...आणि गाडी सुसाट निघाली!

मकरंद केतकर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

विश्‍वाची गाथा  : एंटरटेनमेंट
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

जिनको हमने चलना सिखाया था। वो अपने पाव पे खडे हो गये है।

हम बुढ्ढे हो गये है, बच्चे अब बडे हो गये है।

शायद जीवन चक्र है, पात्र बदलते है, नाटक और स्टेज वही है।

एका हिंदी कवितेतील या ओळी मला कँब्रियन युगाच्या प्रगतीचा अभ्यास करताना खूप चपखल वाटतात. जीवन चक्राची सुरुवात ज्यांनी करून दिली, त्यांचं बोट सोडून आता ही सजीवसृष्टी रांगणं, उभं राहणं, दुडुदुडु धावणं या सगळ्या क्रिया मागं टाकून झेपा टाकत दौडत पुढं निघाली होती. जवळपास पाच साडेपाच कोटी वर्षांच्या ‘अल्प’ काळात जादूची कांडी फिरवल्यासारखी सजीवसृष्टीची अचंबित करणारी प्रगती झाली. यातल्या काही जीवांशी साधर्म्य दाखवणारे जीव आजही अस्तित्वात आहेत. पण अनेक जीव असे होते, की त्यांचं आजच्या जीवांशी काहीही साधर्म्य दिसत नाही. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणं, पृथ्वीचं तापमान उबदार झाल्यामुळं हिमप्रदेश अक्रसून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली व उथळ किनारे तयार झाले. काही शास्त्रज्ञांच्या मते या काळात सायनोबॅक्टेरियांमुळं प्राणवायूची पातळी पुन्हा एकदा वाढली असावी. हे नवे बदल नव्या सजीवांच्या उत्क्रांतीसाठी पोषक ठरले असावेत. मागं म्हटल्याप्रमाणं या दरम्यान मृदुकाय जीव तसंच ‘बायलॅटरल सिस्टीम’ म्हणजेच शरीराची डावी आणि उजवी बाजू समसमान असलेल्या रचना तयार झाल्या. अर्थात हे सगळं आज उपलब्ध असलेल्या जीवाश्मांवरून जुळवलेले कोड्याचे तुकडे आहेत. याचा अर्थ ज्यांचे जीवाश्म नष्ट झाले किंवा ज्यांच्या खुणा मागे राहिल्या नाहीत अशा जीवांचं वैविध्यही कित्येक पटीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कठीण कवचधारी जीवांचा उदय. यामध्ये जसे आजच्या शिंपल्यांशी जवळीक साधणारे जीव होते, तसंच खेकडे, कीटक, कोळी आणि इतर संधीपाद जीवांशी साधर्म्य दाखवणारे जीवही होते. सजीवांच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण कवचाच्या रचनेमुळं त्यांना त्यांच्या शत्रूंपासून संरक्षणाबरोबरच एक छान भक्कम साचा मिळाला, जो त्यांच्या अधिकाधिक मोठ्या होणाऱ्‍या आणि गुंतागुंतीच्या शरीररचनांना आधारदायी ठरला.

कँब्रियन युगाचे ‘स्टार परफॉर्मर्स’ ज्यांना म्हणतात, ते ‘ट्रायलोबाईट्स’ नावाचे जीव होते. शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं अत्यंत लक्षवेधी असलेल्या या प्राण्यांचे जीवाश्म फार मोठ्या प्रमाणात जगभर सापडतात. चपट्या शरीराचे, शरीरावर प्लेट्सची घराच्या कौलांसारखी ओव्हरलॅपिंग रचना असलेले आणि आजच्या कीटकांसारखेच खंडांमध्ये शरीररचना असलेले हे जीव होते. आकारामध्ये जेमतेम एक मिलिमीटर ते दोन फूट इतकं वैविध्य असलेले हे जीव प्राचीन काळातील सर्वात यशस्वी जीव म्हणता येतील. पंचवीस कोटी वर्षांपूर्वी महाविनाश होईपर्यंत यांच्या सुमारे सतरा हजार जाती अस्तित्वात होत्या. त्या काळातील सर्वात मशहूर शिकारी हा कोळंबीसदृश ‘अ‍ॅनोमॅलोकॅरीस’ नावाचा जीव होता. याच्या तोंडात असलेल्या लांबलचक दातेरी अवयवांच्या साहाय्यानं तो शिकार करीत असे. याहून विचित्र असा पाच डोळ्यांचा ओपाबिनिया नामक एक जीव शिकारीसाठी त्याच्या जबड्याला चिकटलेल्या खेकड्याच्या नांगीसारख्या अवयवाचा वापर करीत असे. हे जीव समुद्रतळाजवळ राहून शिकार करीत असत. तत्कालीन समुद्रतळ सायनोबॅक्टेरियांच्या वसाहती व त्यात राहणाऱ्‍या स्पंजसारख्या मृदुकाय शरीराच्या जीवांनी व्यापलेला होता. ते स्वसंरक्षणासाठी ते समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या कॅल्शिअम कार्बोनेटपासून भक्कम भिंती असलेली घरं तयार करत असत.

चीन, कॅनडा, ग्रीनलँड इथल्या कँब्रियनयुगीन गाळाच्या खडकांचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना पृष्ठवंशीय जीवांच्या पहिल्या पूर्वजांचा शोध लागला. या अभ्यासादरम्यान त्याकाळी समुद्राखालील पर्वतरांगांमध्ये (होय, समुद्रातही प्रचंड पर्वतरांगा आहेत) झालेल्या भूस्खलनात ते गाडले गेल्याचं आढळून आलं. या काळात आजच्या जीवांशी साधर्म्य दाखवणाऱ्‍या जवळपास वीस ते पस्तीस विविध शाखा विकसित झाल्या असाव्यात असा अंदाज आहे. जीवन का पहिया अब तेज गतीसे घुमने लगा था।

संबंधित बातम्या