जीवसृष्टीची मुहूर्तमेढ

मकरंद केतकर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

पु.लं.चा अंतू बर्वा, ब्रिटिशांच्या दिडशे वर्षांच्या राज्यावर भाष्य करताना एका संवादात म्हणतो, ‘दिडशे वर्षं तुमची. अहो ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदानेदेखील हालत नाही हजार वर्ष ओलांडल्याशिवाय!’

साडेचार अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आलेलं हे पृथ्वी नावाचं धगधगतं अग्निकुंड ज्वाळा फेकत नवजात सूर्याभोवती रुंजी घालत होतं. पृथ्वीची सुरुवात अशीच झाली याला दुजोरा देणारा अवकाशीय पुरावा खगोलशास्त्रज्ञांना नुकताच मिळाला आहे. आपल्यापासून सुमारे तीनशे प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका नव्या सूर्यमालेचा शोध लागला असून, यात एका नवजात ताऱ्‍याभोवती दोन लालबुंद, तप्त ग्रह प्रदक्षिणा घालताना आढळले आहेत. आता त्यांच्या निरीक्षणातून शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या जन्माकडं अधिक अभ्यासपूर्वक पाहता येईल.

अशीच तप्त लालबुंद पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवतीही फिरत होती. या काळात तिच्यावर भयानक उल्कावर्षाव होत होता. बाँबिंगच म्हणा ना. एकंदर सूर्यमालाच अस्थिर असल्यानं पृथ्वीच्या अगदी सरुवातीच्या काळातच चक्क मंगळाच्या आकाराचा एक ग्रह पृथ्वीला घासून गेला. या प्रचंड मोठ्या धडकेमुळं पृथ्वीच्या पृष्ठभागाचा मोठा भाग अंतराळात उधळला गेला व तिच्या गुरुत्वाकर्षणामुळं तिथंच स्थिरावून तिच्याभोवती भ्रमंती करू लागला. कालांतरानं तो सगळा मलबा एकत्र आला व चंद्राची निर्मिती झाली. चंद्राविषयी अधिक माहिती आपण नंतरच्या लेखात घेऊ.

अवकाशातून पृथ्वीला आज आपण पाहतो तेव्हा ती निळी दिसते. सोप्या भाषेत ‘ब्ल्यू प्लॅनेट’. पण पृथ्वीनं आजपावेतो आपल्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्यात फार मोठी स्थित्यंतरे पाहिली आहेत. तिच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर जैविक व अजैविक घटकांमुळं तिच्या वातावरणात व पृष्ठभागावर अनेक बदल घडले. या काळात तिचा रंगही बदलत राहिला. या स्थित्यंतरांची शास्त्रज्ञांनी रंगाप्रमाणं वर्गवारी केली आहे. या वर्गवारीप्रमाणं आपण स्थित्यंतरे पाहिली, तर तिची कथा समजणं सोपं जाईल. म्हणून त्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं आढावा घेत जाऊ.          

पृथ्वीच्या निर्मितीनंतर तिचा पृष्ठभाग जसा स्थिर होऊ लागला, तसा पृष्ठभागावरील लाव्हा थंड होऊन त्याचा बेसॉल्ट होऊ लागला. बेसॉल्ट हा सर्वात प्राथमिक प्रकारचा दगड आहे, ज्यावर कालांतरानं संस्कार होत होत त्याचं रूपांतर इतर प्रकारच्या दगडांमध्ये होतं. बेसॉल्टचा रंग काळा असतो व त्यामुळं अवकाशातून पाहिल्यास त्यावेळी पृथ्वी काळी दिसत असेल म्हणून हिला ‘ब्लॅक अर्थ’ अर्थात ‘कृष्ण अवनी’ किंवा अगदी सोप्या भाषेत ‘काळी आई’ असं नाव दिलं आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून पुढे साधारण पाचशे कोटी वर्षं तिची ही अवस्था टिकली असावी. या लेखमालेच्या सुरुवातीला आपण पाहिलं, की ताऱ्याचा जन्म होऊन त्याचा मृत्यू होईपर्यंत कशी विविध मूलद्रव्यं निर्माण होत जातात. ही मूलद्रव्यं त्याच्या स्फोटातून अवकाशात भिरकावली जातात. यापैकी ऑक्सिजन, सिलिकॉन, अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्न ही सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी मूलद्रव्यं आहेत व पृथ्वीच्या कवचातही हीच मूलद्रव्यं प्रामुख्यानं आढळतात. आजही पृथ्वीवर आढळणारा ९९.९९ टक्के ऑक्सिजन हा खडक व खनिजांमध्ये बंदिस्त आहे. अगदी दोन अब्ज वर्षांपूर्वीपर्यंत तो मुक्त अवस्थेत नव्हताच.

एकीकडं मजल दरमजल करत आता ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला सेकंदाचा काटा हजार हजार वर्षांच्या अंतराचे टप्पे पार करत सातशे कोटी वर्षांवर जाऊन पोचला होता. सतत होणारे लाव्हाचे उद्रेक नवनवीन भूभागाची भर घालत होते. विविध विषारी वायू (म्हणजे आजच्या जीवसृष्टीच्या दृष्टीनं विषारी) आणि पाण्याची वाफ यांच्यापासून तयार झालेले वातावरण स्थिरावत होते. ‘लाइफ’ नावाच्या अद्‍भुत नाट्याची पूर्वतयारी झालेली होती. काळाच्या ओघात जसजशी जमीन थंड होऊ लागली तसतसं पृथ्वीवर पाणी स्थिरावू लागलं. पाऊस, वादळं, विजा यांचा खेळ अधिक तीव्रतेनं होऊ लागला. मिथेन, अमोनिया, कार्बन आणि इतर खनिजांची अद्‍भुत केमिस्ट्री घडू लागली व समुद्रकिनाऱ्‍यांवरच्या उथळ व उबदार डबक्यांमध्ये अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्सची निर्मिती सुरू झाली. हीच होती जीवसृष्टीची मुहूर्तमेढ!

संबंधित बातम्या