इतिहास खोटे सांगणार नाही

मकरंद केतकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

विश्‍वाची गाथा  
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपली सौरमाला कशी तयार झाली? पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आधी पृथ्वीवर कोणकोणते सजीव राहून गेले? डोंगर-दऱ्या कशा तयार झाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता भौगोलिक सफर...
मकरंद केतकर

...आणि ... आणि आज आपण मानवी संस्कृतीचा नवा दिवस पाहणारे भाग्यवान आहोत. जगलेलो.. वाचलेलो.. उद्याबाबत अनभिज्ञ असलेलो. गेले वर्षभर आपण आजवर उलगडलेल्या एका अद्‍भुत इतिहासाचा मागोवा घेत आहोत. कोण्या एका बिंदूतून महाविस्फोट होऊन निर्माण झालेले हे विश्व. कोण्या एका पेशीला मिळालेल्या स्वप्रतिमानिर्मितीच्या अज्ञात प्रेरणेतून उभे राहिलेले हे सजीव सृष्टीचे नाट्य आणि तसेच कोण्या एका कपीच्या जनुकांमध्ये झालेल्या बदलातून उभी राहिलेली ही मानवी सृष्टी. मला तर स्वत:कडे बघताना अनेकदा ‘जब वी मेट’ या सिनेमातला डायलॉग आठवतो. ‘जिंदगी ट्रेन की पटरी है। एक इंच का बेंड और मीलो की दूरी।’ 

जनुकीय दृष्ट्या माणसाच्या सर्वात जवळचे मानले गेलेले चिंपांझी आणि आपल्या डीएनएमध्ये जेमतेम एक टक्क्याचा फरक आहे. पण यातून निर्माण झालेला नर आणि वानर यातला फरक थक्क करणारा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आलेला कोविड १९ ऊर्फ कोरोनासुद्धा असाच एका बिंदूतून पसरत गेलेला विषाणू. लोक म्हणतात आधुनिकतेच्या हव्यासापोटी माणसाने पृथ्वीचा नाश आरंभला आहे आणि निसर्ग त्याचीच परतफेड करतो आहे. असेलही. ‘व्हॉट गोज अराउण्ड कम्स अराउण्ड.’ जे पेरतो तेच उगवते. पण हा नाश आज नव्याने घडत आहे का हो? परत इतिहासात डोकावून पाहिले तर दिसते की माणसाच्या हातून निसर्गाचा नाश तर हजारो वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. अमेरिकेतल्या हत्तींच्या प्रजातींसकट जगभरातील विविध प्राण्यांना आदिमानवानेच नष्ट केले आहे. जेव्हा माणसाला शोध लागला की मूठभर पेरल्यावर पोतेभर उगवते तेव्हापासून तीव्रता अधिकच वाढली. पण यांत्रिकीकरणाने हा वेग अफाट वाढला एवढे मात्र खरे. 

नुकत्याच पुण्यात झालेल्या रानगव्याच्या गोंधळाने निसर्गाच्या या नुकसानीची चर्चा आणि त्यातून पुणेकरांना दोष देणे अधिकच उफाळून आले. मला खरेतर यात गर्दीचे काही चुकले असे अजिबात वाटत नाही. कारण हा सगळा खेळ मूलतः मानवी प्रवृत्तीचा होता, आहे आणि राहील. आणि त्यालाच नियंत्रित करण्यासाठी शासनकर्त्यांनी सिस्टिम्स लावलेल्या आहेत. माझ्या निरीक्षणानुसार माणूस वैयक्तिक पातळीवर चटकन सुधारतो पण सामाजिक पातळीवर लवकर सुधारत नाही. म्हणजे तो गर्दीत शिरला की त्याचा शहाणपणा हरवतो आणि बेफिकिरी वाढते. कारण संकट आलेच तर ते अंगावर घ्यायला अनेक जण सोबत असतात आणि स्वतःचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच गर्दी बोलवावी लागत नाही. गर्दी आपोआप जमते. या सगळ्याचे बीज माणसाच्या उत्क्रांतीत दडलेले आहे. माणूस सुरुवातीला टोळीने शिकार करायचा. यासाठी सगळ्यांनी नैसर्गिकरीत्या एकत्र यावे लागते. त्यासाठी एक अंतःप्रेरणा लागते, परस्पर सामंजस्य लागते, चेहरे वाचता यावे लागतात. लाखो वर्षे याप्रकारे जीवन जगलेल्या माणसाच्या जनुकांमध्ये आजही हे कोडिंग अस्तित्वात आहे. म्हणूनच माणसे पाठलाग करतात, आरडाओरडा करतात, शिट्ट्या वाजवतात, टाळ्या वाजवतात. कारण एकच.. सावजाला भेदरवून गलितगात्र करणे. भले आज शिकार करत नसू पण या वागण्यामागे मूळ प्रेरणा तीच आहे. एखादी गोष्ट करू नको सांगितले की ती मुद्दाम करायची (रुल्स आर मेन्ट टू बी ब्रोकन) ही मानवी स्वभावातली खोड आपल्या पूर्वजांनी खूप पूर्वीच ओळखली होती आणि म्हणूनच देवराया किंवा पवित्र पाणवठे रक्षित करण्यासाठी त्यांनी शाप तसेच उग्र देवी देवता यांचे धार्मिक कवच या नैसर्गिक साधनांभोवती निर्माण केले होते. थोडक्यात काय तर कितीही प्रबोधन केले तरी जेव्हा प्रसंग येतो तेव्हा माणसे या अंतःप्रेरणेचेच ऐकतात. पण मला खात्री आहे की मूर्खपणाकडे गेलेला मानवी अस्तित्वाचा लंबक परत शहाणपणाकडे येईल. कदाचित तोपर्यंत फक्त मूठभर वाचलेले असतील. पण ते मूठभर वाचलेले नवा अध्याय लिहायला समर्थ असतील. सजीव सृष्टीचा कोट्यवधी वर्षांचा इतिहास साक्षी आहे, तो खोटे नाही सांगणार.

(समाप्त)

संबंधित बातम्या