कोळशाची कहाणी

मकरंद केतकर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

विश्‍वाची गाथा  
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणं साधारण चाळीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वनस्पती आणि प्राणी अशा दोन्ही सजीवसृष्टींचं एक नवीन पर्व सुरू झालं. त्यांची अशा प्रकारे उत्क्रांती होत गेली, की अनेक सजीवांनी जगण्यासाठी आवश्यक असलेलं भक्षण वगळता, खाऱ्‍या किंवा गोड्या पाण्यावर असलेलं अवलंबित्व कमी केलं किंवा पूर्णपणे संपवलं. त्यांच्या शरीरात फुप्फुसांचा विकास झाला, ज्यामुळं मुक्त स्वरूपातील प्राणवायू श्वसनासाठी वापरता येऊ लागला. शिकार आणि शिकारींची जी साखळी पाण्यामध्ये होती, तिचीच नवीन रूपं कोरड्या जमिनीवर दिसू लागली. आजचे सरपटणारे प्राणी तसंच कीटक यांच्या पहिल्या अवतारांचे जीवाश्म आपल्याला आजही सापडतात. 

दरम्यान, वनस्पती सृष्टीनंही उत्क्रांतीमध्ये प्रचंड मोठा टप्पा गाठला. विविध आकाराच्या आणि रचनेच्या वनस्पती या काळात उत्क्रांत झाल्याचं आढळून येतं. यानंतर साधारण पाच कोटी वर्षांनी कार्बनीफेरस युग सुरू झाल्याच्या खुणा आढळतात. हा जीवसृष्टीच्या उत्क्रांतीमधील अजून एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कार्बन हा सगळ्या सजीवसृष्टीचा पाया आहे. प्रत्येक सजीवामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन आहे. साधारण पस्तीस कोटी ते एकोणतीस कोटी वर्षं लांबीच्या या कालखंडानं वनस्पतीसृष्टीची प्रचंड भरभराट पाहिली. आज आपण, वीजनिर्मितीसाठी कोळसा खाणींमधून जो कोळसा काढतो तो या कार्बनीफेरस युगात फोफावलेल्या महाकाय वृक्ष असलेल्या वनांपासून निर्माण झालेला आहे. प्रचंड प्रमाणात पानं, फांद्या आणि वनस्पतींचे इतर भाग मातीत पडत गाडले जात राहिले. कालांतरानं वरच्या थरांच्या प्रचंड दबावामुळं त्यांचं कोळशात रूपांतर झालं. इतक्या मोठ्या प्रमाणात या युगात कोळसा निर्मिती झाली म्हणून या युगाला हे नाव देण्यात आलं आहे. या युगाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यं आपण पाहू. 

आज पृथ्वीवर सात खंड असले, तरी त्या काळात उत्तर गोलार्धात ‘उत्तर अमेरिका आणि युरोप’ यांचा ‘लॉरेशीया’ आणि दक्षिण गोलार्धात उर्वरित जमिनींचा ‘गोंडवाना’ असे दोनच महाखंड होते. बरीचशी जमीन एकत्रच होती व त्यामुळं पृथ्वीवर जंगलेसुद्धा सलग होती. म्हणूनच आज अमेरिका, युरोप तसेच आशिया अशा विविध खंडांमध्ये कार्बनीफेरस काळातील कोळसा आढळतो. या वनांमध्ये शेवाळापासून गगनचुंबी वृक्षांपर्यंत वैविध्य होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलं फोफावल्यामुळं वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू फार मोठ्या प्रमाणात शोषला गेला व ऑक्सिजनचं प्रमाण अधिक झालं. अधिक म्हणजे किती? तर आज वातावरणात २१ टक्के प्राणवायू आहे. त्या काळात तो ३५ टक्क्यांपर्यंत गेल्याच्या रासायनिक खुणा आढळतात. इतक्या मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध झाल्यानं तत्कालीन कीटकांचे आकारही आजच्या तुलनेत फार मोठे झाले होते. उदा. आज जेमतेम दोन तीन इंच लांब असलेला चतुर, त्या काळात तब्बल २८ इंच लांबीचा होता. आजचे छोटेसे मिलिपीड, झुरळं, विंचू हे प्राणी तेव्हा अनेक फूट लांबीचे होते. याच काळात कीटकांच्या पंखांचा अधिक विकास झाला.

तत्कालीन उभयचरसुद्धा मगरीसारखे मोठे प्राणी होते. उत्क्रांतीमध्ये या प्राण्यांच्या नवीन शाखा विकसित होताना त्यांच्या अंगावर कडक खवले व जाड त्वचा तयार झाली. यामुळं पाण्यापासून लांब जाताना त्वचा कोरडी पडण्याची मर्यादा संपुष्टात आली. याचबरोबर सजीवांनी कठीण कवचानं सुरक्षित द्रव्यामध्ये भ्रूण विकसित करण्याची नवीन पद्धत म्हणजेच अंड्याची निर्मिती केली. यामुळं पाण्याबाहेरसुद्धा सजीवांची निर्मिती होणं शक्य झालं. कार्बनीफेरस युगाच्या मध्यावर म्हणजे साधारण बत्तीस कोटी वर्षांपूर्वी एक छोटासा काळ महाजीवसंहार झालेला आढळतो, जेव्हा या वनांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आणि मोठ्या प्रमाणात कोळसा निर्मिती झाली. या महासंहाराची कारणं अद्याप ठाऊक नसली तरी वनं नष्ट झाल्यामुळं तापमान बदल होऊन या काळात शुष्क वनं व वाळवंट निर्माण झाली.

आता पृथ्वीच्या गर्भात पुन्हा काहीतरी डहुळलं. लाव्हाचे उद्रेक सुरू झाले. पृथ्वीवरचे दोन महाखंड एकत्र येऊ लागले होते. सजीवसृष्टी आता नवी उंची गाठणार होती...   

संबंधित बातम्या