डायनासोर्सच्या आगमनाची पूर्वतयारी

मकरंद केतकर
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

विश्‍वाची गाथा  
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

काहीतरी गमावल्याशिवाय काहीतरी कमावता येत नाही हा आयुष्याचा साधा सरळ नियम आहे. निसर्गाच्या या ‘जीवन’ नावाच्या नाट्यामध्ये सातत्याने कथाबदल होत असतात व त्याला अनुसरून काही पात्रांची एन्ट्री होण्यापूर्वी काहींची एग्झीट ही व्हावीच लागते आणि त्याला इलाज नाही. आताही असंच घडणार होतं. कार्बनीफेरस युग संपुष्टात येऊन पर्मियन युग सुरू होणार होतं. या युगात सरीसृपांच्या नव्या शाखांची उत्पत्ती आणि विलय पाहायला मिळतो. रशियामधील ‘पर्म’ नावाच्या प्रदेशात आढळणाऱ्‍या खडकांमध्ये या काळातील जीवाश्म चांगल्या प्रकारे जपले गेलेले आढळतात म्हणून या युगाचं नाव पर्मियन असं आहे.

मागच्या लेखात आपण पाहिलं, की कार्बनीफेरस युगाच्या शेवटी पृथ्वीवरील अनेक भूभाग एकत्र येऊन एका महाखंडांमध्ये सामावले जात होते. त्याच्या मध्य आणि दक्षिण भागाला पँजिया असं नाव दिलं आहे आणि उत्तर भागाला लॉरेशिया. या महाखंडाच्या भोवती पॅंथालसा नावाचा समुद्र होता. पर्मियन युगाच्या प्रारंभी महाखंडाच्या निर्मितीची ही प्रक्रिया पूर्ण झाली व त्यामुळं तापमान बदल होऊन हळूहळू पर्मियन युगाच्या अखेरीस पृथ्वीवरील आजवरचा सर्वात मोठा महाजीवसंहार घडला. पँजिया भूखंडाच्या अजस्र आकारामुळं सलग मोठ्या पट्ट्यात उष्णताशोषक पृष्ठभाग निर्माण झाला. त्याच्या दक्षिणेला फार मोठ्या प्रमाणात बर्फाळ प्रदेश निर्माण झाले, तर मध्य आणि उत्तर दिशेला उष्ण तापमान होतं. दमट आणि उष्ण हवामानाच्या खेळामुळं इथली कार्बनीफेरस युगातली घनदाट जंगलं नष्ट झाली व त्यांची जागा आता कोरड्या हवामानाला तोंड देऊ शकतील अशा वनस्पतींनी घेतली. तत्कालीन परिस्थिती कशी असेल याची कल्पना करायची झाल्यास आपण महाराष्ट्राच्या भूगोलाकडं पाहू शकतो. महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भरपूर पावसामुळं घनदाट जंगलं आहेत, तर याच सह्याद्रीनं बहुतांश पाऊस अडवल्यामुळं पूर्वेकडं पसरलेल्या दख्खनच्या पठारावर शुष्क काटेरी वनं व गवताळ प्रदेश निर्माण झाले आहेत.

कार्बनीफेरस काळात सरीसृपांची उत्क्रांती होताना त्यांनी विकसित केलेली खवलेधारी त्वचा त्यांना पर्मियन काळात अधिक उपयोगी पडणार होती. या नवीन रचनेच्या त्वचेमुळं शरीरातील पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन त्यांचं जगणं सुकर झालं. पँजियाच्या मध्यवर्ती भागांमध्ये एकाच दिवसात तापमान दोन टोकं गाठत असल्याचं आढळून आलं आहे. रात्री शून्याच्या जवळ जाणारं तापमान दिवसा चाळीस अंशाच्या वर पोचत होते. सरीसृप थंड रक्ताचे जीव असल्यानं त्यांना शरीराच्या तापमान नियंत्रणासाठी बाह्यस्रोतातून उष्णता मिळवावी लागते. तत्कालीन ‘पेलीकॉसोरस’ नामक सरीसृपांच्या पाठीवर जपानी पंख्यासारखी रचना दिसते, जिचा उपयोग ते बहुधा पहाटे कोवळ्या उन्हाची उष्णता शोषण्यासाठी करत असावेत. याच काळात थेरप्सीड नामक जीवांनी सस्तन प्राण्यांप्रमाणे चयापचय प्रक्रियेद्वारे अन्नामधून उष्णता निर्माण करण्याची क्षमता विकसित केली. आजच्या सस्तन प्राण्यांचे हे कुळपुरुष म्हणता येतील. या नव्या क्षमतेमुळं थेरप्सीड्स पर्मियन युगाच्या अखेरीस पँजिया महाखंडातील सर्वात वरचढ प्रजाती ठरले. यांच्यापासूनच पुढं तब्बल एक टन वजन असलेले सरीसृप ते लहानखोर चणीचे व केस असलेले आजच्या सस्तन प्राण्यांसारखे जीव उत्क्रांत झाले. केसांमुळे ते अधिक चांगल्या प्रकारे तापमान नियंत्रण करू शकत होते. यामध्ये अर्थातच शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे जीव होते. याच दरम्यान समुद्रातही माशांच्या अनेक लहानमोठ्या, जाड खवले असलेल्या प्रजाती विकसित झाल्या. जवळपास चार साडेचार कोटी वर्षे चालत आलेला हा खेळ पंचवीस कोटी वर्षांपूर्वी संपला. याला जसं सतत होणारे तापमान बदल कारणीभूत होते, तसंच ज्वालामुखींचे उद्रेक, उल्कापात, मिथेन वायूचं वाढतं प्रमाण अशा इतर घटनांचीही जोड मिळाली असावी असा अंदाज आहे. या काळाच्या अखेरीस जमिनीवरील ७० टक्के, तर समुद्रातली ९० टक्के जैवविविधता संपुष्टात आली. जीवनमृत्यूची ही सीमारेषा फारच कमी प्रजातींना पार करता आली. त्यामुळं सजीवसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली जी आता भरून काढणार होते - डायनासोर्स.

संबंधित बातम्या