ऐतिहासिक युती

मकरंद केतकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

‘युती’ या शब्दाबरोबर साहजिकच डोळ्यासमोर उभं राहतं ते राजकारण. हेवेदावे, मानापमान, कुरघोड्या आणि बरंच काही. पण आज मी जी गोष्ट सांगतोय ती आहे एका ऐतिहासिक युतीची, जिचं वय आहे कमी जास्त दोन अब्ज वर्षं. कुठल्याही प्रकारे न भांडता खरोखरंच फक्त ‘विकास’ घडवणारी ही युती आहे, दोन प्रकारच्या पेशींची. जीवसृष्टीच्या देदीप्यमान प्रवासातील हा एक फार महत्त्वाचा टप्पा आहे. पुढं जे सांगतोय ते जरासं किचकट वाटू शकेल, पण सावकाश आणि समजून घेऊन वाचलं तर सहज कळेल.

आत्तापर्यंत आपण पाहिलं, की कशा पद्धतीनं तत्कालीन पारिस्थिकीय उलाढालींमुळं कार्बन डायऑक्साईडचं श्वसन करणारे पहिले एकपेशीय जीव तयार झाले आणि त्यांनी ऑक्सिजनची निर्मिती केली. कालांतरानं ऑक्सिजनचं श्‍वसन करणाऱ्‍या पेशी तयार झाल्या आणि दोन अब्ज वर्षांपूर्वी वर उल्लेखलेल्या दोन प्रकारांची हातमिळवणी झाली... आणि आज आपण जे बहुढंगी जीवन बघतोय, त्या दिशेनं अजून एक पाऊल पडलं. खरं तर इथून पुढं जवळजवळ एक ते दीड अब्ज वर्षं उत्क्रांतीच्या दृष्टीनं फारशी काहीच प्रगती झाली नाही. म्हणून याला ‘बोअरिंग बिलीयन’ म्हणजे ‘रटाळ अब्ज’ असं म्हणतात.  

आज ढोबळमानानं जीवसृष्टीची विभागणी दोन प्रकारात होते. एकपेशीय जीव आणि बहुपेशीय जीव. शास्त्रीय भाषेत प्रोकॅरिओट्स आणि युकॅरिओट्स. प्रोकॅरिओट्समध्ये विविध बॅक्टेरिया तसंच व्हायरसेसचा समावेश होतो, तर युकॅरिओट्समध्ये इतर सर्व जीवांचा समावेश होतो. या दोन्हीमध्ये मुख्य फरक आहे. आपल्या पेशींमध्ये अनेक अवयवांबरोबर पातळ आवरणात गुंडाळलेलं केंद्रक म्हणजे न्युक्लियस आणि त्यामध्ये क्रोमोझोम्स म्हणजेच ‘डी.एन.ए’ची बंडल्स असतात. तर, बॅक्टेरियामध्ये आवरणाशिवाय क्रोमोझोम्स नुसतेच तरंगत असतात. याशिवायही अनेक फरक आहेत त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.

आता वळूया युतीकडं. आपल्या पेशींमध्ये असलेली (आणि बॅक्टेरियांमध्ये नसलेली) अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे मायटोकाँड्रीया, जे पेशींना आणि सर्वार्थानं शरीराला ऊर्जा देणारे ए.टी.पी म्हणजे ‘अ‍ॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट’ हे विचंतक (एन्झाईम) तयार करतात. आपलं जठर अन्नामधलं ‘ग्लुकोज’ वेगळं काढतं व ते रक्तात मिसळतं, ज्याच्यापासून पुढं मायटोकाँड्रीया विद्युत ऊर्जा निर्माण करतात. म्हणून मायटोकाँड्रीयाला पेशीचं पॉवरहाऊस म्हणतात. पण खरी गंमत ही आहे, की हे मायटोकाँड्रीया एक स्वतंत्र बॅक्टेरियासदृश जीव आहेत, ज्यांच्याकडं स्वतःचा वेगळा डी.एन.एसुद्धा आहे. मग हे आपल्या पेशींमध्ये काय करतायत? तर हीच आहे ती दोन भिन्न स्वभावाच्या जीवांची परस्परावलंबी ऐतिहासिक युती. मायटोकाँड्रीयांना पेशींमुळं आयतं अन्न मिळतं आणि त्यांच्यामुळं पेशींना ऊर्जा मिळते.

हे झालं प्राण्यांबद्दल. मग वनस्पतींचं काय? तर वनस्पतींमध्ये मायटोकाँड्रीया आणि क्लोरोप्लास्ट हे दोन्ही प्रकार असतात. क्लोरोप्लास्टसुद्धा मायटोकाँड्रीयासारखेच कधीकाळीचे स्वतंत्र वावरणारे, परंतु स्वतःचं अन्न तयार करू शकणारे सायनोबॅक्टेरिया होते, जे नंतर वनस्पतींच्या पेशींमध्ये शिरून राहू लागले. ते प्रकाशसंस्लेषणातून हवेतला कार्बन आणि मुळांनी शोषलेल्या पोषक घटकांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये आणि मायटोकाँड्रीया या ग्लुकोजचं रूपांतर ऊर्जेत करतात. हे करताना जास्तीचं ग्लुकोज पानांमध्ये तसंच खोडामध्ये साठवलं जातं, ज्याचा उपयोग इतर जीव पोट भरण्यासाठी करून स्वतःसाठी ऊर्जा मिळवतात. मायटोकाँड्रीया आणि क्लोरोप्लास्टमधला मुख्य फरक हा, की मायटोकाँड्रीयाला बाहेरून ग्लुकोज मिळवावं लागतं. तर, क्लोरोप्लास्ट स्वतःच ग्लुकोज तयार करतं. अशाप्रकारे ही दोन जीवांची युती जोवर अभेद्य आहे तोवर सजीवांच्या शासनाला कुठल्याही अस्थिरतेचा धोका नाही हे निश्चित. मग एक प्रश्न असा पडतो, की समजा आपल्या पेशींमध्ये आपण क्लोरोप्लास्ट ठेवलं, तर आपणही स्वतःची ऊर्जा तयार करू शकू का? खरं तर असं नवीन ‘एण्डोसिंबायोसिस’ शक्य होईल का ठाऊक नाही, पण झालंच तर आपणही वनस्पतींसारखेच संथ गतीचे होऊ. कारण प्रकाशसंस्लेषण ही खूप संथ प्रक्रिया आहे आणि त्यासाठी खूप वेळ उन्हात थांबावं लागेल. त्यापेक्षा बाजारातून भाजी विकत आणून खाणं जास्त सोपं आहे, नाही का?

संबंधित बातम्या