नव्या युगाची चाहूल

मकरंद केतकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

विश्‍वाची गाथा
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

मागच्या लेखात आपण पाहिलं, की कशा पद्धतीनं दोन तीन भिन्न स्वभावाच्या पेशींनी एकत्र येऊन युती केली. त्यांच्या या समजूतदार सहचर्यामुळंच पुढं सजीव विश्‍वाचा अद्‍भुत खेळ दाखवणारा संसार मांडला गेला. त्याच लेखात मी ‘बोअरिंग बिलीयन’ म्हणजे ‘रटाळ अब्ज’ अशा एका काळाचा उल्लेख केला आहे. साधारण एक पूर्णांक आठ अब्ज ते ऐंशी कोटी वर्षं हा तो काळ आहे, ज्यात जीवसृष्टीच्या उत्क्रांतीची फारशी प्रगती जीवाश्मांच्या रूपात दिसून येत नाही. 

या विषयावर संशोधन करणाऱ्‍या संशोधकांना उत्तर ऑस्ट्रेलियातील दगडांच्या रासायनिक पृथःकरणातून असा शोध लागला, की या काळाच्या आधी बॅक्टेरियांनी निर्माण केलेल्या मुक्त स्वरूपातील प्राणवायूमुळं भूपृष्ठावरील खनिजांची विविध संयुगं तयार झाली, जी नद्यांमार्फत समुद्रतळाशी पोचली. या संयुगांचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी काही प्रकारच्या बॅक्टेरियांनी केल्यामुळं हायड्रोजन सल्फाइड्स नावाची संयुगं तयार झाली. या काळात समुद्राच्या पृष्ठभागाजवळ ऑक्सिजनयुक्त पाणी, तर त्याखालच्या थरात सदर संयुगं होती. ऑक्सिजनचं श्वसन करणाऱ्‍या नवीन प्रकारच्या सजीव पेशींसाठी ही संयुगं घातक असल्यानं त्याकाळातील जीवांमध्ये फारशी उत्क्रांतीची लक्षणं दिसत नाहीत. मग असं जर आहे, तर मग विषारी संयुगं वापरून जिवंत राहणाऱ्‍या पेशींनी उत्क्रांती का नाही केली असा प्रश्नही निर्माण होतो. याचं कारण असं आहे, की अशा प्रकारच्या संयुगांवर अवलंबून असणाऱ्‍या बॅक्टेरियांमध्ये उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या गुंतागुंतीच्या रचना नसतात. ठेविले अनंते तैसेची राहावे’ अशी काहीशी त्यांची वृत्ती असते. एक सोपं उदाहरण सांगायचं, तर सायकलीचा शोध मोटारसायकलीच्या कितीतरी आधी लागलाय. पण तरी आजही सर्वसाधारण सायकल ही माणसाच्या शक्तीनंच पुढं जातं. तिच्यात फारशी उत्क्रांती झाली नाही. पण मोटरसायकलची प्रगती मात्र कुठच्या कुठं पोचली. कारण तिच्यात असलेल्या इंजीन आणि इतर पार्ट्समुळं तिच्यावर प्रयोग करून आधुनिक बदल घडवण्यासाठी खूप मोठा वाव आहे. हाच तो फरक आहे प्रोकॅरियोट्स (एकपेशीय) आणि युकॅरियोट्स (बहुपेशीय) या पेशींमध्ये. 

हा कालावधी जवळपास एक अब्ज वर्षांचा होता म्हणूनच याला बोअरिंग बिलीयन असं म्हटलं जातं. पण म्हणजे या काळात काहीच बदल झाले नाहीत असं आहे का? तर तसंही नाही. या काळात युकॅरियॉट प्रकारच्या पेशींनी आकार बदलणं, एकमेकींशी संवाद साधणं अशा विविध क्षमता अवगत केल्या. या क्षमता पुढं अजून गुंतागुंतीच्या रचनांच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या ठरणार होत्या. पण विश्वातली कुठलीच अवस्था चिरंजीव नसते, या नियमानुसार साधारण ऐंशी कोटी वर्षांपूर्वी ही स्थिती बदलल्याचं दिसून येऊ लागतं. 

शास्त्रज्ञांचा अंदाज असा आहे, की या दरम्यान पृथ्वीवरील भूखंडांची हालचाल सुरू झाली, ज्यामुळं समुद्राच्या तळाशी हायड्रोथर्मल व्हेंट्स म्हणजे उष्णोदकांचे प्रवाह निर्माण झाले. समुद्रपृष्ठाच्या खूप खोलवरून येणारं हे तप्त पाणी लोहयुक्त असतं. या लोहामुळं पाण्याची रासायनिक रचना बदलली असावी, ज्यामुळं बहुपेशीय जीवांच्या उत्क्रांतीसाठी हळूहळू पोषक वातावरण तयार झालं. पण अशा प्रकारचा जल-वायू-तापमानाच्या रचनाबदलाचा ‘सी-सॉ’चा खेळ काय फक्त याच काळात नाही झाला. विविध स्तरातील दगडांच्या अभ्यासातून असं आढळून आलंय, की पुढच्या काळातही अनेकदा अशी फ्लक्च्युएशन्स घडलेली आहेत, ज्यामुळे जीवसृष्टी उत्पत्ती-लय-विलय या फेऱ्‍यातून अनेकदा गेली आहे. पण आता जीवसृष्टीच्या प्रवासातील अगदी प्राथमिक आणि अचंबित करणाऱ्‍या घडामोडींनी युक्त असा टप्पा संपुष्टात आला होता. ऐंशी ते पासष्ट कोटी वर्षं या काळात आता मृदूकाय शरीराचे जीव उत्क्रांत होत होते. इथपर्यंतच्या या काळाला प्री-कँब्रियन युग असं म्हटलं जातं. आत्तापर्यंत रांगत रांगत कशीबशी एकेक पावलं टाकणारी जीवसृष्टी इथून पुढं नुसती दुडुदुडु धावणार नव्हती, तर झेपा टाकत नवे अवतार घेणार होती. कारण आता कँब्रियन युगाचा उदय झाला होता.

संबंधित बातम्या