धगधगते अग्निकुंड

मकरंद केतकर
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

तर मंडळी, या लेखमालेत आत्तापर्यंत आपण विश्‍वाची निर्मिती, आकाशगंगा, वायुमेघ, त्यातून होणारी ताऱ्यांची निर्मिती व उरलेल्या पदार्थातून होणारी ग्रहांची निर्मिती पाहिली. याच प्रक्रियेतून निर्माण झालेल्या आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला एक प्रचंड तप्त वायूचा गोळा व त्याच्या अचाट गुरुत्वाकर्षणानं धरून ठेवलेली आपली ग्रहमाला हा खरोखर एक भन्नाट विषय आहे. कठीण पृष्ठभाग असलेले चार छोटे ग्रह वगळता उर्वरित ग्रह हे अजूनही वायुरूपात आहेत व आकारानेही अजस्त्र आहेत. पण ज्याला ‘हॅबिटेबल’ म्हणावा असा एकमात्र ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. आजपासून आपण पृथ्वीच्या अद्‍भुत इतिहासात डोकावून पाहणार आहोत. 

आपली सूर्यमाला साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली व त्याच वेळी आपल्या पृथ्वीचाही जन्म झाला. या निर्मितीच्या वेळचं दृष्य कसं असेल याची कल्पना करताना मी दिवाळीतलं भुईचक्र डोळ्यासमोर आणतो. जमिनीवर गरगर फिरणारं भुईचक्र मध्यभागी प्रचंड उष्ण असतं. त्यातून अफाट ऊर्जा बाहेर पडत असते व त्याच वेळी त्याच्या तेजोवलयातून अनेक नारंगी रंगांच्या ठिणग्या बाहेर फेकल्या जात असतात. मला नेहमी वाटतं, की आपल्या सूर्यमालेत सूर्यही असाच तप्त चक्रासारखा फिरत असेल आणि त्याच्यातून किंवा तो ज्या नेब्युलातून जन्माला आला, त्यातून बाहेर पडलेले घनपदार्थ उष्णतेमुळं असेच रसरशीत तापलेले खंड असतील. कारण वास्तवातही आपली पृथ्वी जन्माला आली, तेव्हा असाच एक भयंकर तप्त लालबुंद खंड होता. तिचा पृष्ठभाग विविध खनिजांच्या द्रवरूप मिश्रणानं तयार झालेला होता. सूर्यमालेची निर्मिती होताना असंख्य खडकांचा व खनिजांचा पसारा सूर्याभोवती पसरलेला होता, ज्यांचे अवशेष अजूनही अवकाशात आढळतात. या अस्ताव्यस्त पसाऱ्याला वेग होता. चक्राकार गती होती. त्यामुळं हळूहळू हे तप्त तुकडे एकमेकांवर आदळू लागले आणि त्यांच्यातील उष्णतेनं ते एकजीव होऊ लागले. असे अनेक लहानमोठे तरंगते भूखंड पृथ्वीकडं ओढले जाऊन तिच्यात त्यांचा विलय होत होता. याच्याच बरोबर धुमकेतू तसंच उल्कावर्षावातून त्यांच्यावर असलेलं पाणीही पृथ्वीवर येत होतं. पेटलेल्या होमाच्या अग्निकुंडात समिधा अर्पण होत होत्या. लोहाराची धगधगती भट्टी असावी तसं पृथ्वीचं स्वरूप होतं. 
यावेळी पृथ्वीवर मुक्त स्वरूपातील प्राणवायू अजिबात नव्हता. तिच्या वातावरणात सूर्याच्या निर्मितीतून उरलेला हायड्रोजन, हेलियम व त्यांचे कंपाऊंड्स असे काही वायू होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीचं केंद्र अजून स्थिर नव्हतं. त्यामुळं तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्रही निर्माण झालेलं नव्हतं. मागच्या काही लेखांमध्ये आपण पाहिलं, की चुंबकीय क्षेत्राच्या अभावी मंगळ, शुक्र, बुध इत्यादी ग्रहांवरचं वातावरण, सूर्याच्या जोरदार सौरवाऱ्यांनी कसं नष्ट करून टाकलं. पृथ्वीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. सौरवाऱ्यांनी हेलियम, हायड्रोजन असे गॅसेस फुंकर मारून तिच्या वातावरणातून उडवून टाकण्याचा सपाटा लावला होता. सुमारे पन्नास कोटी वर्षं तरी हा गदारोळ सुरू असावा. 

पण आता पृथ्वी हळूहळू स्थिरावू लागली. तिच्या द्रवरूप पृष्ठभागातील जड घटक हळूहळू केंद्राकडं, तर हलके घटक पृष्ठभागाकडं सरकू लागले. उकळलेलं गढूळ पाणी थंड होताना जसा तळाशी गाळ साठत जातो तसं काहीसं. थंड होणारं पृथ्वीचं कवच आता झाकणासारखं काम करू लागलं. इतका काळ सहज बाहेर पडणारी ऊर्जा आतमध्येच कोंडली जाऊ लागली व आतल्या ऊर्जेच्या दाबामुळं ती ज्वालामुखींच्या रूपानं आत तयार झालेले गॅसेस पृष्ठभाग फोडून बाहेर फेकू लागली. यामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, अमोनिया असे विविध गॅसेस आणि पाण्याची वाफही होती. पृथ्वीवर अद्यापही साठलेल्या स्वरूपातील पाणी नव्हतं, पण कालौघात जन्माला येणाऱ्या पहिल्यावहिल्या जीवांसाठी आवश्यक असलेली नाट्यमय वातावरण निर्मिती मात्र झाली होती.

संबंधित बातम्या