असली खेल की शूरूआत!

मकरंद केतकर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

विश्‍वाची गाथा  : एंटरटेनमेंट
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

मंडळी, विश्वाची निर्मिती ते पृथ्वीवरील एकपेशीय जीवांची निर्मिती हा जवळपास चौदा अब्ज वर्षांचा प्रवास आपण आत्तापर्यंत पाहिला आहे. ‘उत्पत्ती-स्थिती-विलय’ या त्रयावस्थांचा एक अद्‍भुत खेळ संथपणे या विश्वाच्या रंगमंचावर सुरू आहे. जवळजवळ दीड ते अडीच अब्ज वर्षं या पटकथेची विविध सूत्रं लिहिण्यात गेली. त्यानंतर एक अब्ज वर्षं पडद्याआड या सूत्रांची जुळवाजुळव, पात्रनिर्मिती, नेपथ्य वगैरे अरेंज करण्यात गेली आणि मग साधारण पंचावन्न कोटी वर्षांपूर्वी नव्या कलाकारांच्या संचासह पृथ्वीच्या रंगमंचावर अवतरलं कँब्रियन युग नावाचं नाट्य. 

या नाट्याची पटकथा इतकी व्यापक होती, की त्यात सतत नवनवीन कलाकारांची एंट्री होताना दिसून येते. जादूचा मंत्र फुंकल्यासारख्या विविध रचना आढळून येतात. निसर्गानं आपल्या प्रतिभेचा जणू भंडाराच उधळला. तुलनेनं अगदी छोट्या काळामध्ये म्हणजे साडेपाच कोटी वर्षांमध्ये प्रचंड जैववैविध्याची निर्मिती झाली आणि म्हणून या काळाला कँब्रियन एक्स्प्लोजन असं म्हटलं जातं. यात आज आढळणाऱ्या अनेक जीवांचे पहिले पूर्वज होते. जसे की शिंपले, पृष्ठवंशीय जीव आणि कोळी, तसंच कीटकांचे म्हणजे संधीपाद जीवांचे कुळपुरूष. कँब्रियन युग नक्की कधीपासून मोजायचं यावर अनेक मतभेद आहेत, पण तरी बहुतांश शास्त्रज्ञांच्या मते ते पंचावन्न कोटी वर्षं ते साडेएकोणपन्नास कोटी वर्षं इतकं असलं पाहिजे. कारण या सुमारास महाजीवसंहार झाल्याच्या खुणा आढळतात.    

आद्य उत्क्रांती शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या गुरूंनी इंग्लंडमधील ज्या भागात पाषाणस्तरांचा अभ्यास केला त्या वेल्स या भागाच्या ‘कँब्रिया’ या रोमन नावावरून या युगाला कँब्रियन असं नाव देण्यात आलं आहे.

पृथ्वीवरील आजच्या जीवसृष्टीचा अभ्यास करता असं लक्षात येतं, की वातावरणाचा खूप मोठा प्रभाव जीवसृष्टीच्या वैशिष्ट्यांवर आहे. म्हणजे पोलर बेअर (हिमअस्वल) हे फक्त उत्तर गोलार्धातील बर्फाळ प्रदेशातच आढळून येतं. कारण तिथली अतिथंड हवा त्याला मानवते. याचप्रकारे तुम्ही भारतातसुद्धा लदाख भागात आढळणारा हिमबिबट्या पाहिलात, तर अगदी केसाळ आणि तिथल्या पिवळट राखाडी दगडांमध्ये लपून जाईल अशा रंगाचा आहे. याच कारणामुळं कुठल्याही काळातील जीवसृष्टी अभ्यासताना सर्वात आधी तिथं काय प्रकारचं वातावरण होतं हे अभ्यासणं अगदी आवश्यक ठरतं. असेच वातावरणाचे पॅटर्न एकदा समजले, की मग बदलत्या वातावरणाला आणि परिस्थितीला जीवसृष्टीतले कुठले घटक कसे रिस्पाँड करतात याचा काहीएक ठोकताळा मांडता येतो. आजपासून पुढं जीवसृष्टीचं काय भविष्य असेल याचाही अंदाज बांधता येतो.

तर, कँब्रियन युगामधील वातावरणाचा अभ्यास करताना असं आढळून येतं, की त्या वेळी ‘रोडीनिया’ नामक एक महाखंड होता जो विस्कटू लागला होता. त्यादरम्यान होणाऱ्‍या भूकवचांच्या हालचालींमुळं भूगर्भातील उष्णता बाहेर पडू लागली होती. पृथ्वीचं तापमान आजच्या तुलनेनं थंड असलं तरी बर्फाळ प्रदेश अक्रसू शकतील इतपत तापमान वाढलं होतं. रोडीनियाचे दोन तुकडे झाले. एक होता ‘गोंडवाना’ जो दक्षिण गोलार्धात होता आणि एक होता ‘लॉरेशिया’ जो उत्तर गोलार्धात होता. गोंडवाना म्हणजे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया वगैरे देश. लॉरेशिया म्हणजे उत्तर अमेरिका, रशिया, युरोप वगैरे आजच्या देशांचा भाग. या दुभाजनामुळं उथळ समुद्रकिनाऱ्‍यांचा मोठा प्रदेश तयार झाला. जीवसृष्टी अद्याप पाण्यातच होती, पण आता तिला नवीन प्रयोगांसाठी मोठी जागा उपलब्ध झाली. या उथळ समुद्राच्या तळाशी सूक्ष्मजीवांच्या वसाहती होत्याच, पण आता त्यांच्यावर उदरभरण करणारे बहुपेशीय जीवही होते. हे तेच बहुपेशीय जीव आहेत, जे बोअरींग बिलियन काळामध्ये संधीची वाट पाहत स्वस्थ बसले होते. याच सुमारास बिळं खोदून राहणाऱ्‍या सूक्ष्म कृमीसदृश जीवांच्या खुणा आढळून येऊ लागतात. हे बायलॅटरल म्हणजे शरीराची डावी आणि उजवी बाजू समान असलेले जीव होते. खरा खेळ आता सुरू झाला होता.

संबंधित बातम्या