फिटे अंधाराचे जाळे

मकरंद केतकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

विश्‍वाची गाथा  
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

पृथ्वीवर एक महाकाय उल्का आदळते काय आणि सजीवांच्या उत्क्रांतीची दिशाच बदलते काय. सगळेच अद्‍भुत. आरशावर पडलेल्या प्रकाशझोताने अँगल बदलून दुसरीकडेच परावर्तित व्हावे, तसे काहीसे. पण हे नेमके असेच घडले हे कसे कळले? तर १९८० मध्ये शास्त्रज्ञांना मातीच्या अशा एका पट्ट्याच्या शोध लागला, ज्याच्या खालच्या थरात क्रेटॅशियस युगातले जीवाश्म सापडतात आणि वरच्या थरात टर्शरी युगातले जीवाश्म सापडले. पण या मधल्या पट्ट्यात महाविनाश झाल्यामुळे विशेष जीवाश्म सापडत नाहीत. याला K-T boundary (क्रेटॅशियस - टर्शरी बाऊंडरी) असे नाव दिले आहे. संपूर्ण जगभर मातीचा हा विशिष्ट पट्टा सापडतो. या काळात घडलेल्या इतर घटनाही महाविनाशाला पूरक होत्या. उदा. भूखंडांचे विलगीकरण, दख्खनच्या पठारावरील लाव्हाचे उद्रेक, बदलते वातावरण इ. पण महाविनाश झाला आणि सस्तन प्राण्यांनी ‘मौके पे चौका मारला’ हा सर्वमान्य सिद्धान्त आहे.

फार मोठा काळ अंधारात वावरणाऱ्‍या छोट्या सस्तन प्राण्यांनी आत्मसात केलेली शारीरिक वैशिष्ट्ये आपल्याला आजही अनेक प्राण्यांमध्ये दिसतात. उदा. अनेक प्राण्यांचे डोळे रात्री प्रकाशझोत पडला की अंधारात चमकतात. याचे कारण त्यामध्ये असलेला ‘टॅपेटम ल्युसिडम’ नावाचा पडदा, जो अंधूक प्रकाशही गोळा करून डोळ्यातल्या पेशींना पुरवतो. तसेच प्राण्यांच्या तोंडाभोवती असलेल्या स्पृशा, ज्यांचा उपयोग प्राचीन सस्तन प्राण्यांना अंधारात सभोवतालचा अंदाज घेण्यासाठी होत असे व आजही होतो. डायनासोर्सच्या विनाशानंतर ‘फिटे अंधाराचे जाळे’ या काव्यपंक्तींना सिद्ध करणारी फार मोठी झेप सस्तन प्राण्यांनी पुढच्या काळात घेतली आणि विशेष गोष्ट म्हणजे, शास्त्रज्ञांना सस्तन प्राण्यांची उत्क्रांती वनस्पतींच्या अस्तित्वावर अवलंबून असल्याचे पुरावे सापडले आहेत. अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात ‘कोरल ब्लफ’ या ठिकाणी अश्मीकरण झालेल्या चिखलात याचे संकेत देणाऱ्‍या खुणा आहेत. महाविनाश होण्यापूर्वी जिथे मुंगसाच्या आकाराचे प्राणी हिंडत होते, तिथे महाविनाशानंतर पुढच्या जेमतेम हजार वर्षांत उंदरांसारखे सस्तन प्राणी हिंडू लागले. यावेळी तिथे नेचे कुळातील वनस्पतींचे प्राबल्य होते. पुढच्या लाखभर वर्षात तिथे पुन्हा मुंगसासारखे प्राणी वावरू लागले, पण यावेळी नेच्यांची जागा नारळवर्गातील वनस्पतींनी घेतलेली होती. पुढच्या दोन लाख वर्षांत तिथे एखाद्या सर्वसाधारण कुत्र्याच्या आकाराचे प्राणी वावरू लागले व यावेळी या परिसरात अक्रोड प्रकारातील वनस्पतींचे राज्य होते. सुमारे सात लाख वर्षांनी याच जागी चांगले पन्नास एक किलोचे प्राणी नांदत होते, जेव्हा कडधान्य कुळातील वनस्पती बाहुबली झाल्या होत्या. कडधान्यांमधून अधिक प्रोटिन्स मिळतात व यामुळे प्राण्याच्या शरीराला उत्तम पोषण मिळून त्यांचा आकार वाढण्यास मदत झाली.

याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामुख्याने अंधारात वावरणारे सस्तन प्राणी नव्याने उत्क्रांत होताना भय चेपल्यामुळे जेमतेम दोन लाख वर्षांत दिवसाढवळ्या हिंडू लागले. दोन लाख वर्षे म्हणजे तसा क्षुल्लक काळ आणि म्हणूनच ही प्रगती नेत्रदीपक म्हणावी अशीच आहे.

पण फक्त जमीनच नाही तर साधारण पाच कोटी वर्षांपूर्वी समुद्रातही सस्तन प्राण्यांनी शिरकाव केला, ज्यांचे पूर्वज कुत्र्यासारखे दिसणारे प्राणी होते. पाण्यामध्ये उपलब्ध असलेले मुबलक अन्न आणि जमिनीवर चालण्याच्या तुलनेत पाण्यात तरंगायला लागणारे कमी कष्ट यामुळे तिथे त्यांची भरभराट झाली. तसेच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे क्रिल्ससारखे जीव त्यांचे प्रमुख अन्न झाल्याने त्यांना पकडण्यासाठी व्हेल्सच्या जबड्याची रचनाही त्यानुसार बदलली. तसेच पाण्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक प्रमाणात उष्णता शोषणे आवश्यक झाले व त्यामुळे त्यांचा आकारही हळूहळू वाढत गेला.

कालौघात सस्तन प्राण्यांची विभागणी तीन भागात झाली. ‘प्लासेंटल’ म्हणजे गर्भाशयातच पूर्ण वाढ होणारे, ‘मार्सुपियल्स’ म्हणजे थोडीशी वाढ गर्भाशयात आणि पोटावर असलेल्या पिशवीत उरलेली वाढ  होणारे. उदा. कांगारू आणि ‘मोनोट्रेम्स’ म्हणजे अंड घालणारे पण पिल्लाला दूध पाजणारे, जसे की न्यूझीलंडमधील प्लॅटिपस. पुढच्या लेखात आपण सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या प्रगतीचा धावता आढावा घेऊ.

संबंधित बातम्या