वाचक लिहितात...

वाचक
बुधवार, 21 मार्च 2018

आजीची आठवण आली 

आजीची आठवण आली 
माझी आजी पापड लाटून घर चालवायची. तिने तिचा संसार वाळवणातून उभा केला. ‘सकाळ साप्ताहिका’त (ता. ३ मार्च) जो वाळवणाचा विषय प्रसिद्ध झाला आहे, ते वाचून माझ्या आजीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी तिला नानी म्हणायचे. मी खूप लहान होते, फारसे आठवत नाही. पण ममी म्हणते, पापड लाटण्यात तिची हयात गेली. ती पापडाच मसाल्याच्या लोया करायची. तिच्या अगदी अखेरी अखेरीपर्यंत ती पापड लाटत असे. माझ्या मनाच्या कोपऱ्यात ती कायम असते आणि तिच्या पापडाचे बेलनही! नदीपात्रात काही छोटी घरे आहेत. तिथे रस्त्यावर नेहमी पापड लाटत असतात. ते बघूनही तिच्या आठवणीने मला गहिवरून येते. वाळवणाच्या अंकामुळे या सगळ्या आठवणी पुन्हा दाटून आल्या. 
- अमृता देसर्डा, पुणे 

वाळवणाची धमालघाई 
‘सकाळ साप्ताहिक’मधील वाळवणाचे पदार्थ बघून खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. उन्हाळ्याची चाहूल लागली की घरोघरी वाळवणाचे पदार्थ करण्याचे बेत होत असत. कोणाला कोणते पदार्थ किती करायचे यावर चर्चा होई. मग त्याचे हिशेब मांडून एकाच ठिकाणी ते केले जात. आम्हा मुलींची गडबड असे. पापड लाटण्याचे, कुरडयांचा चीक करण्याचा प्रचंड उत्साह असे. पण करताना दमछाक होई. मग आम्ही केलेले अर्धवट काम कोणती तरी काकू, मावशी पूर्ण करत असे. गल्ली गल्लीत ही धमाल असे. 
- प्रेरणा जोग, संगमनेर 

छान किती ते फुलपाखरू 
‘सकाळ साप्ताहिक’मधील मुलांचे पान मधील लेखन मी नियमित वाचतो. त्यातील ‘गंमतगोष्ट’ हे मृणालिनी वनारसे यांचे सदर विशेष आवडीचे आहे. एका लेखात त्यांनी फुलपाखराचे वर्णन अतिशय सुंदर केले आहे. असे वर्णन मी यापूर्वी वाचलेले नाही. यात बायॉलॉजी, इकॉलॉजी, सायकॉलॉजी या सगळ्याचेच मिश्रण आहे. लांडगा-कुत्र्याचे संदर्भही भन्नाट आहेत. ते वाचून प्रत्येक मूल नक्कीच विचार करेल. मुलांसाठी ही सगळी माहिती आदर्श अशीच आहे. 
- उदय सुभेदार, पुणे

स्वयंपाकाचा अनुभव
माझा एक अनुभव सांगावासा वाटतो... माझी पत्नी, २०१३ ते २०१६ या काळात दुर्धर आजाराने आजारी होती. या आजारपणातच तिचे २०१६ मध्ये निधन झाले. पत्नी आजारी असताना घरातील सर्व कामांची जबाबदारी माझ्यावर आली. या आधी दूध तापवणे आणि चहा करणे याशिवाय कुठलेही काम मी केलेल नव्हते, पण हळूहळू पोहे, उपमा, इडली, खिचडी, वरण भात लावणे, पुलाव करणे या सर्व गोष्टी शिकलो. स्वयंपाक करतानाचा वेळ चांगला जात असल्याने मला स्वयंपाकाची गोडी लागली. त्यातूनच स्वयंपाकाचे नवनवीन प्रयोग केले. भाजीला चांगली चव यावी म्हणून एक छोटा प्रयोग मी केला तो येथे देत आहे...
भाजलेले शेंगदाणे, थोडे तीळ व फुटाणे डाळ, पाव चमचा मेथीचे दाणे एकत्र करून थोडेसे तांबूस रंगाचे होईपर्यंत गॅसवर भाजून घेतले. नंतर हे सर्व मिश्रण एक करून मिक्‍सरवर बारीक करून घेतले. हा कूट कुठल्याही भाजीमध्ये घातल्यास भाजीला खूप चांगली चव येते.

शाम दिगंबर कुलकर्णी
बिबवेवाडी, पुणे

संबंधित बातम्या