सीमोल्लंघनाची तयारी

मकरंद केतकर
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

विश्‍वाची गाथा  : एंटरटेनमेंट
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...

कँब्रियन युगात जीवसृष्टीच्या वैविध्याला जो बहर आला तो खऱ्‍या अर्थानं आधुनिक जीवसृष्टीचा पाया ठरला. विविधरंगी, विविधढंगी जीव उण्यापुऱ्‍या पाच सहा कोटी वर्षांत उत्क्रांत झाले. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आजच्या ऑक्टोपस, स्क्वीड, गांडूळ, कीटक, कोळी, खेकडे अशा विविध कुळातील प्राण्यांचे हे आद्यपूर्वज होते. हे सगळे अजून पाण्यात राहणारे म्हणजे जलचरच होते. यापैकी गोम या संधीपाद जीवांशी साधर्म्य दाखवणारे जीव फार थोडा काळ जमिनीवर येऊन पाण्यात जात असावेत, असे ५३ कोटी वर्षं जुन्या असलेल्या वालुकाश्मांच्या काही पुराव्यांवरून सांगता येते. कोरड्या जमिनीवर खऱ्‍या अर्थानं सजीवांच्या पाऊलखुणा उमटायला अजून अवकाश होता. पण आता पुन्हा निसर्गाला आजवर काढलेली चित्रं पुसून नव्यानं पाटी सजवायची हुक्की आली. ४९ कोटी वर्षांपूर्वी पुन्हा एकदा सजीवसृष्टीचा महाविनाश घडून आला आणि सजीवांच्या एका सुवर्ण युगाचा अस्त झाला. गदिमांच्या शब्दात सांगायचं, तर जणू ‘अंत उन्नतीचा पतनी, होई या जगात,’ असं सांगत सजीवांची मरणवेळ आली. या नाशाला पुन्हा आलेलं हिमयुग कारणीभूत असावं असा अंदाज आहे. उबदार वातावरणाला सरावलेले जीव या नव्या थंड वातावरणाशी फारसं जुळवून न घेता आल्यानं मरण पावले. नेहमीप्रमाणंच जे या बदलाशी सामना करू शकले, ते पुढं निघाले व त्यांच्यात पुन्हा विविध शारीरिक बदल घडू लागले. आत्तापर्यंत आपण फक्त प्राण्यांच्याच दुनियेबद्दल बोलतोय. पण याच सुमारास वनस्पतीसुद्धा समांतर प्रगती करू लागल्या होत्या. अर्थात प्राण्यांनी जेवढी मोठी झेप घेतली होती, तेवढी मोठी नसली तरी शेवाळाच्या रूपापर्यंत वनस्पती पोचल्या होत्या.

या काळात सजीवांमध्ये मृदुकाय प्राण्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्या अंगावर संरक्षणासाठी कठीण कवच जरी असलं, तरी त्यांचं शरीर गोगलगायीसारखं मऊच होतं. साधारण पन्नास कोटी वर्षांपूर्वी सजीवांची एक शाखा वेगळ्या दिशेनं प्रवास करू लागली. या काळात आपल्याला मत्स्यावताराचं पहिलं दर्शन घडतं. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय विशेष आहे? म्हणजे जसे इतर जीव घडत होते तसाच मासाही घडला असणार ना? पण मित्रांनो माशाची उत्क्रांती ही आजच्या आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं अत्यंत लक्षणीय बाब आहे. कशी ते सांगतो. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणं अत्यंत पोषक वातावरणाच्या तसंच भूखंडांच्या विस्थापनेच्या कृपेमुळं कँब्रियन एक्सप्लोजन घडून आलं. जीवसृष्टीच्या महासृजनात पहिले पृष्ठवंशीय सदृश जीव उत्क्रांत होऊ लागले. याच सजीवांच्या उत्क्रांतीचा मासा हा नवा टप्पा होता. या नव्या जिवाला पाठीचा कणा, त्याला जोडलेला मज्जारज्जू, पाण्यातल्या श्वसनासाठी कल्ले तसंच लांब शेपूट होती आणि म्हणूनच आपल्या शरीररचनेशी तुम्ही तुलना केली, तर मत्स्यावताराचं महत्त्व तुम्हाला सहज कळेल.

हे समुद्राच्या तळाशी राहणारे मुखविहीन म्हणजे जॉ-लेस मासे होते. साधारणपणे, फिशटँकमध्ये काचेला चिकटणारे सकर फिश असतात तसे. कँब्रियन युगाचा अंत होताना जरी सजीवांच्या दुनियेची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असली तरी उत्क्रांतीनं आता चांगलाच वेग पकडला होता. काळाच्या कसोटीत या मुखविहीन माशांना फारसं बस्तान बसवता आलं नाही आणि त्यांच्या बहुतांश प्रजाती नष्ट झाल्या. पण उत्क्रांतीत यशस्वी झाल्यामुळं साधारण पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी शार्क आणि इतर अनेक प्रजातींचे मासे समुद्रात मुक्तपणे संचार करत होते. एकूणच शिकारी आणि शिकार हे दोघंही आता चांगलेच वेगवान झाले होते. जीवनाचा वेग वाढला होता. सजीव आपल्या सतत विकसित होणाऱ्‍या क्षमतांना नव्यानं चॅलेंज करीत होते. यामुळं अन्न तसंच अधिवास या दोन्हीमध्ये स्पर्धा वाढली होती. नव्या पर्यायांचा शोध घेणं सजीवांना क्रमप्राप्त झालं होतं. समुद्राची मर्यादा त्यांना फार काळ जखडून ठेऊ शकणार नव्हती. त्यामुळं पाण्यापलीकडचा प्रदेश आता माशांसकट अनेक प्रकारच्या प्राण्यांना खुणावू लागला होता.

संबंधित बातम्या