नवा गडी नवे राज्य

मकरंद केतकर
सोमवार, 7 डिसेंबर 2020

विश्‍वाची गाथा 
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

श्रीगणेशाची मूर्ती पाहताना आवर्जून तपासली जाणारी गोष्ट म्हणजे त्याच्या चरणांपाशी असलेला छोटुसा उंदीर. वेदशास्त्रपुराणे याला गणेशाने वचक ठेवलेल्या संकटाच्या रूपात पाहत असली, तरी मी या प्राण्याकडे एका वेगळ्याच आदरयुक्त नजरेने पाहतो. आता हे असे का? हे जाणून घ्यायला आपल्याला घड्याळाच्या जन्माच्या खूप मागे जावे लागेल. मागे म्हणजे किती? तर तब्बल वीस-पंचवीस कोटी वर्षे इतके मागे. हा काळ म्हणजे सरीसृपांच्या वर्चस्वाचा काळ होता. शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी असे विविध भक्षी आणि विविध आकारांचे द्वीपाद आणि चतुष्पाद सरीसृप जमीन आणि सागर व्यापून होते. पण, या दरम्यान कुठल्यातरी एका सरपटणाऱ्‍या प्राण्यांच्या शाखेने जरासा वेगळा रस्ता धरला. त्यांच्या अंगावर आता केस उगवू लागले होते. त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत होते. ते अजूनही अंडी घालत होते पण त्यातून बाहेर आलेल्या पिल्लांना दूधही पाजत होते. याचे आजचे उदाहरण म्हणजे प्लॅटिपस आणि एकिडना हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात आढळणारे प्राणी. हा होता सस्तन प्राण्यांचा उदय. 

पण वेगळी वाट अवलंबणाऱ्‍या प्रत्येकाला लगेच यश मिळतेच असे नाही हे आपल्याला इतिहासातून सिद्ध करता येते. सरीसृपांची सद्दी असलेल्या या काळात या नवीन प्रकारच्या जीवांचा शारीरिक विकास होण्यास फार वाव नव्हता. त्यामुळे त्यांना कायम लपून छपून राहावे लागत होते. त्यांच्या या राहणीमानाला साजेसा होईल असा त्यांचा आकारही अगदी छोटा म्हणजे एखाद्या चिचुंद्री किंवा उंदराएवढा होता. अर्थात याबाबतीतही संशोधकांमध्ये मतमतांतरे आहेत, पण सर्वसाधारण हायपोथिसीस असाच आहे.

तर हे होते माणसासकट जगातल्या यच्चयावत सस्तन प्राण्यांचे (अगदी आजचा महाप्रचंड ब्लू व्हेलसुद्धा) आद्यवंशज. प्रतिकूल परिस्थितीपुढे हार न मानता संधीची वाट पाहत ते पुढची कित्येक युगे चोरवाटांनी आयुष्य जगत होते.. आणि अखेर साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा तो दिवस उजाडला.

सोळा-सतरा कोटी वर्षे पृथ्वीवर अधिराज्य गाजवणाऱ्‍या सरीसृपांसाठी तसा तो नेहमीचाच दिवस होता. पण त्यादिवशी सूर्य उगवलाच मुळी मृत्यूच्या क्षितिजावर. अवकाशाच्या गोफणीतून सुटलेली एक अतिअजस्र उल्का ताशी सत्तर हजार किलोमीटर वेगाने, आजच्या मेक्सिकोजवळ येऊन आदळली. सहसा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर वातावरणाशी होणाऱ्‍या घर्षणामुळे लहानसहान उल्का जळून जातात. पण आज डायनासोर्सचे भविष्य ठरलेले होते. या उल्केचा आकार कित्येक किलोमीटर लांबीचा होता. एखाद्या मोठ्या शहराएवढा. कोट्यवधी अणुबाँब एका सेकंदात फुटल्यावर निर्माण होईल इतकी प्रचंड ऊर्जा या आघातातून निर्माण झाली (हिरोशीमा नागासाकीपेक्षा अगणित पट जास्त). हजारो किलोमीटर परिघातल्या डायनासोर्सचा विनाश झाला. या आघातातून उधळल्या गेलेल्या तप्त धुळीने अवघ्या पृथ्वीचे आसमंत व्यापले. पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचेनासा झाला. हे कमी होते म्हणूनच की काय, आपल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती सुरू झाली होती, ज्यातून कित्येक कोटी टन धूर आणि धूळ अवकाशस्थ होत होती. तिच्या वर्षावामुळे समुद्राचे पाणी अ‍ॅसिडिक होऊन तिथले जीवही नष्ट होऊ लागले. इकडे जमिनीवर वनस्पती सृष्टीचा नाश होऊ लागला. मग त्यावर अवलंबून असलेले शाकाहारी जीव.. मग मांसाहारी जीव.. पत्त्यांचा बंगला कोसळायला लागला. जीवसृष्टीवर न भूतो न भविष्यति संकट कोसळले. संकटांची ही मालिका संपायला हजारो वर्षे गेली. जवळजवळ ८० टक्के जीवन नष्ट झाले. परंतु, चिवट जीवसृष्टीने हा आघातही पचवला. मृत्यूच्या पाऊलखुणांमधूनच नवीन रचनांची पाती उगवली आणि सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. सरीसृपांची सद्दी संपल्याने सस्तन प्राण्यांना आता भरपूर वाव मिळाला. डायनासोर्सच्या युगात चिचुंद्रीएवढे असणारे सस्तन प्राणी आता गरजेनुसार नव्या आकारात आणि रूपात उत्क्रांत होऊ लागले. इथून पुढे जणू त्यांचेच राज्य असणार होते. या नव्या रूपातल्या प्राण्यांबद्दल अधिक माहिती पुढील लेखात घेऊ.

संबंधित बातम्या