वाचक लिहितात...

 वाचक
गुरुवार, 22 मार्च 2018

वाचक लिहितात...

निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. 
पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

मनाची बैठक सकारात्मक असावी
सकाळ साप्ताहिकाच्या (१७ मार्च २०१८) अंकातील ‘सुख म्हणजे काय रे भाऊ?’ हा डॉ. विद्याधर बापट यांचा लेख फार आवडला. खरोखर ईश्‍वराने आपल्याला जे चांगलं दिलं आहे त्याबद्दल कितीजण आणि कितीदा त्यांचे आभार मानतो? कारण, आहे त्यातून आनंद निर्माण करायचा व तो इतरांना वाटायचा हे आपण शिकलोच नाही असेच म्हणावे लागेल. अगदी क्षुुल्लक अशा गोष्टींतून आनंद निर्माण करण्याची कलाच आपणांस अवगत नाही, बापटांनी चर्मकाराच्या उदाहरणातून हे सुंदररित्या विशद केले आहे. आपल्या मनाची बैठक सकारात्मक असावी हे ते आवर्जून सांगतात. ही किमया प्रयासाने का होईना आत्मसात केली, तर ‘‘आनंदाचे डोही आनंद तरंगे’’ अशी मानसिकता होण्यास वेळ लागणार नाही.
- प्रेमला शिरोळकर, पुणे

सकारात्मक विचारसरणी पाहिजे!
‘सकाळ साप्ताहिक’ मधील डॉ. विद्याधर बापट यांचे हितगूज सदर खूप आवडले. या सदरातील (१७ मार्च २०१८) ‘सुख म्हणजे काय रे भाऊ?’ हा लेख आवडला. लेखातून जीवनात प्रत्येक क्षणाला आनंदी कसं राहायचं याची उत्कृष्ट माहिती मिळाली. कृतज्ञता जोपासण्यासाठीच्या टिप्स मिळाल्या. लेखातून व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा याची उत्तम माहिती मिळाली. खरोखरच हा लेख सुंदर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने, नागरिकाने या लेखातून जीवनात आदर्श निर्माण करावा.
- समर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर

उपयुक्त ‘कुकिंग-बिकिंग’
मी ‘सकाळ साप्ताहिक’चा नियमित वाचक आहे. नवीन वर्षापासून ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये सुरू करण्यात आलेली नवीन सदरे व प्रसिद्ध होणारे लेख अत्यंत वाचनीय आहेत. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. नवीन सदरांपैकी  ’स्वयंपाक कसा करावा’ हे सांगणारे ‘कुकिंग-बिकींग’ नावाचे सदर फार अप्रतिम आहे. या सदराचा मलाही अत्यंत उपयोग होतो. या सदरात देण्यात येणारा प्रत्येक पदार्थ मी स्वतः करून बघतो आणि माझ्या नातवंडासह मिळून खातो. फार छान आणि सोप्या पदार्थांच्या पाककृती या सदरात दिल्या जातात.
- अनिल निंबाळकर, कोल्हापूर

 

संबंधित बातम्या