरेखित होतो, ‘विश्वात आपण एकटेच आहोत का?’

संबंधित बातम्या